एखाद्या भाषेचे सामर्थ्य त्या भाषेत ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान किती लिहिले गेले आहे यावरून दिसते. तिच्यात जर सूक्ष्म वैचारिक विश्लेषण करता येत असेल, गुंतागुंतीच्या कल्पना चोखपणे मांडता येत असतील, अमूर्तातील अमूर्त भेद दाखविता येत असतील, विचारांचे बारकावे व्यक्तविता येत असतील, तात्त्विक चिकित्सा, तार्किक मीमांसा आणि सैद्धान्तिक अभिव्यक्ती सहजपणे साधता येत असतील, तर ती भाषा समृद्ध आहे असे समजावे. मराठीला या दिशेने अजून पुष्कळ वाट चालायची आहे. म्हणून मराठीत या प्रकारच्या ग्रंथांची जेवढी निर्मिती होईल तेवढी हवीच आहे. यादृष्टीने ‘बाराला दहां कमी’ या ग्रंथाचे आपण तोंडभर स्वागत केले पाहिजे.
पुस्तकाचे नाव रहस्यकथेला शोभावे असे असले तरी विषय अणुविज्ञान असा गहन गंभीर आहे. १८९७ साली केम्ब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत जे. जे. थॉमसन या वैज्ञानिकाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्या घटकेपासून १९८५ पर्यंत उण्यापुऱ्या नव्वद वर्षांत अण्वस्त्र आणि त्यांची भावंडे यांच्या बाबतीत घडलेल्या घडामोडींचा एक आलेख या ग्रंथात सादर केला आहे. अणुसंशोधनाची कहाणी लेखकांनी सुरस आणि चमत्कारिक वाटावी अश्या पद्धतीने सांगितली आहे.
६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला गेला. नंतर चार वर्षांनी १९४९ मध्ये रशियाने अणुबॉम्बचा स्फोट करून या अस्त्रातील अमेरिकेची मक्तेदारी संपवली. आणखी चार वर्षांनी १९५३ मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी करून आपण अमेरिकेच्या मागे नसून एक पाऊल पुढेच आहोत हे त्याने दाखविले. मागोमाग रासायनिक आणि जीवशास्त्रीय अस्त्रे यांची घोडदौड चालूच होती. या सगळ्यांचे इत्यंभूत वर्तमान या पुस्तकात वाचायला मिळते. पण पुस्तकाच्या निर्मितीमागील तीन सूत्रांपैकी हे फक्त एक सूत्र आहे.
अण्वस्त्रनिर्मितीच्या अनुभवातून जाताना संशोधक माणूस म्हणून कसे दिसले, कसे वागले हे सांगणे या पुस्तकाचे दुसरे सूत्र. आणि शास्त्रज्ञांची सामाजिक बांधिलकी, त्यांची नैतिक जबाबदारी यांची चर्चा हे तिसरे सूत्र आहे. या तिसऱ्या सूत्राच्या अनुषंगाने लेखकांनी उपस्थित केलेले प्रश्न, केलेले तत्त्वचिंतन वाचकाला अंतर्मुख करते. यात पुस्तकाचा मूळ उद्देश सफल होतो. जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे; त्याचे बारा वाजायला दहा मिनिटे बाकी आहेत. पुस्तकाच्या या नावातून शहाण्याने योग्य तो बोध घ्यायचा आहे. एका अर्थी पुढील प्रतिपादनाचे पताकास्थानच वाटावे असे पुस्तकाचे नाव आहे.
अॅटमबॉम्ब अमेरिकेत बनविला गेला तो दुसरे महायुद्ध लवकर संपावे यासाठी. पण तो टाकायच्या आधीच जर्मनी शरण आला (७ मे १९४५), आणि जपानचीही पिछेहाट सुरू झाली होती. तरी बॉम्ब टाकला गेला. जपानवर टाकला तरी जपानला नमविणे हा त्याचा हेतू नव्हता. हेतू होता, रशियाने योग्य तो धडा घ्यावा हा. युद्ध संपल्यावर जगातली पहिल्या क्रमांकाची महासत्ता हे स्थान अमेरिकेचे आहे हे कबूल करताना रशियाने खळखळ करू नये हा. जपानला शरण आणणे, अॅटमबॉम्बचे निर्जन प्रदेशात प्रात्यक्षिक दाखवूनदेखील शक्य होते. काही प्रज्ञावंत वैज्ञानिकांनी तसे सुचविलेही होते. किमानपक्षी तो वापरण्यापूर्वी पुरेसे अगोदर पूर्व-इशारे देता आले असते. पण असे काहीच न करता अचानक हा महाभयंकर बॉम्ब टाकला गेला. केवळ रशियाने बोध घ्यावा म्हणून! केवढे हे क्रौर्य!! हिरोशिमाच्या रुद्रभीषण संहारानंतर लहान मुलांच्या केलेल्या पाहणीत एक प्रश्न होता: “तुला मोठेपणी काय व्हायला आवडेल?” बारा वर्षांच्या एका मुलाचे उत्तर होतेः “मला जिवंत राहायला आवडेल!”
मानवी मन असे खचले होते, हताश झाले होते!
या पुस्तकासाठी लेखकद्वय दहा वर्षे खपत होते. दोघांपैकी एक लेखक वैज्ञानिक, तर दुसऱ्या लेखिका सिद्धहस्त साहित्यिक. उत्कट अनुभूती आणि समर्थ आविष्कार हे ललित साहित्याचे दोन गुण मानले जातात. ते या पुस्तकात जागोजाग दिसतात. ‘ललित पद्धतीने लिहिलेले हे वैचारिक पुस्तक’ अशी त्याची ओळख खुद्द लेखिका सांगतात. लेखिका पद्मजा फाटक स्वतः हिरोशिमा आणि नागासकी इथे जाऊन आल्या. बॉम्बच्या मगरमिठीतून वाचलेल्या व्यक्तींशी, शांतिकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांशी आणि विविध तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा केल्या. अशी आपल्या लेखनविषयीची समज वाढविली. आरंभी केवळ शास्त्रीय संदर्भ तपासायची जबाबदारी अंगावर घेतलेले श्री. माधव नेरूरकर पुस्तकात इतके गुंतत गेले की आज त्यावर त्यांचे सहलेखक म्हणून नाव आले आहे. पुस्तकाची मांडणी कशी रंजक आणि अंतर्मुख करणारी आहे याचा एक मासला पहा. अणुबॉम्बचा नेमका जनक कोण, ओपनहायमर की झलार्ड या प्रश्नाचा ऊहापोह त्या असा करतातः
‘ओपनहायमर प्रकल्पाचा प्रमुख होता आणि बॉम्बचा जनक म्हणून मिरवावं असं त्याचं नेतृत्व खचित होतं. तरी बॉम्बचा जनक कोण असा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो.
-पक्षी कुणाच्या मालकीचा?
त्याला मारणाऱ्याच्या की त्याचा जीव वाचविणाऱ्याच्या?
– मूल कुणाचं?
जन्म देणाऱ्याचं, की त्याचं संगोपन करून त्याला ‘माणूस’ बनविणाऱ्याचं?
-खरी आई कोण?
अर्धे मूल मागणारी की ‘मूल कापू नका’ म्हणणारी?
याच चालीवर याही प्रश्नाची मांडणी करता येईल.
– अणुबॉम्बचा जनक कोण?
अणुबॉम्बची अनावश्यक निर्मिती आणि घातक वापर होऊ देणारा वैज्ञानिक की गैर वाटलेल्या टप्प्यावर अणुबॉम्बची निर्मिती व वापर रोखणारा संशोधक?
हा प्रश्न खरा नैतिक आहे.
एकदा तो मान्य केल्यावर हवे तर अधिकृतरीत्या ओपनहायमरलाच अणुबॉम्बचा जनक म्हणू. मग झलार्डला ‘‘अणुबॉम्बची आई” म्हणायला तर हरकत नसावी?’ (पृ. ३८६).
मानवजातीच्या सर्व दुखण्यांवर विज्ञान हा अक्सीर इलाज आहे असे समजणाऱ्यांना पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणातील चर्चा अस्वस्थ करील. ‘तारांगण’ या अखेरच्या प्रकरणात विज्ञानाचे मूळ उद्दिष्ट काय आणि माणूस आणि विज्ञान याचे नाते कोणते यांची चर्चा आहे. शेवटी शैक्षणिक अभ्यासक्रमात विज्ञानाइतकीच तत्त्वज्ञानासारख्या ज्ञानशाखांची जोड देणे लेखकांना आवश्यक वाटते. मानवाच्या विकासकार्यक्रमात विज्ञानाला स्थान आहेच, पण त्याला त्याची जागा दाखविण्यासाठी सामाजिक शास्त्रे, नीतिशास्त्र यांचा उपयोग आहे. अणुबॉम्ब करताना तेवढा एकच बॉम्ब करायचा आणि युद्ध संपवायचे असा भोळसट समज वैज्ञानिकांचा होता. परंतु गरज सरो आणि वैज्ञानिक मरो या पद्धतीने शासनाने त्यांना बाजूला सारले. त्यातून वैज्ञानिक जागे झाले. वैज्ञानिक संशोधन मानवी अस्तित्वाचाच शेवट करायला निघाले तर ती प्रगती कशी समजायची? आइन्स्टाइन म्हणतो त्याप्रमाणे ‘अणुबॉम्बनंतरच्या जगाला तोंड द्यायला नवीन धर्म, नवीन तत्त्वज्ञान, नव्या विचारसरणी यांची जरूर आहे.’
हिरोशिमाच्या संहारात बॉम्ब पडला तिथे दोन हजार मीटर्सच्या परिसरातील तळघरात काम करणारा एक मनुष्य सोडून एकजात सर्व जीवमात्र जळून खाक झाले. ८० हजार माणसे गेली, ७२ हजार घायाळ झाली. ६०% हिरोशिमा होत्याचे नव्हते झाले. यावर लेखिकेची टिप्पणी अशी – ‘एक माणूस नाहक मेल्यामुळे वाटणारं दुःख आठ माणसांच्या बाबतीत आठपट होतं का? आणि ८० हजार माणसांच्या बाबतीत ८० हजारपट अपराधी वाटतं का?’
लिओ झलार्ड हा हंगेरियन पदार्थवैज्ञानिक आणि जीवशास्त्रज्ञ, दूरदृष्टीचा, शांततावादी संशोधक. हिरोशिमा येथील प्रलयानंतर त्याने अस्सल झलार्डियन शेरा मारलाः ‘आमच्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या हातून हा शोध हुकला त्यांची नावं खरं म्हणजे पुढल्या वर्षीच्या शांतता पारितोषिकासाठी विचारात घेतली पाहिजेत!’ तो वारला त्यावेळी वृत्तपत्रांनी त्याच्या छायाचित्राखाली त्याचेच एक विधान छापले, ‘माझ्या शहाणपणाला कोणी गिऱ्हाईक मिळतंय का ते पाहतोय मी!’
‘विनाशाचे वाटेकरी’ हे प्रदीर्घ प्रकरण शास्त्रज्ञ – यात काही युद्धज्वर चढलेले, काही संशोधनाची झिंग अनावर झालेले, एकमेकांवर मात करू पाहणारे आणि सत्तालोभी, निर्दय राजकारणी, यांतून ट्रमन-चर्चिलही सुटले नाहीत – त्यांच्या खटपटी मुळातून वाचण्यासारख्या आहेत.
पुस्तकाचे जे पहिले सूत्र – अणुसंशोधन-बॉम्बनिर्मिती त्याची इतकी तपशीलवार हकीकत मराठीत प्रथमच लिहिली गेली आहे. ६०० पानी पुस्तकातला जवळजवळ अर्धा भाग तिने व्यापला आहे. विज्ञानाचे वाचक सोडले तर इतरांना यातली माहिती असण्याची शक्यता कमी आहे, म्हणून या घडामोडींचा वेचक भाग थोड्या विस्ताराने सादर करतो.
अणू एका इंचाचा दहाकोट्यंश एवढा आकारमान असलेली कणिका. तिचे मुख्य तीन घटक-प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. अणू भरीव आणि अभेद्य मानला जात असे. अणूचे अस्तित्व भारतीय तत्त्वज्ञांना माहीत होते, पण ते एक तर्कगम्यपदार्थ म्हणून. त्यांचा युक्तिवाद असा होता – प्रत्येक सावयव पदार्थाचे त्याच्या अवयवांमध्ये विभाजन होते. ही विभाजनक्रिया अनंत असू शकत नाही. नाहीतर शेवटी काहीच उरणार नाही, म्हणजेच अभाव स्थिती येईल आणि अभावातून भावपदार्थ उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून विभाजनक्रिया कोठेतरी थांबलीच पाहिजे. हा जो अणूचा अविभाज्य घटक तो अभेद्य आणि तर्कगम्य असतो. ग्रीकांच्या तत्त्वज्ञानातदेखील अणू अभेद्य असा अनुमानविषय आहे. १९१९ साली कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत रुदरफोर्ड या ब्रिटिश शास्त्रज्ञाने अणूचा भंग करून दाखविला. त्यातील प्रोटॉन या धनविद्युत् भारित घटकाच्या शोधाचे श्रेय रुदरफोर्डला जाते. इलेक्ट्रॉनचे अस्तित्व थॉमसनने सिद्ध केले आणि जो पॉझिटिव्ह नाही आणि इलेक्ट्रॉनप्रमाणे निगेटिव्ह विद्युत्भारवाहक नाही असा अलिप्त-न्यूट्रल घटक म्हणजे न्यूट्रॉन. त्याच्या सिद्धीचा मान (१९३२) जेम्स चॅडविक या रुदरफोर्ड-शिष्याचा आहे. अणूच्या केंद्रस्थानी घन अणुकेंन्द्र (न्यूक्लिअस) असते आणि त्याभोवती ठरावीक कक्षेत इलेक्ट्रॉन फिरतात. ते ज्यावेळी कक्षांतर करतात त्यावेळी केंद्रातील ऊर्जा शोषतात किंवा बाहेर सोडतात म्हणजे उत्सर्जन करतात. न्यूट्रॉनच्या शोधामुळे अणुशक्तीचे महाद्वार उघडले गेले.
एन्रिको फर्मी या इटालियन वैज्ञानिकाने दोन महत्त्वाचे शोध लावले. एक, अणुकेंद्रावर मंदगति न्यूट्रॉनचा मारा करता येतो. दोन, गती कमी केली की न्यूट्रॉनचा प्रभावीपणा शंभरपट वाढतो. किल्ल्याचे न उघडणारे द्वार टेबल टेनिसच्या चेंडूने उघडावे असे दुष्कर कार्य न्यूट्रॉन्सनी साध्य झाले.
अणुकेंद्राचे दोन भागांत विभाजन झाल्यास परस्पर अपकर्षणाने (mutual repulsion) ते जोरात फेकले जाऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जानिर्मिती व्हावी. आइनस्टाइनच्या सूत्राप्रमाणे (E=mc2) वस्तुनाश होऊन ऊर्जा-उत्सर्ग होतो. ऑटोफ्रिश या निर्वासित ज्यू वैज्ञानिकाने या क्रियेला विखंडन (fission) हे नाव दिले. आण्विक विखंडनाचा शोध जर्मन पदार्थवैज्ञानिक आणि रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान याने लावला.
अणुबॉम्बच्या संशोधनात लिओ झलार्ड या हंगेरियन वैज्ञानिकाचा मोठा वाटा आहे. ज्याच्या अणूला एक न्यूट्रॉन पुरवला तर दोन न्यूट्रॉन्स बाहेर पडतील असे मूलद्रव्य सापडल्यास त्यातले न्यूट्रॉन्स पुन्हा भोवतालच्या अणूचे विखंडन करतील आणि आणखी न्यूट्रॉन्स बाहेर पडतील अशी एक साखळी-प्रक्रिया सुरू करता येईल ही कल्पना त्याला सुचली. मात्र हे मूलद्रव्य त्याला सापडले नाही. साखळी-प्रक्रिया प्रयोगसिद्ध केली ती फर्मीने. न्यूट्रॉनची गती मंद करण्यासाठी ग्रॅफाईट वापरले गेले. ग्रॅफाईट म्हणजे कार्बनचा मऊ प्रकार, पेन्सिलीतील शिसे. २ डिसेंबर १९४२ रोजी शिकागो विद्यापीठाच्या आवारात फर्मी आणि त्याचे सहकारी यांनी युरेनियम हे मूलद्रव्य आणि ग्रॅफाईट यांचे घर रचून एक आण्वचिती (atomic reactor) रचली. सत्तावन्नावी थप्पी पूर्ण झाल्यावर साखळी-प्रक्रिया सुरू होणार होती. हा प्रयोग यशस्वी झाला आणि अणुऊर्जेची निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
युरेनियम हे मूलद्रव्य मुळात दुर्मिळ. त्याचे U238 आणि U235 असे दोन प्रकार आहेत. त्यातला U235 अणुबॉम्बसाठी लागतो. त्यापासून किरणोत्सर्ग घडवून प्लूटोनियम काढले जाते. प्लूटोनियमपासून अधिक प्रभावी बॉम्ब तयार करता येतो. युरेनियमसारख्या मूलद्रव्यावर न्यूट्रॉनच्या कणांचा मारा झाल्यास न्यूट्रॉन अणुकेंद्रात घुसतात. अणुकेंद्र फुटून ऊर्जा व आणखी न्यूट्रॉन्स अशी एक साखळी-प्रक्रिया सुरू होते. एक लक्षांश सेकंदात निर्माण होणाऱ्या व या प्रचंड ऊर्जेमुळे स्फोट होऊन मैलोगणती प्रदेश उद्ध्वस्त होतो; लाखो माणसे मरू शकतात; किरणोत्सर्गाला बळी पडतात.
प्रत्यक्षात अमेरिकेला अण्वस्त्र-प्रकल्प हाती घ्यायला उद्युक्त केले ते शास्त्रज्ञांनी. तेही जर्मन अणुबॉम्बच्या धास्तीने. त्यात आइन्स्टाइनचा सहभाग कसा नावापुरता होता, झलार्डसारख्या शांतिवाद्यांची फसगत कशी झाली, द्रव्यबळ-मनुष्यबळाचे मूळचे अंदाज सपशेल चुकून या प्रकल्पापायी १५ लक्ष माणसे आणि २०० कोटी डॉलर्स एवढा खर्च कसा लागला हे सगळे मुळातूनच वाचायला पाहिजे.
हायड्रोजन बॉम्बची निर्मिती अणूंच्या सम्मिलनावर (fusion) आधारित आहे. त्याच्या निर्मितीला शास्त्रज्ञांचा – ओपनहायमरसकट सर्वांचा विरोध होता. पण रशियाने अणुबॉम्ब बनवला ही एक आणि कोरियनयुद्ध ही दुसरी – या दोन घटनांनी तो विरोध ताबडतोब मावळला. पहिल्या प्रयोगवजा केलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणीच्या स्फोटाची क्षमता हिरोशिमा बॉम्बच्या ७०० पट मोठी होती. पहिल्या चाचणीत युजिलॅव हे अख्खे बेट नाहीसे झाले. रशियन हायड्रोजन बॉम्बची चाचणी १२ ऑगस्ट ५३ रोजी झाली. अमेरिकेने १ मार्च १९४५ रोजी पॅसिफिक महासागरात केलेल्या स्फोटानंतर बिकिनी बेटावर साचलेल्या राखेची तपासणी केली गेली. तिच्यात ‘स्ट्राँटियम ९०’ हे द्रव्य सापडले. ते माणसाच्या आणि माशांच्या शरीरात २८ वर्षे दबा धरून बसणार होते. स्फोटानंतर पृथ्वीभोवतीच्या वातावरणाच्या वरच्या थरात किरणोत्सार साचून राहिला आहे. त्यात स्ट्राँटियम व किरणोत्सारी आयोडिन ही घातक द्रव्ये आहेत. स्ट्राँटियम लहान मुलांच्या दातांत, हाडांत कायमचे घुसून बसते. त्यामुळे गर्भावस्थेतील बालके जन्मतःच विकृत होतात. पुढे ल्युकेमिया त्यांचा बळी घेणार असतो. आण्विक चाचण्यांमुळे पृथ्वीवरच्या प्रत्येकाचे आयुष्य काही आठवड्यांनी कमी झाले आहे.
माणसाची सर्जनशीलता आत्मघातकी वळणावर आली. शत्रूपेक्षा प्रबळ अस्त्र आपल्या हाती हवे या ध्यासापायी जीवशास्त्रीय अस्त्रांची निर्मिती करण्यापर्यंत मजल गेली. ती थोपविण्याचे श्रेय मॅथ्यू मेसेलन या थोर अमेरिकन जीवशास्त्रज्ञाकडे जाते. त्याने एकांडेपणाने चिकाटीने प्रयत्न करून १९६९ साली एक गड जिंकला. अमेरिका जीवशास्त्रीय अस्त्रांचा विकास व उत्पादन पूर्णपणे थांबवत आहे, त्या अस्त्राचे साठे नष्ट करीत आहे, आपल्या प्रयोगशाळा खुल्या करीत आहे अशी एकतर्फी घोषणा अध्यक्ष निक्सन यांनी केली. १९७२ साली रशियानेही आपले पाऊल मागे घेतले. दोन महासत्तांमध्ये असा समझोता करण्यासाठी मेसेलनने ९ वर्षे रक्ताचे पाणी केले होते.
मेसेलनला एकहाती प्रयत्नांनी जे साधले ते झलार्ड आणि इतर मानवतावादी वैज्ञानिकांना का साधले नाही? आइन्स्टाइन, रॉबिनोविच, वाईसकॉफ, विग्नर, रोटब्लाट या शास्त्रज्ञांना अपयश का आले याचे उत्तर असे की, संशोधनाची ओढ, प्रसिद्धी-अधिकारपदाची हाव, देशप्रेम, स्पर्धा या गोष्टी आड आल्या. शास्त्रज्ञांमधला बंधुभाव व परस्परविश्वास आटला होता. युद्ध चालू असता जर्मन संशोधक हायसेनबर्ग, ऑटो हान यांनी आम्ही अणुबॉम्ब बनवत नाही आहोत, तुम्हीही बनवू नका असा संदेश पाठवला होता. पण त्यांच्या परागंदा देशबांधवांचा आणि अमेरिकन वैज्ञानिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. हा युद्धाचा प्रताप होता. ज्याच्या हाती प्रथम अणुबॉम्ब येईल तो जिकेल हे उघड होते. हिटलरच्या हाती अणुबॉम्ब येता तर, लंडन-न्यूयॉर्क हिरोशिमा नागासकीच्या मार्गाने गेले असते या युक्तिवादात तथ्यांश आहे.
‘युद्धकाळासारख्या कसोटीच्या काळातही टिकेल अशी आचारसंहिता माणसाला सापडेल का?’ ‘हे पुस्तक आम्ही का लिहिलं?’ असे प्रश्न लेखकांनी प्रारंभीच उपस्थित केले आहेत. वैज्ञानिक प्रगती, अस्त्रांची निर्मिती आणि आपली (यात वैज्ञानिकही आले) नैतिक जबाबदारी ह्या प्रश्नांना एकमेकांपासून तोडता येणार नाही हे लेखकांनी समर्थपणे दाखवले आहे. विज्ञान हे ‘पॅंडोराच्या पेटी’सारखे आहे. ग्रीक पुराणकथेतील ही गोष्ट त्या प्रकरणाच्या आरंभी सांगून लेखिका डिडॅलसच्या उत्तराकडे वाचकाला नेतात. डिडॅलस म्हणतो, “माणसांना सुखी करायचा माझा हेतू नाही. मला ती सुजाण, सुज्ञ व्हायला हवी आहेत… शस्त्रास्त्र पेलायची तर त्यांना आणखी शहाणं व्हावं लागेल. आपली वागणूक सुधारावी लागेल.”
माणसाची ज्ञानलालसा दुर्दम्य आहे. त्याला सुजाण व्हायला प्रवृत्त करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
लेखकद्वयांचा मूळ संकल्प हा सहस्र सूर्याहून प्रखर (Brighter than a thousand suns) आणि अंतरात्म्याची टोचणी (Tongues of Conscience) या पुस्तकांची स्वैर भाषांतरे करण्याचा होता. तो महाभारताप्रमाणे विस्तारत गेला आणि सहाशेपानी बृहत्कायग्रंथ सिद्ध झाला. त्यात अणूची कहाणी सांगताना अनेकानेक अवांतर गोष्टी आल्या. वैज्ञानिकांची उपकथानके आली. पुस्तक फुगत गेले. त्यामुळे ग्रंथाचे सूत्र अधूनमधून हातून सुटत जाते. यापेक्षा एक आटोपशीर ग्रंथ जास्त परिणामकारक झाला नसता का असे सारखे वाटत राहाते. मुळात विषयच इतका रोचक आहे की त्याचे निवेदन वाचनीय होईल की नाही याची चिंताच नको. विद्यमान मराठी वाचक एवढा मोठा ग्रंथ, तोही ऐतिहासिक–पौराणिक कादंबरी नसलेला, कितपत वाचेल, तोही अभ्यासूवृत्तीने, हा प्रश्न आहे. वाचक ‘ग्रंथ विकत घेऊन वाचोत’ हे म्हणणे पसायदान मागण्यासारखे आहे. दुसरी संक्षिप्त आवृत्ती काढावी, ती लवकर निघो अशी शुभेच्छा!
बाराला दहा कमी
लेखक: पद्मजा फाटक व माधव नेरूरकर
राजहंस प्रकाशन, पुणे. मूल्य: रुपये ४००.००
शांतिविहार, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१