(७) विवेकनिष्ठेचा सांभाळ
पण हा विषय एवढ्यावरच सोडून द्यावा असे मला वाटत नाही. विवेकनिष्ठा मला प्रिय आहे आणि राष्ट्रवादही. म्हणून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एक उपाय सुचतो तो सांगतो.
विवेकनिष्ठा आदर्श समाजाचा आधार म्हणून इष्ट तर आहेच, पण एकूण विचार करता राष्ट्रवादालाही पोषक आहे. कारण राष्ट्रवादाला संघटनेच्या आड येणारे समाजाचे दोषही दूर करायचे असतात. हे दोष परंपरेतून, इतिहासातून निर्माण झालेले असतात. त्यांची नीट चिकित्सा झाली पाहिजे; कारण चिकित्सा झाल्याशिवाय त्यांच्यावर उपाययोजना करता येत नाही. पण आवाहनात्मक, स्फूर्तिकारक मांडणी करताना गटाच्या दौर्बल्यांचे विश्लेषण करणे टाळले जाते आणि त्याची उभारणी निरोगी पायावर होत नाही. थोडक्यात अशा प्रकारची मांडणी उद्दिष्टविरोधी (काउंटरप्रोडक्टिव) होते.
या ठिकाणी राष्ट्रवादी विचारवंतांवर एक जबाबदारी येते. त्यांनी सत्य इतिहास धुंडाळला पाहिजे, विश्लेषण केले पाहिजे, मूल्यमापन केले पाहिजे; आणि राष्ट्रनेत्यांना, म्हणजे संघटकांना, गटाच्या दौबल्यांची, विकृतींची, स्वभावजन्य अवगुणांची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणजे एका बाजूला मिथकांवर किंवा अपूर्ण सत्यावर आधारलेली स्फूर्तिदायक आवाहने चालू असताना दुसऱ्या बाजूला वैचारिक क्षेत्रात त्या क्षेत्राचे दंडक प्रमाण मानून अभ्यास होत राहिला पाहिजे. असे आणखी एक द्वैत मी पुरस्कारीत आहे!
खरे म्हणजे शहाणे, समंजस राष्ट्रनेते असा दुटप्पीपणा करीत असतातच. तो फार चुकीचा आहे. असे मला वाटत नाही.
पण हे शहाणपण जेव्हा कमी पडते तेव्हा एक दुर्दैवी परिस्थिती निर्माण होते. आवाहने आणि घोषणा सामाजिक – राजकीय तत्त्वज्ञानाच्या जागा घेतात. भारतातला आजचा राष्ट्रवादी विचार, मग तो हिंदुराष्ट्रवादी असो की हिंदीराष्ट्रवादी असो, या कोंडीत सापडला आहे असे मला वाटते.
(८) परंपरा, धर्म आणि विवेकनिष्ठा
परंपरेचा विचार करताना धर्माचा विचार करावा लागतो, कारण परंपरेचा काही हिस्सा धर्माने व्यापलेला असतो. याबाबतची माझी भूमिका मी पूर्वी मांडलेली आहे व तीवर काही चर्चाही झाली आहे. (दि.य. देशपांडे, आ. सु. जाने. ९६, स. ह. देशपांडे, मार्च १९९६; दि. य. देशपांडे, एप्रिल १९९६, गो. पु. देशपांडे सप्टे. ९४).
दि. य. देशपांडे (आ. सु. एप्रिल १९९६) यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं मी माझी भूमिका पुन्हा एकदा थोडक्यात मांडतो. ईश्वर ही कल्पना मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणं शक्य दिसत नाही. कारण तिची मुळं मानवाच्या कपाळी लिहिलेल्या एकटेपणात आहेत. ती केवळ अज्ञानात आणि अविवेकात नाहीत. हे एकटेपण माणसाच्या नियतीचा भाग आहे; तेअल्टिमेट ह्युमन प्रेडिकॅमेंट’ आहे. इतक्या जोरकस शब्दांत मी हे सांगितलं नसेल कदाचित (मार्च १९९६.) पण मला काय म्हणायचं ते पुरेसं स्पष्ट होतं. माझा निष्कर्ष असा की ईश्वर आणि धर्म यांचा उच्छेद शक्य नाही. तरीही निराश व्हायचं कारण नाही; कारण ईश्वर आणि धर्म पूर्णपणे निरस्त झाले नाहीत तरी मागं हटतात, म्हणजेच “धर्मसुधारणा होते. समाजाला पुढे घेऊन जाऊ इच्छिणाच्या नेत्यांना आणि विचारवंतांना, ते स्वतः विवेकवादी असले तरी, हे वास्तव लक्षात घ्यावं लागतं, नाही तर ते निष्प्रभ किंवा पराभूत होण्याची शक्यता असते.
आपल्या उत्तरास दि. य. दे. यांनी ईश्वरकल्पनेविषयी मी जे म्हटले आहे त्याची पुरेशा गंभीरपणानं दखल घेतलेली नाही. माझ्या प्रतिपादनाला “नेहमीचा बचाव” असं म्हणून त्यांनी तो दुर्लक्षित केला आहे. अजूनही या प्रश्नांशी ते नीट भिडत नाहीत असं दिसतं. आ. सु. में १९९७ च्या अंकात गं. र. जोशी यांनी विचारलं आहे, “विश्वाच्या विराट पसाच्यात मानवाच्या पराधीन पुत्राची ‘ईश्वर’ ही भावनिक वा आंतरिक गरज आहे हेही न मानण्यात निखळ विवेकवादातील एक त्रुटी तर नसेल ना?” वेगळ्या भाषेत मी विचारलेला प्रश्नच जोशी विचारीत आहेत हे स्पष्ट आहे. यावर दि. यं. ची प्रतिक्रिया अशी : “मानवाचा पराधीन पुत्र कोण? पण ते जाऊ द्या.” (पुढचा परिच्छेद) “येथे भावनिक गरज आणि आंतरिक गरज म्हणजे काय असा प्रश्न उद्भवतो.’ (आ. सु. मे १९९७) “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या ग. दि. माडगूळकरांच्या ‘गीत रामायणातील शिक्षित महाराष्ट्राला सर्वथा परिचित असणाऱ्या ओळी आहेत. मानव प्राण्याची असहायता त्यांत व्यक्त झाली आहे. त्यामुळे दि. यं, ना या शब्दांच्या अर्थाबद्दल इतकं कोडं का पडावं हे कळत नाही. ‘आंतरिक गरज’ म्हणजे खोल गरज’ असा अर्थही स्पष्ट आहे! असो. दि. य. दे. जोशी यांना उत्तर देताना पुढे काय म्हणतात ते पाहण्यासारखं आहे.“आपल्या गरजा भागवायला निसर्ग बांधलेला नाही”. सदाचरणी लोकांना सुख मिळेल ही गरज नैतिक असेल, ती निसर्गावर बंधनकारक नाही. अतिशय तीव्र, उत्कट, आंतरिक इच्छाही पुरी होईल याची शक्यता नाही. मला वाटतं जोशी यांच्या मी उद्धृत केलेल्या विधानाचा दि. य. दे. यांनी वेगळा अर्थ केला आहे. जोशींनी प्रतिपादिलेली गरज एकटेपणातल्या “आधारा”ची आहे, ती न्याय-नीती ईश्वर प्रस्थापित करील या शाश्वतीची नाही. म्हणजे पुन्हा मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे.
तो मुद्दा पुन्हा अधिक स्पष्ट शब्दांत सांगायचा तर असा की एकटेपणात माणसाला आधार लागतो. पुष्कळ विवेकनिष्ठ माणसंही आजारात किंवा वार्द्धक्यात रामनामाचा जप किंवा तत्सम काही करू लागतात ही नेहमीच्या पाहण्यातली गोष्ट आहे, आणि त्यावरूनही हे सिद्ध होतं की माणूस मुळात भितरा आहे. त्याला विकलतेची, मृत्यूची भीती वाटते. ती न वाटायला विवेकाशिवाय धैर्यही लागतं. काही अपवादात्मक व्यक्तींना ते साध्य होतं, पण सर्वसाधारण माणसांचा विचार करता त्यांना ते साध्य होत नाही असं दिसतं. या आधारासाठी ईश्वर हा ‘एकभ्रम’ (इल्यूजन) त्यांना उपयोगी पडतो किंवा उपयोगी पडतो असं त्यांना वाटतं. म्हणजे ईश्वर हे एक मानसशास्त्रीय घटित आहे. ती सायको-थेरपी आहे, मानसोपचार आहे. या मुद्दयाचा प्रतिवाद दि. य. दे. यांनी केला तर ते उपयुक्त होईल. एरवी ईश्वर व धर्म यांच्या समाजजीवनावरील प्रभावाचा पुरेसा विचार ते करीत नाहीत असा आरोप त्यांना पत्करावा लागेल.
पण दि. य. दे. यांना समाजाशी कर्तव्य नसल्यासारखी त्यांची भाषा आहे. ते (माझ्यासारख्या आक्षेपकांना उद्देशून) म्हणतात : “तुम्ही बाकीच्यांची गोष्ट सोडा. तुम्हाला मी म्हणतो ते पटते की नाही सांगा” (आ. सु. एप्रिल १९९६). बाकींच्याची गोष्ट का सोडा? तीच तर मी निर्माण केलेल्या प्रश्नात मध्यवर्ती आहे. “मला तुमचं म्हणणं (म्हणजे ईश्वर नाही हे) पटतं. समाजाचं काय करायचं ते सांगा’, एवढंच माझं दि. यं. च्या विधानावर प्रत्युत्तर असू शकेल.
धर्माची सुधारणा करणं विफल आहे, त्याचं पूर्ण उच्चाटन करणं हेच अवश्य आहे असं दि. यं. चं. मत आहे. ते म्हणतात, मूळ चौकट (म्ह. धर्माची) न मोडता करावयाचे उपाय अतिशय जुजबी, किरकोळ डागडुजीच्या स्वरूपाचेच असणार. त्यामुळे प्रा. देशपांड्यांनी (म्ह. मी) सुचविलेल्या उपयांनी सुधारणा फारशी झालेली नाही हे सांगायला नकोच’ (आ. सु. एप्रिल १९९६). खरं म्हणजे मुळात मी असं म्हटलं होतं की सर्वच सुधारणा धर्माच्या चौकटीत होत नाही. काही सुधारणा धर्म आक्रसून होते. काही सुधारणा ‘भाष्य’ आणि ‘पळवाटा’ यांमधून होते आणि ती धर्माच्या चौकटीत होते; काही सुधारणा विशिष्ट श्रद्धांचा त्याग करून होते आणि या प्रक्रियेत धर्माचा परिसर मर्यादित होत जातो. या मुद्याकडे दि. यं. चं दुर्लक्ष झालेलं आहे. सुधारणा फारशी झालेलीच नाही हे विधान तर मला अनैतिहासिकच वाटतं.
एकेकाळी धार्मिक अंधारयुगात बुडून गेलेला मध्ययुगीन ख्रिश्चन युरोप आज धर्माच्या पकडीतून बराचसा सुटल्याचं दिसत नाही काय? तसा तो बाहेर पडल्याची महत्त्वाची खूणम्हणजे धर्मनिरपेक्ष (सेक्यूलर) राज्यसंस्थेचा बव्हंशी स्वीकार. अशा राज्यसंस्थेत धर्म, ईश्वर या वैयक्तिक बाबी होतात, समाजकारणात धर्माचा शिरकाव होऊ दिला जात नाही. तीनचार शतकात घडलेलं हे परिवर्तन क्रांतिकारक म्हणावं इतकं मोठं आहे, “किरकोळ’ नाही. पण हे परिवर्तन ईश्वर व धर्म यांचे समूळ उच्चाटन न होताच घडून आलं आहे. (अजूनही बहुसंख्य माणसं आस्तिक आणि धर्मश्रद्ध असल्याचे निरनिराळ्या पाहण्यांवरून व निरीक्षणांवरून दिसून येतं.) शिवाय आता ख्रिश्चन युरोपच्या पलीकडे जाऊन भारतासारख्या देशांतही धर्मनिरपेक्षता (तत्त्वतः तरी) मान्य झाली आहे. इथली राज्यघटना कोणत्याही धर्माला अनुसरून केलेली नाही. इस्लामी देशही स्वतःला “इस्लामी’ म्हणवत असले तरी त्यापैकी अनेकांनी अनेक बाबतीत धार्मिक कायद्यांशी (शरियतशी) फारकत घेतली आहे.
ही ढळढळीत उदाहरणं दुर्लक्षून दि. य. दे. प्रतिपक्षाच्या एका दुर्बळ मुद्द्यावर हल्ला करतात. हा मुद्दा म्हणजे सोव्हिएत रशियात निधर्मीपणाचा प्रयोग फसला आहे. त्यावर दि. यं. चं म्हणणं असं की, “रशियन प्रयोग मुळातच सदोष होता. तो विवेकवादी नव्हता, आणि त्यात जबरदस्ती, भय, यांसारख्या उपायांचा सर्रास उपयोग केला गेला’ (एप्रिल १९९६). हे खरं आहे. पण हे उदाहरण घेऊन काय साधलं?शांततेच्या आणि विवेकी मार्गांनीच युरोपातलं, अमेरिकेतलं, भारतातलं परिवर्तन घडून आलं, पण दि. य. म्हणतात त्या अर्थानं नव्हे. खरं म्हणजे दि. यं. च्या अर्थानं तिथंही विवेकवादाचा पराभवच झालेला आहे, कारण ‘‘धर्माची हकालपट्टी” “ईश्वर, परलोक, मृत्यूत्तर अस्तित्व’ ह्या कल्पनांचा ‘‘त्याग’ या गोष्टी तिथं घडून आलेल्या नाहीत. समाजकारणातून धर्म, ईश्वर बाद झालेचे आहेत, त्यांचा अंमल संकुचित झालेला आहे; पण खाजगी जीवनात या कल्पना अजूनही सुप्रतिष्ठित आहेत.
एकूणच माझ्या असं लक्षात येतं की परमेश्वरश्रद्धेच्या मागच्या समाजशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा परिप्रेक्ष्य दि. य. लक्षात घेत नाहीत. परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही म्हणून आस्तिक्य बुद्धीचा त्याग केला पाहिजे. असं केल्यानं माणसाचं मन अधिक मुक्त होईल, अधिक आत्मनिर्भर होईल- असं त्याचं थोडक्यात प्रतिपादन आहे. त्यांचा हेतू मानवी मनातून हा भ्रम काढून टाकावा असा आहे. तो स्तुत्य आहे असं आपण धरून चालू. मग प्रश्न असा उभा राहतो की एक उघड-उघड असत्य लोक हजारो वर्ष का कवटाळीत राहतात?ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढल्याशिवाय दि. यं. चा हेतू कसा साध्य होणार? म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेची सामाजिक आणि मानसिक मुळं शोधायला नकोत काय?
खरं म्हणजे ईश्वरनिष्ठ माणसानं ईश्वराचं सार्वत्रिक आधिपत्य मान्य केलं पाहिजे. जेव्हा तो धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेला मान्यता देतो तेव्हा त्याचं वर्तन विसंगत असतं असं म्हणता येईल. जीवनाच्या केवळ काही अंशावरच ज्याचं नियंत्रण तो ईश्वर ईश्वर कसला आणि तो धर्म धर्म कसला? पण ही विसंगती माणसाच्या मनात सुखेनैव नांदते खरी. हा एक अधिक शोधघेण्यासारखा प्रश्न आहे. ईश्वरश्रद्धेचं स्वरूप अशा शोधातून आपल्याला अधिक चांगल्या रीतीनं कळेल.
राज्यसंस्था (पॉलिटी, स्टेट) धर्मनिरपेक्ष, पण समाज (सोसायटी) धर्मनिष्ठ ही स्थिती असमतोलाची आहे हेही मान्य करता येईल. आणि कदाचित् “हा असमतोल किती काळ चालेल?” असा प्रश्नही विचारता येईल. मात्र देशच्या देश असे असमतोल वर्षानुवर्ष पचवू शकतात हे तर उघड दिसतं.
आपला मूळ विषय राष्ट्रवाद आणि परंपरा यांचे संबंध हा आहे. धर्माच्या समाजमानसावरील प्रभावाचं वास्तव वर विवेचून सांगितलं आहे. राष्ट्रवादानं त्याच्याशी कसं जुळवून घ्यायचं?
जगानं जी यातून तोड काढलेली आहे तीच आपण काढावी. खरं म्हणजे अगोदर ती आपण काढलेलीच आहे. ती म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार. आपली राज्यघटना पूर्णपणे नसली तरी बरीच धर्मनिरपेक्ष आहे. पण धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय याबद्दल विचारात बराच गोंधळ आहे. शिवाय अशा काही शक्ती विद्यमान आहेत की ज्यांना सक्त धर्मनिरपेक्षता मंजूर नाही. तेव्हा धर्मनिरपेक्षतेची संकल्पना अधिक स्पष्ट करणं, आपली घटना धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीनं अधिक परपूर्ण करणे, तिचा राष्ट्रवादी विचारात अंतर्भाव होईल यासाठी प्रयत्न करणं आणि धर्मनिरपेक्षताविरोधी शक्तींशी मुकाबला करणं हा कार्यक्रम विचारवंतापुढे आहे. मात्र राष्ट्रवादी विचारानं धर्माच्या समूळ उच्चाटनाची भूमिका घेऊ नये. खाजगी जीवनात धर्मस्वातंत्र्यांची भूमिका घ्यावी – जशी घटनेनं घेतलेली आहे.
(९) समारोप
आधुनिक मूल्यांच्या नेहमीच्या चर्चेत अति-सुलभीकरण (ओव्हरसिप्लिकेशन) प्रत्ययाला येते. राष्ट्रवादाच्या संदर्भात त्यांच्याकडे नजर टाकली तर बरेच जटिल प्रश्न उभे असलेले दिसतात निष्कर्ष असा निघतो की राष्ट्रवाराष्ट्रांच्या स्पर्धेत ही मूल्यं स्थळकाळनिरपेक्ष (अॅबसोल्यूट) म्हणून स्वीकारता येत नाहीत, त्यांना मुरड घालावी लागते. तडजोडी कराव्या लागतात. या लेखात मी आधुनिक मूल्यं आणि राष्ट्रवाद यांच्या परस्परसंबंधांच्या काही दिशांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आधुनिकतेला कमीत कमी ढळ पोचेल अशा तडजोडी सुचविल्या आहेत. या विषयावर चर्चा व्हावी अस मला वाटतं.