परंपरा, रूढी आणि आधुनिकता या विषयावरील माझ्या भाषणाचा वृत्तांत आणि त्यावरील प्रा.प्र.ब.कुलकर्णी यांचे आक्षेप ‘आजचा सुधारक’च्या एप्रिल महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यापूर्वीच्या म्हणजे मार्च महिन्याच्या अंकात, त्याच परिसंवादातील प्रा.कुलकर्णी यांचे भाषण प्रसिद्ध झाले आहे. प्रा.कुलकर्णी यांच्या अनुग्रहामुळे हे दोन्ही अंक मी वाचू शकलो. मी प्रा.कुलकर्णी यांचा आभारी आहे.
मी हे प्रारंभीच मान्य करतो की, प्रा.कुलकर्णी यांच्यासारख्या विद्वान आणि विचक्षण श्रोत्याला मी माझे म्हणणे नीट समजावून सांगू शकलो नाही, हे माझ्याच प्रतिपादनाचे न्यून आहे. मी भाषण लिहून आणलेले नव्हते. पूर्वी झालेल्या माझ्या भाषणांचा परामर्श, परिपाटीप्रमाणे मी अध्यक्षीय भाषणात घेतला. त्यामुळे संदिग्धता राहणे शक्य आहे.
मी भाषणाच्या प्रारंभी व्हॉल्टेअरचे वाक्य उद्धृत केले होते. ते असे आहे. “If you want to talk with me, please define your terms.” मी ‘terms’ असा शब्द वापरला असावा असे वाटते, ‘yourself’ असा नाही. माझ्या तोंडून ‘yourself’ असा शब्द निघाला असेल, तर ती माझी चूक आहे. व्हॉल्टेअरच्या वचनाला अनुसरूनच मी परंपरेची व्याख्या केली. शब्दकोशात, माझ्या अल्प समजुतीप्रमाणे अलंकारिक व्याख्या देत नसतात. म्हणून मी हेमचंद्राच्या शब्दकोशाचा दाखला दिला. हेमचंद्राने ‘अविच्छिन्न धारा म्हणजे परंपरा’ असा अर्थ दिला आहे. तो अलंकारिक कसा हे मला अद्यापही कळले नाही. प्रा.कुलकर्णी यांचा मूळ लेख आणि माझ्या भाषणावरील आक्षेप-लेख यांत त्यांनी परंपरेचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्टपणे दिला नाही. त्यांच्या प्रतिपादनावरून एवढे जाणवते की, परंपरा म्हणजे जुन्या वाईट गोष्टी. जुन्या काळातल्या काही गोष्टी वाईट नक्कीच आहेत. मी त्यांना रूढी म्हटले. परंपरा ही धारा असते. आणि धारा प्रवाहाचीच असते. जी पुढे चालत राहील तिलाच धारा म्हटले जाईल. जी आटते, किंवा थांबते ती पूर्वी धारा, तरी पुढे राहत नाही. म्हणून मी म्हणालो की, जी चालू राहते ती परंपरा, जी थांबते ती रूढी, यात वास्तविकता आहे. अलंकारिकता नाही. अर्थ स्पष्ट करण्याकरिता रूपकांचा आश्रय घेणे ही सर्वसामान्य पद्धतीच आहे. म्हणून मी रूढी म्हणजे डबके म्हटले; कारण परंपरा हा प्रवाह असतो.
‘परंपरा’ या शब्दातच प्रवाहित्व अनुस्यूत आहे. ‘पर’ आणि ‘पर’ असे दोन शब्द आहेत. ते जेव्हा एकमेकांतच गुंतून राहतात, तेव्हा ‘परस्पर’ असा प्रयोग होतो. जेव्हा ते ‘एकाकडून दुसऱ्याकडे जातात (आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तेथून चौथ्याकडे हे अध्याहृत आहे) तेव्हा परंपरा शब्द तयार होतो.
मी परंपरेचा अर्थ दिला. प्रा.कुलकर्णी यांनी मात्र आधुनिकतेची व्याख्या केली नाही. आपल्या लेखाच्या शेवटी ‘विवेकनिष्ठ मानवता हे आधुनिकतेचे बीज आहे’ असे त्यांनी लिहिले आहे. ही आधुनिकतेची व्याख्या समजावी काय? ही अलंकारिक व्याख्या नव्हे काय? ‘बीज’ हे रूपक नाही काय? ‘संघनेत्यांनी हिंदुत्वाला जो नवा आयाम दिला आहे ही आधुनिकता म्हणता येईल.’ असे वाक्य त्यांच्या लेखात आहे. ही ‘आधुनिकता’ विवेकनिष्ठ मानवतेची निदर्शक कशी हे प्रा.कुलकर्णी यांनी सांगावयास हवे होते.
परंपरेचा संघर्ष सुधारणेशी असतो, असे प्रा.कुलकर्णी यांनी म्हटले आहे, ते मला मान्य नाही. परंपरेचा संघर्ष नवतेशी असतो, असे त्यांनी म्हटले असते तर एका मर्यादेपर्यंत मी ते मान्य केले असते. परंपरा प्रवाहमान असल्यामुळे ती नवतेची चिकित्सा करते आणि प्रवाहाशी ती जुळती करून स्वतःत समाविष्ट करून घेते. ही सुधारणा असते. परंपरा मोडली जाऊ शकते. परंतु त्या क्षणानंतर ती परंपरा राहत नाही. परंपरा वळविली मात्र अवश्य जाऊ शकते. अस्पृश्यतेची परंपरा होती. म्हणजे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिली. आता ती थांबली आहे. अस्पृश्यतेला समाजमान्यता नाही, धर्ममान्यता नाही हे मान्य असेल – मला वाटते ते मान्य व्हावे कारण शंकराचार्यांनीदेखील अस्पृश्यता धर्माला मान्य नाही असे म्हटले आहे. तर ती परंपरा संपली आहे, हे मान्य करावे लागेल. अपवादादाखल कोणी ती पाळत असतील तर ते रूढीचे पालन करीत आहेत, असे म्हणावे लागेल. परंपरा आणि रूढी यांतला हा फरक ध्यानात घ्यावा, असे मला म्हणावयाचे आहे.
प्रा.कुलकर्णी यांनी यज्ञाचे उदाहरण दिले आहे. मीही आपल्या भाषणात यज्ञाचे उदाहरण दिले होते. पशुहिंसा असलेले यज्ञ संपले. परंतु यज्ञपरंपरा कायम आहे. कारण यज्ञाचे मूलतत्त्व, जे ममत्वरहित समर्पण, ते चालू आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञानाचे ममत्वशून्य वितरण. जपयज्ञ म्हणजे सामूहिक कल्याणाकरिता जपाचे अनुष्ठान. ‘बलिदान’, ‘स्थंडिल’, ‘आहुती’ इत्यादी शब्दावली आपल्या भाषेत रूढ झाली आहे. ती यज्ञाची स्मरण करून देणारी तर आहेच, पण तिला कोणताही हेय अर्थ चिकटलेला नाही. यज्ञातील पशुहिंसेची परंपरा संपली आहे असे कुणाला म्हणावयाचे असेल, तर ते त्याला म्हणता येईल. परंतु मी यशाची परंपरा चालू आहे, असे म्हटले तर पूर्वीप्रमाणेच यज्ञात पशुहिंसा चालू आहे, असा त्या विधानाचा अर्थ करणे चूक ठरेल.
येथे माझ्या प्रतिपादनाचा गाभा संपतो. काही शिल्लक राहिलेच असेल, तर माझ्या भाषणाचा जो गोषवारा ‘आजचा सुधारक’मध्ये (एप्रिलचा अंक) प्रसिद्ध झाला आहे, त्यावरून त्याची पूर्तता करता येऊ शकेल. परंतु, या ठिकाणी मी हा लेख संपवीत नाही. प्रा.कुलकर्णी यांच्या काही विधानांचा परामर्श घेणे मी आवश्यक समजतो. ते आपल्या लेखात म्हणतात की, “प्राचीन ऋषिमुनींबद्दल श्रद्धा इतकी की, त्यांच्या शब्दामागे सत्य धावते अशी धारणा.” यासाठी त्यांनी भवभूतीच्या उत्तररामचरित या नाटकातील एक ओळ दिली आहे – “ऋषिणां पुनराद्यानां वाचमर्थोऽनुधावति.” येथे प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, उत्तररामचरित हे एक नाटक आहे. म्हणजे एक ललितकृती आहे. तिच्यातील काव्यात्म अतिशयोक्ती ध्यानात घेणे आवश्यक आहे. शिवाय प्रा.कुलकर्णी यांनी त्या लोकांचा संदर्भ आणि किमान त्याची पहिली पंक्ती तरी द्यावयास हवी होती. ती ओळ अशी आहे – “लौकिकानां हि साधूनां अथ वागनुवर्तते.” आणि संदर्भ असा आहे की, अष्टावक्र नावाचा ब्रह्मचारी (विद्यार्थी) गरोदर स्त्रीकरिता आशीर्वाद घेऊन आलेला असतो. वसिष्ठ त्या आशीर्वचनात म्हणतात – ‘‘वीरप्रसवा भूयाः’ – म्हणजे वीरपुत्राची माता तू हो. त्यावर रामाचे उत्तर असे आहे की, “आम्ही ऋषींचे आभारी आहोत. लौकिक सज्जन, जे घडले आहे, त्याचे वर्णन करणारे असतात. परंतु जे आद्य ऋषी क्रांतदर्शी असतात ते जसे बोलतात, तसे घडत असते. रामाने या लोकांना, वसिष्ठांना क्रांतदर्शित्व बहाल केले आहे; आणि क्रांतदर्शित्व हा काही दोष नव्हे. क्रांतदर्शी ऋषीच्याही मताची (येथे मत प्रतिपादित नाही, फक्त आशीर्वाद आहे.) चिकित्सा करू नये, असा दंडक प्रा.कुलकर्णी यांना कुठे आढळला, हे त्यांनी सांगायला हवे होते.
काही गोष्टी दैवाधीन असतात, असे मी दैववादी नसलो, तरी मानावे लागते.- दैवं चैवात्र पंचमम्’चा गीतेतील संदर्भ ध्यानात घ्यावा. ‘दैव’ पाचवे आहे. पहिले नाही. दैव जाणण्यासाठी अनुमानधक्क्याचा अवलंब केला जातो. पूर्वी कन्यापरीक्षणासाठी मृत्पिंड वापरले जाते. आता पत्रिका बघतात. ३६ गुण उतरत असतानाही विवाह असफल झाल्याची व पत्रिका न पाहता केलेले विवाह सफल झाल्याची असंख्य उदाहरणे असतानाही पत्रिका पाहतातच. जे अनाकलनीय दैव आहे, त्याची व्यवस्था लावण्याची ही रीत आहे. नेपोलियन फ्रान्सचा बादशहा असताना, एखाद्या मोहिमेसाठी पाठवायच्या सेनापतीची शिफारस सरसेनापती करायचा, तेव्हा तो त्याच्या पराक्रमाची व अनुभवाची माहिती द्यावयाचा; त्यावर असे म्हणतात की नेपोलियनचा “But is he lucky?” असा प्रश्न असायचा. सगळेच डॉक्टर एम्.बी.बी.एस्. असले, तरी ‘अमक्याच्या हाताला गुण आहे’ असे लोकोक्तीत बोलले जातेच. गुण डॉक्टरच्या हातात असतो की औषधात? क्रिकेटच्या खेळात कुणी फलंदाजी करायची आणि कोणी गोलंदाजी हे चितपट करूनच ठरवितात ना? विवाहात पत्रिका पाहतात, पण केवळ पत्रिकाच पाहतात असे नाही. मुलीचे रूप, वय, शिक्षण हेही पाहतात. गतार्थ रिवाज सोडले जातच असतात. म्हणून तर परंपरा पुढे सरकत असते. मात्र अनाकलनीय दैवाची व्यवस्था लावण्याची परंपरा चालू आहे असे आपण म्हणू शकतो.
सत्य जाणण्याचा म्हणजे ज्ञानाचा प्रत्येक मनुष्यमात्राचा हक्क आहे. हे आधुनिक मूल्य आहे असे प्रा.कुलकर्णी म्हणतात. आम्हा भारतीयांकरिता मात्र ते अतिप्राचीन मूल्य आहे; आणि कुणालाच ते नाकारता आले नव्हते. प्रा.कुलकर्णी व्यक्तिवाद हा ‘आधुनिकतेचा मुख्य आधार आहे’ असे प्रतिपादन करतात. मग ‘साम्यवाद आणि समाजवाद’ हे काय परंपरेचे आधार आहेत? या दोन्ही वादांनी व्यक्तीला गौण मानले आहे. व्यक्ती समाजाचा घटक असेल, तर समाजहिताशी व्यक्तीच्या हिताचे सामंजस्य बसवावेच लागेल. हे सामंजस्य बसविण्याची आपली भारतीय व्यवस्था म्हणजे कुटुंब आहे. आपली ती परंपरा आहे. कुटुंबाच्या बाह्य रचनेत आणि विस्तारात अंतर पडले तरी ती चालू आहे, चालू रहावी अशी बहुसंख्य लोकांची इच्छा असल्यामुळे ती भारतीय परंपरा आहे.
घटस्फोटाची व्यवस्था ठेवूनही विवाहसंस्थेचे पावित्र्य मान्य करावयाला हरकत नसावी. घटस्फोट हे यश नव्हे, अपयश आहे. कुणीही घटस्फोटासाठी विवाह करीत नाही. विवाह टिकला पाहिजे, याचाच प्रयत्न असतो. हा प्रयत्न फसला, तरच घटस्फोट. आदर्श हा की घटस्फोट होऊ नये. योगायोगाने प्राप्त झालेल्या साथीदाराला जीवनसाथी बनविणे हे विवाहाचे उद्दिष्ट असले पाहिजे. तेच ध्येय भारतीयांनी समाजासमोर ठेवले तरी घटस्फोट होतच होते. ब्राह्मण किंवा अन्य उच्चभ्रू अल्पसंख्य वर्गात होत नसतील. इतरत्र ते बहुसंख्यकांत होत होते. विधवांचे पुनर्विवाहही होत होते. जित्या नवऱ्याची बायकोही दुसरा घरठाव करीत होती. प्रा.कुलकर्णी एखाद्या खेड्यात जाऊन या दृष्टीने पाहणी करतील, तर घटस्फोटाची ‘सुधारणा’ पुरेशा प्रमाणात फार पूर्वीपासून दृढमूल झालेली आहे, हे त्यांच्या ध्यानात येईल. फक्त ब्राह्मण समाजाची स्थिती बघून सरसकट निष्कर्ष काढणे युक्तिसंगत ठरावयाचे नाही.
विद्याध्ययन हा ब्राह्मणांचा एकाधिकार केव्हाच नव्हता. मी प्रा.कुलकर्णी यांचे प्रा. धर्मपाल लिखित ‘The Beautiful Tree’ या पुस्तकाकडे लक्ष वेधू इच्छितो. या पुस्तकात इ.स. १८२६ च्या सुमाराची बंगाल, मद्रास व मुंबई या तीन इलाख्यांतील शिक्षणाची आकडेवारी दिली आहे. ती आकडेवारी, त्याकाळाच्या युरोपियन कलेक्टरांनी गोळा केलेली आहे. त्या आकडेवारीचा निष्कर्ष हा आहे की, बहुतांशी प्रत्येक गावात शाळा होती. प्राथमिक शाळा, हिशेब शिकविण्याच्या शाळा,तांत्रिक (technical) शाळा हे सर्व होते. त्या पुस्तकात विद्याथ्र्यांची जातवार माहितीही दिली आहे.’ सर्व जातीचे लोक शिकत होते. शिक्षकांच्या संख्येत ब्राह्मण शिक्षकांची संख्या फक्त २५ टक्के होती. महात्मा गांधींनी १९३० साली लंडनमध्ये भाषण करताना इंग्रजी राज्य आल्यापासून आमच्या देशात निरक्षरता वाढली आहे, आमच्या देशातील शिक्षणाचा ‘सुंदर वृक्ष’ इंग्रजी सत्तेने उद्ध्वस्त केला आहे, अशा आशयाचे उद्गार काढले होते. ‘सुंदर वृक्षाचे’ ते रूपकात्मक शीर्षक घेऊन प्रा. धर्मपाल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्राचीन काळी वेदाध्ययनाला फक्त इतरांसाठी बंदी होती. सर्व ऐहिक विद्या व शास्त्र यांचे अध्ययन सर्वांसाठी खुले होते. भारतीयांचा परदेशांशी कारभार चालत असे. ओरिसातील लोक कार्तिक पौर्णिमला जावा, सुमात्रा, सयाम आदि देशांकडे प्रवासासाठी निघत असत. ते सारे काय ब्राह्मण होते?ते आपला व्यापारी हिशेब कसा करीत होते?धातुशास्त्राच्या विकसित ज्ञानाची व कौशल्याची अनेक प्रतीके आजही उपलब्ध आहेत. ती ज्यांनी उभी केली ते ब्राह्मण नव्हते. ही प्रतीके काय तंत्रज्ञानाच्या अध्ययनाशिवायच उभी झाली?मोठमोठी मंदिरे, लेणी, शिल्पे ही काय इंजिनियरिंगच्या ज्ञानाशिवायच निर्माण झाली? आणि ही निर्माण करणारे काय ब्राह्मण होते?ख्रिस्ती मिशनच्यांनी आणि इंग्रजी शासकांनी जे भ्रामक मायाजाल पसरविले, त्याला प्रा. कुलकर्णी यांच्यासारख्या चिकित्सक विद्वानानेही बळी पडावे, याचे मला नवल वाटते.
याचा अर्थ असा नव्हे की, भारताच्या प्राचीन इतिहासात आणि समाजव्यवस्थेत काहीच वैगुण्ये नव्हती. इसवी सनाच्या ८ व्या ९ व्या शतकापासून त्या वैगुण्यांची चिकित्सा आणि निराकरण करण्यात आले नाही, हे खरे आहे. कारण जवळ जवळ एक हजार वर्षे भारतीय समाज एका सर्वभक्षक परकीय आक्रमणाशी झुंजत होता. लढाईच्या वेळी बचावात्मक कवच धारण करावे लागते. तसे कवच समाजाने धारण केले असेल, तर त्यात आश्चर्य नाही. परंतु संधी येताच त्याची चिकित्सा सुरू झाली, नानक आले. दयानंद सरस्वती आले, राजा राममोहन रॉय आले, फुले, आगरकर आले आमचा संघही आला.सर्वच सुधारकांना प्रारंभी त्रास होत असतो. कारण समाज जुन्याला चिकटून राहणे पसंत करीत असतो. प्रत्येकच समाजात एक स्थितिवादी वर्ग असतो. तो टिकाऊपणाचा पक्षधर असतो. आणि ज्याचा टिकाऊपणा सिद्ध झाला असतो, ते जुने असते. त्याचबरोबर स्थितिवादाचे परीक्षण करणारा दुसराही वर्ग असतो. तो गतिवादी असतो. या दोन वर्गाच्या धारणांच्या समन्वयातून परंपरा पुढे धावत असते. म्हणून परंपरा जशी प्राचीन असते, तशी ती आधुनिकही बनते. ‘आधुनिक’ म्हणजे काय?तर ‘अधुना’ म्हणजे आता असलेले. ते पुढेही चालावे असे वाटत असेल, तर परंपरेशी त्याचे सात्म्य अपरिहार्य आहे. आधुनिकता’ म्हणजे केवळ चालू फॅशन असेल तर तात्कालिक आकर्षणाशिवाय तिच्या ठिकाणी अधिकचे मूल्य कल्पिणे गैर
आहे.