आमच्या मुलाचा विवाह २४ डिसेंबर १९९७ रोजी नोंदणी पद्धतीने झाला. आमचे कुटुंबच पुरोगामी विचारांचे, विवेकवादी विचारसरणीवर चालणारे! आम्हाला व्याहीही समविचारी मिळाले.
विवाह किती साध्या पद्धतीने साजरा करावा ह्याचा विचार केल्यानंतर ठरले की फक्त सख्खी बहीण भावंडे बोलवायची. मामा, मामी, मावशी, आत्या, काकू कोणीही नाही. मित्रमैत्रिणींचे प्रतिनिधित्व करणारी एक मैत्रीण व एक मित्र! ते दोघेही साक्षीदार म्हणूनही होते. दोन डॉक्टर्स, ज्यांनी आमच्या कुटुंबाला अडचणीच्या वेळी अगदी आपलेपणाने मदत केली. त्यांच्या प्रती कृतज्ञता दर्शविण्यासाठी म्हणून त्यांना आमंत्रण दिले. (आमंत्रणपत्रिका छापल्या नाहीत. सर्वांना घरी जाऊन विवाहाला येण्याविषयी सांगून आलो.) हे दोन्ही डॉक्टर्स आमच्या कुटुंबातलेच आम्ही मानतो.
बाकी मित्रमंडळींचा गोतावळा खूप मोठा आहे. निरलसपणे प्रेम करणारी ही मित्रमंडळी तर माझी संपत्ती आहे. मी त्या बाबतीत खूप श्रीमंत आहे. ह्यांपैकी कोणालाही न बोलावण्याचा आम्हाला सर्वांनाच खूप त्रास झाला, वाईटही वाटले. पण जर विवाह साध्या पद्धतीने करायचे ठरले तर आपण हे पाऊल टाकलेच पाहिजे ह्या विचाराने ह्या मित्रमंडळींना फक्त विवाह होत आहे हे कळविले व त्यांचे आशीर्वाद नवविवाहितांच्या पाठीशी असावेत ही विनंती केली. जवळजवळ सर्वांनी पत्राला उत्तरे पाठविली. काहींनी हा विचार उचलून धरला व अभिनंदनहीं केले.
परंतु काहींनी मात्र आपली नाराजी व्यक्त केली. त्यांना ह्या पद्धतीने विवाह व्हावा हे मुळीच आवडले नाही. एकुलता एक मुलगा त्याचा विवाह अशा पद्धतीने का केला? आपल्याकडे पैसे नव्हते का? आपण धूमधडाक्यात विवाह सोहळा केला असता, वगैरे वगैरे! काहींनी मनात धरून ठेवलेली अढी अजूनही सैल केलेली नाही.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या मनात विचार आला की कुठेतरी जर चाकोरी मोडायची असेल तर त्याची किंमत आपण मोजलीच पाहिजे. पण ज्या व्यक्ती आम्हाला समजून घेतील ह्याची एकशे एक टक्के खात्री होती त्यांनीही रागावून बसावे हे मला समजू शकले नाही. विवाहाला बोलावले नाही ह्या मागचा विचार का नाही समजून घेतला? त्यांना बोलावले नाही ह्याचा आम्हाला झालेला मानसिक त्रास ह्यांना समजू शकला नाही का?
(मी माझ्या विद्यार्थी मित्राला म्हटलेही की पुरोगामी विचारांनी चालताना कुठेतरी आपण आपल्या तत्त्वांचा पुनर्विचार करायला हवा की काय असे मला वाटते.) नेमके काय घडले? माझी श्रीमंती काही प्रमाणात कमी होतेय की काय? मला कळत नाही.