कावळ्याच्या घरट्यांत कोकिळा अंडी घालते. अंडी घालताना कावळ्याची अंडी घरट्यातून बाहेर ढकलून देते. कोकिळेची अंडी लवकर फुटतात व त्यातून लवकर पिल्लू बाहेर येते. ते पिल्लू देखील सोबतएखादे कावळ्याचे पिल्लू असेल तर त्याला घरट्याबाहेर ढकलून देते. कावळा मात्र त्याला आपलेच पिल्लू समजून वाढवतो. पिल्लू मात्र वाढल्यावर सर्वार्थाने कोकिळाच होते, त्याच्यात कावळ्याचे कोणतेही गुणधर्म येत नाहीत. या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना माहीतच आहेत.
आपल्या समाजालाही हा काक-कोकिल न्याय चपखलपणे लागू पडतो हे मात्र आपण लक्षात घेत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीची मुले आपल्या घरोघरी वाढत आहेत. त्यासाठी पाश्चात्त्यांना आपल्या घरांत अंडी घालावी लागत नाहीत किंवा गर्भ-बीज इकडे वाढवावे लागत नाही. फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा, पाश्चात्त्य पद्धतीचा पेहेराव, अन्न व प्रसारमाध्यमे, पुस्तके, कॉमिक्स यांच्या साहाय्याने आमच्या मुलांवर पाश्चात्त्य संस्कार अगदी कोवळ्या वाढत्या वयापासून करतात. त्यामुळे हे कावळे काव-काव करणे विसरून जाऊन कुहू कुहू करू लागतात. त्यांना संडे-मंडे कळते, सोमवार-मंगळवार कळत नाही. ईस्ट-वेस्ट कळते, पूर्व-पश्चिम कळत नाही. भारतातील उष्ण हवामानातही ही मुले बूट वापरतात, व व्यायाम करताना ट्रैक सूट वापरतात. भारतीय पदार्थ त्यांना गोड लागत नाही. नूडल्स, पिझ्झा, चीज, पोटॅटो चिप्स व फिंगर चिप्स लागतात. महाभारत-रामायण त्यांना कॉमिक्स मधून वाचावे लागते. येथील राज्यव्यवस्थेलाही, काव-काव करण्यापेक्षा कुहू-कुहू केलेले आवडते. त्यामुळे नोक-यांच्या स्पर्धेमध्ये इंग्रजी-माध्यमात शिकलेली मुले मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांना मागे टाकतात.त्यातील काही थोड्या बुद्धिमान मुलांना पाश्चात्त्य समाज निवडून तिकडे पाश्चात्त्य देशांत घेऊन जातो, व तिकडे त्यांच्याकडून त्यांना कंटाळवाणी वाटणारी, डोकेफोड करायला लागणारी कामे करून घेतो.
तेथे गेल्यावर मात्र या मुलांना समजून येते की आपण कोकिळ नाही, कावळेच आहो. त्यांना कावळे म्हणूनच वागवले जाते. मग त्यांचे कावळेपण जागे होते. मग ते भारतीय संस्कृती तेथे जपण्याचा प्रयत्न करतात! कमनशिबाने त्यांच्या मुलांना काव-काव अजिबातच करता येत नाही. ती पूर्ण अंतर्बाह्य पाश्चात्त्य बनून जातात!
जीवशास्त्रावर संस्कारांनी मात केली आहे. आधुनिक कोकिळेला आता कावळ्याच्या घरट्यात अंडेही घालावे लागत नाही! आधुनिक तंत्राने कावळ्याच्या अंड्यातून कोकिळा वाढवता येतात. फक्त हे तंत्र अजून पूर्णत्वास पोचलेले नाही. त्यामुळे धड कावळा नाही व धड कोकिळा नाही, अशा पिलांची बरीच कुतरओढ होते, एवढेच!