जे जग आपल्याला निर्मायचे आहे त्यात सर्जक वृत्ती जिवंत असतील. त्यात जीवन हे आनंद आणि आशा यांनी परिपूर्ण असे साहस असेल. आपल्या जे मालकीचे आहे ते राखण्याच्या किंवा दुसन्याच्या मालकीच्या वस्तू लुबाडण्याच्या नव्हे, तर विधायक प्रवृत्तींवर आधारलेले ते जीवन असेल. त्या जगात स्नेहाला अनिबंध वाव असेल. त्यातील प्रेमातील अधिकारवृत्ती नाहीशी झालेली असेल. त्यातील क्रौर्य आणि असूया सुखानुभवाने नाहीशी झालेली असतील, आणि जीवनाला समृद्ध करणाच्या सर्व सहजप्रवृत्तींना वाव मिळून ते आनंदमय झालेले असेल, असे जग निर्मिणे शक्य आहे. ते फक्त ते इच्छिणाच्या मानवांची वाट पाहात आहे.
आपल्या सध्याच्या जगाची उद्दिष्टे वेगळी आहेत. पण ते स्वतःच्या अत्युत्कट विकारांच्या अग्नीत भस्म होऊन नष्ट होईल, आणि त्याच्या राखेतून एक नवे बाल जग निर्माण होईल, हृदयात नवीन आशा आणि डोळ्यांत प्रातःकाळाचे तेज घेऊन.