आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द तसे परिचयाचे. पण तरीही त्यांचा नेमका अर्थ प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून. साध्या सोप्या भाषेत मी देवावर विश्वास ठेवणारा आस्तिकआणि तसं न करणारा तो नास्तिक असं समजते. आणि याच साध्या अर्थाच्या अनुषंगानं माझे विचार मांडते. मी नास्तिक का आहे? प्रश्नाच्या उत्तराचे अनेक कप्पे आहेत. काही उदाहरणांसह ते स्पष्ट करीनच.
मुळात लोक आस्तिक का असतात? पूर्वीचा काळ ढवळून पाहिला तर कुणीतरी धर्मगुरू – धर्माची शिक्षणप्रणाली पुढं हाकणारे असे जे कुणी होते त्यांनी समाज आपल्या इशा-यांवर नाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पटेल ते, किंबहुना आपलं अस्तित्व अबाधित रहावं म्हणून अनेक गोष्टी त्यांनी समाजावर लादल्या. एक कुठली तरी अदृश्य व्यक्ती – देव आपणा सर्वांवर नियंत्रण ठेवते. जर आपण चुकीचे वागलो तर तीच शक्ती आपल्याला नामशेष करून टाकेल, ही भीती समाजावर पसरवली गेली. शिवाय स्वतः (धर्मगुरू) त्या देवाचे दूत आहोत, देवानं दृष्टांत दिला, इत्यादि गोष्टी लोकांत पसरवून त्यांच्यावर वर्चस्व गाजवणं हा प्रकार सुरू झाला. पुढे पुढे जसजसं शिक्षण, विज्ञान येत गेलं अशी लोकं मागे मागे पडत गेली. पण वर्षानुवर्षे समाजावर बिंबवले गेलेले काही व्रण मात्र तसेच राहिले. देव ही संकल्पना तशीच राहिली. सनातनी लोकांनी ती सांभाळली. पुढच्या वारसदारांना वारसा म्हणून दिली. लहानपणापासून संस्कार केले गेले. ‘तू असं केलंस ना तर तुला देवबाप्पा शिक्षा करील’, ‘देवाला सांग देवबाप्पा मला सुखी ठेव’ अशा शिकवणुकीमुळे लहानपणापासूनच माणूस देव नावाच्या शक्तीला घाबरू लागला, तिच्यासमोर नतमस्तक, व्याकुळ होऊ लागला.
माझ्यावरही सारे संस्कार झाले. मग मी नास्तिक का? कारण मी ती गोष्ट मानत नाही जिचं अस्तित्व जाणवत नाही. नीट लक्ष द्या, मी जी गोष्ट दिसत नाही असं म्हटलं नाही. जिचं अस्तित्व जाणवत नाही. म्हणजे असं पाहा वारा दिसत नाही, पण वाहातो तेव्हा ते जाणवतं, कृष्णविवर दिसत नाही, पण त्याच्या गुरूत्वाकर्षणानं एखादी गोष्ट खेचली जाते हे जाणवतं. त्यामुळे या गोष्टी आहेत हे मी मानते. पण ‘देव’ नावाच्या गोष्टीचं अस्तित्व मला जाणवत नाही.
एखादा आस्तिक मला समजावेल. हे गगन, हे तारे, हे पाणी सारं सारं त्याच्यामुळे आहे.
माझं उत्तर असेल, मुळीच नाही. पृथ्वीभोवती पोकळी आहे म्हणून वातावरणाच्या रूपात गगन आहे, खगोल शास्त्रात तान्यांच्या उत्पत्तीची माहिती आहे, ती पटणारी आहे. पाणी पृथ्वीवर का आहे हेही शास्त्र सांगते. कुणी म्हणेल, “अग बाई, तुझं जीवन हे आयुष्य त्याच्यामुळे मिळालंय.” माझं उत्तर, नाही ते माझ्या आई-वडिलांमुळे मिळालंय. यालाही शास्त्र सोबत आहे. टेस्टट्यूब बेबी पूर्वीच देवानं का नाही तयार केली? जर तो निर्माता आहे तर त्यानं निर्माण केलेला माणूस आज त्याच्यापुढे कसा गेला?
आस्तिकतेचं आणखी एक कारण म्हणजे असहायता. अनेक गोष्टी आपल्या हाती नसतात, पण त्या घडतात मग अशा वेळी काय करायचं? आपल्या हाती काही नाही याची जाण असतेच, आपले आप्तजनही मदत करू शकणार नाहीत याची कल्पना असते. मग – अखेरचा उपाय – कुठल्या तरी अगाध शक्तीची आळवणी. परिणाम काय? होणार असतं तेच होतं. पण चांगलं झालं तर देवाची कृपा झाली हा अभिप्राय, तर वाईट झाल्यास माझीच उपासना चुकीची झाली असावी, काहीतरी राहून गेलं असावं अशी स्वतः स्वतःची समजूत काढायची. मी स्वत: अशा असहाय अवस्थेत कशी वागते? मी नेहमीच मानते की जे व्हायचं आहे ते अटळ आहे. कदाचित ते अप्रियहीं असेल. मग मी उपासना वा नामस्मरण नाही करीत बसत; कारण माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचं नसतं. माझ्यामते महत्त्वाचं असतं अप्रिय घडल्यावर स्वतःला सावरणं, इतरांना सावरणं, त्या मरगळीतून पुन्हा वर कसं यायचं, हे सारं कसं तारून न्यायचं? याचा विचार करणं मी अधिक पसंत करते. स्वत:ला त्यासाठी तयार करते.
मी माझ्या जीवनात घडणार्यास प्रत्येक घटनेचं उत्तर त्या प्रसंगातच शोधते. त्यामुळे, देवा हे असं का? असं विचारण्याची वेळ माझ्यावर येत नाही. पोटावर अन्याय नको म्हणून उपवास करणं मला पटतं, पण देवासाठी म्हणून सोमवार, शनिवार करणं मला पटत नाही. माझं मत स्पष्ट आहे, जर तुम्ही तो उपवास तुमच्या प्रकृतीसाठी करीत असाल तर ते तसं मान्य करा. त्या कुणा तिन्हाइतासाठी आपण कष्ट सोसत आहोत हा आभास कशासाठी? बरं हे सारं करताना नि:स्वार्थी वृत्ती असेल तर तेही नाही. प्रत्येक उपवासामागे काहीतरी अपेक्षा असतेच. म्हणजे थोडक्यात तुम्ही एकीकडे ज्या शक्तीला ‘महान शक्ती’ मानता तिला कमी दर्जाचीही ठरवता की, मी अमुक अमुक दिवस उपवास करीन, मला हे मिळू दे, मी हे काम झालं की दहा नारळ वाहीन … हे आणि अशा अनेक बोली लावल्या जातात. सरकारी नोकराला आपण सांगतो ना हे एवढं काम कर बुवा तुला अमुक देईन, अन् ते काम जरा लवकर होतं. मग जी अगाध शक्ती तुम्ही पूजता ती इतक्या खाली कशी आणता? मग तिच्यात आणि सर्वसामान्य माणसात अंतर काय?
सारासार विचार करता जी गोष्ट पटते ती मान्य करणं मला सोपं जातं. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे शक्य नाही, निदान एका सर्वसाधारण माणसाला तरी
ते शक्य नाही. पण ‘उद्धरेदात्मनात्मानं’ शक्य वाटतं. म्हणजे पटतं. आता हे विचार पटतात म्हणून किंवा हे असं सात्त्विक, बौद्धिक वाचायला, समजून घ्यायला आवडतं म्हणून गीता जवळ बाळगायला आवडते. एखाद्या अस्थिर क्षणी या ग्रंथातील हे विचार मनाला आधार देऊ शकतात. पण हाच ग्रंथ केवळ पवित्रग्रंथ म्हणून देव्हार्या त ठेवून पुजावं तर ते मला जमणार नाही. कारण ह्या ग्रंथाबाबतीत मी आस्तिक आहे, वाद नाही, पण आस्तिकतेचा पुरावा देण्यासाठी ते सारे सोपस्कार करणं मला पटत नाही. इथं आस्तिकता म्हणजे निखळ श्रद्धा!
जशी आणि जेवढी माझी ‘गीता’ या पुस्तकावर श्रद्धा आहे तशीच ती माझ्या आईवडिलांवर आहे. माझ्या काही माननीय गुरुजनांवर आहे. तेव्हा त्याबाबतीत मी नक्कीच आस्तिक आहे. अन्यथा मी नास्तिक आहे. माझ्यात नसलेल्या त्या आस्तिकतेबद्दल मला खंत नाही, असलाच तर असलेल्या आस्तिकतेचा अभिमान आहे!
३ धनराज बाभई लो. टि. मार्ग बोरिवली (प.) मुंबई ९१
२
ऑक्टोबर १९७८ सालांतील ही सत्य घटना. महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरात राहणारे, प्रतिष्ठित, कुलवंत, सधन व सुशिक्षित घराण्यातले, वयाने दोघेहि ५५ च्या पुढचे असलेले, एक दांपत्य अमेरिकेच्या दौर्याकवर आले होते. माझ्या पुतणीच्या सासरच्या बाजूचे ते जवळचे नातेवाईक, तेव्हा न्यूजर्सीमध्ये ते तिच्याकडेच राहात होते.
‘कोलंबस डे’ ची इथे सोमवारी सुट्टी होती. म्हणजे शनिवार, रविवार व सोमवार असा लागोपाठ ३ दिवस सुट्टीचा long weekend होता. रविवारी रात्री अमेरिकेच्या दौर्यारवर आलेल्या पं. भीमसेन जोशींचा एके ठिकाणी गाण्याचा खाजगी प्रोग्रॅम होता. वास्तविक ह्या जोडप्याची व जोशी दांपत्याची खूप ओळख. पण त्या गाण्याला माझ्या पुतणीबरोबर जेव्हा हे जोडपे गेले तेव्हा नेहमी हसतमुख, खूप मनमोकळ्या गप्पा मारणाच्या ह्या बाई त्या रात्री मात्र खूपच अबोल झाल्या होत्या, कुठे तरी ‘ट्रान्स’ मध्ये असल्या सारख्या वागत होत्या. प्रोग्रॅमहून घरी परत यायला जवळजवळ रात्रीचे २-३ वाजले होते.
जाग्रणामुळे व सुट्या असल्यामुळे सर्वजण जरा उशीरापर्यंत झोपले. साधारण सकाळी ८ च्या सुमारास त्या दांपत्यांतील गृहस्थांनी माझ्या पुतणीला व तिच्या यजमानांना उठविले व सांगितले कि माझ्या बायकोच्या ‘अंगांत देवी’ आली आहे. सर्वजण धावतच ‘गेस्टरूम’मध्येगेले. बघतात तर काय, बेडवरच त्या बाई कुणाशी तरी (?) अस्पष्ट बोलत होत्या.“या वर्षी मी तुझी सेवा करायला तेथे नाही”. पण पुढच्या वर्षी नक्की सेवा करीन’ असे काही तरी एकतर्फी (?) संभाषण करीत होत्या. बघता बघता त्या बाईचे कपाळ कुंकवाने भरले. हातात काही नव्हते. कुंकू कुठून आले हे कुणाला कळेना. माझ्या पुतणीने त्यांची ओटी भरली. प्रसादाचे म्हणून थोडे कुंकू त्यांच्या कपाळावरचे काढून स्वत:च्या कपाळावर लावले. नंतर काही वेळाने
त्या बाई हळूहळू पूर्ववत् झाल्या.
ज्यावेळी हा प्रकार घडला त्याच वेळी इंडियात नवरात्रांतील अष्टमीचा दिवस होता व साधारण संध्याकाळचे ६ ते ७या दरम्यानची वेळ होती. दरवर्षी नवरात्रांतील अष्टमीला घागरी फुकताना त्या बाईंच्या अंगात येई. म्हणूनच इंडियापासून इतक्या लांब आल्या तरीहि तो अष्टमीचा संपूर्ण दिवस त्या ‘ट्रान्स’ मध्ये असल्यासारख्या वागत होत्या.
माझ्या लहानपणी नवरात्रांत पुण्याला जोगेश्वरी, अष्टभुजा वगैरे देवींच्या देवळात अंगात आलेल्या बायका मी लांबून बघितल्या होत्या. त्याबद्दल बालमनाला एक भीती उत्पन्न झाली होती. पण त्याबद्दल कुतूहलहि वाटत असे. काही अडाणी, गरीब बायका पैसे मिळविण्यासाठी हे ढोंग(?) करतात असेही काही लोकांकडून ऐकले होते. पण यावरील प्रसंगातील बाई तर असे काही नाटक वगैरे करणे शक्यच नव्हते. शिवाय त्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरत असताना पैशासाठी असे करणे हे त्यांच्याबाबतीत अशक्यप्राय होते. उलट त्याच अनेकांना दानशूरपणे दान करून गोरगरिबांना आश्रय देत. त्यांचे माहेरही वेदशास्त्रसंपन्न घराणे. त्या बाईकडे बघून कुणालाही त्यांचेबद्दल आदर उत्पन्न व्हावा असेच त्यांचे व्यक्तिमत्व. मग हे जे देवीचे अंगात येणे या देशांतही घडून आले त्याला काय उत्तर? या घटनेबद्दल स्पष्टीकरण करता येईल काय? या सत्य घटनेत ‘तिखटमीठ’ लावून घटना अतिरंजित केली गेली नाही याची खात्री बाळगा.
सरिता करंदीकर
812 Marrary Hill Road Vestal Nr 13850, U.S.A.
(वरील प्रकारांची चर्चा व त्यामागील शक्तींचे (?) स्वरूप याविषयी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठे काम केले आहेत. डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांचे ‘अंधश्रद्धा विनाशाय’ व ‘विचार तर कराल’ आणि श्याम मानवांचे ‘बुवाबाजीचे बळी’ व ‘बुवाबाजी एक फसवेगिरी’ही पुस्तके लेखिकेने अवश्य पाहावीत.
– संपादक)