‘डीप ब्लू’ ह्या संगणकावरील कार्यप्रणालीत बुद्धिबळात अनेक वर्षे जगज्जेता असलेल्या कॅस्पोरोव्हला ‘बुद्धिमत्तेची झलक दिसली व ती एक विचित्र, अकार्यक्षम व लवचिकता नसलेली बुद्धिमत्ता आहे असे वाटले. (आजचा सुधारक जून ‘९६). नंदा खरे ह्यांना अपेक्षित असलेल्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेविषयी चर्चा न करता कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव (robot) या संपूर्ण दोन वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या शाखांवरून बुद्धिमान यंत्रमानवाचा विकास होण्याची शक्यता आहे काह्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.
यंत्रमानवाविषयीचे तंत्रज्ञान पूर्णपणे मानवाच्या शारीरिक क्षमतेस पर्यायी व्यवस्था म्हणून विकसित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक बिनडोक, स्वतंत्र निर्णय न घेणारा पण पूर्ण आज्ञाधारक, तंतोतंत, बिनचूक काम करणारा व मानवापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या यंत्रमानवाची रचना करून मानवाचे शारीरिक श्रम व वेळ वाचवण्यास मदत होत आहे.
अभियांत्रिकी व प्रगत विज्ञान ह्यांमधील अतिविकसित तंत्रज्ञानाची फलश्रुती म्हणजे यंत्रमानव. वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी, कामाच्या स्वरूपानुसार प्रत्येक यंत्रमानवाची रचना करावी लागते. त्यामुळे यंत्रमानवाच्या क्षमतेवर मर्यादा पडतात.
तंत्रज्ञानामुळे विकसित झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मेंदूंनासुद्धा काही प्रकारच्या बंधनांनी जखडून ठेवले आहे. त्यांच्यामधील विचार करण्याची प्रक्रिया काही ठराविक क्षेत्रापुरतीच मर्यादित असून ते क्षेत्रसुद्धा पूर्णपणे नियमबद्ध व एखाद्या विशिष्ट चौकटीतच काम करणारे असते. बुद्धिबळ म्हणजे फक्त बुद्धिबळच खेळणारा कृत्रिम मेंदू असेल. एकाच प्रकारची पण बुद्धिकौशल्याची कामे हा मेंदू हाताळेल. पण निर्दिष्ट केलेल्या चौकटीबाहेर जाऊन तो काम करू शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानात कार्यप्रणालीची रचना करताना विशिष्ट क्षेत्र, क्षेत्रासाठी आखून घेतलेली चौकट व क्षेत्रास लागू पडणारे सर्व नियम व नियमांची अचूक व्याख्या ह्यांना फार महत्त्व आहे.
वेगवेगळ्या प्रकारची कामे हाताळणार्यान बुद्धिमान यंत्रमानवासाठी कार्यप्रणालीची रचना करताना प्रत्येक क्षेत्रासाठी असलेल्या सर्व नियमांचा समावेश करावा लागतो. आपल्या नित्य जीवनातील साध्या वाटणार्याे व्यवहारज्ञानाच्या कित्येक गोष्टींबद्दल फार मोठ्या प्रमाणात नियमांचीसंख्या असते. शिवाय जगाचे व्यवहार अशा प्रकारे ठराविक नैसर्गिक नियम व किंवा नीतिनियमाने बंधित करणे फार अवघड असते. कारण गतिमान असलेल्या ह्या जगामध्ये आजचे नियम उद्याच्या जगासाठी लागू होतीलच ह्याची शाश्वती नसते. त्यामुळे कार्यप्रणालीत समावेश केलेल्या चौकटीवर मर्यादा येतात व बुद्धिमत्ता अकार्यक्षम वाटण्याची शक्यता असते. काही वैज्ञानिकाना ही समस्या सुटेल असे वाटते. टेक्सास येथील काही वैज्ञानिकांनी CYC नावाच्या कार्यप्रणालीची रचना केली आहे. तिच्यामध्ये मूलभूत नियमांच्या काही ठोकताळ्यांचा अतंर्भाव केला आहे. (ह्या ठोकताळ्यांची संख्याच जवळ जवळ १० लाखापेक्षा जास्त आहे!) CYC कार्यप्रणालीला जेव्हा एखादी नवीन माहिती मिळेल (अशी माहिती internet सारख्या सुविधांमधून आजकाल सहज उपलब्ध होत आहे.) तेव्हा ती माहिती व स्वत:जवळील ठोकताळ्यांच्या आधारावरून सुसंगत विचारप्रक्रिया CYC कार्यप्रणाली करून दाखवेल असे वैज्ञानिकांना वाटते. अशाप्रकारे ही कार्यप्रणाली नवीन माहितीचे संकलन व पृथक्करण (analysis) करत स्वतःची क्षमता मानवाच्या मेंदूसारखे काम करण्यापर्यंत वाढवू शकेल.
परंतु काही वैज्ञानिकांना याबद्दल शंका वाटते. केवळ माहितीच्या संकलनामुळे व विचारप्रक्रियेमुळे यंत्रमानव बुद्धिमान होऊ शकणार नाही. विचारप्रक्रियेबरोबर वर्तनाची पण त्याला जोड हवी. परिस्थितीस अनुरूप असे वर्तन हवे. पण अशा प्रकारचे बुद्धिमान वर्तन पूर्णपणे ज्ञानेंद्रियांवर व संवेदनांच्या आकलनावर आधारित असते. खाण्यापिण्याच्या क्रियेपासून ते प्रजोत्पादनाच्या क्रियेपर्यंतचे सर्व वर्तन भोवतालची परिस्थिती ज्या प्रकारे आकलन केली असेल तिला अनुसरूनच असते. जीवशास्त्राचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की बुद्धिमत्ता, इंद्रियग्रहण व शारीरिक गरज ह्यांच्यामध्ये अन्योन्यसंबंध असून ही साखळी तोडणे शक्य नाही, व ह्या तीन घटकांवर आधारित शारीरिक वर्तन असते. अशा प्रकारे वर्तनाच्या प्रकटीकरणासाठी शरीरासारख्या माध्यमाची आवश्यकता भासते. कृत्रिम बुद्धिमत्तेला यंत्रमानवाची जोड मिळाल्यास स्वयंप्रेरित (autonomous) बुद्धिमान यंत्रमानवाची रचना करता येईल.
बुद्धिमान यंत्रमानवासाठी उद्देश (purpose) व प्रेरणा (motivation) ह्या जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून घेता येईल. तहान लागल्यावर पाण्यासाठी, भूक लागल्यावर अन्नासाठी धडपडणे अशा अवस्थांचे सदृशीकरण (simulation) केल्याशिवाय बुद्धिमान यंत्रमानव स्वयंप्रेरित वर्तन करू शकणार नाही. तहान, भूक या सारख्या संवेदनांची जाणीव नसल्यामुळे संबंधित संप्रेरक उत्तेजित होणार नाहीत. अशा उत्तेजनाशिवाय शारीरिक वर्तनाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल.
कुठल्याही प्राण्याचे वर्तन बाह्य परिस्थितीच्या उत्तेजनाचे पण फलित असते. इंद्रियाद्वारे ज्ञान व त्यानुसार वर्तन या गोष्टी एकाच वेळी घडत असतात. बुद्धिमान यंत्रमानवामध्येसुद्धा बाह्य परिस्थितीची जाणीव व त्याप्रमाणे वर्तन करण्यास उद्युक्त करणारी यंत्रणा असावी लागते. बाह्य जगाचे पूर्ण ज्ञान व त्यानुसार वर्तन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये हवी.
यंत्रमानव-तंत्रज्ञानामध्ये एका कामासाठी अनेक यंत्रमानवांचा उपयोग करून सामूहिक प्रयत्नाने काम करण्यास वाव नाही. बुद्धिमान यंत्रमानवामध्ये अशा प्रकारची क्षमता निर्माण केली पाहिजे. त्यासाठी माहितीच्या देवाणघेवाणीसाठी संभाषण व संभाषणासाठी भाषाज्ञानाची आवश्यकता आहे. संभाषण साधण्यासाठी काही तरी उद्देश असावा लागतो. संवेदना हे काम करू शकेल. पण प्रणयचेष्ठा, गोंधळलेली मनःस्थिती, लाजणे ह्यासारख्या संवेदनांचे सदृशीकरण करणे सोपे नाही व अशा प्रकारच्या संवदेनांची जाणीव असल्याशिवाय बुद्धिमान यंत्रमानव परिपूर्ण असणार नाही.