ऑयलरविषयी आख्यायिका
अठराव्या शतकात ऑयलर (Euler) नावाचा एक महान गणिती होऊन गेला. त्याच्याविषयी पुढील आख्यायिका प्रसिद्ध आहे. एका गणितात गति नसलेल्या नास्तिक पंडिताचा पाडाव करण्याची कामगिरी ऑयलरवर सोपविली असता तो त्या नास्तिक पंडिताला भर दरबारात म्हणाला, “महाशय,
(a + b*)/ n = x
म्हणून ईश्वर असतो. उत्तर द्यावे!”
नास्तिक पंडित गांगरला, उपस्थित दरबारी हसू लागले, व कामगिरी फत्ते झाली. गणिताचा दुरुपयोग
गणिताविषयी कित्येक माणसांच्या मनात असणार्यास भीतियुक्त आदराचा वरील आख्यायिकेत येन केन प्रकारेण वाद जिंकण्यासाठी वापर केलेला दिसतो. वस्तुत: वरील विशिष्ट समीकरणाचा ईश्वराच्या अस्तित्वाशी काहीही खास संबंध नाही. ज्याअर्थी जगात गणितासारखी अद्भुत चीज अस्तित्वात आहे त्याअर्थी ईश्वरही अस्तित्वात असला पाहिजे असे जर कोणाला वाटत असेल तर तो वेगळा मुद्दा झाला.
बुवाबाजीपासून सावधान!
“वैज्ञानिक संशोधन करताना आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती देणारे अनुभव आले”. हे अनुभव गणिताच्या भाषेत मांडावे लागतील, आणि म्हणून ते तुम्हाला (तुम्ही गणितात अज्ञ असल्याने व वैज्ञानिक नसल्याने संपूर्णपणे समजणार नाहीत. पण मी गणिती, वैज्ञानिक असल्याने माझ्यावर विश्वास ठेवा व देव मानू लागा,’ असा विचार जर कोणी मांडू लागले तर नास्तिकांनी गांगरून जाऊ नये व त्याचप्रमाणे आस्तिकांनीही खूष होऊ नये असे मला वाटते. अशा तर्हे चे दावे म्हणजे आख्यायिकेतल्या ऑयलरच्या बुवाबाजीची केवळ एक आधुनिक आवृत्ती होय. त्या नास्तिक पंडिताने जर न घाबरता ‘महाशय, तुमचे गणिती समीकरण व तुमचा ईश्वरविषयक निष्कर्ष यांतील संबंध स्पष्ट करा!’ असे उत्तर दिले असते, तर बाजू सहज उलटली असती!