स. ह. देशपांडे यांचे ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील दोन लेख आणि त्यावरील प्रा. अशोक चौसाळकर यांची ‘डॉ.स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया वाचली. राष्ट्रवाद म्हटले की काही आक्षेपांचा पाढा वाचायचा असा एक प्रघातच पडला आहे. ही प्रतिक्रिया नेमकी त्याच स्वरूपाची आहे, म्हणून मला या विषयासंदर्भात जाणविणार्याा काही बाबी येथे नोंदवीत आहे.
राष्ट्रवाद ही प्रामुख्याने गेल्या तीन शतकांमध्ये उदयास आलेली अतिशय प्रभावी वगतिमान विचारसरणी आहे. आनुवंशिक तत्त्वाने चालत आलेल्या राजघराण्यांना किंवा दैवी आधार असल्याचा दावा करणा-यांना या तत्त्वज्ञानाने झुगारून दिले. १८१५ ते १९२० या काळात तर संपूर्ण युरोपचा नकाशा बदलून टाकण्यात या राष्ट्रवादा’ने महत्त्वाची भूमिका बजावली, एवढेच नव्हे तर विसाव्या शतकात अनेक आफ्रो-आशियाई देशांच्या स्वातंत्र्याकडे झालेल्या प्रवासाला राष्ट्रभावनेचा भक्कम आधार मिळाला.
या विचारसरणीत असे काय रसायन आहे की, ज्यामुळे इतिहासाला वळण देण्याची शक्ती तिला प्राप्त झाली?राष्ट्रवादाचे सुप्रसिद्ध अभ्यासक हान्स कोहन यांनी म्हटल्याप्रमाणे ही कमालीची व्यामिश्र पण प्रभावी संकल्पना समजावून घेण्यासाठी आंतरज्ञानशाखीय अभ्यासाचीच गरज आहे. आपल्याकडे अद्याप हा एक स्वतंत्र विषय आहे याचा स्वीकारच मनापासून होत नाही, मग बाकीच्या गोष्टी तर दूरच. राष्ट्रवाद म्हटले की आपल्याला एकदम हिटलरच आठवतो! राष्ट्रवाद म्हणजे शस्त्रस्पर्धा, युद्ध, संहार असे समीकरण आपल्या मनात ठाण मांडून बसले आहे. आपल्या ‘विश्वात्मक दृष्टीला राष्ट्रवादाचा संकुचितपणा अगदी सहन होत नाही! एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्रखर वास्तव तर नाकारता येत नाही, आणि संकुचित ठरू या भीतीने राष्ट्रवादाचा स्वीकारही करवत नाही. म्हणून मग सर्वसमावेशक, प्रगमनशील, सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष अशी विशेषणांची रांग लावल्याशिवाय डॉ. अशोक चौसाळकरांसारख्या राज्यशास्त्रज्ञाचेही समाधान होत नाही! पण (दुर्दैवाने) वास्तव असे आहे की, अशी आणखी कितीही विशेषणे लावली तरी राष्ट्रवादाचे स्पर्धात्मक, स्वार्थी, आपला आणि परका यांत भेद करणारे स्वरूप नष्ट होत नाही. अगदी चौसाळकर यांच्या मनात जो काही प्रगमनशील राष्ट्रवाद आहे, तो जगातील वेगवेगळ्या मानवीसमाजांमध्ये अस्तित्वात असलेला ‘आपला-परका’ हा भेद नाकारू शकतो काय?
‘युरोपीय समुदायाच्या संकल्पनेमुळे सर्वांत जास्त उत्साह संचारला तो आपल्याकडील राष्ट्रवाद नाकारू पाहणार्या् विचारवंतांमध्ये. पण युरोपात ही जी सहकार्याची भाषा सुरू आहे ती स्वार्थप्रेरित आहे. अमेरिकी पंडित तर राष्ट्रवाद कालबाह्य झाल्याचा प्रचार खुषीने करीत आहेत. या प्रचारामागचे राजकारण आणि अर्थकारण काय आहे? अमेरिकेच्या डोळ्यांसमोरून अचानकराष्ट्र नावाची चीज पुसली जाऊन त्यांना सगळीकडे सलग अशी ‘बाजारपेठ’ दिसू लागली आहे.
” राष्ट्र वगैरे ‘भावनिक अडथळे त्यांना नकोसे झाले आहेत. गंमत म्हणजे, पाश्चात्त्य
जगाविरुद्ध वेळोवेळी लेखणी चालविणारेही याबाबतीत त्यांच्याशी चटकन सहमत होतात. परंपरेतील अभिमानाची व स्फूर्तीची केंद्रे उज्जीवित केली पाहिजेत, या स.ह. देशपांडे यांच्या प्रतिपादनावर प्रा. चौसाळकरांचा आक्षेप आहे. वास्तविक यात संकुचित काय आहे? प्रगमनशील राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र प्रा. चौसाळकर यांनी ज्या भारताला, चीनला आणि इजिप्तला दिले आहे, तेथील राष्ट्रवादात परंपरेला स्थान नाही, असे म्हणता येईल का? अगदी साम्यवादी चीनचेच उदाहरण घेऊ या. हान राजवटीचा सुवर्णकाळ (इसवी सन पूर्व २०६ ते इसवी सन २२०) हा चीनच्या राष्ट्रवादाचा आधार आहे. तेथे बोलली जाणारी भाषा ‘हान्यू’ म्हणून ओळखली जाते आणि तेथील सभ्य माणसाचे वर्णन ‘होर्हातन्झी’ असे केले जाते. संपूर्ण स्वर्गभूमी’वर एकाच सम्राटाचे राज्य ही हान राजवटीची लाडकी कल्पना. पण हे केवळ इतिहासात आणि परंपरेत बंदिस्त झालेले नाही. याच कल्पनांचा वापर चिनी राज्यकर्त्यांनी आधुनिक काळातील हानवंशीयांच्या राजकीय एकात्मतेसाठी केला. चीनच्या सांस्कृतिक सातत्यावर तर ते भर देतातच, पण देशाचा कोणताही भाग चीनमधून फुटून निघू नये म्हणून तिबेट, मंगोलिया आदी ‘अल्पसंख्य’ प्रदेशांमध्ये हानवंशीयांचे पद्धतशीररीत्या स्थलांतर गेली अनेक वर्षे घडवून आणले जात आहे. युआंग, मांचू, हुई, मियाओ, यी, उजिआ, मंगोलियन व तिबेटी या अल्पसंख्य गटांचे वास्तव्य ज्या पश्चिम सरहद्दीवर आहे, तेथील वसाहतींमध्ये हान परंपरेवर आधारित राष्ट्रीय जाणीवाच कशा रुजतील, यावर चीनचा कटाक्ष असतो. ही सर्व माहिती सावरकरी राष्ट्रवादावर पोषण झालेल्या कोणी दिली नसून कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘राजकीय भूगोल’ या विषयात संशोधन करणार्यार श्रीमती लीसा हसमान यांनी दिली आहे. राष्ट्रवादाची गरज आहे किंवा नाही?या प्रश्नाबाबत चीनमध्ये कोणताच गोंधळ दिसत नाही. आपल्याकडे मात्र तो भरपूर प्रमाणात आहे. प्रा. औसाळकरांच्या टिपणावरूनही त्याची कल्पना येते. म्हणूनच शोषितांचा प्रश्न, धर्मनिरपेक्षतेची समस्या, साम्राज्यवाद असे अनेक विषय त्यात आणून राष्ट्रवादाचा मुळातून शोध घेण्याचेच ते नाकारतात. Roots चा शोध घेण्याची आणि सुरक्षिततेसाठी समूह करून राहण्याची, अशा दोन सहजप्रेरणा मानवी मनात अस्तित्वात आहेत. या दोन प्रेरणांमधून तयार होणार्याण निष्ठांचा राष्ट्रवादाशी संबंध आहे. आधुनिक काळात प्रामुख्याने त्याला भूमिनिष्ठेशी जोड मिळाली आणि त्यातून सध्याच्या स्वरूपातील राष्ट्रवाद उभा राहिला. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता, भावना आणि बुद्धी, संकुचितता आणि व्यापकता असे द्वैतच या संकल्पनेत अंतर्भूत आहे. राष्ट्रवादाची उकल करू पाहणार्यासला त्या द्वैताला सामोरे जावे लागते. तेव्हा द्वैत हे प्रचलित राष्ट्रवादीच्या जडणघडणीतच अंतर्भूत आहे. त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरविले, तर बोधवादी निबंध तयार होतात, पण त्यापलिकडे हाती काही लागत नाही. राष्ट्रवादाच्या बाबतीत आपल्याकडील विचारवंतांची अवस्था पु.शि. रेगे यांच्या कवितेतल्याप्रमाणे (वेगळ्या संदर्भात) ‘नकोच तू, नाहीच तू, छे छे नसशी तू’ अशी झाली आहे. ती बदलणे ‘देशहितासाठीआवश्यकच आहे.