१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन वाङ्मयाचा अभ्यास करताना नेहमी जाणवायचा तो त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे व्यापून टाकणारा औद्योगिक क्रांतीचा प्रचंड बॅकड्रॉप. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, साहित्यिक इ. कुठलेही क्षेत्र त्याच्या सर्वव्यापी प्रभावापासून मुक्त नव्हते. १९ वे शतक हा सर्वार्थाने स्थित्यंतराचा काळ. व्हिक्टोरिया राणीच्या स्थिर आणि खंबीर राजवटीच्या खांबाभोवती हे बदलाचे गोफ विणले गेले. प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या बदलांमागचे महत्त्वाचे कारण होते औद्योगिक क्रांती.
तांत्रिक-औद्योगिक क्षेत्रातील तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे क्षेत्रांतील हे बदल आमूलाग्र स्वरूपाचे होते. त्यांचे क्रांतिकारक स्वरूप लक्षात येण्याच्या आधीच माणसे ओळखीच्या जगातून अनोळखी जगात लोटली गेली होती. शांत, आत्मसंतुष्ट असे कृषिप्रधान सरंजामशाहीचे युग नष्ट होऊन कारखानदारीचे, वेगळ्याच कार्यपद्धतीचे, वेगळ्याच वेळापत्रकाचे असे वेगवान जग निर्माण होत होते. ह्या नवीन जगाबद्दलच्या वाङ्मयात उठलेल्या प्रतिक्रिया तीव्र असंतोषाच्या, असमाधानाच्या, जवळजवळ निराशेच्या होत्या. जे थोडेफार समाधानाचे सूर होते ते विश्वासार्ह नव्हते. प्रसिद्ध कवी मॅथ्यू आर्नल्डने म्हटल्याप्रमाणे ह्या नव्या जगातल्या माणसाची अवस्था ‘Wandering between two worlds, one dead, the other powerless to be born’ अशी झाली होती. अशा वाङ्मयीन माहितीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हम्फ्री जेनिंग्जने संकलित ‘chiedot PANDAEMONIUM (The coming of the Machine as seen by the Contemporary Observer)’ हे पुस्तक हातात आले तेव्हा त्याबद्दल विशेष कुतूहल वाटून ते वाचायला घेतले. यंत्राचे आगमन तत्कालीन निरीक्षकांनी कसे पाहिले ह्याचा मागोवा घेणारे हम्फ्री जेनिंग्जचे हे पुस्तक विलक्षण आहे, तसेच असामान्य आहे. इ.स. १६६० ते १८६६ ह्या कालखंडात जगलेली विविध प्रकारची माणसे आणि त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या कविता, दैनंदिन्या, पत्रे ह्यांचा अभ्यास करून त्यांत जाणता-अजाणता, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमटलेल्या औद्योगिक क्रांतीच्या पाउलखुणांचा मागोवा जेनिंग्जने घेतला आहे. त्याचबरोबर त्या काळात भरभराटीला आलेल्या संस्थांचे वृतान्त, वर्तमानपत्रातील बातम्या ह्यांचाही काळजीपूर्वक अभ्यास करून जिथे जिथे त्याला यंत्राच्या अस्तित्वाची चाहूल जाणवली आणि त्यातल्या वेगळेपणाने त्याला आकर्षून घेतले त्या त्या गोष्टींचा समावेश त्याने ह्या पुस्तकात केला आहे. औद्योगिक क्रांतीचा हा इतिहास अशा तऱ्हेने अवतरणाच्या रूपात आहे.
असा मागोवा घेण्याची इच्छा जेनिंग्जला का झाली? कोण होता हम्फ्री जेनिंग्ज? समाजवादी परंपरा असलेल्या घरात जन्माला आलेला, तल्लख बुद्धीचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हा माणूस संगीत, चित्रकला, नाट्य आणि वाङ्मय ह्या सर्वच ललित कलांमध्ये विलक्षण गती असलेला होता पण सातत्याने आणि स्थिरबुद्धीने एखादी गोष्ट करणे त्याच्या वृत्तीतच नव्हते. त्याच्या ह्या वृत्तीचे विश्लेषण करताना त्याचा मित्र जेकब ब्रॉनोवस्की म्हणतो, ‘विलक्षण बुद्धिचापल्यामुळे आणि सूक्ष्म आकलनशक्तीमुळे स्वतःच्या सर्व कल्पना कागदावर उतरवणे त्याला जमत नसावे.’
‘जी.पी.ओ. फिल्म युनिट’ मध्ये १९३४ साली जेनिंग्जने कामाला सुरुवात केली आणि १९३४ ते १९३९ ह्या काळात १२ डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या. त्या तयार करत असताना यंत्राबद्दलचे त्याचे कुतूहल जागे झाले. युद्धाचा धोका समोर उभा असताना राष्ट्रांच्या सामूहिक जाणिवेचे निरीक्षण मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून करण्याच्या प्रकल्पातही त्याने हातभार लावला. समाजाच्या सामूहिक जाणिवेचा शोध भूतकाळातच घ्यायला हवा, ह्या विचाराने जी माहिती जेनिंग्जने गोळा केली त्यातूनच पुढे पॅडिमोनियमचा जन्म झाला.
‘पॅडिमोनियम’चे दोन अर्थ आहेत. एक अर्थ आहे प्रचंड गोंधळ आणि दुसरा अर्थ आहे सैतानांचे निवासस्थान. मिल्टनच्या ‘पॅरडाइज लॉस्ट’ ह्या काव्यात जमिनीतील मौल्यवान धातुरस शोषून सैतानांचे निवासस्थान ज्या पद्धतीने उभारले त्याचे औद्योगिक क्रांतीच्या प्रक्रियेशी नाते आहे, असे जेनिंग्जला सुचवायचे आहे. पॅडिमोनियमची ही प्रतिमा अनेक अर्थांनी ह्या पुस्तकाचे प्रतीक आहे. हे पुस्तक वेगवेगळ्या लोकांच्या लेखनांतील अवतरणांच्या रूपात आहे. ही अवतरणे कालानुक्रमाने मांडलेली आहेत, पण त्यात चर्चिलेले विषय अथवा विचार ह्यांच्यात कुठलाच अनुक्रम अथवा सातत्य नाही. त्यामुळे वरकरणी ही माहिती अतिशय रंजक, पण कुठलेच सूत्र नसलेला गोंधळ, अशी असल्यासारखी वाटते. त्या अनुषंगाने पॅडिमोनियम हे नाव पुस्तकाला शोभूनच दिसते. उदा. पहिलाच उतारा ‘पॅरडाइज लॉस्ट’मधली पॅडिमोनियमच्या बांधकामाची प्रतिमा चितारणारा आहे. मिल्टनच्या चित्रदर्शी शैलीतील तालबद्ध काव्यात रचलेली ही प्रतिमा आपल्या कल्पनाशक्तीला भारून टाकते. ह्या काव्याच्या तालावर जणू पॅडिमोनियम निर्माण होते; पण त्याच्या पुढचाच उतारा रॉयल सोसायटीच्या स्थापनेचे रूक्ष गद्यातले निवेदनपत्र हा आहे.
२८ नोव्हेंबर १६६० रोजी एका व्याख्यानासाठी एकत्र जमलेल्या काही व्यक्तींनी असे ठरवले की, भौतिकीतील आणि गणितातील प्रायोगिक अभ्यासासाठी एका महाविद्यालयाची स्थापना करावी. इतर देशांत जशी ज्ञानाच्या विविध शाखांच्या उन्नतीसाठी ज्ञानपिठे असतात त्या धर्तीवर येथेही प्रायोगिक तत्त्वज्ञानाच्या उन्नतीसाठी एका ज्ञानपिठाची स्थापना करावी. ज्या रॉयल सोसायटीच्या आधाराने निसर्गविज्ञानाने आणि तंत्रविज्ञानाने पुढे महान प्रगती केली आणि ज्या ज्ञानाची परिणती पुढे औद्योगिक क्रांतीमध्ये झाली त्या रॉयल सोसायटीची सुरुवात इतक्या साधेपणाने कुठल्याही डामडौलाशिवाय झाली.
हे दोन्ही उतारे एकापाठोपाठ एक मांडून जेनिंग्ज जणू वाचकाच्या कल्पनाशक्तीला धक्का देऊन जागे करतो. पहिला उतारा मिल्टनच्या प्रतिभेचा काव्यमय अविष्कार आहे. दुसरा उतारा घडलेल्या घटनेची त्रोटक शैलीत केलेली संक्षिप्त नोंद आहे; पण ती घटनाही माणसाच्या प्रतिभेचाच आविष्कार आहे आणि ह्या दोन्ही घटना १६६० च्या सुमारास घडल्या. ही अवतरणे पुस्तकात चार भागांमध्ये विभागली आहेत. पहिला भाग औद्योगिक क्रांतीच्या पहिल्या टप्प्याबद्दल आहे. ह्यात आपल्याला शुद्ध विज्ञान, प्रयोग आणि निरीक्षणे, निखळ तात्त्विक जडवादी विचार यांचे दर्शन होते. ह्या सगळ्यांची अजून उपयोजित विज्ञानात परिणती झालेली नाही. पण ज्ञानाला पौराणिक, धार्मिक, दैववादी स्पष्टीकरणाच्या घोटाळ्यातून बाहेर काढून लौकिक पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणारे धाडसी वैज्ञानिक या टप्प्यात भेटतात. उदाहरणार्थ – रॉबर्ट हूकसारखा वैज्ञानिक आकाशाच्या वेगवेगळ्या ‘चेहऱ्याकरता’ नावे निश्चित करतो. निरभ्र आकाशापासून बर्फ पडत असतानापर्यंतच्या आकाशाच्या विविध अवस्थांचे बारकाईने वर्गीकरण करून तो त्यांना काय म्हणायचे हे निश्चित करतो. त्याची भाषा अजूनही काव्यात्मक आहे. विज्ञानाची निर्विकार वस्तुनिष्ठता भाषेमध्ये यायला अजून अवकाश आहे पण ‘वातावरणविज्ञान’ ह्या नवीन ज्ञानशाखेचा जन्म ज्यात झाला असावा ते हे अवतरण वाचून वाचक थरारून जातो. ह्या भागातली बरीचशी अवतरणे रॉयल सोसायटीच्या इतिहासातून घेतलेली आहेत. तत्कालीन विचारवंतांच्या जगाकडे कुतूहलाने बघण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी साध्या साध्या गोष्टींची निरीक्षणे केली. आकाश, झाडाच्या खोडाची रचना, सूक्ष्मदर्शकातून दिसणारे पाण्यातील किडे, ध्वनी, प्रकाश ह्या सर्वांबद्दल चिंतन करून ह्या विचारवंतांनी त्याच्या नोंदी ठेवल्या. सर आयझेक न्यूटनसारख्या प्रतिभावान वैज्ञानिकाने केलेली ध्वनी आणि प्रकाशाच्या लहरींची तुलना ह्यात आहे. पेपिज, हुक आणि एव्हलीन यांच्या दैनंदिनीमध्ये केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी आहेत. एडमंड हॅलीने (धूमकेतू फेम) केलेली एक विशिष्ट संधिप्रकाशाची नोंद आहे. अनेक उताऱ्यांमधून निरीक्षणाची हौस दिसून येते. लोकांच्या माहितीसाठी अशा निरीक्षणांना प्रसिद्धी देण्यात येत असे आणि लोकांनी निरीक्षण करावे म्हणून त्यांना प्रोत्साहनही देण्यात येत असे. सामान्य माणसाच्या वृत्तीत लक्षणीय बदल घडवून राष्ट्राचे बौद्धिक जीवन अशा तऱ्हेने समृद्ध करण्याचे काम ह्या काळात घडले.
दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने १८ व्या शतकातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले आहे. वैज्ञानिक तत्त्वांचे यंत्रात रूपांतर झालेले इथे पाहायला मिळते. जेम्स वॉटचे वाफेचे इंजिन, बलूनमधून केलेला पहिला हवाई प्रवास ह्या ठळक घटनांबरोबरच अनेक लोकांनी केलेली प्रवासवर्णने, गावांची वर्णन ह्यावरून रस्ते, पूल ह्यांच्यात झालेली लक्षणीय वाढ जाणवते. ‘एंजिनियर’, ‘मेकॅनिक’ हे व्यवसाय म्हणून प्रस्थापित होत असल्याचे लक्षात येते; पण सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मानवी संस्कृतीच्या उगमापासून असलेला शेती हा व्यवसाय आधुनिक स्पर्धेत मागे पडत असल्याची खंत अनेक अवतरणांमधून पहिल्यांदा जाणवते. ही खंत केवळ शेतीला दुय्यम स्थान प्राप्त झाल्याची नाही, तर शेती ह्या व्यवसायात अभिप्रेत असलेली जीवनप्रणाली नष्ट होत असल्याची ती खंत आहे. ऑलिव्हर गोल्डस्मिथ आपल्या ‘डिझर्टेड व्हिलेज’ ह्या कवितेत १७७० मध्ये लिहितो –
‘Princes or lords may flourish, or may fade;
A breath can make them, as a breath has made;
But a bold peasantry, the contry’s pride,
When once destroyed, can never be supply’d ‘.
शेतीवर उपजीविका करणारी कुटुंबे खेडी सोडून कारखाने असलेल्या शहरांकडे जायला लागली. ओळखीचे जग सोडून आलेली ही विस्थापित माणसे एक प्रकारच्या बधीरपणे आयुष्य जगत असताना जॉन वेस्ली सारख्या कर्मठ मेथॉडिस्ट धर्मगुरूंनी त्यांच्या गोंधळेल्या मनोवृत्तीचा फायदा घेऊन ह्या ‘रानटी’, ‘अशिक्षित’ (heathens) माणसांना आपल्या पंथाची दीक्षा दिली. वेस्ली आपल्या एका पत्रात कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या मजुरांना त्याच्या सहकारी मिशनऱ्यांनी कसे ‘वळण’ लावले हे सांगून लिहितो, “आता दृश्य पालटले आहे. बरेचसे मजूर शांत, सौम्य, सहज समजूत पटेल असे झाले आहेत. आता आरडाओरडा, भांडणे बंद आहेत. एवढेच काय पण संध्याकाळी देवाच्या स्तुतिपर गाणी म्हणण्यासाठी ते एकत्र जमतात, ते सोडून त्यांचा आवाजही रस्त्यावर ऐकू येत नाही.”
अतिशय सावधपणे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाला चिकटून राहणाऱ्या जेनिंग्जला वेस्लीवर टीका करायचा मोह आवरत नाही. ह्या अवतरणानंतरच्या टिपेत तो म्हणतो, “‘रानटी’ ह्या शब्दात इंग्लंडबद्दलचे सगळे सत्य एकवटले आहे. इंग्लंडला ह्या सगळ्यांनी वसाहतीसारखे वापरले, तिथल्या रहिवाश्यांना शोषण करण्यास योग्य अशा रानटी लोकांसारखे वागवले, तिथली संपत्ती जेत्यांची मालमत्ता बनली, तिथले धर्मगुरू नाडलेल्या गरिबांना धर्माची अफू देऊन वश करणारे मिशनरी बनले.” (ही टीप वाचताना भारतीय असलेल्या माझा चांगलाच गोंधळ झाला. हे जर ‘इंग्लंडला’ केले तर मग ‘इंग्लंड’ने आम्हाला काय केले?)
ह्या दुसऱ्या टप्प्यात वैज्ञानिक तत्त्वांचे तंत्रज्ञानात झालेले रूपांतर अजून शोषणाच्या पातळीला पोचलेले नाही. नवीन शोधांबद्दल जिज्ञासा, तंत्रज्ञांच्या यशस्वी प्रयोगांबद्दल कौतुकादराची भावना असे आत्मविश्वासाने भरलेले रोमांचकारी वातावरण इथे आढळते. पण तिसऱ्या टप्प्यात मात्र ज्ञानाचा शोषणासाठी करण्यात येत असलेला वापर समाजातील संवेदनाशील व्यक्तींना जाणवायला लागल्याचे दिसते. ह्या भागातील १७४ अवतरणापैकी एक तृतीयांशापेक्षा जास्त अवतरणे कवी, कादंबरीकार, विचारवंत ह्यांसारख्या प्रतिभावंतांची आहेत. दैनंदिन आयुष्यात वेगाने घडणारे बदल आणि त्यामुळे बदललेली समाजाची मानसिकता ह्याची दखल कोलरिज, ब्लेक, वर्डस्वर्थ, कार्लाइल, डिकन्स, डार्विन वगैरे प्रसिद्ध व्यक्तींनी आपापल्या लिखाणातून घेतलीच. शिवाय कितीतरी अनोळखी साध्यासुध्या लोकांनीसुद्धा ह्या बदलांच्या नोंदी आपल्या पत्रांत, लेखांत वृत्तांतांत केल्या. तत्कालीन वास्तवाला उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे आणि जाणण्याचे सामर्थ्य सगळ्यांमध्ये सारख्याच प्रमाणात होते असे नाही, पण ब्लेकसारखे द्रष्टे कवी जेव्हा आजूबाजूच्या वास्तवावर आपली प्रभावी दृष्टी रोखत तेव्हा नजरेस पडणारी विषमता आणि भ्रष्टता त्यांच्या लेखणीतून जळजळीतपणे बाहेर पडत असे. ‘लंडन’ ह्या कवितेत भाडोत्री टेम्सजवळून जाणाऱ्या ‘भाडोत्री’ रस्त्यावरून हिंडणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर ब्लेकला विवशतेचे, दुःखाचे ठसे दिसतात. ह्या प्रत्येक माणसाच्या आवाजात त्यानेच निर्माण केलेल्या शृंखलांचा प्रतिध्वनी ब्लेकला ऐकू येतो. धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्यांच्यातली अभद्र भागीदारी त्याला जाणवते आणि त्याचा उद्रेक एका वेगळ्याच अवतरणात त्यानेच केलेल्या उपहासगर्भ टीकेत आपल्याला वाचायला मिळतो – “देव ही फक्त राजाची अन्योक्ति आहे, इतर काही नाही.” तिसऱ्या टप्प्यातल्या ह्या अवतरणांमधून आणखी एक प्रतिमा ठळक होत जाते, ती म्हणजे जमावाची. १९ व्या शतकातल्या पहिल्या ५० वर्षांत घडलेल्या संघर्षात जमाव हे प्रमुख पात्र आहे. इंग्लंडच्या लोकसभेचा इतिहास पाहिला तर जमावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशाच जमावाने १२१५ मध्ये राजाला मॅग्ना कोर्टासमोर सादर करून वठणीवर आणले आणि इंग्लंडला प्रशासकीय आणि कायदेविषयक चौकट मिळवून दिली. पण १९ व्या शतकातल्या जमावाचे शिस्तबद्ध रूप आणि त्याने केलेली शिस्तबद्ध निदर्शने हे वाढत्या राजकीय जाणिवेचे चिन्ह जसे आहे तसेच मॅग्ना कोर्टापासून सुरू झालेल्या सत्तांतराच्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पाही आहे.
मँचेस्टरला १६ ऑगस्ट १८१९ ह्या दिवशी जमलेल्या कामगारांच्या प्रचंड जमावावर घोडदळाने हल्ला केला. साठ हजारांपेक्षा जास्त संख्येने जमलेले हे स्त्री-पुरुष मतदानाचा हक्क मागण्यासाठी एकत्र आले होते. ह्या शांत आणि निःशस्त्र लोकांच्या प्रचंड संख्येला घाबरून मॅजिस्ट्रेट्सनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला आणि घोडदळाने तो निष्ठेने अंमलात आणला. ह्या प्रसंगावर रचलेल्या ‘मास्क ऑफ ॲनार्की’ ह्या आपल्या कवितेत ह्या रक्तरंजित खुनी अत्याचारांच्या निषेधार्थ एकजुटीने उभे राहण्याचा आदेश देताना शेली म्हणतो, “तुम्ही बेसावध असताना तुमच्यावर पडलेल्या बेड्या दवबिंदूसारख्या झटकून टाका. झोपेतून उठलेल्या सिंहासारखे अशा प्रचंड संख्येने उभे राहा की, तुम्हाला कोणीही पराभूत करू शकणार नाही. तुम्ही अनेक आहात, ते थोडे आहेत.” तिसऱ्या भागातील अनेक अवतरणे औद्योगिक क्रांतीची तुलना नरकाशी करतात – कारखान्यांच्या भोवती वसलेल्या गलिच्छ कामगारवस्त्या, कोळशाच्या खाणीतील रोगट आणि धोक्याचे आयुष्य, माणसाच्या अडचणींचा, भावनांचा विचार न करता त्याला जखडून टाकणारी निर्दय अमानुष यंत्रे ह्या सगळ्याने बेचैन झालेले लेखक आणि कवी आपल्याला जागोजागी भेटतात. पण ह्याच नरकाकडे आदर्श भूमी (classic soil) म्हणून पाहणारा एक नवा अनोळखी आवाजही भेटतो, फ्रेडरिक एंगेल्सचा. उत्पादकतेचे कामगारांवर होणारे परिणाम इथे नीट प्रमाणभूत अशा वातावरणात अभ्यासायला मिळतील असे सांगून तो म्हणतो, “वाफेची ऊर्जा, यंत्रे, श्रमविभागणी ह्या गोष्टींमुळे कामगारांचे जे अधःपतन झाले आहे त्यातून बाहेर पडण्याचे त्याचे प्रयत्नही इथेच नीट अभ्यासायला मिळतील.” तिसऱ्या टप्प्यातल्या अवतरणांना एका सूत्रात ओवणारी प्रतिमा आहे आगगाडीची. वाफेच्या इंजिनाबरोबरच आगगाडी हे औद्योगिक क्रांतीचे महत्त्वाचे प्रतीक आहे. तिच्यासाठी बांधण्यात आलेले रस्ते, पूल आणि बोगदे हे माणसाच्या बुद्धीचे आणि पराक्रमाचे द्योतक मानले गेले. पण जड वस्तूंमध्ये आत्मा आणि माणसासारख्या भावना शोधणाऱ्या कवींना आणि लेखकांना आगगाडीच्या पिसाट वेगात परिस्थितीवरचा माणसाचा सुटत असलेला ताबाच जाणवला. ह्या आगगाडीच्या धुराच्या ढगाने पॅडिमोनियमचा चवथा आणि शेवटचा टप्पा झाकोळला आहे.
जरी ह्या भागातील अवतरणांची सुरुवात १८५१ च्या दैदीप्यमान प्रदर्शनाने होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एवढा भव्य प्रकल्प ह्या आधी कधी झाला नव्हता. धातुविज्ञान, रासायनिक उत्पादने, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, ललित कला, शेती, बागायती ह्यांसारख्या अनेक क्षेत्रांतील वस्तूंचे प्रदर्शन देशोदेशीच्या उद्योजकांनी भरवलेले होते. त्यासाठी खास उभारण्यात आलेल्या पोलादाच्या आणि काचेच्या स्फटिक महालात हे प्रदर्शन भरले होते. औद्योगिक क्रांतीमुळे घडून आलेल्या ऐहिक प्रगतीचे हा स्फटिक महाल म्हणजे जणू झळाळणारे प्रतीक होते. कादंबरीकार शार्लोट ब्रॉन्टे आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात म्हणते, “पूर्वेकडच्या एखाद्या पिशाच्चदेवतेने निर्माण केलेली जादूची जत्रा असेच त्याचे वर्णन करावे लागेल. पृथ्वीच्या सर्व भागांतून हे वैभव एकत्र आणणे जादूशिवाय जमणे शक्यच नव्हते. कुठल्यातरी अद्भुत शक्तीने विविध रंगांच्या वापरातून अलौकिक असा परिणाम साधला होता. तिथे जमलेला प्रचंड जमाव ह्या अदृश्य शक्तीच्या प्रभावाने जणू संमोहित झाला होता. कुठलाही आवाज न करता, दंगा न करता ३० हजार माणसांचा प्रवाह शांतपणे हालचाल करत होता. दुरून समुद्राची गाज यावी तशी त्यांची कुजबूज फक्त जाणवत होती.”
ह्या टप्प्यातल्या अवतरणांमधले संबंध इतके सूक्ष्म आहेत की, जेनिंग्जच्या टिपा नसत्या तर त्यातील अर्थसूचकता लक्षात यायला वेळ लागला असता. जेनिंग्जच्या नजरेतून त्या पाहिल्यावर त्यांचे महत्त्व तर लक्षात येतेच, पण ह्या वेगवेगळ्या आणि कधीकधी परस्परविरोधी असलेल्या गोष्टींमधली एकसूत्रता ओळखण्याची पारखी नजर लाभलेल्या ह्या माणसाचे द्रष्टेपण आपल्याला स्तिमित करते. जमाव आणि त्या बिनचेहऱ्याच्या अनोळखी जमावातून हळूहळू ठळक होत जाणारी व्यक्ती हा संबंध तर चित्रकला, भौतिकी, वाङ्मय अशा विविध शाखांमधली उदाहरणे घेऊन त्याने अधोरेखित केला आहे. उदा. फ्रेंच चित्रकार सरा (Seurat) ठिपक्यांचा वापर करून चित्रे काढत असे. Pointillism ह्या नावाने त्याची शैली प्रसिद्ध आहे. हे असंख्य ठिपके आणि त्यांच्या संयोगातून उद्भवणारे वैशिष्ट्यपूर्ण ओळखीचे आकार ह्यामध्ये आणि जमाव आणि एक व्यक्ती ह्यांच्यामधील संबंधामध्ये जेनिंग्जला साम्य जाणवते. आधुनिक काळातील व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातला नातेसंबंध हा सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. ह्या संबंधाला अनेक पैलू आहेत. ह्या निर्विकार, चेहरा नसलेल्या समाजाच्या आधाराने व्यक्ती स्वतःची उन्नती करते, ह्या समाजातील रूढींमुळे, नियमांमुळे ती खुरटते, त्यांच्या वजनाखाली ती चिरडली जाते, त्याच्यापासून ती तुटते, एकटी पडते. ह्या शेवटच्या टप्प्यात मनाला भिडते ती एकाकी माणसाची प्रतिमा, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र ह्यातून मिळालेल्या नवीन ज्ञानाने माणसाचे विश्वातील स्थान, निसर्गातील इतर गोष्टींबरोबर असलेले त्याचे नाते ह्याबाबतींत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. त्यांनी धर्माच्या आधाराने फोफावलेल्या प्रचलित समजुतींना आव्हान दिले. ह्या प्रश्नांचा धैयन आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्याच्या इच्छेने विचार करणारी डार्विन, टी. एच्. हक्सले वगैरे विचारवंतांची पत्रे आपल्याला अंतर्मुख करतात. माणसाच्या विश्वातील अस्तित्वामागे कोणताही हेतू असू शकत नाही, जगातील दुःखाचे स्पष्टीकरण द्यायला दयाळू परमेश्वराची संकल्पना पुरी पडत नाही, ह्या क्रांतिकारक कल्पनांनी एकशेचाळीस वर्षांपूर्वी ह्या विचारवंतांना किती व्याकुळ केले होते ते वाचून वाचक हेलावून जातात. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्याचा संहार करणारी प्राणिजाती निर्माण करणारा परमेश्वर दयाळू आणि सर्वशक्तिमान असूच शकत नाही हे जसे खरे, तसेच ह्या आश्चर्यकारक विश्वाची निर्मिती करणारी शक्ती पाशवी असू शकत नाही हेही खरे. ह्या द्वंद्वात सापडेला डार्विन लिहितो, “सर्व गोष्टी काही पूर्वनियोजित नियमांचा परिणाम म्हणून घडतात असे मला वाटायला लागले आहे. त्यातले बरेवाईट तपशील हे केवळ योगायोगावर अवलंबून असतात, ह्या कल्पनेने मला कुठलेही समाधान अजिबात लाभत नाही. हा सगळा विषयच माणसाच्या बुद्धीच्या आवाक्यापलिकडचा आहे. न्यूटनच्या बुद्धीबद्दल एखाद्या कुत्र्याने तर्क करण्यासारखे आहे हे.”
नवीन ज्ञानाने देव, धर्म ह्या प्राचीन संकल्पनांना हादरा बसला, परिचित असलेले विश्व उद्ध्वस्त झाले. ज्ञानवृक्षाचे फळ चाखल्याने पुन्हा एकदा स्वर्ग गमवावा लागला. विचार करणाच्या माणसाची हीच शोकांतिका असावी – तो स्वर्ग गमावू शकतो, पण ज्ञान नाकारू शकत नाही. औद्योगिक क्रांतीचा वेगळ्या पद्धतीने मागोवा घेणाऱ्या हम्फ्री जेनिंग्जला हा दोन विचारप्रणालींमधला संघर्ष वाटतो. जडवादी विचारांच्या कसोटीवर सर्व ज्ञान तपासून पाहणारे वैज्ञानिक एका बाजूला आणि जड वस्तूंमध्येही आत्मा आणि मानवी भावना पाहणारे जडप्राणवादी (animistic) कवी एका बाजूला. ह्या संघर्षात जडवादी वैज्ञानिक प्रभावी ठरले आहेत आणि ते योग्यही आहे; पण त्यामुळे आधुनिक मानवाच्या जीवनात प्रचंड उणीव निर्माण झाली आहे, हेही मान्य करायला हवे. आधुनिक काळातील विशिष्टीकरणाच्या प्रभावामुळे जीवनाच्या समग्रतेला सामोरे जाण्याची क्षमता कवी गमावून बसले ह्याचे हम्फ्री जेनिंग्जला दु:ख आहे. व्यास, वाल्मिकी, होमर, हेसियड अशा ऋषितुल्य कवींच्या काळात कवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करीत. वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक बाबींच्या चिंतनातून त्यांचे काव्य जन्माला येत असे. कवी आणि काव्य दोन्ही जीवनाभिमुख होते, पण आधुनिक काळात हा अधिकार कवी गमावून बसले.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत जेनिंग्ज म्हणतो, “मी ह्या पुस्तकात औद्योगिक क्रांतीचा कल्पनेने जाणलेला इतिहास सादर करीत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा यांत्रिक इतिहास नाही, तर कल्पनेने पाहिलेला, अनुभवलेला इतिहास.” कवितेमध्ये प्रतिमांचा जसा वापर करतात तसा ह्या पुस्तकात अवतरणांचा वापर जेनिंग्ज करतो. वर्णन, पृथक्करण, संश्लेषण ह्या ठरावीक मार्गाने न जाता आपल्यासमोर तो फक्त या प्रतिमा ठेवतो ज्या त्याच्या मते औद्योगिक क्रांतीची प्रतिबिंबे आहेत. ह्यातील प्रत्येक अवतरण ही एक प्रतिमा आहे जी अनुभवाच्या जटिलतेचे, त्याच्या समग्रतेचे ओझरते दर्शन फक्त घडवते आणि आजपर्यंत न जाणवलेली नाती आणि संबंध प्रकाशाच्या एका झोतात उजळून टाकते.
हे पुस्तक वाचताना मला हेवा करण्यासारखी गोष्ट ही वाटली की राष्ट्राच्या सामूहिक जाणिवेत सामान्य माणसाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग असावा. समाज फार मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे, ह्याची जाणीव कदाचित आपल्यालाही झाली असती; पण इंग्लंडमधल्या त्या काळात जगत असलेल्या सामान्य माणसांच्या भावनांना आणि विचारांनाही ह्या घटनांनी असा स्पर्श केला की त्याची नोंद ठेवण्याची, दखल घेण्याची इच्छा त्यांना झाली.
जाता जाता आवर्जून एका गोष्टीची नोंद करावीशी वाटते. वेगळ्या पद्धतीने इतिहास लिहावयाचा प्रयत्न मराठीतही अतिशय यशस्वीरीतीने ह. वि. मोटे यांनी केला. महाराष्ट्राचा १८१८ ते १९४७ ह्या कालखंडातील राजकीय, सांस्कृतिक आणि ललित कलांच्या दृष्टिकोनातून घेतलेला पत्ररूपी आढावा असलेले ‘विश्रब्ध शारदे’चे तीन खंड हे मराठी वाङ्मयाचे वैभवशाली लेणे आहे.