गांधींना वाटले, ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ या शब्दात न्यून आहे. ऐकणाराला ते निर्बलांचे हत्यार वाटते. त्यात द्वेषाला जागा आहे असे वाटते. शिवाय त्याची परिणती हिंसेतही होऊ शकेल. दक्षिणआफ्रिकेत आपण जो लढा उभारला त्याला काय म्हणावे या विचारात त्यांना आधी ‘सदाग्रह’ (सत्+आग्रह) आणि मग ‘सत्याग्रह’ हा शब्द सुचला. सॉक्रेटीस त्यांना जगातला पहिला सत्याग्रही वाटला.’इंडियन ओपिनियन’ या आपल्या पत्राच्या गुजराती भागात त्यांनी त्याची कथा सांगितली. त्याचे चरित्र आणि चारित्र्य यावर ६ भाग लिहिले. त्याच्या विचारसरणीतून आपल्याला नवसंजीवन मिळाले असे ते म्हणतात.
सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण हे श्री. वसंत पळशीकरांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. पळशीकर सामाजिक स्थित्यंतरांची दखल घेणारे विचारवंत आहेत. विपुल पण दक्षतेने लिहिणारे लेखक आहेत. प्रस्तुत पुस्तक त्यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या, मिताक्षरा शैलीने लिहिले आहे. प्रसिद्ध तत्त्ववेत्ते प्रा. मे. पुं. रेगे यांची पुस्तकाला प्रस्तावना आहे. या लेखनाचा ताजेपणा ते नावाजतात. सॉक्रेटिसाचे जीवन आणि मरण नाट्यपूर्ण आहे. ज्या कार्याचा त्याला निदिध्यास लागला होता त्याची ओळख मराठी मनाला उपकारक होईल, त्याचा मार्ग समाजहिताचे चिंतन करणार्यांहना प्रेरक होईल, असा विश्वास बाळगून पुस्तक लिहिले गेले आहे. एका भारावलेल्या मनःस्थितीत लिहिलेले हे छोटेखानी पुस्तक त्यामुळे मोठे झाले आहे.
सॉक्रेटिसाचे व्यक्तिमत्त्व, वृत्ती, जगण्याची शैली भारतीय आध्यात्मिक वळणाची आहे असे रेग्यांना वाटते. त्याला ऐहिकाचे आकर्षण नाही. आचरणात तणावरहित सहजता आहे, साधकासारखी. ‘साधना’ या शब्दाच्या सगळ्या छटा इंग्रजीत आणणे अशक्य असले तरी भारतीय मनाला त्या सॉक्रेटिसाच्या जीवनात ठळकपणे दिसतात.
रेग्यांच्या या समजुतीचे प्रतिबिंब पळशीकरांच्या लिखाणात दिसते. ते म्हणतात, “समाजनेत्यांची धर्मजिज्ञासा जागृत व्हावी अशा काळात गांधी आणि सॉक्रेटीस जगत होते.”
सॉक्रटीस आणि गांधी यांना नीती आणि धर्म यांत अद्वैत दिसते. हा धर्म पूर्णपणे सामाजिक आहे. कर्मकांड, सण-उत्सव, विधि-निषेधांचा कौटुंबिक बडिवार हा धर्म नाही. ज्याने समाजाची योग्य धारणा होते त्या धर्माचे पालन करा, हा एकच मुद्दा सॉक्रेटिसाला आपल्या अखेरच्या भाषणातून अथेन्स-नगरवासीयांच्या मनावर ठसवायचा होता असे पळशीकर म्हणतात (पृ. ६२). त्यांच्या मते तत्त्वज्ञ नुसता पंडित नसतो. तो ‘सजग, सक्रिय, श्रेष्ठ दर्जाचा’ कर्ता असतो. तो सद्भुणांचा उपासक असतो. सद्भुण हे दिव्य सत्याचे इहलोकातले आविष्कार असतात. सत्य हाचपरमेश्वर अशी गांधींप्रमाणे त्याचीही व्याख्या आहे. आणि साधकाला ज्या प्रमाणात अनासक्ती साधते त्या प्रमाणात सत्यज्ञान होते (पृ. ५). धर्मपरायणता (piety) हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक जीवनातच व्यक्तीची धर्मपरायणता दिसली पाहिजे.
इहवादी भूमिकेचा तो धिक्कार करतो. मानवीय नीतितत्त्वे नुसत्या ऐहिकाच्या विचारातून लाभतात हा पक्ष त्याला भ्रामकच नाही तर घातक वाटतो (६). नाशिवंतपणा हा शरीराचा आणि अविनाशित्व हा आत्म्याचा गुण आहे असे तो मानतो (८७).
व्यक्ती सामाजिक आहे. कुटुंब, गण-गोत, ग्राम-नगर-जनपद या संदभनि व्यक्तित्व ठरते. व्यक्तीची धर्मपरायणता हा तिच्या मर्जीचा प्रश्न नाही. इतरांनी उठाठेव करू नये असा तो विषय नाही. वेगवेगळ्या नात्यांनी समाजाशी जोडलेली व्यक्ती देवाशी, दिव्याशी जो व्यवहार करते ती धर्मपरायणता. ती नसण्यात समाजद्रोह आहे असे सॉक्रटीस म्हणतो. गांधीही मानतात.
पळशीकर इथेच थांबत नाहीत. सर्व देवदेवता ही एका देव नावाच्या चिर, सनातन अशा अनाद्यनन्त रूपाची (Idea, form) विशिष्ट उदाहरणे आहेत असे सांगतात. ‘दुसन्या अंगाने, मूर्तिमंत चांगुलपणा, परिपूर्ण सद्गुण, परिपूर्ण त्रिकालज्ञान, विशुद्ध नीतिविवेक हेच देवाचे व त्याचीच भिन्न रूपे असलेल्या देव-देवतांचे खरे स्वरूप असते’ (५१) असे मत पूर्ण पटल्यासारखे सांगतात. सॉक्रटीस मात्र सावधपणे आपले तत्त्वज्ञान ‘मानणे न मानणे’ या कोटीचे समजतो. आपण मानतो तसे मानण्यात धोका असला तरी तो धीरोदात्त वाटावा असा आहे असे त्याला वाटते (८८).
सॉक्रेटिसाच्या व्याख्येप्रमाणे ज्ञानी मनुष्य अयोग्य, अहितकारक, अनैतिक वर्तन करू शकत नाही. सत्याचे ज्ञान होणे म्हणजे असत्य अहितकारक असते हे पटणे. ज्ञानी नीतिमान असतोच. कळते पण वळत नाही हा प्रकार तेथे नसतोच (५३).
आता पळशीकरांच्या या विवेचनाचे थोडे परीक्षण करू.
Virtue is knowledge अशी एक उक्ती सॉक्रेटिसाच्या नावावर आहे. ग्रीकांच्या विचारपद्धतीची ओळख असल्यावाचून पुष्कळ वचनांचे अर्थ नीट लागत नाहीत. सॉक्रेटिसापुढे सोफिस्टांचा पूर्वपक्ष असतो. ते अभाववादी पाखंडी विचारवंत होते. जीवन निष्प्रयोजन आहे असे मानत. सॉक्रेटिसाला सत्याचे ज्ञान आणि धर्माचे आचरण हे जीवन-प्रयोजन वाटते. कारागिरालाही वस्तूचे प्रयोजन माहीत असल्यावाचून कुशलतेने वस्तू घडवता येत नाही. Virtue हा इंग्लिश शब्द arete’ या ग्रीक शब्दाचे रूपांतर आहे. ‘arete’ म्हणजे कौशल्य. अगदी चोरीचेही arete असते. Knowledge म्हणजे प्रयोजनाचे ज्ञान. ते नसेल तर कारागिरालाही कुशल आचरण करता येणार नाही. हाच विचार दुसन्या तर्हे.ने, कुशल आचरण म्हणजे ज्ञान (प्रयोजनाचे) असा सांगता येईल. यातून ज्ञानी म्हणजे धर्मनिष्ठच असा अर्थ निघत नाही.
मनुष्य स्वभावतः सामाजिक आहे हे खरे, पण व्यक्ती जितकी खरी तितका समाज नाही. समाज ही संकल्पना आहे, मानीव गोष्ट आहे, असा दुसराही एक प्रभावी विचार आहे. सत्य ही दिव्य गोष्ट आहे, तिचे ज्ञान काही तपस्वी साधकांना फक्त शक्य आहे, असे ज्ञानी, तत्त्वज्ञ म्हणजे धर्मज्ञ. ही विचारसरणी सोळाव्या-सतराव्या शतकापासून मागे पडत आहे. सत्य हे कोणत्याहीपोथ्यापुस्तकांत बंदिस्त नाही. ते कळण्यासाठी कोणा धर्मज्ञांची मध्यस्थी जरूरीची नाही. कोणत्याही सामान्यातल्या सामान्य माणसाला सत्य समजू शकते. नीतीचे सामान्य तत्त्व, आपल्यावरून जग ओळखावे एवढेच आहे. ‘आत्मवत् सर्व भूतेषु’ असे वागणे हाच धर्म. हीच नीती. ही धर्माच्या क्षेत्रातली लोकशाही आहे. अनासक्ती, साधना यांचा बडिवार सामाजिक धर्माच्या क्षेत्रात कशाला?ही इहवादी विचारसरणी आहे. तिचा पाडाव करणे कठीण आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्ती म्हणून तिचा मान. न्याय, समता यांची मजा चाखलेला समाज आपल्याला मिळालेले लाभ आता सोडणे नाही. कुलासाठी एकट्याचा, गावासाठी कुलाचा, जनपदासाठी एका गावाचा आणि आत्मप्राप्तीसाठी पृथ्वीचा त्याग करावा, ह्या भारतीय आध्यात्मिक विचारसरणीचा सार्वत्रिक स्वीकार आता होणे नाही. निदान सरसकट नाही. इ. स. पूर्व चारशे वर्षांपूर्वी साक्रेटिसाच्या विचारसरणीचा पराभव झाला. विसाव्या शतकात आध्यात्मिक भाषा बोलणार्यास गांधींचा पराभव झाला. कौटुंबिक कर्मकांड, सण-उत्सव हा जो साक्रेटिसाला अधर्म वाटला तो धर्म तर आटोकाट फोफावत आहे. तो समाजमनातून नाहीसा होणे कदापि शक्य नाही. हे लक्षात घेऊन धर्मजिज्ञासा करावी लागणार आहे.
पळशीकरांनी हे पुस्तक लिहून मराठीतल्या वैचारिक वाङ्मयात निश्चितच मोलाची भर घातली आहे हे निर्विवाद.
सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण, लेखक : वसंत पळशीकर, अक्षरमुद्रा प्रकाशन, मूल्य ३५ रु.