प्लेटोच्या Republicच्या राज्यशास्त्रीय मतांची भल्या लोकांनी प्रशंसा करावी हे वाङ्मयीन भद्रमानी वृत्तीचे (snobbery) चे अत्यंत आश्चर्यकारक उदाहरण आहे. या एकतंत्री हुकूमशाही प्रबंधाविषयीच्या काही गोष्टी पाहा. शिक्षणाचे मुख्य प्रयोजन युद्धात धैर्य निर्माण करणे हे असून अन्य सर्व गोष्टी त्याला साधनीभूत मानल्या पाहिजेत. याकरिता माता आणि आया यांच्याकडून बालकांना सांगितल्या जाणार्यास गोष्टींची कडक तपासणी केली पाहिजे. होमरचे वाचन बंद केले पाहिजे, कारण तो भ्रष्ट लेखक वीरांना रडवतो आणि देवांना हसवतो. नाटकाला मनाई केली पाहिजे, कारण त्यात खलपुरुष आणि स्त्रिया असतात. संगीत काही विशिष्ट प्रकारचेच असले पाहिजे, म्हणजे आजच्या परिभाषेत Rule Britannia सारखे. शासन काही निवडक लोकांच्या हातात असले पाहिजे. त्यांना फसवणूक आणि लबाडी करावी लागेल-फसवणूक सुप्रजाशास्त्रीय हेतूने सहचरसहचरीची प्राप्ती फासे टाकून ठरविण्याच्या बाबतीत, आणि लबाडी उच्चवर्गीय आणि नीचवर्णीय लोकांत जीवशास्त्रीय भेद आहेत हे दाखविण्याकरिता. शेवटी, जेव्हा बालके फाशांनी ठरविलेल्या जोड्यांव्यतिरिक्त जन्मतात, तेव्हा त्यांची हत्या केली पाहिजे.
या राज्यात लोक सुखी आहेत की नाहीत याला महत्त्व नाही. कारण उत्तमता संबंधात (whole) असते, घटकांत नाही.