वास्तविक पाहिले तर ज्यांना आपण लोक म्हणतो, व ज्यांच्या अपवादाला आपण भीत असतो, त्यांवर आपले फारच थोडे अवलंबून असते. लोकांना संतुष्ट राखण्याकरिता स्ववंचन करणे हे महापातक आहे असे समजले पाहिजे. सामान्य लोक अंधासारखे गतानुगतिक असतात. विचारी पुरुष अशांच्या छंदाने नेहमी वागतील तर सत्पक्षाचा प्रसार कधीच व्हावयाचा नाही. तेव्हा अज्ञानमग्न, अविचारी आणि ज्यांच्याशी आपला अर्थाअर्थी संबंध नाही अशा लोकसमुदायाच्या निंदेकडे आणि स्तुतीकडे दुर्लक्ष्य करून ज्याच्या मनाला जी मते प्रशस्त वाटत असतील त्यांचे त्याने निर्भयपणे प्रतिपादन करावे. असे केल्याने उलट पक्षांचे ऐकून घेण्याची व विचारपूर्वक सत्यासत्याचा निर्णय करण्याची संवय सर्वास लागेल,