मेंदूच्या वजनाचे शरीराच्या वजनाशी प्रमाण तपासले तर माणसाइतका मेंदू इतर फारच थोड्या प्राण्यांमध्ये आढळतो. एकदोन फुटकळ अपवाद सोडता प्रमाणाच्या निकषावर माणसाइतका ‘डोकेबाज’ कोणताच प्राणी नाही. माणसांचे मेंदू दीड-पावणेदोन किलोंचे असतात, आणि शरीरे साठ-सत्तर किलोंची. म्हणजे माणसांच्या शरीरांचा सव्वादोन-अडीच टक्के भाग मेंदूने व्यापलेला असतो.
माणसाचे सगळ्यात जवळचे नातलग म्हणजे चिंपांझी, गोरिला, ओरांग-उटान हे मानवेतर कपी. हे प्राणी आणि माणसे मिळून कपी (apes) हा वर्ग बनतो. या मानवेतर कपींमध्ये मेंदूचे प्रमाणमाणसांच्या थेट अर्धे, म्हणजे शरीराच्या एक-सव्वा टक्का येवढेच असते. चाळीसेक लक्ष वर्षांपूर्वी
जेव्हा माणसांचे पूर्वज या इतर कपीपेक्षा सुटे झाले, तेव्हा माणसांच्या पूर्वजांचे मेंदूही शरीराच्या एक-दीड टक्काच असायचे.
आता एखाद्या प्राण्यात एखादा अवयव असा ‘प्रमाणाबाहेर’ मोठा होतो, तेव्हा आजचे जीवशास्त्रज्ञ या वाढीमुळे फायदेतोटे काय होतात असा प्रश्न विचारतात. डार्विनच्या उत्क्रांतिवादामुळे या प्रश्नाला महत्त्व येते. शरीराचे एखादे अंग, वागणुकीतली एखादी लकब, यांच्यामुळे जर त्या जीवाला परिस्थितीतील घटक जास्त कार्यक्षमतेने वापरता येत असतील, तरच ते शरीराचे अंग, किंवा लकब पूर्ण प्रजातीत स्थिरावते. परिस्थितीचा जास्त चांगला वापर करता येणे म्हणजेच जास्त अन्न कमावून जास्त सशक्तपणे जगणे. जास्त सशक्तपणे जगण्याने जास्त प्रजा उत्पन्न होते आणि जास्त प्रमाणातली, जास्त ‘टिकाऊ’ प्रजा, तिच्यातले जास्त सक्षम गुणांचे वाढलेले प्रमाण म्हणजेच प्रजातीची उत्क्रांती.
इतर कपींपासून सुटे होताना माणसांमध्ये अनेक गुण वेगळे झाले. शरीरावरचे केस कमी होणे हे एक वैशिष्ट्य, ‘माजावर येण्याचा ठरीव काळ सोडून सदा सर्वदा कामव्यवहार होणे, हेही माणसाचे वैशिष्ट्य. ताठ उभे राहता येईल अशी गुडघ्यांची आणि कंबरेची रचना, ही सुद्धा माणसांची ‘खासियत’. आणि मेंदू प्रमाणाबाहेर मोठा होणे, ही सुद्धा माणसांच्या उत्क्रांतीची वेगळी वाट. यातल्या प्रत्येक मानव-कपी फरकावर भरपूर विचार झाला आहे. आणि या विचारांना बैठकआहे ती ‘मतांची’ नव्हे, तर माणसांच्या आणि इतर कपींच्या अवशेषांची आहे, जीवाश्मांची (फॉसिल्जची) बैठक आहे. एक कामव्यवहाराचा अपवाद आहे. त्याचे जीवाश्म’ नसतात! (पण इतर पुरावा अनुमानित करता येतो.)
एखादे शारीरिक किंवा वागणुकीतले अंग जर एखाद्या जीवाला परिस्थितीशी जास्त अनुरूप करत असेल, तर त्या अंगाची वाढ झपाट्याने होते. समांतर उदाह[ माणसांच्या वागण्यात पाहा. आज पेशा-धंदा करणार्याअ शहरी माणसाकडे ‘टेलिफोन’ असणे त्याला जास्त परिस्थितीनुरूप करते. फोन नसलेल्या माणसाला फोनधारकापेक्षा खूपच जास्त ऊर्जा संदेशवहनावर खर्च करावी लागते- आर्थिक ऊर्जाही, शारीरिक ऊर्जाही. हे एकदा का सर्वांना जाणवले, की पस्तीसेक वर्षांतच नागपुरातील टेलिफोनची संख्या शतपट होते! टेलिफोन नसलेले पेशेवर-धंदेवाईक झपाट्याने मागे पडतात.
आज माणसांची संख्या आणि भौगोलिक व्याप्ती प्रचंड आहे. त्या मानाने त्यांच्यासारखाच इतिहास असलेले इतर कपी शेकड्यांतल्या, हजारांतल्या लोकसंख्या, त्याही काही थोड्याशाच भूभागापुरत्यासीमित, असेच उरले आहेत. त्यांच्यापेक्षा माणूस तगण्या-जगण्यात कैक पट यशस्वी ठरला आहे. आणि या ‘यशा’मध्ये मेंदूच्या वाढीव प्रमाणाचा मोठा भाग आहे.
हे मेंदूचे प्रमाण वाढण्याने माणसांना नेमका काय फायदा झाला?खरे तर मेंदू मोठा असण्यात तोटे भरपूर आहेत. माणसाच्या शरीरातला सर्वात जास्त रक्ताभिसरणातला वाटा घेणारा अवयव आहे मेंदू हा. त्याला रक्त जास्त लागते, तशीच ऊर्जाही खूप लागते. मेंदू घडणे, टिकणे, वापरला जाणे, या सान्यांसाठी खूप अन्न लागते. बरे, मोठा मेंदू असलेले बालक हे त्याच्या आईवरहीबराच ताण उत्पन्न करते. असे बालक आईपासून सुटे होताना जेवढा ताण येतो, त्याच्या बराच कमी ताण लहान डोक्याचे बाळ जन्मताना येतो. आणि माणसांची बाळे जन्मतात ती मेंदूची वाढ पूर्ण व्हायच्या आधी. जर ‘टाळू’ भरण्याइतका, पूर्ण मेंदू घडण्याइतका काळ बाळाने आईच्या गर्भात काढला, तर नैसर्गिक बाळंतपण होणे अशक्य होईल. आणि मेंदू पूर्णपणे न वाढलेले बाळ जन्मल्यानंतर खूपच काळ आईवर, इतर नातलगांवर अवलंबून असते. इतर कोणत्याही कपीपेक्षा किंवा इतर प्राण्यांपेक्षा माणसांची बाळे खूप जास्त काळ ‘असहाय’ असतात.
मग इतके तोटे असलेला अवयव घडण्याने काहीतरी मोठे फायदेही मिळत असणारच. तसे जर नसते तर हा महा-मेंदू माणसांना उत्क्रांतीच्या वाटेतल्या कड्यावरून लोटणारा, नष्ट करणारा ठरला असता.
सध्या कपींवर आणि इतर प्राण्यांवर होणार्यार संशोधनांतून मेंदूच्या नेमक्या फायद्यांवर प्रकाश पडतो आहे. त्यावर ‘टाइम’ने काही वर्षांपूर्वी (२९ मार्च १९९३) एक विशेषांक काढला होता. त्यात मेंदूच्या काही वैशिष्ट्यांवर, बुद्धीच्या काही ‘प्रकटीकरणांवर (manifestations) नवी माहिती देणाच्या प्रयोगांची वर्णन होती.
माणसाने मेंदूचा वापर करण्यातून घडलेल्या काही खास गोष्टी अशा. आजूबाजूला दिसणाच्या गोष्टींचा, वस्तूंचा परस्परसंबंध जोडणे, हत्यारांचा वापर करणे, एकमेकांना एकमेकांचीमते तपशिलात कळविण्यासाठी भाषा ही यंत्रणा घडवणे.
यातल्या हत्यारांच्या वापराबाबत चिंपांझी आणि आदिम माणसे (सुमारे चाळीसेक लक्ष वर्षांपूर्वीची) यांच्यात बरीच साम्ये आढळली. वाळवीच्या (उधईच्या) वारुळात काडी खुपसणे, ती बाहेर काढणे आणि तिच्यावर चढलेले कीटक खाणे, हा हत्यारांचा वापर चिंपांझी सर्रास करताना दिसतात. मासेमारीला जवळ अशी ही क्रिया. पण यापेक्षा जास्त कठीण हत्यारांचा वापरही चिंपाझींना सुचतो.
इंडियाना विद्यापीठात ‘कांझी’ नावाच्या एका चिंपाझीपुढे एक कोडे’ टाकले गेले. त्याचा आवडता एक खाद्यपदार्थ त्याला दाखवून एका पेटीत ठेवला. पेटीला कुलूप लावून किल्ली दुसर्या. एका पेटीत ठेवली. ही पेटी एका दोरीने घट्ट बांधून ठेवली. कांझीला किल्लीने कुलूप उघडते, हे माहीत होते. त्याने एका सहलीच्या वेळी जमवलेले गारगोटीचे धारदार तुकडेही खोलीत होते. त्याने गारगोटीने दोरी कापली आणि किल्लीने कुलूप उघडून ‘खाऊ’ हस्तगत केला. हा प्रयोग रचणारा निकल्स टॉथ (Toth) हा प्राचीन, आदिम माणसांवर संशोधन करतो. प्रयोग अनेक वेळा केल्यावर टॉथची खात्री पटली की आदिम माणसांइतपत (आजचे) चिंपांझी हत्यारे वापरण्यात ‘तज्ज्ञ असतात.
कांझीवर भाषा शिकवण्याचेही प्रयोग झालेले आहेत. चिंपांझींना माणसांसारखे स्वरयंत्र नसल्याने ते बोलू शकत नाहीत, म्हणून कांझीकरता दोन फळे घडवले गेले. या फळ्यांवर अनेक आकृत्या काढलेल्या आहेत. एका फळ्यावरील चिन्हांकडे बोटे दाखवून कांझी प्रश्नांची उत्तरे देतो. दुसर्याा फळ्यावरील चिन्हे दाबून इंग्रजीमध्ये त्या चिन्हाने निर्देशिलेला शब्द संगणकाद्वारे उच्चारता येतो. खरे तर हे फळे कांझीच्या आईसाठी घडवले गेले, पण तिला शिकवण्याच्या प्रयत्नात कांझीचआधी फळे वापरायला शिकला!
चिन्हांच्या क्रमाला महत्त्व देण्याची व्याकरणातील रचनाही कांझीला थोडीफार जमते. ‘कलिंगड त्या बादलीत नेऊन ठेव’,किंवा ‘मायक्रोवेव्ह मट्टीतले गाजर इकडे आण’, इतपत किचकट वाक्ये कांझी समजू शकतो. कांझी अकरा-बारा वर्षांचा असताना त्याच्या ग्रहणशक्तीची तुलना आलिया नावाच्या मुलीशी केली गेली. आलिया दोन वर्षांची होती. दोघांनाही सुमारे साडेसहाशे इंग्रजी वाक्ये वापरून तपासले गेले. आलिया अडीच वर्षांची होईपर्यंत कांझी तिच्याइतकी समज दाखवू शकला. मग मात्र आलियाने त्याला खूप मागे टाकले.
पूर्वी ‘कोको’ नावाचा गोरिलाही या भाषिक पातळीला पोचला होता. कांझीवरीलप्रयोगांमध्ये मात्र शंकेला कमी वाव आहे. संशोधक वेगळ्या खोलीत बसतात, त्यामुळे त्यांच्याकडून कांझीला काही अप्रत्यक्ष सूचना जाऊ शकतील, हे शक्य नाही. वापरलेली वाक्येही कांझी (किंवा आलिया) यांनी आधी कधीच ऐकलेली नव्हती. एकूणच हा खराखुरा ‘नियंत्रित प्रयोग आहे.
चिन्हांऐवजी मूक-बधिरांसाठी घडवलेली अमेस्लॅन (Ameslan) – (अमेरिकन साइन लँग्वेज) ही भाषा वापरून देवमासेही (डॉल्फिन्स dolphins) थोडीफार भाषा समजू शकतात, हे दाखवता आले आहे. एक अॅलेक्स नावाचा राखी पोपटही बोलू शकतोसमजून उमजून. अनेक वस्तूंपैकी विशिष्ट रंगाच्या आणि आकाराच्या वस्तूहा पोपट निवडू शकतो. एखादा प्रश्न सुटत नसेल तर “मी जातो’ असेही अॅलेक्स म्हणतो. एकदा अॅलेक्स आजारी असताना त्याला रात्रभर पशुवैद्याकडे ठेवावे लागले. त्याची पालक आणि संशोधक जेव्हा त्याला सोडून जाऊ लागली, तेव्हा अॅलेक्स म्हणाला, “इकडे ये. माझं तुझ्यावर प्रेम आहे. परत जाऊ या.
ही पोपटपंची आहे, की भाषा?सतत सान्निध्यात असलेल्या संशोधकांच्या चेहे-यांवरचे भाव, शरीराच्या ‘पोझेज’ यांना हे प्राणी प्रतिसाद देतात की खरेच भाषा वापरतात?या सर्वांवर दुमत आहे. पण जास्त जास्त काटेकोर प्रयोगांमधून जे थोडेसे समजते आहे, ते ‘घट्ट’ ज्ञान आहे.
थेट निसर्ग-निरीक्षणातूनही चिंपांझींच्या वागणुकीचे ज्ञान मिळत आहे, आणि यात आढळलेला एक अनपेक्षित ‘डोकेबाज’ गुण म्हणजे ‘बनेलपणा’!जपानी शास्त्रज्ञ टांझानियातील चिंपांझींचे निरीक्षण करत होते. त्या चिंपांझी टोळीत दोन प्रबळ नरांमध्ये टोळीच्या नेतेपदासाठी ओढाताण सुरू असे. एक दुय्यम तर कधी याला तर कधी त्याला मदत करून स्वत:चे टोळीतले स्थान टिकवीत असे. अशी मदत करण्याचा मोबदला म्हणजे माजावर आलेल्या माद्यांशी समागमाची संधी.
याचप्रमाणे एक दुय्यम शक्तीचा नर चांगला अन्नसाठा दिसत असतानाही जर इतर सबळ नर शेजारी असतील तर अन्नाकडे दुर्लक्ष करीत असे. नंतर आपण एकटेच आहोत याची खात्री असतानाच ‘खाऊ’ खात असे. अशी फसवाफसवीची, ‘चालू’पणाची भरपूर उदाहरणे चिंपांझींच्या निरीक्षणांत दिसत असतात.
याहून जरा मजेदार प्रयोगांची वर्णनही उपलब्ध आहेत. डेव्हिड प्रिमॅक या मानसशास्त्रज्ञाने एक जरा किचकट प्रयोग रचला. एका मुलाला एक दृश्य दाखवले, ज्यात सॅली नांवाची मुलगी एक काचेची गोटी एका पिशवीत ठेवताना दिसे. नंतर सॅली खोलीबाहेर जाई. एक अॅन नावाची मुलगीमग गोटी पिशवीतून काढून एका डबीत ठेवत असे. यानंतर त्या मुलाला विचारले जाई, की सॅली : खोलीत परतल्यावर गोटी कोणत्या जागी शोधेल. तीन वर्षे वयापर्यंतची मुले, डबीकडे बोट दाखवीत, म्हणजे गोटीच्या प्रत्यक्ष जागी. सॅलीला ही नवी आणि खरी जागा माहीत नाही, हे। या लहान मुलांना सुचत नसे. चार वर्षांपुढील मुले मात्र सॅली पिशवीत गोटी शोधेल, कारण तिच्या समजुतीप्रमाणे गोटी पिशवीत आहे, हे बरोबर ओळखीत!
याच्यासारखेच प्रयोग चिंपांझींसाठीही घडवले गेले. चिंपांझींच्या दृष्टीआड ‘खाऊ’ लपवला जाई. शेजारी दोन माणसेही उभी असत. एकाला खाऊ कुठे लपवला जात आहे हे दिसत असे, तर दुसन्याला ते नीटसे दिसत नसे. बहुतांश प्रयोगांमध्ये चिंपांझी ज्या माणसाला लपवण्याची जागा नीट दिसलेली असे, त्यालाच खाऊ शोधण्यात मदत मागत?गंमत म्हणजे कपी नसलेली माकडे सहाशे प्रयत्नांनंतरही दोन माणसापैकी ‘ज्ञानी’ कोण, ‘अज्ञानी’ कोण, हे ओळखू शकत नसत! चिंपांझींचा बनेलपणा, फसवाफसवी ओळखायची क्षमता या ‘कपीतर’ माकडांमध्ये दिसली नाही.
आणखी एका प्रयोगात दोन माणसांना चिंपांझींना फळांचा रस देण्याचे काम दिले. एक जण कप हिंदकळवून थोडा रस जमिनीवर सांडी, पण हे ‘अपघाताने घडल्यासारखे वागे. दुसरा मात्र उघडच थोडा रस जमिनीवर सांडी. हे बरेचदा दाखवल्यावर चिंपांझींना विचारले जाई, की कोणाच्या हातून त्यांना रस पाठवावा.‘वेंधळेपणा’ आणि बदमाघी यातला फरक ओळखून माकडे मुद्दाम रस सांडणान्याला टाळीत! कपी नसलेली माकडे मात्र वारंवार वाईट अनुभव येऊनही चुकीचा अन्नवाहक निवडीत.
तीन वर्षांची मुले आणि चार वर्षांची मुले यांच्यातल्या फरकांसारखाच हा कपि-कपीतर फरक आहे. पण चिंपांझींसारखे कपी माणसांसोबतच बनेलपणा ओळखू शकणाच्या बाजूला आहेत. या मानवेतर कपींमध्ये आणि माणसांमध्ये फरक कोणता, असा विचार केला, तपास केला, तर उत्तर मिळते ते क्लिष्टपणाशी जोडलेले आहे.
प्राण्यांची बुद्धिमत्ता हत्यारे वापरायची क्षमता, भाषेची जाण या सर्व गोष्टींच्या तपासात जाणवतेकी वेगवेगळ्या घटकांची संख्या वाढवली की प्राण्यांचा फार झपाट्याने गोंधळ उडतो. त्यांना वेगवेगळे घटक आणि त्यांचे परस्परसंबंध यांची आठवण ठेवणे जड जायला लागते. असे संबंध कधीकधी समजलेही, तरी ते फार वेळ स्मरणात राहात नाहीत. याऊलट माणसांची स्मरणशक्ती मात्र प्राण्यांच्या तुलनेत प्रचंड असते.
आणि यावरून माणसांचे मेंदू प्रमाणातीत मोठे का याचे उत्तर सुचवता येते. झाडांवर वावरणारे माणसांचे पूर्वज चाळीसेक लक्ष वर्षांपूर्वी पायउतार झाले. त्या काळी मानवाच्या “मातृभूमी’त म्हणजे आफ्रिकेत जंगले घटून कुरणे घडली. यामुळे कपींचा एक वंश पायउतार झाला, तर इतर बहुतेक कपी झाडांवरील जीवनपद्धतीलाच चिकटून राहिले.
झाडांवरील पाने, फळे, अळ्या यांऐवजी गवत खाणे माणसांच्या पूर्वजांना नीटसे जमत नसे. त्यामुळे आहारामध्ये, फळां-पानांमध्ये पडलेली तूट आदिमानव मांसाहाराने भरून काढू लागले. चिंपांझीही अधूनमधून मांसाहार करतात. गोरिला मात्र पूर्णपणे शाकाहारी असतात.
वाघ-सिंहांपासून कुत्र्यामांजरांपर्यंतच्या मांसाहारी-शिकारी प्राण्यांकडे असलेला वेग व दांतनखे आदिमानवांना नव्हती. त्यामुळे त्यांच्या शिकारीमध्ये पूर्ण टोळीने भक्ष्याला पेचात आणून पकडण्याचे अंग उद्भवले. असे अंग न उद्भवते, तर तो वंश नष्ट झाला असता, हे लक्षात ठेवावे.
आणि अशा सहकारी शिकारीला गटाच्या सर्व सभासदांनी एकदिलाने काम करावे लागते. यासाठी परिस्थितीतल्या अनेक घटकांचा विचार करून, संबंध ठरवून, निर्णय घ्यावे लागतात. हे ज्यांना जमले, त्यांची प्रजा वाढली. हे त्यांनाच जमले, ज्यांचे मेंदू मोठे होते. चाळीसेक लक्ष वर्षात दोनेक लाख पिढ्या होतात. आणि दोनेक लाख पिढ्यांमध्ये मेंदू दुप्पट होणे, हे फार अनाकलनीय नाही!
म्हणजे माणसांचा मेंदू मोठा, त्यामुळे मिळणारी बुद्धिमत्ता जास्त; कारण या बाबींची मानवसमूहांपासून मानवसमाज घडण्याला नितांत गरज होती. जर या बाबी घडल्या नसत्या, तर ना समाज घडला असता, ना समूह टिकले असते.
मध्ये एक मत वाचले की माणसे मेंदूचा जेमतेम पाचदहा टक्के भागच वापरतात. हे ठार चूक आहे. खाद्य, ऊर्जा या दृष्टीने इतके ‘महाग’ यंत्र जे मानवी शरीरात घडले, ते ‘रिकामे राहायला नक्कीच नाही. एक शक्यता आहे की बहुतांश माणसे एकमेकांशी येणार्याम संबंधांवरच फक्त मेंदू ‘रोखतात. यामुळे विचारांची पातळी फारच ‘घरेलू राहते. खूपसे विद्वान माणसांशी संबंध ठेवण्याच्या संदर्भात तिरसट, पोरकट, माणूसघाणे असतात; याचाही अर्थ या तर्कपरंपरेने लावता येतो. असे विद्वान मेंदूचा वापर वेगळ्या, ‘अमानवी’ पातळीवर करत असावेत्!
एक मात्र खरे, की माणूस आणि अन्य प्राणी यांच्या बुद्धिमत्तेतला फरक गुणात्मक नसून संख्यात्मक आहे!
पण यापेक्षा महत्त्वाची एक बाब लक्षात येते. तीन फार वेगवेगळे, जवळजवळ एकमेकांशी असंबद्ध वाटणारे घटक आहेत.
१) मेंदू, हा एक अवयव, माणसांमध्ये वाढीव प्रमाणात आढळणारा.
२) चाळीसेक लक्ष वर्षांपूर्वी घडलेला हवामानातील बदल, ज्याने आफ्रिकेला जंगलांतून कुरणांकडे नेले.
३) आणि समाज नावाची व्यवस्था, जी चालायला अनेक व्यक्तींनी एकमेकांशी संबंध असल्याची जाण राखावी लागते – भलेही ही जाण ‘बनेलपणा वाटत असेल.
आणि हे तीन घटक एकमेकांशी जोडण्यातून घडलेले आपण!
खूपदा माणसांनी घडवल्यासारख्या भासणाच्या बाबी माणूस नावाच्या जीवाच्या शरीररचनेतून अपरिहार्यपणे घडलेल्या असतात! आपण एक जीव म्हणून, एक प्राणी म्हणून स्वत:ला समजून घेण्यासाठी किती वेगवेगळ्या ज्ञानशाखांची मदत होते, हे आश्चर्यकारक वाटते.
कस्त्वं कोऽहं कुत आयातः । का मे जननी को मे तात:”, या विचारणांना ‘स्वप्नविचारा’पासून दूर न्यायला चक्क पुरामानववंशशास्त्र लागते!