ज्या प्रौढ लोकांच्या मनांत विशिष्ट धर्मकल्पना कायम होऊन गेल्या आहेत व ज्यांचे वर्तन तदनुरोधाने होत आहे त्यांच्या मनावर असल्या चर्चेचा विशेष परिणाम होण्याचा संभव नाहीं हे खरे आहे. पण आमचे असले निबंध तसल्या लोकांकरितां लिहिलेलेच नसतात. ज्या तरुण वाचकांच्या धर्मकल्पना दृढ झाल्या नसतील; ज्यांच्या बुद्धींत साधकबाधक प्रमाणांचा प्रवेश होऊन त्यांचा विचार होणे शक्य असेल; व विचारा अंतीं जें बरें दिसेल त्याप्रमाणे आम्ही थोडा-बहुत तरी विचार करू अशी ज्यांना उमेद असेल, त्यांच्याकरितांच हे लेख आहेत. असले लेख एकदा लिहून टाकले म्हणजे आपले कर्तव्य आटपलें असें कदाचित् मोठमोठ्या तत्त्वशोधकांस म्हणता येईल….पण इतरांनी केलेल्या शोधाचे ज्ञान करून घेऊन त्यांचा लोकांत प्रसार करणे हे ज्या आमच्यासारख्यांचे नम्र कर्तव्य आहे त्यांनी नवीन नवीन वाचकांच्या फायद्याकरितां असले लेख फिरून फिरून लिहिले पाहिजेत; त्यास कंटाळतां कामा नये. आमच्या धंद्यांत आणि शिक्षकाच्या धंद्यात विशेष फरक नाहीं. नवीन पिढीच्या तरुण लोकांत राजकीय, सामाजिक व धार्मिक विचारांचा प्रसार करणे आणि प्रत्येक वर्षी नवीन विद्याथ्याँस विवक्षित विषयांची माहिती देणे यांत पुष्कळ साम्य आहे….एकवेळ सांगितलेले विचार पुनःपुन्हा सांगणे दोघांनाही सुटत नाहीं, …व तसे करतांना दुसन्यास आपले विचार कळविण्याचे आद्य साधन जी भाषा तिचीही थोडीबहुत पुनरुक्ति होते. पण त्याला इलाज नाहीं.