श्री. दि. य. देशपांडे यांना स. न.
मे ९७ च्या आ. सु. मधील आपल्या लेखावरील माझे विचार कळवितो.
आपण असे म्हटले आहे की श्री आडारकर यांनी त्यांना काय अनुभव आले ते सांगितलेले नाही; ते नेमके काय होते हे कळेपर्यंत त्यांचे महत्त्व निश्चित करणे अशक्य आहे. पण मला असे वाटते की जरी ते अनुभव त्यांनी लिहिले असते तरी आपण बहुधा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असते, कारण आपली जी एक साचेबंद विचारसरणी आहे तिला ते गैरसोयीचे वाटले असते. मी हे म्हणतो त्याला कारण आहे. सप्टेंबर १९९३ च्या आ. सु.च्या अंकात माझे एक पत्र व लेख प्रसिद्ध झालाआहे. त्यात मी म्हटले आहे की फलित बीजांडापासून आरंभ करून संपूर्ण देह तयार होईपर्यंत ज्या क्रिया घडतात त्यात जोडीजोडीचे अवयव ज्या पेशींपासून बनतात त्या पेशीची दोन अधुके एकमेकांपासून वेगळी होऊन दूर होण्याची क्रिया असते. ही दोन अधुक एका काल्पनिक मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर जाऊन थांबतात, त्यांना डावे-उजवे पणाचे भान असते व त्यानुसार त्यांची पुढली जडण-घडण होते, आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना सिमेट्रीचे भान असते. या तीन गोष्टी निश्चितपणे हे दर्शवितात की, कसलीतरी जाणीव इथे कार्यरत आहे. आपोआप, यांत्रिकपणे या गोष्टी घडतात असे मानणे मला प्रांजळपणाचे वाटत नाही. त्या अंकांत आपण आपल्या उत्तरांत या ‘जाणीव’ कल्पनेची थट्टा केली आहे, परंतु समर्पक उत्तर दिलेले नाही. मी हा जो मुद्दा उपस्थित केलेला होता तो नंतर अनेक लेखांत उपस्थित झाला. श्री. आडारकरांच्याही लेखांत तो उपस्थित झालेला आहे. ईश्वर आणि जाणीव हे शब्द समानार्थकच आहेत.
आणखी एक मुद्दा असा की, ईश्वराचे वर्णन आस्तिक लोक कसे करतात हे सांगतांना सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, या विशेषणांच्या जोडीला सर्वसाधुहे विशेषण आपण न चुकता लावता, आणि ज्या अर्थी जगात दुःखे आहेत त्या अर्थी ईश्वर सर्वसाधु नाही, आणि तो सर्वसाधु नाही म्हणून तो अस्तित्वातच नाही, असा युक्तिवाद मांडला.
माझे म्हणणे असे की, ईश्वर साधुही नाही आणि असाधुही नाही. बुद्धीबळ खेळणारा ज्याप्रमाणे प्याद्या-मोहन्यांच्या बाबतीत साधु-असाधु नसतो, त्याच प्रमाणे ईश्वर प्राणिमात्रांच्याआणि अर्थात् माणसाच्याही बाबतीत साधु-असाधु नसतो. सजीवांच्या हजारो जाती निर्माण झाल्या आणि नाहीशा झाल्या, त्यातलीच माणूस ही एक जात असावी. ईश्वर सर्वशक्तिमान आहे आणि सर्वज्ञ आहे असे म्हणायला तर काही हरकत नाही ना? सर्वसाधु हे विशेषण ईश्वराला लावलेचपाहिजे असे कोणी सांगितले? – आणि‘साधु’त्वाचा अर्थ माणसाच्या दृष्टिकोनातूनच ठरवला पाहिजे असे तरी कोणी ठरवले?
ईश्वराचा निर्माता कोण हे सांगा, आणि नसेल सांगता येत तर ईश्वराचे अस्तित्व तुम्ही मानू शकत नाही’, हा आपला नेहमीचा युक्तिवाद आहे, – मला तो हटवाद वाटतो ! क्षमस्व.
माधव रिसबूड
२१०१, सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
————————————–
संपादक, आजचा सुधारक यांस
श्री. अॅलेस्टर कुक नामक एक ज्येष्ठ ब्रिटिश पत्रकार गेली सुमारे ५० वर्षे लाँग आयलण्ड, न्यूयॉर्क राज्य, तसेच सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियाराज्य, येथे वास्तव्याला आहेत. लंडनच्या गार्डियनखेरीज इतर अनेक ब्रिटिश वृत्तपत्रातून ते नियमितपणे स्तंभलेखन करतात. “अॅलेस्टर कुक्स अमेरिका”नावाचे त्यांचे पुस्तकही सुमारे १५-२० वर्षांपूर्वी फार गाजले होते.
श्री. कुक यांचा याहूनही अधिक चांगला परिचय B.B.C. च्या इंग्रजी भाषेतील कार्यक्रमाच्या सर्व जगभर विखुरलेल्या श्रोत्यांना आहे. कारण गेली ५० वर्षे सातत्याने दर आठवड्याला B.B.C. वर १५ मिनिटांचा श्री. कुक यांच्या आवाजातील ‘लेटर फ्रॉम अमेरिका हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. अतिशय उत्तम प्रासादिक इंग्रजी भाषेत, अमेरिकेत घडणार्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा परमार्श ‘लेटर फ्रॉम अमेरिका’ मध्ये घेतलेला असतो. विशेषतः जे विषय सामान्यतः वृत्तपत्रे व टेलिव्हिजनवर ठळकपणे येत नाहीत अशा विषयांवर श्री. कुक अतिशय रसाळपणे भाष्य करतात. उभी हयात हा कार्यक्रम न चुकता ऐकणारे त्यांचे अगणित श्रोते आहेत!
अलीकडेच अमेरिकेत श्री. टायगर वुडस् नावाच्या एका मिश्रवंशाच्या, परंतु प्रामुख्याने कृष्णवर्णी आफ्रिकन-अमेरिकन (नीग्रो) युवकाने, अमेरिकेतील बहुतेक सर्वच गोल्फ खेळाच्या सामन्यांत (golf circuits) मध्ये प्रथम स्थान मिळवून इतिहास घडविला. ही घटना अमेरिका क्रीडा विश्वात एक अभूतपूर्व घटना म्हणून गाजली. याविषयी श्री. कुक यांनी आपल्या अलीकडच्या ‘लेटर’ मध्ये ‘Soon, black Americans will infest golf courses all over this nation’ असे विधान केले होते.
B. B.C. वरील श्रोत्यांच्या पत्रांच्या ‘Write on’ या कार्यक्रमात श्री. कुक यांच्या उपर्युक्त वक्तव्याबद्दल त्यांची निंदा व निषेध करणारी असंख्य पत्रे आली, म्हणून Write on’ कार्यक्रमाच्यासंयोजक महिलेने श्री. कुक यांची दूरध्वनीवर घेतलेली मुलाखतच प्रसारित
केली ! श्री. कुक यांना आपली बाजू सावरता-सावरता अतिशय कमीपणा (embarrassment) पत्करून आपण अभावितपणे परंतु निष्काळजीपणे वापरलेल्या infest’ या शब्दाबद्दल क्षमायाचना करावी लागली!
अमेरिकेत आता संथ परंतु अधिक बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेल्या क्रीडाप्रकारांतही हळूहळू कृष्णवर्णी अमेरिकनांची प्रगती होत आहे, हे या उदाहरणावरून मान्य करणे भागच आहे.
आजचा सुधारकच्या साक्षेपी व जागृत वाचक, लेखक आणि “महाराष्ट्र फौंडेशन’च्या एक कार्यकारी सदस्या, डॉ. ललिताजी गडंभीर यांना हे वाचून निश्चितच आनंद व समाधान होईल याविषयी शंकाच नाही ! त्यांचे अभिनंदन.
आपला विश्वासु
र. वि. पंडित
‘तेजस’, १४६ पावनभूमी लेआऊट वर्धामार्गाजवळ, सोमलवाडा, नागपूर – ४४० ०२५
__________________
संपादक, आजचा सुधारक
स. न.
मार्च-अंकाच्या पहिल्या पानावर चिकटलेल्या चिठ्ठीत व्यवस्थापकीय कार्यालयाने केलेले वर्गणी संपल्याचे व पुढील वर्षासाठी ती त्वरित पाठवण्याचे विनंतीवजा निवेदन आहे. ते ग्राहकांना उद्देशून असल्यामुळे आपला एक जुना ‘ग्राहक’ या नात्याने मी हे पत्र पाठवत आहे. ते छापले तरआजचा सुधारकला हलक्या-फुलक्या मजकुराचे वावडे नाही आणि मासिकातील भारदस्त वगंभीर लिखाणापासून निदान थोडासा विरंगुळा या मासिकातच मिळू शकतो, त्यासाठी इतरत्र जायला नकोअसा सुखद धक्का त्यामुळे वाचकांना, नव्हे ग्राहकांना बसेल असे वाटते.
पुनरुज्जीवनाचे (Renaissance) युग केव्हाच इतिहासात जमा झाले आहे. आता संगणक, शेअर्स, डिबेंचर्स, म्युच्युल फंड्स, बाँड्स, मुदतबंद ठेवी यांचे युग सुरू झाले आहे. ग्राहक संरक्षण न्यायालये आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेणार्याब लोकांचे बरेवाईट अनुभव ऐकायला मिळत आहेत. सगळे वातावरण, पैसा, गुंतवणूक, भांडवल इ. विषयांनी भारावून गेलेले असताना त्याचा प्रभाव मासिकाच्या व्यवस्थापकीय कार्यालयावर पडला नसता तरच नवल! (पणआगरकरांना काय वाटले असते?)
तात्पर्य, वाचकाचे रूपांतर ग्राहकात होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी मासिकाच्या समस्त वाचकवर्गाचे रूपांतर ग्राहकवर्गात झालेले आपल्यालापाहायला मिळेल. असे झाले म्हणजे साधारणपणे असे संवाद ऐकायला मिळतील
– अहो विनायकराव, तुम्हाला एप्रिलचा अंक मिळाला का?
– नाही अजून नाही.
– मलाही नाही मिळाला. आर्थिक वर्ष संपत आहे म्हणून कदाचित उशीर होत असेल. एरव्ही तो अगदी वेळेवर मिळतो. प्रत्येक अंकातला माल किती पौष्टिक, भरपूर प्रथिनयुक्त, रुचकर व टिकाऊ असतो. प्रत्येक अंक म्हणजे बौद्धिक मेजवानीच!
– हो. पण पचायला जरा जडच. ते येरा गबपाळाचे काम नाही.
– बरोबर आहे. त्यासाठी मेधाग्नी प्रखर हवा.
– पण मग इतक्या उत्तम प्रतीचा माल इतक्या कमी पैशात देणे त्यांना कसे काय परवडते?निदान ५०० रू. किंमतीचा माल फक्त ५० रुपयांत!
– त्याचे असे आहे, ते आपला उपक्रम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवत आहेत. नफा कमावणे हे काही त्यांचे ध्येय नाही. त्यांचे ऑडिटर डोळ्यात तेल घालून बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेत असतात.
– तुम्हाला ‘एडिटर’ म्हणायचे आहे ना?
– नाही. शब्दांचा, मजकुराचा तो ऑडिटरच आहे. मजकुरातील असलेली, कोप्या पानांतील जागा व त्यांत छापायचा मजकूर यांचा दर महिन्याला तो ताळेबंदच तयार करीत नाही काय?शिवाय, मासिकाच्या संचालक मंडळातील सर्वजण अनुभवी तज्ज्ञ असून मालाची गुणवत्ता कायम राखण्याची तेही सतत काळजी घेतात,
– तुम्हाला संपादक मंडळच म्हणायचे आहे ना?
– हो. पण मला असे समजले आहे की ‘संपादक’ ऐवजी ‘संचालक’ हा शब्द ते वापरणार आहेत.
– फारच छान! कालानुरूप परिवर्तन व्हायला नको का?” इत्यादि. व्यवस्थापकीय कार्यालयाने पुनर्विचार करून आता ‘प्रिय चिंतनशील विचारवंत वाचक’ असा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले तर त्यामुळे वाचकांना (की ग्राहकांना) दुसरा सुखद धक्का बसेल. अन्यथा ‘वर्गणीदार’ हा ‘जेवढ्यास तेवढा’ (की ग्राहकांना) मॅटर ऑफ फॅक्ट) शब्द काही कुठे गेला नाही.
ते काहीही असो या सर्व लिखाणाचे प्रेरणास्रोत ‘ग्राहकच आहे, ‘वाचक’ नव्हे, याबद्दल दुमत होऊ नये.
श्रीधाम र.वि.खांडेकर
नेहरूमार्ग, नागपूर – २२