गेल्या काही दिवसांत दोन जाहीर कार्यक्रमांनी सार्वजनिक जीवनात बरीच खळबळ माजविली, मुंबईचा मायकेल जॅक्सन यांचा पॉप संगीताचा कार्यक्रम आणि बंगलोरचा विश्वसुंदरीचा स्पर्धात्मक कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रमांचे आश्रयदाते १५०००-२०००० हे. रुपयांचे तिकीट सहज परवडू शकणारे होते. बिनधास्त, बेपर्वा अशा या बाजारू संस्कृतीच्या बटबटीत कार्यक्रमांना दोन्ही ठिकाणच्या राज्य सरकारांनी ठाम, निर्धारपूर्वक, करडा पाठिंबा दिला. ही दोन्ही सरकारे त्यांच्या राजकीय मतप्रणालीत दोन ध्रुवांइतकी दूर आहेत. परंतु खुल्या अनिर्बध बाजारपद्धतीबाबत त्यांच्यात एकमत दिसते.
ही खुली बाजारू संस्कृती व्यक्तीच्या बाबतीत किती संवेदनशून्य असू शकते याची दोन उदाहरणे इथे देण्यासारखी आहेत. ज्या अमेरिकेमुळे ही नवी संस्कृती जग पादाक्रांत करायला निघाली आहे त्या अमेरिकेतील ही उदाहरणे आहेत. अमेरिकेत उत्पादक अनेक माध्यमांच्या द्वारे अतिशय आक्रमकपणे आपल्या मालाची सतत जाहिरात करत असतात. गुळगुळीत, रंगीबेरंगी, चटकदार पत्रके दररोज अक्षरश: किलोच्या मापात तुमच्या घराच्या पत्रपेटीत कोंबली जातात. या कोंबाकोंबीत तुमचा खाजगी पत्रव्यवहार गुदमरून जातो. हा कचरा काढून काढून माणूस त्रस्त होतो. अशाच एका त्रस्त घरमालकाने आपल्याला या त्रासातून वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जाहिरातदारांचा आपल्या मालाची जाहिरात करण्याचा मूलभूत हक्क (fundamental right) ग्राह्य मानून घरमालकाचा अर्ज फेटाळून लावला.
दुसरे उदाहरण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या पत्नी जॅकलीन यांच्याशी संबंधित आहे. एक पत्रकार—छायाचित्रकार जॅकलीन यांचा सतत पाठपुरावा करून त्यांची छायाचित्रे काढत असे. जॅकलीन यांना जणू स्वत:चे खाजगी जीवनच राहिले नाही. काही दिवस निवांतपणे, गजबजाटापासून दूर, निसर्गरम्यस्थळी घालविण्यासाठी त्या एका जवळजवळ निर्जन बेटावर गेल्या असता हा पठ्ठ्या छायाचित्रकार तिथेही पोहोचला. सामोपचाराचे, थोडेसे धाकधपटशहाचे उपाय थकल्यावर जॅकलीन यांनी न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाने छायाचित्रकाराचा उपजीविकेचा व्यवसाय करण्याचा मूलभूत हक्क ग्राह्य मानला. फक्त जॅकलीन केनेडी यांचा व्यक्तिगत खाजगी जीवन जगण्याचा हक्क कबूल करून छायाचित्रकाराला त्यांच्यापासून अमुक एक अंतर ठेवण्याचे बंधन घातले! टेलिफोटोची प्रगती लक्षात घेता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या या पत्नीची न्यायालयाने समजूत घालून बोळवणच केली असे म्हणायला हवे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखी एक दृश्य नजरेस पडले. परस्परविरोधी विचारांचे मूलतत्त्ववादी आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाचे कार्यकर्ते एकत्र नव्हे, पण एकाच बाजूला आलेले दिसले
विशेषत: बंगलोरच्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या विरोधात. मूलतत्त्ववाद्यांचे जाऊ द्या, पण स्त्रीमुक्ती आंदोलकांची तरी नेमकी वैचारिक बैठक काय होती? इथे काही वर्षांपूर्वी Great Essays in Science या पुस्तकात हॅवेलॉक एलिस यांच्या What makes a Woman Beautiful या निबंधाची आठवण होते. एलिस हे फ्रॉईडच्या दर्जाचेच मानसशास्त्रज्ञ होते (१८५९-१९३९). लोकमताच्या क्षोभाला तोंड देत त्यांनी Studies in Psychology of Sex चे सात खंड प्रसिद्ध केले. लज्जास्पद, बीभत्स, दृष्ट अशी त्यावेळी त्यावर टीका झाली. पण कालांतराने हा टीकेचा धुराळा खाली बसून माणसातील लैंगिक भावनांचा शोध हा वैज्ञानिक संशोधनाचा विषय म्हणून मान्यता पावला. या निबंधाची थोडक्यात मांडणी खाली देत आहे.
नर आणि मादी यांच्यातील आकर्षण हे नैसर्गिक आहे आणि वंशसातत्यासाठी ते आवश्यकआहे. प्राणिसृष्टीत नर हा मादीभोवती पिंगा घालतो. मोराचा पिसारा, सिंहाची आयाळ, कोकिळाचे कूजन ही त्यांची काही उदाहरणे. माणसात याबाबतीत मादीचा पुढाकार असतो- पहा मराठी, हिंदी, मल्याळी, तामीळ … चित्रपटातील छायागीते. एकदा परस्पर आकर्षणाची गरज मान्य केल्यानंतर या प्रेमळ, खोट्याखोट्या युद्धातल्या शस्त्रास्त्रांची माहिती करून घेणेक्रमप्राप्तच होते.
समाजाच्या अगदी प्राथमिक अवस्थेत लिंगआणि योनिप्रदेशावर भर होता. जिथे माणसाचा जन्म होतो त्याविषयी आदरभाव, पूज्यभावच होता. लिंग आणि योनिपूजा आजही प्राथमिक अवस्थेतील समाजात रूढ आहेत. शंकराची पिंडी आणि तिच्यापुढील नंदीच्या गुन्ह्यांगाला हात लावून गाभार्या त (गर्भगृहांत) प्रवेश हिंदूत आजही रूढ आहे. व्हिक्टोरियन काळापर्यंत युरोपियन पुरुषांचे पोशाख बटबटीत वाटावेत असेच होते. आजचे बिकिनीही वेगळे नाहीत. कालपरवापर्यंत विवाहपत्रिकेत “शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे’ असा स्पष्ट उल्लेख असे व ‘गर्भाधाना’चा धार्मिक विधीही केला जात असे.
जसजसा मानवसमाज प्रगल्भ होत गेला, तसतशी या उघड उघड खुलेपणाची जागा सूचकतेने घेतली. लैंगिक आकर्षणाच्या दुय्यम भागांना जास्त महत्त्व येऊ लागले. स्त्रियांच्या बाबतीत पार्श्वभाग–पूर्वीची गजगामिनी आणि आजचा Catwalk-व उरोभाग यांना महत्त्व प्राप्त झाले, तर पुरुषांच्या बाबत HeMan, केसाळ छाती, दाढी मिशा यांना महत्त्व आलेले दिसते. सूचकतेच्या बाबतीत “काय लपवत आहोत याकडे लक्ष वेधण्याची खुबी’ असे स्त्रियांच्या आधुनिक पोशाखाचे वर्णन केले जाते. “Modem men are getting conscious about their thighs” अशी एका पॅण्टची जाहिरात वाचल्याचे स्मरते.
यानंतरच्या आकर्षणाच्या साधनात केस, वर्ण, डोके यांचा समावेश हॅवलॉक एलिसने केला आहे. या बाबतीत भौगोलिक, वांशिक, सांस्कृतिक संकेतांना महत्त्व प्राप्त होते. याशिवाय स्वतंत्र (लैंगिक विचारांपासून स्वतंत्र) अशा सौंदर्यदृष्टीचाही परिणाम असतो. काळ्याढुस्स चेहरयावर निळे डोळे आणि सोनेरी केस यांची कल्पना कोणी मांडीत नाही. आपल्याकडील काळेभोर टपोरे डोळे चिनी-जपानी चेहर्याावर विसंगतच दिसतील. अपरिचित गोष्टींविषयी नेहमीच थोडेबहुत आकर्षण असते. आपल्याकडे कुरळ्या केसांच्या बटा अनेक मजनूंना खुळावतात, पण नीग्रो लोकांना कुरळ्या केसांची महती काय? भारतात गौरवर्णाला महत्त्व, पण अमेरिकेत, युरोपात काळ्यागोव्यांच्या संकरातून जन्माला आलेली एक प्रकारची गहूवर्णी त्वचा फार आकर्षक गणली जाते. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ एलिसने त्या त्या काळातील काव्य, चित्रे व कथा कादंबर्यां च्या साक्षी काढल्याआहेत. मात्र त्याने स्वत:च आपल्या या शास्त्रीय लेखाचे वर्णन in that cold and dry light | through which alone the goal of knowledge may truly be seen’ – असे केले आहे. तसे ते लिखाण अर्थातच नाहीये. निबंधाला आपला स्वतःचा स्वाभाविक डौल आहे. शैली आहे.
आता एक नितळ स्वच्छ दृष्टिकोनाची आठवण. खूप वर्षांपूर्वी मुंबईत एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही दोघे-तिघे जेवत होतो. इतक्यात एक प्रौढ प्राध्यापक अमेरिकन जोडपे आणि त्यांचा अठरावीस वर्षांचा तरुण झिपऱ्या आमच्या शेजारी येऊन बसले. मधेच गप्पा मारता मारता तो तरुण झिपऱ्या दाणदाण गाण्यात आणि नाचात सामील झाला. आम्ही आमचे तरुण वय विसरून, सुसंस्कृतपणाचा आव आणून त्याच्या आईवडिलांशी हल्लीची पोरं वगैरे सांस्कृतिक गप्पा मारायला सुरुवात केली. त्यावेळी ते अमेरिकन प्राध्यापक आईवडील म्हणाले “जाऊ द्या हो, तरुण सळसळते वय आहे. नाचेल ओरडेल आणि काही वर्षांनी आपोआपच आमच्यासारखा शांत होईल.”
आणिक एक गमतीशीर विचार. २०५० साली मानवी समाज पूर्णपणे मातृसत्ताक झालेला असेल असे एका भविष्यवेत्याचे म्हणणे आहे. बाकी वर्तमानातील वास्तव विसरण्याला भूत आणि भविष्यकाळ किती सोयिस्कर असतात नाही? लेखकाचे म्हणणे असे की स्त्रियांना पुरुषाची गरज दोन गोष्टींसाठी असते. एक शारीरिक ताकदीची कामे करायला. ती कामे त्या वेळपर्यंत ती सहजच स्वत: यंत्राच्या साहाय्याने करू शकेल. तेव्हा यासाठी पुरुषाची गरज नाही. दुसरी गरज शुक्रजंतूंची. त्यासाठी “बीज बँक’ असेल, दोनएकशे स्त्रियांसाठी एक पुरुष पुरे होईल. हायरे कंबख्त! स्त्रियांवर पुरुषी वाड्यात मूर्खपणाचे आरोप अनेक वेळा झालेत. पण इतका प्रखर हल्ला झाल्याचे माझ्यावाचनात नाही. मला सांगा या स्त्रीराज्यात आरशावर बंदी असेल? आरसा हा क्रमांक एकचास्तुतिपाठक असला तरी पुरुषाला क्रमांक दोनही मिळणार नाही?
अन्यायाविरुद्धचे लढे हिरीरीनेच लढायचे असतात. पण ते लढत असताना जीवनाला विन्मुख होऊन, जीवनातला आनंद गमावून आश्रमीय सुतकी चेहरेच घेऊन फिरायला हवे का?