पृथ्वीवरील जीवसृष्टीत तरी प्रजोत्पादनाचे अजून दोनच प्रमुख प्रकार ज्ञात आहेत. काही निम्नस्तरीय जीव वगळता, बहुसंख्य प्राण्यांचे लैंगिक प्रजनन, तसेच वनस्पतींतील लैंगिक आणि अलैंगिक (कलमी) प्रजनन हे ते प्रकार होत. सस्तन प्राण्यांसारख्या सर्वच उत्क्रांत जीवांमध्ये केवळ लैंगिक पद्धतीनेच प्रजोत्पादन शक्य आहे. परंतु अशा लैंगिक प्रजोत्पादनात पुढील पिढी आधीच्यापिढीच्या दोन जीवांच्या मिश्र गुणधर्माचीच असते. त्यामुळे अल्फान्सो (हापूस) आंब्याचे अथवा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबाचे शतप्रतिशत गुण असणारे नवे झाड उत्पन्न करणे जसे सुलभ होते तसे सस्तन प्राण्यांच्या बाबतीत आतापर्यंत अशक्यच होते. परंतु एखाद्या प्राण्याची शतप्रतिशत प्रत (copy) तयार करण्याचे स्वप्न मात्र आधुनिक जीवशास्त्रज्ञ फार पूर्वीपासूनच पाहत होते.
एखाद्या प्राण्याच्या अंडपेशीचा (ovum) प्रयोगपात्रासारखा वापर करून हे साध्य करण्याचे प्रयत्न १९५० च्या दशकात सुरू झाले होते. त्यात मुख्य लक्ष्य म्हणजे अफलित अंडपेशीत असणारी निम्मी गुणसूत्रे (n complement) काढून त्याजागी त्याच जातीच्या प्राण्याच्या शरीरातील पेशीमधील (somatic cell with 2 n complement) केन्द्रक (nucleus) रोपून, अशा पेशीचा गर्भाशयात भ्रूणविकास घडविणे हे होते. यामुळे पेशीदान करणाच्या प्राण्याचे शतप्रतिशत गुणधर्म अशा भ्रूणापासून विकसित होणार्या बालकात (पिल्लात) उत्पन्न करणे शक्य होते. असे पिल्लू पेशीदान करणाच्या प्राण्याचे कलमच ठरणार. त्यात लैंगिक प्रजननामध्ये होणारी गुणधर्माची भेसळ टाळता येते.
या संबंधीचे प्राथमिक प्रयोग फिलाडेल्फिया येथील प्रसिद्ध युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हानियातील डॉ. किंग व डॉ. ब्रिग्ज या संशोधकांनी १९५४-५५ सालापासून सुरू केले. प्रामुख्याने बेडकांवर केलेल्या या प्रयोगांद्वारे ८०% कलमी बेडूक तयार झाले होते. यातील पुढील प्रयोगांत डॉ. डिबिरानो व डॉ. किंग यांनी बेडकांच्या मज्जापेशींची, तर डॉ. जॉन गर्डन यांनी बेडकांच्या आतड्यातील आवरण पेशींतील केन्द्रकेरोवण्यासाठी वापरली होती. परंतु याप्रयोगांमध्ये वयस्क पेशीदात्यांच्या पेशी वापरून उत्पन्न केलेल्या कलमी बेडकांची वाढ खुटत असे. त्यामुळे डॉ. गर्डन यांचा सिंहाचा वाटा असलेले ते प्रयोग हळूहळू थंडावले. हे प्रयोग अपेक्षेइतके यशस्वी न होण्याचे कारण म्हणजे, सामान्य गर्भातील प्रारंभिक अवस्थांमध्ये पेशीविभाजन अतिशय वेगाने होत असते. म्हणजे पेशी आवर्तनाचा (एका पेशीपासून दोन पेशी उत्पन्न होण्याचा) कालखंड (cell cycle) केवळ एक तासाहूनही अल्प असतो व तेवढ्याच कालखंडात या पेशीतील डीएनए द्रव्याचे संश्लेषण पूर्ण होऊन डीएन्एची मात्रा दुप्पट म्हणजे पुढील विभाजनास पुरेशी होते. परंतु कलम करण्याच्या प्रयोगात वापरलेल्या वयस्क पेशीदात्यांच्या पेशीतील केन्द्रक काहीसा सुस्त असतो व त्याचा पेशी आवर्तनाचा कालखंड बराच दीर्घ असतो, तसेच डीएनए विश्लेषणाचा वेगही कमी असतो. त्यामुळे कलमी गर्भापासून संपूर्णपणे विकसित बालक उत्पन्न होण्याचे वेळापत्रक बिघडत असे. या अडचणीमुळे १९६० पासून सुरू झालेले हे संशोधन काहीसे मागे पडले. परंतु १९८० पासून युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया (आताची अॅलघंनी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस्) येथील डेव्हलपमेंटल बायॉलजी विभागात वयस्क बेडकांच्या रक्तपेशीतील केन्द्रके वापरून बेडकाची कलमी पिल्ले तयार करण्यात आली व या प्रकारच्या संशोधनाला पुन्हा प्रेरणा मिळाली.
आता गेल्या ४-५ वर्षांत अनेक ठिकाणी संशोधक पुन्हा या रोमांचकारक तंत्राकडे आकृष्ट झाले आहेत. स्कॉटलंडमधील रोझलिन इन्स्टिट्यूटच्या डॉ. इयान विल्मट यांनी फेब्रुवारी १९९७ च्या Nature या सुप्रसिद्ध ब्रिटिश वैज्ञानिक नियतकालिकात एका वयस्क मेंढीच्या स्तनातीलपेशीमधील केंद्रके वापरून एक डॉली (Dolly) नावाची कलमी मेंढी तयार केल्याची घोषणा केली. परंतु २७७ प्रयोगापैकी एकच प्रयोग यशस्वी होऊन डॉली ही वयात आलेली मेंढी तयार होऊ शकली! त्यानंतर अलीकडेच अमेरिकेतील ओरेगॉन रीजनल प्रायमेट रिसर्च सेंटर येथील वैज्ञानिकांनी “नेती’’ आणि ‘डिट्टो’ नावाची दोन लाल तोंडी (मूळ भारतातील हिशस जातीची) कलमी माकडे उत्पन्न केल्याचे जाहीर केले आहे. या प्रयोगात मात्र रोपण्यात आलेली केन्द्रके भ्रूणपेशीपासून मिळविण्यात आली होती. त्यामुळे डॉली या मेंढीचा जन्म हा नेती आणि डिट्टोपेक्षा खूपच अधिक कौतुकास्पद आहे! या पद्धतीने गाई, डुकरे, ससे यांचीच नव्हे तर मानवाची कलमे करण्यात वैज्ञानिक यशस्वी झालेआहेत. परंतु कलमी मानवाचे गर्भ भ्रूणावस्थेतच नष्ट करण्यात आले. परंतु या प्रयोगांच्या यशावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की एका मानवी व्यक्तीच्या शरीरपेशीतील (somatic cell) केन्द्रके (nuclei) वापरून, या केन्द्रकांचे मानवी अंडपेशीत रोपण करून पेशीदात्या व्यक्तीचे शतप्रतिशत गुणधर्म असलेला कलमी मानव निर्माण होऊ शकतो.
अर्थातच एवढ्या मोठ्या क्रांतिकारक वैज्ञानिक उपलब्धीचे सामाजिक, नैतिक व धार्मिक आयामही फार महत्त्वाचे आहेत. यामुळे या विषयावर जगभर गंभीर चर्चा सुरू झालेली आहेच. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, शासकीय खचनि कलमी मानव निर्मितीचे सर्व संशोधन बंद करण्याचा फतवा काढला आहे. आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार ब्रिटिश पार्लमेंटही या विषयावर विविध स्तरावर ऊहापोह करून हे संशोधन निषिद्ध ठरविण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कलमी मानव रस्त्यावर हिंडता फिरताना दिसण्याचा सुतराम संभव नाही. परंतु ही वैज्ञानिक जिनी’ तिच्या जादूच्या पात्रात कायमची बंदिस्त राहीलच याची खात्री देता येत नाही! लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के जनतेच्या इच्छेला मान देऊन आज राजकारण्यांनी या तंत्रज्ञानावर बंदी घातली आहे खरी, परंतु जनमत बदलणार नाही असे ठामपणे सांगता येत नाही. नव्हे जनमत बदलावे आणि कलमी मानव तयार करण्याच्या तंत्राचा संपूर्ण विकास होऊन या तंत्रज्ञानाचे विस्तृत प्रमाणावर उपयोजन व्हावे असे प्रस्तुत लेखकाचे प्रामाणिक मत आहे. याबद्दल थोडी चर्चा अनाठायी ठरू नये.
कलमी मानव म्हणजे काचपात्रात उत्पन्न झालेला माणूस अशी अतिरंजित कल्पना सपशेल चुकीची आहे. कलमी मानव निर्माण करण्यासाठी त्याची वाढ गर्भाशयातच ९|| महिने करावी लागेल. पण त्यासाठी कोणीही महिला गर्भवाहक महिला (surrogate mother) म्हणून काम करू शकेल. अशा गर्भवाहक महिला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर मोठ्या संख्येत एका व्यक्तीची शतप्रतिशत नक्कल (copy) असणारी कलमे तयार करता येतील. पुरुषापासून पुरुष कलमे व स्त्रीपासून स्त्रीकलमेच उत्पन्न होतील. एका व्यक्तीपासून उत्पन्न होणारी कलमे, समधर्मी जुळ्या मुलांसारखी (identical twins) संपूर्णतः समान जैनिक गुणधर्माची असतील. परंतु कलमी पद्धतीने जन्म झाल्यावर त्यांच्या वाढ होण्याच्या कालखंडात त्यांच्यावर परिसराचे, पर्यावरणाचे कार्य प्रभाव होतील हे सांगणे कठीण आहे. परंतु संपूर्णपणे समान परिसर, शिक्षण, संगोपन, संस्कार, प्रशिक्षण झाले तर मात्र अशा सर्व कलमी व्यक्ती समान रूपाने कार्यक्षम होतील.
असे कलमी मानव अनेक दृष्टीने फार उपयुक्त ठरू शकतात. हल्ली अनेक प्रकारचे वैद्यकीय,, औषधाचे परिणाम शोधणे, मानसिक, सामाजिक स्वरूपाचेतुलनात्मक अभ्यास करण्यासाठी जैविक निकटता असणारे प्राणी (inbred experimental animals) अथवा समधर्मी जुळ्या व्यक्ती (identical twins) वापरतात. पण जुळ्यांचे लोकसंख्येतील प्रमाण फारच अल्प, म्हणजे १ कोटी लोकसंख्येत बोटावर मोजण्याइतके असल्याने अशा तुलनात्मक अभ्यासावर मर्यादा येतात. एकाच व्यक्तीपासून अनेक कलमे मिळविल्यास, तुलनात्मक अभ्यासासाठी फार मोठी सोय होईल.
दुसरे म्हणजे अतिशय मेधावी अथवा गुणी व्यक्तीपासून नेमकी त्यासारखीच गुणी कलमे करणे फार मोलाचे ठरेल. श्रीमती लता मंगेशकर यांची अग्रिम बिनशर्त क्षमायाचना करून त्यांचे बोलके उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही! लतादीदींचा आवाज व गाण्याची शैली नैसर्गिकपणे अद्वितीय आहे. आणि लताबाईंसारखी गायिका पुन्हा होणे नाही असे सर्वच म्हणतात. आता या वयात लतादीदींना कन्यारत्नाचा लाभ होणे ही तर असंभव गोष्ट आहे. परंतु त्यांनी जर १ मिलीलिटर रक्त अथवा आपल्या त्वचेचा नखभर तुकडा दिला तर या नव्या तंत्रज्ञानाने त्यापासून कलम म्हणून एक बालिका तयार करणे शक्य आहे. अशा बालिकेचे प्रशिक्षण लताबाईंनी आपल्या उर्वरित जीवनात केले तर १५-२० वर्षांत खर्या अर्थानि प्रतिलता अगदी निश्चितपणे तयार होईल! आणि लतादीदींची कला खर्या अर्थाने अमर होईल!
कोणत्याही व्यक्तीला लैंगिक मार्गाचा अवलंब न करता आपलेच शतप्रतिशत व्यक्तिमत्त्व आपल्याच लिंगाचे उभे करणे शक्य होईल. अशा अपत्यात इतर कोणत्याही व्यक्तीची जैविक भेसळ संपूर्णपणे टाळता येईल. महिलांना पुरुषाच्या सहभागाशिवाय संपूर्णतः स्वतःसारख्या कन्या (फक्त कन्याच) मिळविता येतील. त्यामुळे पुरुषांचे वर्चस्व नाहीसे करून खरी स्त्रीमुक्ती साधता येईल. परंतु शनैःशनैः पुरुषजातच नामशेष होईल हेही तेवढेच खरे. परंतु विरुद्धार्थी पुरुषांनाही स्वतःच्या पत्नीऐवजी कोणत्याही भाडोत्री गर्भवाहक महिलेमार्फत स्वतःच्या प्रतिकृती उत्पन्न करता येतील!
या कलमी मानवनिर्मितीवर एक मोठा आक्षेप असा आहे की, त्यामुळे दुष्ट आणि संहारक अशा हिटलर, पॉल पॉट्, इदी अमीन, फ्रँकेन्स्टाइन यांसारखे सत्ताधारी आपल्या आवृत्त्या तयार करतील. परंतु हा आक्षेप फारसा गंभीर नाही. कारण अशा दृष्टांच्या प्रतिकृती वर्ष दोन वर्षांत तयार होणार नाहीत. पूर्ण कार्यक्षम होण्यासाठी या कलमांना २०-२५ वर्षे तरी लागतील आणि दुष्ट सत्ताधार्याची सद्दी फार अल्पकाळ टिकते असा जगाचा इतिहास आहे.
हे तंत्रज्ञान अतिशय खर्चिक आणि वेळकाढू आहे. कोणा अज्ञात ठिकाणी चटपट कलमी मानव तयार करणे शक्य नाही. तसेच या तंत्रात गर्भवाहक महिलांना ९|| महिने कलमी गर्भ पोसावा लागेल त्यामुळे हे काम गुप्तपणे करणे शक्य नाही. याखेरीज हल्ली या तंत्रज्ञानातील यशाचे प्रमाणही फार कमी आहे. परंतु तंत्राचा चांगला विकास झाला तर हे तंत्रज्ञान मानवी संस्कृतीच्या विकासास मारक न ठरता तारकच ठरेल असा विश्वास वाटतो.
यहुदी, खिस्ती, इस्लाम या सेमिटिक धर्मगुरूंचा या तंत्रज्ञानावर धार्मिक आक्षेप आहे. प्रत्येक मानवी जीव हा ईश्वराची अद्वितीय कृती आहे आणि या दैवी चमत्कृतीमध्ये मानवाने हस्तक्षेपकंरणे हे पाप आहे असे हे धर्म मानतात. परंतु वस्तुतः मानवी जन्म व मानवी जीवन ही निसर्गाच्या सामान्य नियमांची परिणती आहे. त्यात दैवी कृपा वगैरे काहीही नाही. त्यामुळे मानवाची प्रतिकृती विज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करणे ही गोष्ट पौर्वात्य धर्माना (हिंदू, बौद्ध आदि) मान्य होण्यास मुळीच हरकत नसावी. आपल्या पुराणकथांतून पुत्रप्राप्तीसाठी प्रसाद म्हणून मिळालेल्या पिंडाचे भाग करून एकाहून अधिक पुत्र प्रसविल्याचे दाखले मिळतातच. तेव्हा कलमी मानव (human clones) उत्पन्न करण्याचे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वस्वी स्वागतार्हच आहे असे म्हणावेसे वाटते!