ब्रेन-ड्रेन – दुसरी बाजू

संपादक आजचा सुधारक, नागपूर.
स.न.वि.वि.
ऑक्टोबर महिन्याचा आजचा सुधारक वाचला. या अंकातील पान २१८ वरील ‘कावळे आणि कोकिळा’ हा सुभाष म, आठले, कोल्हापूर, यांचा लेख छापून आपण आपल्या मासिकास खालच्या दर्जावर उतरविले आहे. कोणतीही आकडेवारी किंवा संशोधन याचा आधार न घेता, प्रस्तुत लेखकाने अतिशय बेजबाबदार विधाने केलेली आहेत. उपमेचा आधार घेऊनही लेखकाला नेमक्या सामाजिक वैगुण्यावर बोट ठेवणे जमलेले नाही. एखाद्या ‘मिसफिट’ ठरलेल्या व्यक्तीवरून जर लेखकाचा मानसिक उद्रेक बाहेर पडलेला असेल तर त्या ‘मिसफिट्’ केसबद्दल विस्तृत माहिती उदाहरणादाखल त्याने द्यावयास हवी होती.‘कुतरओढ’ होणारी एखादी व्यक्ती लघुकथेचा विषय होऊ शकेल, निबंधाचा नव्हे. पाश्चात्य देशांकडे वळणारे आपले सुशिक्षित सर्व ‘कुतरओढ’ अनुभवीत जगत नसतात हे निश्चित!
परस्परविरोधी विधाने करीत लेखकाने काय साधले आहे तेच कळत नाही. इंग्रजी माध्यमांत शिकलेली मुले, मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांना मागे टाकतात’ ‘हे स्पर्धाविषयक सत्य मानत असतानाच, राज्यव्यवस्थेच्या माथ्यावर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या अपयशाचे खापर लेखक का फोडत आहे?संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, इंग्रजी माध्यमांच्या शाळांत ‘मराठी’ ही रीजनल लँग्वेज अत्यावश्यक (compulsory) आहे, हे लेखकास ठाऊक नाही?के.जी. चा एखादा विद्यार्थी सोमवार, मंगळवार चा अर्थ जाणत नसेल – केवळ त्यालाच नजरेसमोर ठेवून हा लेख लिहिला असावा. पूर्वी चहा पिणे हे एक व्यसन समजले जाई. इंग्रजांचा ‘टी’ म्हणून हे पेय आज आपण नाकारतो का?तद्वतच बूट, पेहेराव, टॅकसूट ह्यांना हिणविण्याची गरजच नाही. मुळातच या गोष्टी संस्कृतिदर्शक नाहीतच. संस्कृती जपणारे सुसंस्कृत मन हे कोणत्याही माध्यमातून शिकले तरी, आपल्या मुलांवर, शुभंकरोति ते ज्ञानेश्वरी हे सुसंस्कार सहजतया करत असते, व ‘पिझा’ ‘पोटॅटो चिप्स’ मुलांना खायला देता देता, मालती कारवारकरांचे अत्याधुनिक ‘आहारशास्त्रही स्वगृही बाळगून असते. ‘कॉमिक्स’द्वारे रामायण-महाभारत वाचले तर बिघडले कुठे? वेगवान जीवनात, आजी-आजोबा आपापल्या व्यवसायात मग्न असतीलत्यांना नातवंडांना गोष्टी सांगण्यास वेळ मिळत नसेल, तर कॉमिक्स ती भूक भागवू शकतात. संस्कृत न समजताही पंचतंत्राचा खजिना कॉमिक्सद्वारे मुलांना मिळतो आहे हा इंग्रजी भाषेचाच महिमा आहे.
श्री आठले लिहितात, ‘थोड्या बुद्धिमान मुलांना पाश्चात्त्य समाज निवडून तिकडे पाश्चात्त्य देशांत घेऊन जातो व तिकडे त्यांच्याकडून त्यांना कंटाळवाणी वाटणारी, डोळेफोड करायला लावणारी कामे करून घेतो. हे विधान साफ चुकीचे आहे. मुळातच ‘ब्रेन-ड्रेन’ हा विषय व्यापक स्वरूपात वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो. तूर्त एकच कारण मांडते.‘जॉब सॅटिस्फॅक्शन’ – कामातून मिळणारा आनंद – हे ब्रेन-ड्रेनच्या अनेक कारणांपैकी एक आहे. उच्च बुद्धयंक असणारी, आय्.आय्.टी. सारख्या मान्यवर संस्थांतील पदवीधर मुले ही काय केवळ ‘डोकेफोड करून कंटाळवाणी काम करण्यास परदेशी जातात?त्यांच्या बुद्धीस अधिक ज्ञानाची हाव असते. जी फक्त पाश्चात्त्य देशातील वाचनालयेच पुरी करू शकतात. तेथील शिक्षणपद्धती, वशिलेबाजीने बरबटलेली नसल्यामुळेच आपल्या भारतीय बुद्धिवंतांना तिथे गुणवत्तेवर युनिव्हर्सिट्यांत प्रवेश मिळतो. (G.R.E, Toffell सारख्या परीक्षा ही गुणवत्ता सिद्ध करतात.) प्रवेश मिळाल्यानंतरही, नोकरी करीत, ज्ञानसंपादन करण्याची सुविधा तेथेच प्राप्त होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही पुढील संशोधनास तेथे सुविधा मिळत राहतात. आपली मुले या सर्व सुविधांचा फायदा घेत घेत ज्ञानसंवर्धन, संशोधन करीत, आपापल्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळवीत राहतात. तेथे वयाचेही बंधन शिक्षणास नसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेनागपूरच्या रिटायर्ड झालेल्या वनस्पतिशास्त्रज्ञ सौ. श्यामला चितळे या वय झाल्यावरही अद्याप कार्यरत आहेत. स्वत:चे संशोधन संपवून!
(मूळ लेख वाचा – ऑक्टो. त्रैमासिक ‘एकता’ – एकता प्रकाशन, कॅनडा)
काही असाधारण बुद्धिमत्ता नसलेली मुलेही परदेशी पोचतात ती केवळ इंग्रजी माध्यमाच्या बळावरच! ऑफिस, कंपनीद्वारे अनेक भारतीय पदवीधारकांना, ‘तयार’ होण्याकरिता म्हणजेच ‘ट्रेनिंग देऊन अधिक कार्यक्षम होण्याकरिता पाश्चात्त्य देशांत पाठविले जाते. या मुलांकडून काम करवून घेतले जाते व कंपनीचा आर्थिक फायदा होतोही! पण ही मुले स्वखुषीने, स्वतःच्या आवडीनेच ही कामे करीत असतात. आखाती देशांकडे, अर्धशिक्षित लोकांची गुलामांप्रमाणे भरती होत असेलही कदाचित; पण आमची मुले जेव्हा पाश्चात्त्य देशांतील कामासाठी निवडली जातात तेव्हा त्यांच्या गुणवत्ता यादीत ‘इंग्रजी माध्यम’ हा अग्रक्रमाचा भाग असतोच असतो. पाश्चात्त्य देशांतील, हवामानाशी मुकाबला करत असतानाच, त्यांना अमाप कष्ट करावे लागतात. सातत्याने मनापासून काम शिकत, सतत पुढे जाणारा हा भारतीय वर्ग पाश्चात्त्यांना पसंत पडतो. निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांचे नेत्रदीपक यश आम्ही भारतांतील पालक अभिमानाने अवलोकीत असतो व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शतशः धन्यवाद देत असतो; कारण आमच्या पिढीने शाळेतून मराठी व कॉलेजातून इंग्रजी अशा धेडगुजरी माध्यमात शिक्षण घेतलेले असते व त्याचे दुष्परिणाम भोगलेले असतात.
पाश्चात्त्य देशातील आमच्या नातवंड-पतवंडांवर चांगले भारतीय संस्कार होणारच हे आम्ही जाणून असतो. आमची मुले नुसतेच भारतीय सण तिकडे साजरे करीत नाहीत, तर येथील अद्यावत घडामोडींपासूनही ते वंचित होत नाहीत. उदाहरणार्थ, नुकतीच मी एक बातमी वाचली. महाराष्ट्रातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर, अर्जेंटिना येथील गणित ऑलिंपियाड मध्ये तीन रौप्य पदके व तीन कास्य पदके मिळविली. यांत पुण्याच्या शाळांतील तीन महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ही बातमी मी इथल्या, नव्हे तर कॅनेडातून निघणार्याय मराठी मासिकात वाचली.
पुण्याच्या शुभदा चंद्रचूड या लेखिका ‘महाराष्ट्र सार’ सारखे अद्ययावत बातमीपत्र कॅनडातील मराठी त्रैमासिकास पुरवीत आहेत. आजच्या सुधारकाला मात्र आठल्यांसारखे विद्यार्थ्यांचे यश ‘काव काव’ म्हणणारे लेखक लाभतात हे आमचे दुर्दैवच होय. करवीर वाचनमंदिर, राजापूर मार्ग, कोल्हापूर येथे ऑक्टोबर महिन्याचा ‘एकता’ मासिकाचा अंक उपलब्ध आहे तो लेखकाने अवश्य वाचावा, म्हणजे त्याचे पाश्चात्त्य भारतीयांच्याबद्दल गैरसमज दूर होतील.
कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करण्याचा माझा हेतू नसून, सर्वांगसुंदर लेख, काव्य, शास्त्र, विनोद, मुलाखती (सुप्रसिद्ध लेखिका, आशा बगे यांची मुलाखतही याअंकात आहे) यांनी नटलेला, ‘एकता’ या त्रैमासिकाचा, कॅनडातून प्रकाशित होणारा मराठी + इंग्रजी अंक, प्रत्येक ‘आजच्या सुधारकाने वाचून आनंद मिळवावा असे मला मनोमन वाटते. मुंबई, पुणे, ठाणे, नासिक, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर येथील वाचनालयांत उपलब्ध असलेले हे त्रैमासिक नागपूरच्या वाचनालयांत उपलब्ध व्हावे या इच्छेतून पुढे त्रैमासिकाचा पत्ता देत आहे.
धन्यवाद!
आपली नम्र
११, मानस, बेझंट रोड सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई – ४०००५४ कल्पना कोठारे
ताजा कलम: – या मासिकाशी माझे कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध नाहीत. वांद्रयाच्या नॅशनल लायब्ररीत मला हे सुंदर मासिक वाचावयास मिळाले. कळावे, लोभ असावा, ही विनंती!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.