पुदुकोट्टाई हा एक तामिळनाडू राज्यातील जिल्हा. हा भारताच्या अगदी आग्नेयेला, बंगालच्या उपसागराला लागून आहे. अत्यंत मागासलेला जिल्हा. गरिबी, निरक्षरता अगदी भारतीय परिमाणानेही भरपूर. सामाजिक व आर्थिक विकासाला पूर्ण पारखा! अशा या जिल्ह्यात १९९० नंतर प्रौढ साक्षरतेसाठी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
प्रौढ साक्षरतेचा कार्यक्रम भारताच्या अंदाजे ४७० जिल्ह्यांत १९९० च्या सुमारास सुरू केला गेला. त्या अन्वये वेगवेगळ्या जिल्ह्यांनी प्रौढ म्हणून वेगवेगळे वयोगट कार्यक्रमाखाली घेतले. कोणी ९ ते ३५ वयोगट, कोणी १५ ते ३५ वयोगट, तर पुदुकोट्टाईमध्ये ९ ते ४५ वयोगट साक्षर करण्यासाठी निवडला. साक्षरतेचा प्रसार करण्याचे काम भारतात गेल्या जवळजवळ पन्नास वर्षे चालले आहे, अशी एक आपली समजूत आहे. कारण १९५० सालानंतर ज्या पंचवार्षिक योजना झाल्या त्यात अगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेत असे म्हटले गेले की १९६१ पर्यंत म्हणजे दुसर्या् पंचवार्षिक योजनेअखेर ६ ते १४ हा वयोगट पूर्ण साक्षर झाला पाहिजे. मात्र वास्तवात १९९२९३ साली सुद्धा ६ ते १४ वयोगटात फक्त ७५ टक्के मुले व ५९ टक्के मुली शाळेत जात होत्या. ग्रामीण भागात तर केवळ ५२ टक्के मुली शाळेत जात. राजस्थान हे राज्य तर सर्वांत मागास. तेथे ७४ टक्के मुले तर ४१ टक्के मुली ह्या वयात शाळेत जात. ग्रामीण भागात तेथे अवघ्या ३३ टक्के मुली शाळेत जात होत्या. त्यामुळे वय ६ वर भारतात एकूण ३१ टक्के पुरुष व ५७ टक्के स्त्रिया निरक्षर आढळल्या (१९९२-९३). म्हणूनच युद्धपातळीवर निरक्षरता नष्ट करण्याची कल्पना १९९० च्या सुमारासराबवू घातली, ह्याचे आश्चर्य नाही.
खरोखर विसाव्या शतकात अनेक राष्ट्रांनी अशा मोहिमा सर्व लोकसंख्येसाठी करू घालून त्यात यश मिळविले. रशियाने १९१९ ते १९३९ मध्ये, चीनने १९५० ते १९८० मध्ये, ब्राझिलने १९६७ ते ८० मध्ये, टांझानियाने १९७१-१९८१, ब्रह्मदेशात (म्हणजे आताचा म्यानमार) १९६० ते ८० मध्ये, क्यूबामध्ये १९६१ च्या सुमारास १ वर्षात, निकारग्वामध्ये १९८० च्या सुमारास पाच महिन्यांत अशा थोडक्या वेळात सर्वांना साक्षर केले. जगभर असा कार्यक्रम चालू असता भारत मात्र ज्या वेगाने साक्षरता प्रसार करीत आहे त्या वेगाने २०२० मध्ये पूर्ण साक्षर होईल. ह्याचा अर्थ भारताला साक्षर होण्याला ७० वर्षे लागतील. थोडक्यात, १९९० च्या सुमारास युद्धपातळीवर प्रौढ साक्षरतेचा कार्यक्रम भारतात हाती घेणे अगदी साहजिक होते.
ह्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आपण पुदुकोट्टाईकडे पाहू. ह्या कार्यक्रमासाठी एकूण निरक्षर लोकांच्या संख्येचा अंदाज घेऊन प्रत्येक गावात त्यांचे दहाहांचे गट करून त्यांना एकेका शिक्षकाकडे सोपविण्याचे ठरले. अंगणवाडी शिक्षिका किंवा तत्सम साक्षर पुरुष किंवा स्त्रिया शिक्षक म्हणून घेतले गेले. काही वेळा जवळपास कोणी साक्षर शिक्षक न मिळाल्यास शेजारच्या गावातून शिक्षक आणण्याची व्यवस्था झाली. बन्याच वेळा स्त्री-शिक्षिका एका गावाहून दुसन्यागावात जाऊन शिक्षिकेचे काम करीत.
हे साक्षरतेचे वर्ग सामान्यपणे रात्री ७|| ते ९॥ ह्या वेळात भरत. निरक्षरांत स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियाच ह्या वर्गांना येणे सहाजिक होते. घरकाम, शेतकाम, मजुरी करून आल्यावर घरच्या सर्वांना जेवू घालून ह्या स्त्रिया वर्गाला येत. ह्या कार्यक्रमासाठी शासनाने माणशी ६५ रुपये खर्च करण्याचे ठरविले. त्यापैकी २० रुपये ही रक्कम साक्षरतेसाठी जी तीन पुस्तके मंजूर केली होती त्यासाठी जात. उरलेल्या माणशी ४५ रुपयांत, शिक्षकाचा थोडाफार पगार, खडू, फळा किंवा इतर साहित्य, एका खेड्यातून दुसर्या४ खेड्यात जा-ये, निरक्षरांच्या परीक्षा वगैरे सर्व कार्ये आटोपली जात. एकूण साक्षरता कार्यक्रमाचा शासकीय भाग मात्र शासन सांभाळीत होते. साक्षर करण्यास एका माणसास २०० तास खर्ची घालावे लागत. इतके तास खर्च करणे बर्या.च वेळा कठीण जाई. कारण रोजच्या मोलमजुरीशिवाय लग्नकार्ये, पाहुणे राऊळे, सणसमारंभ, गोधड्या शिवणे इत्यादि नेहमीचे कार्यक्रम चालू होतेच.
हा कार्यक्रम राबविण्यासाठी खेड्यांमधूनच शिक्षक निवडावे लागत. त्यांत लंगडे-थोटे पुरुष, लग्न न झालेल्या चौदावे वर्ष उलटून गेलेल्या मुली शिक्षक म्हणून मिळत. ज्यांच्या आयुष्याला पूर्वी कधीही काही अर्थ नव्हता अशा लोकांना कार्य करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात एक स्फूर्तीची लाट उत्पन्न झाली आणि त्याचे प्रत्यंतर पुदुकोट्टाईमध्ये दिसले. पुदुकोट्टाईमध्ये सामान्यपणे, पुरुष-स्त्रियांनी एकमेकांशी बोलणे, स्त्रियांनी सायकलवर बसणे व तेही पुरुषांसमोर हे कल्पनातीत समजले जाई. रात्री अपरात्री एका गावाहून दुसन्या गावी जाणे, रानावनातून जाणे, एकाकी प्रदेशातून जाणे सारेच धडाडीचे काम होते व ते कधीही न वावरलेल्या स्त्रियांवर बव्हंशीपडत होते. त्यातून एक तर्हे चे क्रान्तीचे वारे गावागावातून शिरले. सुरवातीस स्त्रियांची टिंगल करणे,त्यांना अपशब्द बोलून दुखावणे वगैरे नेहमीचे त्रास येथेही सुरू झाले. जिल्ह्याच्या कलेक्टरचा हा कार्यक्रम राबविण्यात बराच हातभार लागला. एका गावातून दुसन्या गावी ४-५ मैलांपर्यंतही जावे लागे. त्यामुळे मुली सायकलवर बसावयास शिकल्या. रात्री अपरात्री एकाकी भागातून कोण्या पुरुषाला सायकलवर मागे सोबत म्हणून नेऊ लागल्या.
कलेक्टरने सायकली बन्याच मुलींना देऊ केल्या. रस्त्याने सायकलवर स्त्री जाते हे दृश्य ह्या गावांतून जेव्हा दिसू लागले, जेव्हा गावच्या चावडीसमोरून ही बाई सायकलवरून जाण्यास धजली, तेव्हा ह्या गावात सामाजिक बदलाचे वारे वाहू लागले. सुरवातीस जरी ह्यात स्त्रियांना त्रास झाला तरी, त्रास देणारेही ह्या बदलापायी निवळून त्यांना मदत करू लागले. विशेषतः सायकलने ह्या गावांना गतिमानता आली. सायकल म्हणजे दोन दोन चार चार मैल सहज दूर जाणे; सायकल म्हणजे पाण्याच्या कळश्या सायकलवरून मैलमैल, दोन दोन मैल आणणे; अशीच अंतरे मुलांना शाळेत पोहोचविण्यास किंवा डॉक्टरकडे जाण्यास पालथी घालणे: ह्यामुळे ही गावे उत्स्फूर्त काहीही शिकायला तयार झाली. नुसताच साक्षरतेचा नव्हे तर इतरही कार्यक्रम ह्या गावांना हवाहवासा वाटू लागला. सुरवातीला काही कुटुंबप्रमुख आपल्या मुलींना किंवा बहिणींना ह्या नव्या वातावरणाचा वाराही लागायला नको म्हणत, पण तेही निवळले. ह्याला क्रान्ति म्हणायची नाही तर काय?मुसलमान वस्ती, महारोग्यांची वस्ती, मंग्यांची वस्ती, कोणी कोणीही ह्यातून सुटले नाही.
नेहमीप्रमाणे पाण्याची टंचाईही ह्या गावांना होती. एका गावातले लोक “आमच्या गावाला ‘बोअर वेल’ (भोकाची विहीर) द्या’ असा कलेक्टरकडे तगादा लावून होते. कलेक्टर ‘हा कार्यक्रम सध्या शक्य नाही’ असे म्हणून अंगाबाहेर टाकीत होता. तेव्हा एक ६८ वर्षे वयाची बाई म्हणालीमी जर सायकलवर बसून १५ दिवसांत तयार झाले तर विहीर द्याल का?” तेव्हा “हो” म्हणून उत्तर मिळाल्यावर ही बाई ह्या वयाला १५ दिवसांनी कलेक्टरच्या कचेरीत सायकलवर बसून फेन्या मारीत राहिली. असे हे शिक्षण आणि असे हे सायकल-शिक्षण! ह्या काळात एका १७/१८ वयाच्या मुलीला लग्नासाठी बघायला येणार होते. पण त्याच वेळी तिला दुसन्या तालुक्यातल्या गावी जाऊन परीक्षा घ्यावयाच्या होत्या. तेव्हा तिने आईबापांना सांगितले “तुम्ही लग्नाची बोलणी करा. मी जरी मुलाला बघितले नाही तरी चालेल. शिवाय, दुसन्या गावी जाऊन परीक्षा घेण्याची जोखीम मी आधी पत्करली असल्याने मी ती कोठल्याही कारणाकरिता टाळू शकत नाही.” ह्यावर नवरा मुलगाही रुष्ट न होता मुलगी मागाहून बघायला तयार झाला. एवढेच नव्हे, ज्या ठिकाणी हुंड्याव्यतिरिक्त लग्न होणे कठीण अशा गावी मुलामुलींची चारदोन लग्नेही बिनहुंड्याची जमू शकली. फिरून फिरून सांगावेसे वाटते की ह्या सर्व कार्यास जिल्ह्याची कलेक्टर मंडळी सहानुभूतीने हातभार लावीत होती.
ह्या गावच्या बर्या च मजूर स्त्रिया जवळपासच्या दगडांच्या खाणींमध्ये दगड फोडायच्या कामावर जात. ह्या खाणी पैसेवाले लोक लिलाव बोलून विकत घेत व मजुरांकरवी दगडफोडीची कामे करून घेत. कलेक्टरनी ह्या मजूर स्त्रियांच्या सहकारी सोसायट्या करून त्यांच्याकडून लिलाव बोलण्याची तजवीज केली. त्यांना ‘क्रेडिट’ देण्याची सोय आज अनेक कार्यक्रमात करता येतअसल्याने असे क्रेडिटही ह्या सोसायट्यांना देऊ केले व हे स्त्रीमंडळ दगडाच्या खाणी चालवू लागले. कधीकधी पुरुष मजुरांना जास्त रोजगारी देण्याची पद्धत त्यांच्या रक्तात खोलवर रुजलेली असल्याने ह्याही स्त्रिया पुरुषांना जास्त रोजगारी देऊ करीत. ह्याही बाबतीत जरूर तेथे स्त्रियांना आपल्या जबाबदारीची समज करून देण्यात आली. अशी ही प्रौढ साक्षरता मोहीम.
साक्षरतेबरोबर स्त्रिया आरोग्य, स्वच्छता व मुलांना शाळेत नियमित जाऊ देणे ह्यावर भर देऊ लागल्या. परंतु हळूहळू असे कार्यक्रम राबविणे सोपे राहणार नव्हते. गावात उत्साह तर फार! नवनव्या गोष्टी करून पाहण्याची हौस. आयाच नव्हे तर आज्याही आपल्या नातीला कलेक्टर करण्याच्या गोष्टी बोलू लागल्या. स्त्री-पुरुष नव्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करू लागले. साक्षरता कार्यक्रम राबविणा-यांवर मोठीच जबाबदारी पडली. नवे नवे कार्यक्रम लोकांना देणे भाग होते.
वरील अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. ह्यात इतर अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. आजच्या भ्रष्टाचाराच्या काळात कोणताही कार्यक्रम भारतात रुजू शकेल असे वाटत नाही. परंतु ह्या साक्षरतेच्या मोहिमेत आजच्या परिस्थितीतही त्यागी वृत्ति दिसून आली. दहापाच रुपये मिळविणारी माणसेसुद्धा कार्यक्रमात काही कमी पडले तर पदरचे दहावीस पैसे घालायला तयार होत. ह्यामुळे त्याग व स्वयंसेवकता ही आज नष्ट झालेली आहेत व ती स्वातंत्र्यापूर्वी बरीच आढळत ह्या कल्पनेला तडा बसला. आजही ह्या गोष्टी जिवंत आहेत; एवढेच की, त्या आजच्या नागरीकरणात किंवा औद्योगिकीकरणात शहरी वातावरणात हरविल्या आहेत. कदाचित वरील वातावरणात त्या पुन्हा रुजू लागतील. माझ्या मते महाराष्ट्र राज्य हे गैरसमजुतीने प्रगतिशील समजले जाते. औद्योगिकीकरण व नागरीकरण महाराष्ट्रात जास्त असल्याने ते प्रगतिपथावर असेल असा भास बन्याच लोकांना होतो. परंतु आकडेवारी पाहता हा गैरसमज आहे हेही लक्षात येते. उदाहरणार्थ लोकसंख्येच्या वाढीला आळा घालण्याचा आजचा प्रश्न पाहा. तो केरळात, गोव्यात व तामिळनाडूत जवळजवळ सुटलेला आहे, महाराष्ट्रात नाही. जी राज्ये लोकसंख्यावाढीवर मात करू शकतात ती प्रगतिशील व्हायला वेळ लागणार नाही.
भारतीय संस्कृतीत आणखीही काही उणिवा दिसून येतात. मुलींना न शिकविणे, त्यांची लग्न लवकर करणे, मुले मुली ह्यांत भेद करणे, वगैरे गोष्टी नष्ट होणे सामाजिक बदलासाठी जरूर आहे. जेव्हा युरोपीय सत्ताधीशांनी आफ्रिकेत शाळा उघडून लोकांना शिक्षणाची दालने उघडी केली तेव्हा बर्यााच देशात स्त्रिया व पुरुष समसंख्येने शिक्षणासाठी धावले; पण भारतात ते झाले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. असो.
वरील अनुभव Empowerment through Literacy ह्या व्यंकटेश आत्रेय व शीलाराणी चुंकत ह्या लेखकांच्या Sage ह्या प्रकाशकानी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात वर्णिलेला आहे.
माझ्या मते आज जे महाराष्ट्रात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालू आहे ते आपल्या पायावर उभे राहण्यासाठी लोकशिक्षणाची अत्यंत जरूर आहे. ह्या लोकशिक्षणाचा पहिला भाग म्हणून निरक्षरता अगदी वरच्यासारखी म्हणजे युद्धपातळीवर पुदुकोट्टाईसारखी निपटून काढल्यास व त्याची जोड भ्रष्टाचार निर्मूलनाला दिल्याशिवाय भ्रष्टाचार निपटणे कठीण जाईल. खरोखर स्वातंत्र्यमिळाल्याबरोबर दुसर्याी दिवशीच स्वतंत्र भारतातील नागरिक कसा असावा हे त्याच बदललेल्या वातावरणात ठरायला हवे होते. त्यात स्वतंत्र भारतातील ‘नवा माणूस’ नक्कीच साक्षर हवा म्हणून पहिल्या दहा वर्षांतच हा कार्यक्रम त्या वातावरणात उभा राहणे जरूर होते. नाही म्हटले तरीआमच्या पिढीची ही एक मोठ्ठी चूक झाली.