अर्थार्जन करणाच्या सर्वच स्त्रिया स्वतंत्र असत नाहीत. बहुतेक कुटुंबांमधून बायकोचा पगार हा पुरुषाच्या मिळकतीचाच भाग समजला जातो. महिन्याच्या महिन्याला बायकोने आपला पगार नवर्याोच्या हातात ठेवावा, असा दंडकही या घरांत आढळतो. त्या पगारातून हातखर्चाचे पैसे आधी ठेवून घेण्याची सवड कधी बायकोला असते, तर कधी तिचा पगार हातात आल्यावर त्यातून नवरा तिला हातखर्चाचे पैसे देतो; कधी तिच्या खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न तो करतो आणि स्त्री खंबीर नसल्याने तो प्रयत्न यशवीही होतो. पैशाच्या व्यवहारांत बहुतेक पुरुष काटेकोर तर स्त्रिया बेपर्वा असतात. दोघांच्या समाइक मिळकतीने घर किंवा फ्लॅट घेतल्यास तो बहुधा नवर्या च्या नावावर असतो. आपल्या बचतीचे काय । होते हे स्त्रियांना क्वचितच माहीत असते. त्याबद्दल त्यांना कधी जिज्ञासा नसते, तर कधी नवर्यायवर त्यांचा श्रद्धवजा विश्वास असतो, आणि कधी नवर्याबला त्याबद्दल प्रश्न विचारण्याचे धैर्य नसते. विचारल्यावाचून बहुसंख्य स्त्रिया आपल्या निर्णयाने कुठलाही खर्च करू धजत नाहीत. नवरा बिथरला तर होणार्याध भांडणांना तोंड देण्याची त्यांची तयारी नसते किंवा “लोक काय म्हणतील?’ या भीतीची पकडही पक्की असते. या परिस्थितीत बहुसंख्य स्त्रिया मिळवत्या असूनही त्या वस्तुत: वेठीच्या मजूरच असतात, आणि त्याही म्हणतात, “देवा, पुढचा जन्म कोल्ह्याकुत्र्याचा दे, पण स्त्रीजन्म देऊ नकोस’ किंवा ‘‘अस्तुरीचा जन्म देऊ नको रघुपती.”