संपादक, आजचा सुधारक, यांस
आपल्या जुलै-ऑगस्टच्या अंकाचे अभ्यागत संपादक श्री. सत्यरंजन साठे यांचे अभिनंदन. समृद्ध, वाचनीय लेखांबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या विस्तृत लेखातील सुबोध मांडणीबद्दल. या विषयांशी अपरिचित असल्यामुळे असेल, मला दोन शंका पडल्या. पृ. १४८ वर ‘बोम्मई वि. भारत’ खटल्यात (भा.ज.प. सरकारे यांच्या) बडतर्फीचा हुकूम अवैध ठरवावा लागला नाही, पण वैध म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करायचेही टाळता आले.’ हे कसे काय?जे अवैध नाही ते वैधठरते. मग या लिहिण्याचा अर्थ?दुसरे शंकास्थळ पृ. १४६ वर, न्यायालयाने बोम्मई वि. भारतआणि फारुकी वि. भारत या दोन्ही खटल्यांत कोणता आक्षेप तपासला?पहिल्यात ६ विरुद्ध ३ मतांनी तो स्वीकारला, तर दुसन्यात ३ वि. २ मतांनी तो अमान्य केला. ‘तो’हे सर्वनाम कोणत्या नामाबद्दल आले ते कळले नाही. कळावे.
आपला
प्र. ब. कुळकर्णी
संपादक,आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
आतापर्यंतच्या अंकातील आमुख पृष्ठावरील मजकूर हा आ. सुधारकाच्या परंपरेला साजेसा असायचा. क्वचित तो अंकातील लेखविषयांना धरूनही असायचा. परंतु नोव्हे.डिसें. १९९६ च्या अंकातील आमुखात आपण ‘स्त्रीविषयी मनुस्मृतीचे मत’ उद्धृत केले आहे.
या उद्धृतीमध्ये मनूला बदनाम (इंग्रजीत व्हिलिफाय) करण्यापलीकडे कोणतेच प्रयोजन आढळून येत नाही. समान नागरी कायद्याच्या मुद्दयाशीही ह्या उद्धृतीचा कोणताच संबंध पोहचत नाही. त्यामुळे संपादकांच्या डुलकीमुळे हा मजकूर येथे आला की काय असा भ्रम निर्माण होतो.
मनूचा स्त्रियांविषयीचा समग्र दृष्टिकोन या उद्धृतीमध्ये आलेला नाही. मनुकालीन समाज हा पुरुषप्रधानच होता, आणि पिता, भर्ता आणि पुत्र यांनी कन्या, पत्नी व माता यांचे रक्षण करणे ही कायद्यानेही वैयक्तिक जबाबदारी होती. नंतर सांगितलेली सहा दूषणे ही पुरुषांनाही थोड्याफार फरकाने लागू आहेत. ‘नैते रूपं परीक्षन्ते’हे पुरुषांच्या बाबतीत मनूने म्हटले नसले, तरी संभाव्य आहेच.
अगोदरच्या अध्यायांमध्ये मनूने स्त्रियांची वाखाणणीच केली आहे आणि त्यांच्याबद्दल आदरभाव दर्शवला आहे. ऐश्वर्य इच्छिणार्याी पुरुषाने स्त्रियांशी कसे वागावे हेही मनूने सांगितले आहे. जेथे स्त्रिया दुःखी होतात ते कुळ नष्ट पावते. स्त्रियांना अन्न, वस्त्र व भूषणे देऊन नित्य आनंदात ठेवावे. पतिपत्नींनी परस्परांना संतुष्ट ठेवावे अशा अर्थाचे श्लोक आले आहेत ते असे :
‘शोचन्ति जाययो यत्र विनश्यत्याशु तत् कुलम्।।
न शोचन्ति तु यत्रैता वर्धते तद्धि सर्वदा || मनु. ३।५३
तस्मादेताः सदा पूज्या भूषणाच्छादनाशनैः।
भूतिकामैनरैर्नित्यं सत्कारेषुत्सवेषु च।। ३/५९।
संतुष्टे भार्यया भर्ता भर्ना भार्या तथैव च।
यस्मिन्नेव कुले नित्यं कल्याणं तत्र वै धुवम् ॥ ३॥६७
स्त्रियां तु रोचमानायां सर्वं तद्रोचते कुलम्।।
स्यां त्वरोचमानायां सर्वमेव न रोचते || ३|६८
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रियाः।।
(स्त्रियांचा जेथे मान राखला जाणार नाही तेथे कोणतेही कार्य निष्फळ ठरेल.)
सुसंस्कृत समाजातील हा स्त्रीविषयक दृष्टिकोन आहे. मनूने स्त्रियांचे क्वचित् दोषदिग्दर्शन केले असले तरी मनूने स्त्रियांचे कुटुंबातील व समाजातील सामर्थ्य ओळखले होते आणि म्हणूनच त्याने वरप्रमाणे लिहून ठेवले आहे. स्त्रीमुक्तिचळवळीच्या आजच्या काळातही मनूची ही वचने असंबद्ध ठरत नाहीत.
नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकाच्या १ ल्या पृष्ठावरील मनूच्या उद्धृतीमुळे झालेल्या मनूवरील अन्यायाचे परिमार्जन करावयाची संपादकांना इच्छा असल्यास मनुस्मृतीतील सामाजिक आशयाच्या बर्याेच उद्धृती संपादकांना देता येतील.
आपला न. ब. पाटील
अ, ३७ कमलपुष्प वांद्रा रिक्लेमेशन, मुंबई ४०० ०५०
डॉ. न. ब. पाटील ह्यांचे पत्र वर दिले आहे. त्यांनी आजचा सुधारक च्या समान नागरी कायदा विशेषांकावर (नोव्हें-डिसें ९६) जे मनुवचन उद्धृत केले आहे त्याचे औचित्य विवादास्पद आहे असे त्यात म्हटले आहे.
मनुस्मृतीमध्ये काही वचने स्त्रियांच्या प्रशंसेची आहेत हे मान्य आहे. पण स्त्रियांच्या निदेची पुष्कळ जास्त आहेत, इतकेच नाही तर ती अत्यन्त अपमानास्पद भाषेमध्ये लिहिली आहेत. पूर्ण मनुस्मृती वाचल्यानंतर मनावर छाप स्त्रीशूद्रांच्या निंदेचीच राहते. एकीकडे खेटरे मारावयाची व दुसरीकडे उगी उगी करून चुचकारावयाचे असे एकूण त्या वचनांचे स्वरूप आहे. स्त्रियांविषयी दुसर्या व तिसर्या् अध्यायांत आदरभाव दाखविणारा मनू आठव्यानवव्या अध्यायांत त्यांच्याविषयी इतके घाणीने बरबटलेले, लडबडलेले कसा काय लिहू शकतो हे कोडे आम्हाला उलगडत नाही. मनूच्या मनात स्त्रियांविषयी खरा आदर असता तर तो इतके निरर्गल उद्गार पुढे काढू शकला नसता. त्याच्या वाणीला त्याने त्या आदराचा लगाम घातलेला नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच मनुस्मृती हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणा एका व्यक्तीने लिहिलेला ग्रन्थ असणे शक्य नाही. शासकाची त्या त्या वेळची मर्जी सांभाळण्यासाठी कोणी आधी काही वचने संस्कृतात रचावयाची, त्यांचा संग्रह करावयाचा व मागाहून पुढच्या पिढ्यांनी त्या संग्रहातून प्राप्त प्रसंगाला वा शासकाच्या लहरीला अनुकूल अशी वचने पुन्हा आपल्या तत्तत्कालीन शासकाला काढून दाखवावयाची असे काहीसे आमच्या इतिहासकाली घडत असले पाहिजे. आपल्या एकाच ग्रन्थात इतकी परस्परविरुद्ध मतेएक माणूस कसा लिहू शकेल व आपले मत बदललेच तर पूर्वीचे शिल्लक कशाला ठेवीलर्हेध कोरि आम्हाला समजावून देईल तर बरे होईल. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी परस्परविसंगत अशी विधाने सापडतात ह्यामधील संगती आम्हाला तरी दुसरी दिसत नाही. स्त्रियांविषयी मनूचा समग्र दृष्टिकोणआम्हाला तरी सुसंगत दिसत नाही. विसंगती मात्र जागोजाग दिसतात.
स्त्रियांना समुचित न्याय नाकारण्यासाठी मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायातील वचनांचा आधार घेतला जाऊ शकतो, नव्हे तो तसा घेतला जात होता ह्याविषयी आमच्या मनात शंका नाही. डॉ. पाटलांना आमचे हे म्हणणे अमान्य असेल तर त्यांनी तसे आम्हाला साधार पटवून द्यावे. त्याचप्रमाणे ‘नैते रूपं परीक्ष्यन्ते’ हे मनु पुरुषांविषयी स्पष्ट सांगत नाही. सांगत असलाच तर आडपडद्याने सांगतो हीच तर आमची तक्रार आहे. पुरुषाने गुप्त परस्त्रीची अभिलाषा धरल्यास त्याला अमकी शिक्षा असे मनू क्वचित् सांगतो; परंतु स्त्रिया स्वतः पुरुषाला वाममार्गाला लावणाच्या असल्यामुळे पुरुषांनी आपल्या छत्राखालच्या सगळ्याच सुरूपकुरूपादि स्त्रियांना आवरावे हेच तोआपल्या वाचकांवर बिंबवितो.
हे सारे मनूचे लिखाण स्त्रीपुरुषसमानतेला बाधक आहे. मध्ययुगामध्येच ते क्षम्य होते. आजच्या समान नागरी कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट निरनिराळ्या धर्माच्या नागरिकांना एकच कायदा सरसकट लागू करावयाचा हे नसून स्त्रीपुरुषांच्या दर्जामध्ये जी विषमता आज धर्माच्या नावाखाली नांदत आहे तिला दूर करणे हे आहे.
स्त्रीपुरुषांच्या समतेच्या मार्गात आज कोणा मनुस्मृत्यभिमान्याने अडसर बनू नये ही आमची इच्छा त्या वचनांच्या उद्धरणाच्या साह्याने आम्ही व्यक्त केली आहे.
दिवाकर मोहनी
श्री संपादक, आजचा सुधारक यांस
सप्रेम नमस्कार,
तुमचे अलीकडील चारपाच अंक खूपच वाचनीय निघाले आहेत. हिंदुत्व, समान नागरी कायदा आणि समतेवर आधारलेला समाज हे खरोखरच आजचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. हिंदुत्व आणि समता या विषयांवर मी माझ्या प्रतिक्रिया विस्तरशः लिहिणार होतो, पण सध्या इतर कामात व्यस्त आहे त्यामुळे काही प्रतिक्रिया थोडक्यात लिहितो.
(१) State ने धर्मनिरपेक्ष असावे अशी घटनेत तरतूद आहे. नागरिकांनी धर्मनिरपेक्ष असावे अशी तरतूद नाही. उलट त्यांना धर्माचरणाचे स्वातंत्र्य आहे. समाजात धर्माच्या आधारावर आजही अनेक चांगली कार्ये चालतात. पांडुरंगशास्त्री आठवले व अण्णा हजारे यांची उदाहरणे देता येतील. विवेकवाद मलाही श्रेष्ठ वाटतो; पण त्याला अनुयायी थोडे आहेत. सामान्य लोकांची जरधर्मावर श्रद्धा असेल तर धर्माच्या आधाराने समाजाचे परिवर्तन जास्त सुलभ होईल. ‘State’ ने स्वतःला अलिप्त ठेवावे इतकेच.
(२) समानता हा एक आदर्श आहे, नैसर्गिक स्थिती नव्हे. शिवाय संधीची समानता कितीही देत गेले तरी यशाची असमानताराहणारच व त्यातून संधीची असमानताही उत्पन्न होणार. खाजगी यशाला जागा न ठेवल्याने सगळ्या समाजाचाच व्हास होतो असा साम्यवादी देशांचा अनुभव आहे. तेव्हा यशाची असमानता मान्य करून खाजगी यशाला संधी दिली पाहिजे. यातून उच्चनीचता, घाणेरडी-कष्टाची कामे वगैरे समस्या तयार होणारच, त्या पूर्णपणे टाळता येणे अशक्यआहे. सर्वांची समृद्धी हे लक्ष्य ठेवले पाहिजे, समानता हे नव्हे.
(३) समान नागरी कायदा करण्याची जबाबदारी नेहरूंच्या पिढीने पुढच्या पिढीवर ढकलली. त्यावेळची कारणे अजूनही कायम आहेत. तेव्हा सध्याच्या पिढीनेही ती जबाबदारी आणखी पुढच्या पिढीवर ढकलण्यात घटनेचा अवमान होत नाही. ‘समान नागरी कायदा’यातील ‘समान’ या शब्दावर फक्त जोर दिला जातो, ‘नागरी’ म्हणजे धर्मनिरपेक्ष या शब्दावर दिला जात नाही हे यामागील जातीयवादाचे निदर्शक आहे. हा जातीयवाद जाऊन, ‘स्त्री-पुरुष समानतेकरता समान नागरी कायदा’ असे ब्रीदवाक्य व्हायला पाहिजे. असो.
आपला
भ, पां. पाटणकर
प्रति,
श्रीमती वैजयंती जोशी, C/o संपादक, आजचा सुधारक
स. न.
आजचा सुधारक – समान नागरी कायदा विशेषांकामध्ये आपण तयार केलेल्या ‘वैवाहिक कायद्याचा मसुदा’ हा लेख वाचला, आवडला व या कामाबद्दल आपले अभिनंदन व आभार.
त्यामध्ये एक दुरुस्ती सुचविण्यासाठी हे पत्र. पान २६७ वर (आजचा सुधारक – नोव्हें. डिसें. १९९६) घटस्फोटासाठी ज्या कारणांची तरतूद केली आहे, त्यामध्ये “(९) महारोग झाला असणे’ ही एक तरतूद आहे. ही तरतूद आता कालबाह्य झाली असल्याने ती गाळावी अशी विनंती आहे. महारोग आता पूर्ण बरा होऊ शकतो, लवकर बरा होऊ शकतो व त्या रोगांची संसर्ग-क्षमता अत्यंत कमी आहे. तेव्हा घटस्फोटासाठी हे कारण मान्य करणे आता वैद्यकीयदृष्ट्या समर्थनीयनाही.
तसेच सामाजिक दृष्ट्याही अशी तरतूद केल्याने महारोगाबद्दलच्या अवास्तव भीतीमध्ये वाढ होईल, व महारोग्यावर सामाजिक बहिष्कार व अस्पृश्यता लादण्याच्या प्रवृत्तीत त्यामुळे वाढहोईल. त्यामुळे महारोग्यांचे मूलभूत मानवी अधिकार नाकारले जातील, व महारोग गुप्त ठेवण्याची वृत्ती वाढेल. त्यामुळे हा रोग समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडेल.
तरी ही तरतूद आपल्या मसुद्यातून वगळावी ही विनंती.
आपला
सुभाष आठले, जन-स्वास्थ्य-दक्षता-समितीसाठी