गेल्या महिन्यात इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या संघपरिवारातील संस्थेच्या वतीने नागपूरला एक परिसंवाद झाला. विषय होता ‘परंपरा आणि आधुनिकता’. या प्रसंगी परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून श्री. मा. गो. वैद्य यांनी जो समारोप केला ते भाषण याच अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. मा. गो. वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार-प्रमुख आहेत. त्यापूर्वी बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आणि जवळजवळ तेवढाच काळ ते नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे संपादक होते. त्यांचे विचार जितके गंभीर तितकेच सुस्पष्ट आणि लेखनशैली जशी प्रासादिक तशीच मार्मिक असते असा लौकिक आहे.
वैद्यांनी आपले भाषण परंपरेच्या व्याख्येने सुरू केले. हेमचंद्राच्या कोशातली ‘अविच्छिन्नधारायां परंपरा’ ही व्याख्या देऊन ते म्हणाले की परंपरा हा अखंड वाहणारा प्रवाह आहे. प्रवाह खंडित झाला की साचलेल्या पाण्याचे डबके बनते. ती रूढी, परंपरा मनुष्यजीवनाइतकी गतिशील असते. तिचे एक टोक भूतकाळात तर दुसरे भविष्यात असते. परंपरा नि आधुनिकता अविरोधी आहेत. रूढीशी आधुनिकतेचा विरोध राहू शकेल, परंपरेशी नाही.
परंपरेची त्यांची व्याख्या आणि तीवरील भाष्य वाचून अनेक प्रश्न उत्पन्न होतात.
१. व्याख्या अलंकारिक असू नये हा तर्कशास्त्रातला पहिला दंडक आहे. तो येथे पायदळी तुडविला गेला आहे. प्रवाह, डबके ही रूपकात्मक भाषा आहे. समजा कोणी ‘शीलं परं भूषणम्’ अशी शीलाची व्याख्या केली तर काय कळेल?शील खूप शोभून दिसणारा दागिना आहे असे म्हटल्याने शील म्हणजे काय हे कळत नाही. तसेच परंपरा प्रवाहासारखी अखंड धारा आहे हे म्हटल्याने परंपरा म्हणजे काय याचा बोध होत नाही.
२. दुसरी शंका परंपरेच्या जीवितासंबंधी आहे. एखादी परंपरा भूतकाळापासून आजतागायत चालू आहे. पण ती भविष्यात टिकेलचयाची काय खात्री? वर्णव्यवस्था प्राचीन काळापासून चालत आलेली म्हणून साधुसंतांना ‘परंपरा’ वाटली असणार. निसर्ग- नियमासारखी अपरिवर्तनीय वाटली असणार. ती पुढे खंडित झाली म्हणून आपण तिला रूढी म्हणूशकतो. म्हणजे त्यांच्या लेखी जी परंपरा होती ती आपल्या लेखी रूढी झाली आहे. आता कोणत्याही परंपरेबद्दल असे म्हणता येईल. आज आहे ते उद्या, ५० वर्षांनी राहीलच असा दंभ व्यर्थ आहे असे श्री. वैद्यच सांगतात. त्यांचे हे म्हणणे परंपरेलाही को लागू करू नये?
३. श्री. वैद्यांनी परंपरा आणि रूढी यांची चपखल उदाहरणे घेऊन व्याख्या केल्या असत्या तर नेमका बोध झाला असता. यज्ञसंस्था, विवाहसंस्था, ब्राह्मणांचे वेदाध्ययन-विद्याध्ययन त्यांना परंपरा वाटतात. त्यांचे विश्लेषण करून श्री. वैद्य (१) परिभाषा (२) आशय आणि (३) आविष्करणअसे भेद करतात. त्यांच्या मते ‘यज्ञ’ ही परिभाषा आणि त्याग हा यज्ञाचा आशय कायम आहे. फक्त आविष्कार बदलला म्हणून काय झाले. यज्ञ ही परंपरा आजही टिकून आहे. श्री. वैद्य म्हणतात निर्मम होणे, ममत्वशून्यता हा यज्ञाचा आशय आहे. हे माझे नाही, इदं न मम, असा स्वतःचा अधिकार दुसर्यातच्या स्वाधीन करणे, समूहाला वाहणे हा यज्ञाचा आशय आहे. आविष्करणे बदलली. गीतेत जपयज्ञ, ज्ञानयज्ञ असे कितीतरी यज्ञ सांगितले आहेत. ते नवनवे आविष्कार आहेत.
याचा अर्थ असा की प्राचीन लोक ज्याला यज्ञ म्हणत त्यापेक्षा अत्यंत भिन्न गोष्टींना आधुनिक लोक यज्ञ म्हणणार. मग यात सातत्य कशाचे राहिले?हेतूचे म्हणावे तर जपयज्ञ आणि ज्ञानयज्ञात त्याग कशाचा आहे?अविष्कार भिन्न, आशयही भिन्न, नाव तेवढे कायम; याला परंपरा म्हणणार काय?
विवाहसंस्था कुटुंबाच्या स्थैर्यासाठी आहे. कुटुंब ही आपली परंपरा आहे. म्हणून विवाहसंस्थेचे पावित्र्य राखले पाहिजे, हा आपला आग्रह बदलेल का, असा श्री. वैद्यांचा प्रश्न आहे. विवाह हा संस्कार ठरवून त्याचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न झाला आहे. विद्यमान कायद्यांनी विवाह हा करार ठरविला आहे. घटस्फोट मान्य करून तो करार संपुष्टात आणण्याची व्यवस्था केली आहे. श्री. वैद्यांना घटस्फोट मान्य नाही का?विवाहसंस्थेचे पावित्र्य कुटुंबपरंपरा टिकविण्यासाठी राखले पाहिजे असे त्यांचे म्हणणे. विवाहसंस्था ज्या पुरुषांनी उत्पन्न केली त्यांनीच तिच्या पावित्र्याचे संकेत ठरवून दिले आहेत. विधवेचा पुनर्विवाह ही गोष्ट आता आतापर्यंत अपवित्र मानली जात होती. लोकहितवादींच्यापुढाकाराने मार्च १८७० मध्ये शास्त्रार्थ करून तिला धर्माची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न पुण्याला झाला. या वादासाठी थोरले शास्त्रीबुवा, कृष्णशास्त्री चिपळूणकर, हे एक पंच होते. त्यांनी एकदा इंग्रजांबरोबर फळफळावळेखाल्ली म्हणून त्यांच्याकडून ५०० रु. दंडप्रायश्चित्तादाखल वसूल केला गेला. क्षौर करून सर्वदेह प्रायश्चित्त घेतले तेव्हा त्यांना पंच म्हणून मान्य करण्यात आले. नऊ दिवस वाद चालला. शेवटी परंपरावादी कर्मठांचा विजय झाला. विवाहसंस्थेचे पावित्र्य राखले गेले आणि लक्षावधी विधवा आयुष्यभर देह जाळत राहिल्या. त्या काळी बालविवाह होत. घरोघर बालविधवा असत. त्यांच्या यातना आणि लाजिरवाणे जिणे प्रत्यक्ष दिसत असता शब्दप्रामाण्याच्या अभावी त्यांना तडफडत ठेवून कोणते पावित्र्य राखले गेले?
पुढे साठ वर्षांनी अस्पृश्यता धर्मसंमत नसावी या आशेने गांधीजींनी १९३३ साली येरवड्याच्या जेलमध्ये असताना शास्त्रीपंडितांना एकत्र बोलविले. सुधारणावाद्यांतर्फे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि सनातन्यांतर्फे काशीचे राजेश्वरशास्त्री द्रविड असे मोठमोठे धर्मज्ञ पंडित जमले. अस्पृश्यांचा मंदिरप्रवेश धर्मशास्त्रांना मान्य नाही असे या पंडितांनी एकमुखाने बजावले. परंपरेचे पावित्र्य राखले गेले आणि हिंदुधर्माचा एक मोठा तुकडा फुटून वेगळा झाला. आता त्यांना मंदिरांची दारे सताड उघडी असली तरी त्यांनीच त्यांकडे कायमची पाठ फिरविली आहे.
विसाव्या शतकाच्या चवथ्या दशकात अस्पृश्यतेची अमानुषता पटविण्यासाठी महात्मा गांधींना शास्त्राधार शोधावा लागावा आणि तो मिळू नये ह्या गोष्टी काय सांगतात?जन्मजात विषमता मानणारी वर्णव्यवस्था परंपरेने चालत आली तिला रूढी का म्हणायचे आणि परंपरा काम्हणायचे नाही हे श्री. वैद्यांच्या निकषाने आम्हाला कळत नाही.
ज्ञानसाधनेची परंपरा श्री. वैद्यांच्या मते आशयदृष्टया टिकून आहे. गुरुगृही १२ वर्षे वास करावा हे आविष्करण तेवढे बदलले. हे म्हणणे पटण्यासारखे नाही. विद्याध्ययन हा केवळ ब्राह्मणांचा अधिकार राहिला नाही. विद्या म्हणजे वेदविद्या हे समीकरण राहिले नाही. तेव्हा गुरुगृही वास्तव्य हे आविष्करण आणि वेद-वेदांग अध्ययन हा आशय गेला. उरली फक्त परिभाषा.
श्री. वैद्य म्हणतात, इथल्या कोपर्निकस आणि गॅलिलिओंना अपमान सहन करावा लागला नाही. इथल्या ब्रूनोला सुळावर जळावे लागले नाही. यावर मनात प्रश्न येतो की इथे कोपर्निकसआणि गॅलिलिओ निर्माणच का झाले नाहीत?उत्तर सुचते ते असे की, विद्या म्हणजे वेदविद्या. तिचे सांगोपांग अध्ययन करणे हीच परंपरा. आणि तीही ब्राह्मण या एकाच वर्णाने. त्याने निष्कारणधर्म म्हणून अध्ययन करायचे. म्हणजे कारण विचाराचे नाही. काय, म्हणायचे नाही. करा म्हणजे करा. हाच धर्म आहे. हेच शास्त्र आहे. हीच परंपरा, एवढेच उत्तर . उपयोगी काय, अनुपयोगी काय असा विचारही मनात आणणे हे पाप. अशा समाजात बंदिस्ते जिज्ञासेच्या वातावरणात कोपर्निकस आणि गॅलिलिओ निघतीलच कसे?वेदांना आणि वैदिकांना शिव्या देणारा चार्वाक निघाला हेच खूप झाले. पण तो ऐतिहासिक की अनैतिहासिक असा प्रश्न पडावा इतका धूसर, पुराणातली वानगी म्हणावी असा झालेला.
हुंड्याची पद्धती ही श्री वैद्य म्हणतात रूढी आहे. कारण ती आधुनिक आहे. पारंपरिक नाही. श्री. वैद्यांनी फॅशनचे परंपरेशी सात्म्य कसे होते हे सांगितले आहे. त्याच पद्धतीने ह्या रूढीचे परंपरेशी सात्म्य होताना दिसत आहे. कारण स्त्रीला पुरुषापेक्षा कमी प्रतीचे मानायचे ही परंपरा आहे आणि हुंड्याची रूढी तिच्याशी सात्म्य होऊन चिरंजीव होत आहे. तिची परिभाषा म्हणजे नाव बदलेल, आविष्करण बदलेल पण आशय कायम राहील असे दिसत असताना तिला रूढ़ी का म्हणायचे आणि परंपरा का म्हणायचे नाही याचे उत्तर श्री. वैद्यांच्या व्याख्येत मिळत नाही. हीच वैद्यांच्या व्याख्येतली मख्खी आहे.
४. वैद्यांना मूल्ये आणि परंपरा एकच वाटतात. परंपरा ही चिरंतन मूल्येच आहेत अशी त्यांची धारणा दिसते. म्हणून एखादी गोष्ट परंपरा आहे असे म्हटले म्हणजे ती राखली पाहिजे असा आग्रह असतो. म्हणजे, अमुक एक करावे असे परंपरा सांगते एवढ्यासाठीच ते केले पाहिजे असा अर्थ होतो. परंपरांचा अभिमान बाळगल्याशिवाय एक समाज, एक राष्ट्र निर्मिती होत नाही असा त्यांचा दावा आहे.
याप्रतिपादनावर पुष्कळ काही म्हणण्यासारखे आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी मानवतेची म्हणून चिरंतन मूल्ये असतात, उदाहरणार्थ भूतदया, परोपकार, समाजहितार्थ स्वार्थाचा त्याग इ., ती आपलीच खास परंपरा ठरत नाही. आपले वेगळेपण जसे आपल्या भूगोलात आहे, इतिहासात आहे, तसे आपल्या म्हणून वेगळ्या सांगता येणार्या परंपरांत आहे. ज्यांच्या जोपासनेनेच आपले राष्ट्र बनेल, अशा आपल्या परंपरा आहेत; पण त्या प्रायः त्याज्य ठरल्या आहेत. जन्मजात विषमतेवर आधारलेले चातुर्वर्ण्य, स्त्रीजातीची दुय्यमता या गोष्टी परंपरेत दृढमूल झाल्या आहेत.व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी ही अशीचएक परंपरा आहे. कुटुंबासाठी एका व्यक्तीचा, गावासाठी कुलाचा आणि जनपदासाठी गावाचा त्याग करणे हे न्याय्य आहे असे आपली परंपरा सांगते. वर्तमान जगतामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य सर्वमान्य होत आहे. आपला समाजही त्याच दिशेने वेगाने पुढे चालला आहे. त्याला रोखण्याचेसामर्थ्य कोणत्याही परंपरेत नाही. तेव्हा कोणत्या समाजाची निर्मिती आपल्याला करावयाची ते पाहिले पाहिजे. शिवाय राष्ट्र म्हणजे फक्त पुरुष नाही. खरे तर राष्ट्र म्हणजे स्त्रिया, एखाद्या युद्धात पुरुषजातीपैकी ७५ टक्के पुरुष नष्ट झाले, पण स्त्रिया कायम राहिल्या, तर लोकसंख्या अल्पावधीत भरून निघू शकते. पण तेच उलटे झाले आणि ७५ टक्के स्त्रिया नष्ट झाल्या तर लोकसंख्या पूर्ववत् यायला किती काळ लागेल?राष्ट्राची हानी केव्हा भरून निघेल?हा प्रश्न आजचा सुधारकाचा नाही. थोर समाजशास्त्रज्ञ डॉ. श्री. व्यं. केतकरांचा आहे, आणि राष्ट्र म्हणजे स्त्रिया हे उत्तरही त्यांचेच आहे. स्त्रीपुरुषसमानता असलेले राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आपल्या परंपरा निमूटपणे स्वीकाराव्या अशी ती मूल्ये नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.