दक्षिण कोरियातील किम उंगयोंग या चार वर्षांच्या मेधावी बालकाच्या बुद्धिमत्तेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९६८ सालीच घेतलेली अनेकांना परिचित असेल. हा मुलगा वयाच्या चौघ्या वर्षापासूनच कविता करीत असे, चार भाषांमध्ये अस्खलितपणे संभाषण करी आणि टेलिव्हिजनवर त्याने इन्टिग्रल कॅलक्युलसचे प्रश्न सोडविण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते. ह्या मुलाचा टर्मन बुद्धयंक २१० मानण्यात आला होता. याचप्रमाणे इंग्लिश तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल तसेच जर्मन कवी वुल्फगांग गटे यांचाही बुद्धयंक २०० च्या वरच असावा असे सांगण्यात येते. सामान्य माणसांचा बुद्धयंक १०० ते १४० या दरम्यान आढळतो. अर्वाचीन भारतीयापैकी टिळक, ज्ञानकोशकार केतकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धयंकाची मात्र कोठे नोंद झालेली आढळत नाही. वयाच्या २२ व्या वर्षीच डब्लिन विद्यापीठातील ज्योतिर्विद्येचे विभागप्रमुख विल्यम हॅमिल्टन व १९ व्या वर्षीच स्टॅनफर्ड विद्यापीठात नेमले गेलेले प्राध्यापक हार्वे फ्राइडमन हे सुद्धा असामान्य बुद्धिमत्तेचे होते. हल्ली अमेरिकेत अति बुद्धिमान मुलांसाठी (gifted children) विशेष शाळा असून त्यांत शिक्षण घेऊन वयाच्या ११-१२ व्या वर्षी विद्यापीठात प्रवेश मिळविणारी बरीच मुले आहेत!
मानवी मेंदू हा संपूर्ण जीवसृष्टीत सर्वाधिक उत्क्रान्त मेंदू आहे हे तर सर्वमान्यच आहे. भ्रूणविक्रासामध्येही मेंदूच्या विकासाचा प्रारंभ शरीराच्या इतर कोणत्याही अवयवापेक्षा सर्वात आधी होतो. गर्भधारणेपासून पहिल्या २-३ आठवड्यांतच गर्भाच्या पेशींमध्ये हालचाल सुरू झाल्यावर सर्वप्रथम काही पेशींची मज्जासंस्थेच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू होते. यासाठी प्राथमिक प्रेरणा (primary induction) कारणीभूत असते. या विशिष्ट पेशीसमूहाचा झपाट्याने विकास होऊन पहिल्याने मज्जासंस्थेच्या अग्रिम टोकाचे अर्थात मेंदूचे स्थान निश्चित होते. सुरुवातीला काही शेकड्यांच्या संख्येत असणार्या या पेशींचे सतत विभाजन होत राहून, पूर्णावस्थेला पोचलेल्या गर्भामधील केवळ मज्जासंस्थेतच अब्जावधी मज्जापेशी व त्यांचे तंतू निर्माण झालेले असतात. (प्रत्येक डोळ्यातील दृक्पटलातील (retina) शंक्वाकार पेशीच (cones) १० कोटींहून अधिक असतात!) मेंदूत उत्पन्न झालेल्या या मज्जापेशीपैकी बहुसंख्य पेशी असंख्य पेशीगटांत (nuclei) विभागल्या जातात. या विविध गटांतील पेशींच्या तंतूंचे परस्परांशी अनुबंध (circuits) होण्यास प्रारंभ झालेला असतो, परंतु जन्मापूर्वी सर्वच अनुबंध पूर्ण झालेले नसतात. विशेषतः प्रगत कार्यप्रणालीशी (advanced functions) संबंधित मज्जापेशींचे परस्परांतील संबंध (projections) बालकाच्या जन्मानंतरच प्रस्थापित होऊ लागतात. नवजात बालकावर त्याच्या परिसरातून जे भौतिक आघात (प्रकाश, ध्वनी, गंध, स्पर्श, तपमान, आर्द्रता इत्यादी) होतात त्यामुळे मेंदूतील मज्जापेशींचे विशिष्ट अनुबंध (circuits) निर्माण होण्यास साहाय्य होते. याप्रमाणे नवजात बालकांच्या मज्जासंस्थेच्या विकासावर व पर्यायाने बौद्धिक विकासावर, परिसरातील भौतिक वातावरणाचा फार मोठा प्रभाव असतो.
बालकाच्या जन्मापासून पहिल्या ३ वर्षांत मेंदूतील अब्जावधी मज्जापेशींच्या शेकडो गटांमध्ये (nuclei) अतिशय गुंतागुंतीचे अनुबंध प्रस्थापित झाले तरी असंख्य पेशी मुक्तच राहतात. वाढत्या वयाबरोबर, शरीराच्या विविध क्रियाप्रक्रियांमुळे अशा मुक्त पेशीही मेंदूतील मज्जाजालाशी जोडल्या जातात. अनुभव, प्रशिक्षण, स्मृती यांसारख्या अनुभूतींच्या प्रभावामुळे सतत नवनव्या पेशी वेठीला धरल्या जाऊन, मेंदूतील मज्जाजालात सम्मिलित होतात. त्यामुळे मानवी मनाच्या कार्याचा आवाका सतत वर्धिष्णु असतो. अशा नव्याने कार्यरत होणार्या मज्जापेशींचा मेंदूतील शरीरधर्माच्या मूलभूत क्रियांशी संबंधित असलेल्या जुन्या (उत्क्रांतीच्या संदर्भात) मेंदूतील बेसल गॅग्लिया, बॅलॅमस वगैरे भागातील पेशींशीही अनुबंध निर्माण होतात. जोपर्यंत या रीतीने मेंदूतील नवनव्या पेशी कामास जुंपल्या जाऊ शकतात तोपर्यंत त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता शाबूत आहे असे आपण म्हणतो, ज्या वयापासून नव्या पेशी कामात येण्याचे थांबते त्या वयानंतर व्यक्तीच्या मानसिक कार्यक्षमतेमध्ये घट होऊ लागते.
जन्माच्या वेळी काहीशा विस्कळीत स्वरूपात असलेल्या मज्जासंस्थेच्या सुगठित विकासासाठी बालकाच्या जीवनातील पहिली तीन वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. या काळात त्याच्यावर होणारे प्रकाश, ध्वनी, गंध, स्पर्श, आदि भौतिक प्रभाव अतिशय महत्त्वाचे असतात. संपूर्णपणे निरोगी असलेले बालक दररोज, प्रत्येक घटकेला आपल्या परिसराचे आकलन करीतअसते व त्याच्या मेंदूचा विकास घडत असतो. त्यामुळे या काळात बालकाशी बोलणे, गाणे, विविध सुसूत्र ध्वनींचा (गोंगाटाचा नव्हे) अनुभव देणे, विविध आकार रंग असणार्या वस्तू सतत दाखविणे, विविध स्पर्शाचा व गंधांचा अनुभव देणे फार उपयुक्त ठरते. तान्ह्या बाळांना टेलिव्हिजन दाखवावा किंवा नाही याबद्दल दुमत आहे, परंतु मूल मान सावरू लागल्यापासून त्यास धांगडधिंगा नसलेले टेलेव्हिजनचे कार्यक्रम माफक प्रमाणात दाखविण्यास हरकत नाही. पण त्याचबरोबर बालकांना खन्या जीवनात असणार्या गोष्टींचा अनुभव भरपूर प्रमाणात दिला पाहिजे. आकाशात उडणारे पक्षी, झाडे, डोंगर, फिरणारे पंखे, धावणाच्या मोटारी व रेलगाड्या, मैदानावरील खेळ अशी दृश्ये, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज, घंटानाद, बडबडगीते, नर्सरी व्हाइम्स, खुळखुळे वगैरेचे ध्वनी, वेगवेगळ्या आवाजात बोलणे यासारखे श्राव्य अनुभव, विविध आकाराच्या व स्पर्शाची खेळणी, मऊ कापडाच्या बाहुल्या, तसेच प्राणी, लाकडी अथवा रबराची खेळणी, किल्यांचा जुडगा, मोठ्या आकाराचे बोल्टस् अथवा इतर स्वच्छ व सुरक्षित यांत्रिक भाग, भांडी खेळावयास देणे; बालकांना रस्त्यावर, मैदानात हिंडवणे; पादत्राणे घालून तसेच अनवाणी चालविणे व धावविणे, झोपाळ्यावर झुलविणे, चढण्यास प्रोत्साहन देणे या सारख्या अनुभवांमुळे बालकांच्या बुद्धीचा उत्तम विकास होण्यास साहाय्य होते. या सर्व प्रकारच्या अनुभवांमुळे जो विकास होतो तो प्रामुख्याने वैयक्तिक स्वरूपाचा असतो. सामाजिक अथवा समूहातील वर्तनाची बुद्धि, बालकास गटामध्ये वावरावयास लागल्यावरच विकसित होऊ शकते. त्यामुळे साधारणतः वयाच्या तिसर्या वर्षापासूनच बालकास बालवाडीत पाठविणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
शाळेमध्ये बालकाचे अनुभवविश्व झपाट्याने विस्तारू लागते. बरोबरीची मुले, शिक्षक, शाळेत जातायेताना भेटणार्या व्यक्ती, वाहनांचे चालक इत्यादि व्यक्ती, तसेच परिसरातील दृश्ये या सर्वांचा बालकाच्या मनावर परिणाम होत असतो. परस्परांशी व शिक्षकांशी वागण्याची त्यास सवय होते, सहकार्याची तसेच स्पर्धेची तोंडओळख होते आणि एकूणच चांगल्या-वाइटाची जाणीव उत्पन्न होऊ लागते. ही प्रगती होत असतानाच काही बालकांना या विस्तारलेल्या परिसराशी इष्टपणे समरस होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याचीही शक्यता असते. हट्ट करणे, सोबत्यांशी अरेरावी करणे, भांडणे, मारणे, ओरबाडणे, गोंधळ आरडाओरड करणे, शिक्षकांशी दुर्वर्तन करणे, अबोल होणे यासारखे दोषही याच काळात निर्माण होऊ शकतात. हे दोष वेळीच लक्षात न आल्यास अथवा त्याकडे शिक्षकांनी व पालकांनी दुर्लक्ष केल्यास त्याचा परिपाक पुढे चोरी करणे, खोटे बोलणे, मारहाण करणे, शाळा बुडविणे, धूम्रपान करणे यांसारख्या दुर्वर्तनांत व अन्ततः वयात आल्यावर गुन्हेगारी, व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर प्रकारांत होण्याचा संभव असतो. त्यासाठी बालवाडीपासूनच शिक्षकांचे व पालकांचे बालकाकडे सतत बारीक लक्ष असणे आवश्यक असते. प्रेमापोटी आपल्या पाल्याचे दुर्वर्तन खपवून घेणे हा पालकांचा घोर प्रमाद ठरू शकतो. पालकांनी वारंवार शिक्षकांशी, मुलांना शाळेत नेणार्या वाहनचालकांशी, तसेच आपल्या पाल्याच्या वर्गातील मुलांच्या पालकांशी संपर्क करून आपल्या पाल्याच्या वर्तनाविषयी चर्चा करणे फायद्याचे ठरते. घरामध्येही बालके वडीलधाच्या मंडळीपासून सतत शिकत असतात. पालकांनी स्वतः खोटे बोलणे,सामाजिक शिस्त न पाळणे, आळस, बनवाबनवी करणे, कर्जबाजारीपणा, इतरांबद्दल कुत्सितपणे बोलणे, ‘व्यसने, यांपासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा हेच वातावरण घरात अनुभवणारी मुले त्यांपासून मुक्त कशी राहणार?
प्रत्येक पालकाला असे वाटत असते की, त्याच्या पाल्याने बुद्धिमान व्हावे, अभ्यास खेळ व कला यांमध्ये प्रगती करावी, उत्तमोत्तम शाळांमध्ये प्रवेश मिळवावा, शिष्यवृत्ती व पारितोषिके मिळवावीत, खूप शिकून भरपूर पैसा मिळवावा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, अधिकार मिळवावे. यासाठी पालक वाटेल तेवढा पैसा खर्च करण्यास तयार असतात. परंतु स्वतः त्याग करण्यास, आपली स्वतःची जीवनशैली बदलण्यास मात्र तयार नसतात. त्यामुळे मुलांना मोठे करण्याचे पालकांचे स्वप्न पुष्कळदा विरून जाते. वस्तुतः पालकांनी अगदी बालवाडीपासूनच आपल्या पाल्याच्या बुद्धिमत्तेचा योग्य दिशेने विकास करण्यात मनःपूर्वक भाग घेणे गरजेचे असते. पाल्यांशी नियमितपणे भरपूर मोकळेपणाने बोलणे, मुलांच्या मित्रांबद्दल, शिक्षकांबद्दल, अभ्यासाबद्दल, खेळाविषयी, छंदांविषयी चौकशी करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, फाजील लाड न करता त्यांच्या गरजा भागविणे, चांगल्या सवयी लावणे, सामाजिक शिस्त व इतरांच्या भावना ओळखून सहकार्य करण्यास मुलांना प्रोत्साहित करणे हे सगळे पालकांनीच करावयाचे असते. बालकांचा केवळ बौद्धिक विकासच नव्हे तर त्यांची नैतिक बुद्धिमत्ता (moral intelligence) कशी विकसित होईल हे पालकांनी पाहिले पाहिजे. हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट कोल्स यांनी अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात याविषयी भरपूर ऊहापोह केला आहे. नैतिक बुद्धिमत्तेची काही उदाहरणे त्यांनी दिली आहेत. अभ्यासात हुशारी, इतरांशी समजूतदारपणे व सहकार्याने वागणे, इतरांच्या भावनांचा आदर करणे, सामाजिक शिस्त व जबाबदारी मनःपूर्वक स्वीकारणे, स्वतःच्या स्वार्थाहून इतरांच्या अडीअडचणीचे भान असणे ही सगळी उत्तम नैतिक बुद्धिमत्तेची लक्षणे प्राध्यापक कोल्स यांनी सांगितली आहेत. पण अशी नैतिक बुद्धिमत्ता विकसित कशी व्हावी?
त्यासाठी जीवनात येणार्या अनुभवांवर विचार करण्यास मुलांना शिकविणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना कधीही काही असामान्य अनुभव आले, उदाहरणार्थ अपघात, गुन्हा, भांडण, क्रीडेतील अथवा कलेतील एखाद्याचे कर्तृत्व, अशा प्रसंगी त्यावर मुलांशी बोलणे, साधकबाधक चर्चा करणे फार मोलाचे ठरते. त्यामुळे अशा घटनांचा सामाजिक अन्वयार्थ लावण्याची क्षमता मुलांमध्ये उत्पन्न होते. अॅना फ्रॉईडच्या मते प्राथमिक शाळेत जाणाच्या बालकांमध्ये याच काळात चांगल्यावाईटाबद्दल जाणीव निर्माण होते. अवतीभोवती घडणार्या असामान्य घटनांवर या बालकांना विचार करण्याची क्षमता प्राप्त झालेली असते. आणि विविध परिस्थितींमध्ये आपण कसे वागावे हेसुद्धा या वयातील बालकांना समजू शकते. परंतु या सर्व क्षमता असूनही पुष्कळ मुले सर्वांत सोपा व इतरांच्या अनुकरणाचा मार्ग स्वीकारतात. पालकांनी व शिक्षकांनी अशा मुलांचे प्रबोधन केले पाहिजे. अॅना फ्रॉइड तर म्हणतात की याच कालखंडात बालकामध्ये आत्मज्ञानाची (conscience) रुजवात होत असते व बालकांचे व्यक्ती म्हणून व्यक्तित्व आकार घेऊ लागते. याचवेळी बालकांवर पुस्तके, संगीत, कला, क्रीडा यांचा सुस्पष्ट परिणाम होऊ लागतो. याच वयात बालकेप्रत्येक घटनेचा व वस्तूचा अर्थ समजून घेण्यास उत्सुक असतात. आणि म्हणूनच याच वयात पालकांनी आपल्या मुलांच्या शंकाकुशंका नाहीशा करून त्यांच्यापुढील पेचसोडवून त्यांना तर्कशुद्ध भूमिका घेण्यास उद्युक्त करावयास हवे.
केवळ ईश्वरेच्छा, नियती यांसारख्या निरर्थक गोष्टींच्या आधारे बालकांचे समाधान करणे हे त्या बालकाच्या नैतिक बुद्धिमत्तेला मारक ठरते.
राल्फ वाल्डो इमर्सनने सांगून ठेवलेच आहे की नैतिकता ही बुद्धिमत्तेहून श्रेष्ठ आहे.” परंतु ‘‘नैतिक बुद्धिमत्ता’ ही केवळ नैतिकता (जयप्रकाशजी नारायण यांची!) अथवा केवळ बुद्धिमत्ता (चंद्रास्वामीची) याहूनही सर्वश्रेष्ठ आहे याबद्दल दुमत नाही. अशी नैतिक बुद्धिमत्ताच मानवी संस्कृतीच्या विकासाचा आणि जागतिक शांतीचा व सुव्यवस्थेचा आधार ठरेल. त्यामुळे बालवयापासूनच बालकांची नैतिक बुद्धिमत्ता विकसित करण्याची मुख्य जबाबदारी पालकांचीच आहे. भारतीय संस्कृतीत ही जबाबदारी पालक पार पाडतातच. परंतु अलीकडे जागतिकीकरणाच्या नादात भारतीयांच्या जीवनशैलीत आलेल्या बदलांमुळे, नव्या पिढीच्या पालकांचे या विषयाकडे लक्ष आकृष्ट करणे आवश्यक झाले आहे!