मला जे तत्त्व शिकवायचे आहे, ते स्वैर स्वेच्छाचाराचे नाही. पारंपरिक मतात अभिप्रेत असतो, जवळपास तितकाच आत्मसंयम त्यात अवश्य आहे. परंतु त्यात संयम इतरांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ न करण्याकरिता वापरावा लागेल, आपले स्वातंत्र्य कमी करण्याकरिता नव्हे. आरंभापासून योग्य शिक्षण मिळाल्यास इतरांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वातंत्र्य याबद्दल आदर बाळगणे बरेच सोपे होईल अशी आशा करायला हरकत नाही असे मला वाटते. परंतु आपल्याला इतरांच्या कृतीवर नीतीच्या नावाने नकाराधिकार वापरण्याचा अधिकार आहे असा विश्वास निर्माण करणाच्या आजच्या परिस्थितीत वाढलेले जे लोक आहेत त्यांना त्या आवडत्या छळापासून अलिप्त राहणे जड जाईल. कदाचित् ते अशक्यही होईल. परंतु एखाद्या कमी प्रतिबंधक नीतिमत्तेत वाढलेल्या लोकांनाही ते अशक्य असेल असा निष्कर्ष काढणे मात्र चूक होईल.