स्वेच्छामरण चळवळीचा आरंभ व्हायलाच हवा!
‘स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज’ हा आजचा सुधारक सप्टेंबर ९७ मधील लेख वाचला. लेखाच्या विषयाबद्दल कोणतेही दुमत नाही. फक्त स्वेच्छामरण ह्या शब्दाच्या विविध छटा आणि ते स्वीकारण्याचे नियोजित मार्ग याविषयी काही मुद्दे मांडावेसे वाटतात.
आयुष्य पुरेसे जगून झाल्यानंतर म्हणजेच त्यातील स्वारस्य कमी झाल्यानंतर मरण स्वीकारण्याचा मार्ग कायद्याने मोकळा असावा आणि नसला तर तो करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ती वेळ आता आली आहे हे निश्चित. पण त्यासाठी आत्महत्येकरिता पोटॅशियम सायनाईड पुरविण्यापेक्षा सांगलीचे वि.रा. लिमये यांनी सुचविलेली महानिर्वाण गृहे व त्यांच्या माध्यमातून तज्ज्ञांकरवी दिले जाणारे विनायास मरण ही कल्पना अधिक व्यवहार्य वाटते. कारण सद्विचारांनी प्रभावित असणे आणि प्रत्यक्ष आचरणात सदासर्वकाळ सद्विचारांचा अवलंब करीत असणे यात सामान्य माणसांच्या आयुष्यात नेहमीच अंतर असलेले आपण पाहतो, आणि अशावेळी सदाचाराच्या मार्गावर माणूस चालावा यासाठी सामाजिक नीतिनियमांच्या चौकटी, धर्मकल्पना इ. गोष्टींची सामान्य माणसाला आजवर मदतच होत आलेली आहे. अशीच स्वेच्छामरणाच्या बाबतीत, सामान्य माणसाला मदत होईल तर ती वि.रा. लिमये यांच्या प्रस्तावित योजनेतूनच असे वाटते. कारण आत्महत्या करायची असे म्हटले तर ज्या जीवनावर पराकोटीचे प्रेम केले म्हणा, किंवा निष्ठा ठेवली म्हणा, त्याचा स्वतःच्या बुद्धीने शेवट करायचे ठरविले तर कदाचित भावना त्यात आडवी येऊ शकेल आणि अंतिम कृतीच्या वेळी धैर्य कमी पडू शकेल. सामान्य माणसांच्या बाबतीत ही शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच अंतिम कृतीच्या वेळी दुसर्यााची, तज्ज्ञांची मदत घेणेच व्यवहार्य ठरेल असे वाटते. त्यात आत्महत्येची ही कृती करताना आपण एकटे नाही, समाजाविरुद्ध काही वागत नाही, गैरकृत्य करत नाही हे समाधान त्या सामान्य पापभीरू व्यक्तीला सोबत करील, धैर्य देईल.
कुटुंब-नियोजन आणि स्वेच्छामरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजून विचार करणे ही आता काळाची गरज बनली आहे. संततिनियमन अंगवळणी पडण्यास जेवढा कालावधी घालवावा लागला तेवढा कालावधी स्वेच्छामरण अंगवळणी पडण्यात वाया घालविण्याची मुळीच आवश्यकता नाही, व प्रस्तुत लेखकाने सुचविल्याप्रमाणे ज्येष्ठनागरिक संघटनांनी या कामात पुढाकार घेण्याची अपेक्षा करण्यापेक्षा तरुण सभासद असणार्याा सामाजिक संघटनांनीच या कामात पुढाकार घ्यायला हवा असे, एक तरुणी असूनही, माझे मत आहे. कारण उतारवयात पेन्शन किंवा तत्सम उत्पन्नाचे नियोजन ज्याप्रमाणे आपण तरुणपणीच करतो, त्याचप्रमाणे हेही एका अर्थी नियोजनच आहे व या मूलभूत नियोजनामुळे तरुणांना आनुषंगिक आर्थिक, मानसिक नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे. म्हणजेच वयाच्या पंचविशीपर्यंत आर्थिक बाजूची निश्चित झाल्यानंतर पस्तीशीपर्यंत आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. पन्नाशीपर्यंत प्रत्यक्ष उत्पन्न मिळवीत राहून त्यानंतर पन्नास ते साठ पर्यंत निमआराम व पूर्ण आराम दर्जाचे आयुष्य स्वच्छंदपणे उपभोगून साठ ते पासष्ट च्या दरम्यान शारीरिक स्थितीवर अवलंबून राहून इच्छामरण स्वीकारता येईल. अर्थात वृद्धांची मनोवृत्ति हा वेगळा अभ्यासाचा विषय असून, खरोखरच वय झाल्यानंतर ‘जगणे पूर्ण झाले असे वाटते का याविषयी मानसशास्त्रज्ञांनी मतप्रदर्शन व मार्गदर्शन करणे उचित ठरेल असे वाटते. आम्ही इतरांना नकोसे आहोत म्हणून आम्हाला इच्छामरण द्या’ ही मानसिकता असणे सामाजिकआरोग्याच्या दृष्टीने विघातकच ठरेल असे वाटते.
स्वेच्छामरण कायद्याच्या चळवळीविषयी मला व्यक्तिश: अत्यंत आत्मीयता असून त्याविषयीच्या प्रत्यक्ष कार्यात सहभागी होण्याची इच्छाही आहेच. मात्र कार्य नक्की काय असेल, रूपरेषा काय असणार याविषयी ठोस योजना समोर नसून कल्पना अस्पष्ट आहेत. म्हणूनच तज्ज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.
कृत्तिका सोसायटी, ४ सी २, कोथरूड, पुणे-२९ मंजिरी घाटपांडे
निमित्त मुलीच्या विवाहाचे
१९६० साली माझ्या मुलीचा विवाह ब्राह्मसंस्कारपद्धतीने, म्हणजेच वैदिक पद्धतीने झाला. दोन्ही पक्षांचे पौरोहित्य करण्याचे वाते गुरुजींनी कबूल केले. त्यांनी मागितली ती म्हणजे रुपये पन्नास दक्षिणा मी कबूल केली.
एखाद्या स्नेहसंमेलनाचे जसे विभाग कल्पून, त्या त्या विभागाची जबाबदारी प्रमुखावर सोपवावी, तशी माझ्या मित्रांनी जबाबदारी स्वीकारली व पार पाडली.
लग्नाला बाहेरगावाहून कोणालाही न बोलावण्याचे ठरले. बाहेरगावच्या कोणालाही निमंत्रणे गेली नाहीत. गांवांतील परिचितांना मात्र भेदभाव न करता सर्वांना निमंत्रण-पत्रेगेली. पोस्टकार्डावरच निमंत्रण पत्रिका छापल्यामुळे निमंत्रणे पोस्टानेच पोचली. वाजंत्रीवाले कालू व श्रावण यांनी देखील छापील निमंत्रण अगदी अगत्याचे मानून दोघेही हजर राहिले व त्यांनी वाजंत्री वाजवली.
स्वागत, हारतुरे, अत्तरगुलाब, बिछाईत, सभामंडपशोभा, पंगत, पाकशाळा, असे सर्व विभाग ज्याने त्याने सांभाळले. कोठीघर तर इतके हिशेबी ठरले की धान्यधुन्य, वगैरेच्या पिशव्या रिकाम्या झालेल्या झटकून टाकता आल्या.
वरपक्षाचे सहकार्य कमालीचे आपुलकीचे लाभले.
लग्नाचे वेळी राममंदिराचा सभामंडप गच्च भरला होता. पंगत झाली तीनशे पात्रांची. खर्च अंदाजपत्रकाबाहेर गेला नाही.
बाहेरगावच्या नातेवाइकांच्या व इष्टमित्रांच्या शुभेच्छा पोष्टाने आल्या. वधूचा भाऊ म्हणजे माझा मुलगा, वधूची आजी म्हणजे माझी आई हे देखील बाहेरगावी होते, ते आले नाहीत व रुसलेही नाहीत.
चाकोरी मोडली. पण किंमत मोजावी लागली नाही!
ना. वा. गोखले