“ …रामनवमीचे दिवसी असे तेथे माहात्म्य आहे की, दोन प्रहरी शरयू गंगेत स्नान करून रामजन्म ज्या जाग्यावर जाहालेला आहे तेथे जाऊन जन्मभूमीचे दर्शन त्या समई ज्यास घडेल त्यास पुनः जन्म नाही, असे श्रुतिस्मृति पुराणप्रसिद्ध आहे. म्हणोन सर्व लोक जन्म दिवसी मध्यान्ही स्नाने करून हातात तुलसी, पैसा-सुपारी घेऊन सर्व लोक जन्मभूमीचे दर्शन घेऊन तुलसी तेथे वाहातात. तेथे जागा असी आहे की, मोठे मैदान झाडीचे आहे. बहुत प्राचीन भिताडे दूर दूर आहेत. कौसल्येची खोलीची जागा पन्नास हात लांबी व चालीस हात रुंदीची असोन पक्का चुना सिसे ओतून चौथरा कंबरभर उंचीचा बांधून व दोन हात उंच फक्त कठडा मारिला आहे. सात आठ लक्ष यात्रेची येकवेळी गर्दी होते. परंतु भोवताली जागा मोठी असल्याकारणानी व सरकारांतून सिपाई लोक स्वार व काही हत्ती मधून मधून उभे करितात तरी चार पाच मनुष्ये मरण पावतात असी गर्दी होऊन जात असत्ये. तेथेही आम्ही जाऊन दर्शन घेतले …”