-१-
डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुइझम’ या संकल्पनांबाबत काही विवेचन केले आहे. त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणे व त्यावर भाष्य करणे हा या लेखनाचा हेतू आहे. न्यायाधीशांनी या विषयाबाबत केलेली विस्तृत मीमांसा डॉ. रमेश प्रभू वि. श्री. प्रभाकर कुंटे आणि बाळ ठाकरे वि. प्रभाकर कुंटे या दोन प्रकरणांत दिलेल्या निकालपत्रात आली आहे. तिचाच मी मुख्यतः उपयोग करणार आहे.
-२-
प्रथम संक्षेपाने न्यायालयाचे प्रतिपादन काय आहे ते पाहू. सारांशाने ते अशा शब्दांत मांडता येईल: ‘‘हिंदुत्व’ किंवा/ आणि हिंदुइझम’ या संज्ञांना एक व्यापक अर्थ आहे आणि एक संकुचित अर्थ आहे. व्यापक अर्थाने या संज्ञांची योजना केली तर त्यांचा भारतीय (इंडियन) संस्कृती, जीवनसरणी किंवा मनोऽवस्था असा अर्थ होतो. अशा वेळी ती योजना निषेधार्ह किंवा दंड्य ठरत नाही; कारण तिच्यातून धार्मिक मूलतत्त्ववाद किंवा जातीयता प्रकट होत नाही. मात्र या संज्ञांचा उपयोग संकुचित अर्थानेही होऊ शकतो; त्यातून धार्मिक मूलतत्त्ववाद किंवा जातीयता (कम्यूनलिझम) यांची सूचना मिळू शकते. अशा वेळी या संज्ञांचा उपयोग/ निषेधार्ह किंवा दण्ड्य ठरतो. या संज्ञांचा उपयोग कोणत्या अर्थाने केला आहे हे संदर्भावर अवलंबूनराहील. तो संदर्भ तपासून नक्की अर्थ ठरवणे हे न्यायालयांचे काम आहे.
‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुइझम’ या शब्दांना एक व्यापक अर्थ आहे आणि संपूर्ण भारतीय संस्कृतीशी तो समांतर आहे या निर्णयाने हिंदुत्ववादी विचारसरणी बाळगणार्याए लोकांना समाधानच नव्हे, तर हर्ष व्हावा हे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर ज्यांना पुरोगामी’, ‘सेक्युलर’ इत्यादि उपाधी लावल्या जातात त्यांच्यात या निर्णयाबद्दल नाराजी पसरलेली दिसावी हेही समजण्यासारखे आहे. याविषयीचे मतप्रदर्शन मी शेवटी करीन. तत्पूर्वी वर जोन्यायालयाच्या प्रतिपादनाचा मला समजलेला सारांश दिला आहे त्याच्या समर्थनार्थ निकालपत्रात जे मुद्दे मांडण्यात आले आहेत त्यांचा तपशील बघू.
त्याअगोदर दोन गोष्टी लक्षात ठेवणे अवश्य आहे. (१) प्रस्तुत खंडपीठाने स्वतःचे फारसे विवेचन केलेले नसून सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या काही निकालांचा आणि इतर सामग्रीचा आधार घेतलेला आहे. (२) न्यायालयाने विवाद्य संज्ञांच्या अर्थाची चर्चा करताना जे संदर्भ,आपण होऊन किंवा पूर्वीच्या निकालपत्रांमधून, दिले आहेत त्यांत स्वा. सावरकरांच्या किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा उल्लेख नाही. न्यायालयासमोर आलेल्या प्रकरणांमधली हिंदुत्वाचा उच्चार करणारी मंडळी भा.ज.पा. आणि शिवसेना या पक्षांची होती. त्यांच्या हिंदुत्वाचा संदर्भ प्रामुख्याने सावरकर आणि संघ यांच्या विचारांशी पोचतो. अशा अवस्थेत मोनिअर-विल्यम्स, टॉयनबी, डॉ. राधाकृष्णन्, वेब्स्टरची डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिका, एन्सायक्लोपीडिआऑफ रिलिजन अँड एथिक्स इत्यादींचे संदर्भ देणे काहीसे आश्चर्यकारक म्हटले पाहिजे. न्यायालयाने या विचारधारांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम त्यांच्या प्रतिपादनावरही झाल्यासारखा दिसतो. उदाहरणार्थ, त्याने जे उतारे सादर केले आहेत त्यांमध्ये ‘हिंदुत्व’ शब्द येत नाही तर ‘हिंदुइझम’ हा शब्द येतो (मोनिअर- विल्यम्स, टॉयनबी, राधाकृष्णन् इ.). ‘हिंदुत्व’ या संज्ञेचा उच्चार एका विशिष्ट तांत्रिक अर्थाने प्रथम सावरकरांनी केला. (A Maratha, Essentials of Hindutva, १९२३). ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुइझम’ (हिंदुधर्म या अर्थी) या शब्दांच्या आशयामध्ये भेद आहे असे सावरकरांनी सांगितलेआणि ही परिभाषा सर्वसामान्यपणे सर्वच हिंदुत्ववादी आजही वापरताना दिसतात. हा भेद न्यायालय स्पष्टपणे करते असे दिसत नाही. उदाहरणार्थ ‘हिंदुइझम’ म्हणताना न्यायालयाच्या मनात ‘हिंदुधर्म’ आहे की (धर्मनिरपेक्ष) हिंदुत्व’ आहे हे नीटपणे ध्यानात येत नाही. (म्हणूनच या लेखाच्या शीर्षकात व प्रारंभी दिलेल्या न्यायालयाच्या प्रतिपादनाच्या सारांशात मी मुळातला ‘हिंदुइझम’ हा इंग्रजी शब्दच भाषांतर न करता ठेवला आहे). काही ठिकाणी न्यायालयाने ‘हिंदुत्व ऑर हिंदुइझम’ अशी शब्दयोजना केली आहे तीही अर्थातच संदिग्ध आहे. शिवाय हेही लक्षात घेतले पाहिजे की हिंदुत्ववादी विचारसणीत ‘हिंदुत्व’ या शब्दाचा आशय कालक्रमात बदलत गेलेला आहे. तूर्त एवढेच म्हणणे पुरे आहे की विवाद्य शब्दांच्या अर्थांच्या संदर्भात आज प्रचलित असलेल्या वैचारिक आणि भाषिक वास्तवाचे भानन्यायालयाने राखलेले दिसत नाही. त्यामुळे त्याच्या विवेचनात समग्रता आलेली नाही किंवा रेखीवपणाही आलेला नाही.
-३-
आता आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ न्यायालयाने जे मुद्दे मांडले आहेत ते एकमेकांपासून वेगळे करून मांडण्याचा प्रयत्न करू.
(अ) ‘हिंदू’ हा शब्द मुळात प्रादेशिक अर्थाचा आहे; सिंधू नदीच्या किंवा सप्तसिंधूच्या (सात नद्यांच्या) परिसरात राहणार्याह लोकसमूहाला तो प्रथम लावण्यात आला; त्याचा उगम वेदवाङ्मयात आहे, पर्शियन लोकांच्या भाषेत आपल्या ‘स’ चा ‘ह’ होतो म्हणून सिंधू’ चे ‘हिंदू’ असे रूपांतर झाले; त्यावरून ग्रीकांनी ‘इंडॉस’ केले; त्याचे पुढे इंडिया’ झाले, इत्यादी.
या मुद्द्याचा अर्थ असा होतो की मुळात ‘हिंदू’ ही संज्ञा धर्मवाचक नव्हती; एका विशिष्टप्रदेशात राहणार्याा सर्वांचा ती निर्देश करी. या देशात म्हणजे हिंदुस्थानात राहणारे सगळेच हिंदू असा तिचा अर्थ होत असे.
(आ) ‘हिंदू’ या शब्दाने केवळ एका प्रदेशांत (हिंदुस्थान ह्या उपखंडात) राहणार्याा सर्वच लोकांचा निर्देश होतो (किंवा होत असे) एवढेच म्हणून न्यायालय थांबत नाही तर ह्या लोकांच्या ‘संस्कृती’चाही निर्देश होतो असे न्यायालयाचे म्हणणे आहे. विधिज्ञ श्री. राम जेठमलानी यांनीअपील करणारांची बाजू मांडताना असे विधान केले होते की, “हिंदुत्व या शब्दाने हिंदुस्थान नावाच्या भौगोलिक प्रदेशावर निर्माण झालेल्या हिंदी इंडियन संस्कृतीचा बोध होतो’. न्यायालयाने ही भूमिका स्वीकारलेली दिसते. न्यायालय म्हणते,
* “हिंदुइझम’ किंवा ‘हिंदुत्व’ ह्या शब्दांचा भारतातल्या (इंडिया)लोकांची जीवनसरणी (वे ऑफ लाइफ) व्यक्त करणाच्या संस्कृतीशी किंवा मानसिक वातावरणाशी (इथॉस) असलेला संबंध दुर्लक्षून ते निव्वळ हिंदुधर्मीय आचारांशी संबंधित आहेत अशी संकुचित समजूत करून घेणे योग्य नाही. (एखाद्या) भाषणाचा संदर्भ पाहता या शब्दांचा विपरीत अर्थ केला गेल्याचे दिसत नसेल तर केवळ अर्थाने (इन द अॅबस्ट्रॅक्ट) हे शब्द भारतीय जनतेच्या जीवनसरणीचा (वे ऑफ लाइफ ऑफ दि इंडियन पीपल) निर्देश करतात. विशेषतः ह्या न्यायालयाच्या घटनापीठांनी दिलेल्या निर्णयांचा विचारकरता या बाबतीत शंका उरत नाही.’
(इ) ही जीवनसरणी नेमकी कोणत्या प्रकारची आहे याचा बोध कदाचित् न्यायालयाने केलेल्या पुढील विवेचनावरून होईल : ‘हिंदुइझम’ इतर धर्मांहून वेगळा आहे; त्याला एक तत्त्व, एक देव, एक प्रेषित नाही; ‘सार्वत्रिक स्वागतशीलता’ हे हिंदुइझमचे वैशिष्ट्य आहे; सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत (एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’ -सत् एकच असून विद्वान लोक त्याला निरनिराळी नावे देतात), असे हिंदुइझम समजतो; हिंदुइझममध्ये अनेक शाखा – उपशाखा असून त्यांची मते केवळ परस्परभिन्नच नसून क्वचित् परस्परविरोधीही आहेत; परमेश्वर आहे की नाही आणि असल्यास एक की अनेक या वादाशीही हिंदुइझमचे कर्तव्य नाही; एकूण या सगळ्यावरून हिंदुइझमची सहिष्णुता प्रत्ययास येते. न्यायालय ज्याला ‘वातावरण’ (इथॉस) किंवा ‘मनोऽवस्था’ (स्टेट ऑफ माइंड) म्हणते ते हेच असावे.
(ई) ‘हिंदू’ची व्याख्या सुचविणारे आणखी जे दोन आधार न्यायालयाने दिले आहेत ते काहीसे लक्ष वेधून घेणारे आहेत. त्यातला एक लोकमान्य टिळकांनी केलेली ‘हिंदू’ धर्माची व ‘हिंदू’ माणसाची सुप्रसिद्ध व्याख्या हा होय. (लेखाच्या शेवटची टीप पाहा.) वाचकांच्या सोयीसाठी ती समग्र व्याख्या येथे उद्धृत करण्याची परवानगी घेतो.
प्रामाण्यबुद्धिः वेदेषु साधनानां अनेकता।
उपास्यानां अनियमः चैतद् धर्मस्य लक्षणम्॥
धर्ममेनं समालम्ब्य विधिभिः संस्कृतस्तु यः।
श्रुतिस्मृतिपुराणोक्तैः क्रमप्राप्तैः अथापि वा।
स्वे स्वे कर्मण्यभिरतः श्रद्धाभक्तिसमन्वितः
शास्त्रोक्ताचारशीलश्च स वै हिन्दुः सनातनः।।
न्यायालयाने यांतील पहिल्या दोन चरणांचा तर्जुमा केलेला आहे. सबंध उतार्या चा अर्थ पुढीलप्रमाणेआहे: “वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी बाळगणे, (मुक्तीची) अनेक साधने आहेत असा विश्वास राखणे, उपास्य दैवतांबाबत कोणताच नियम नसणे – ही (हिंदू धर्माची व्याख्या लक्षण
आहे. हा धर्म मानून व श्रुती, स्मृती व पुराणे यांनी घालून दिलेले अथवा (रूढीने) चालत आलेले क्रमप्राप्त विधी पाळून जो संस्कारित झालेला आहे; जो आपले कर्म श्रद्धायुक्तपणे व भक्तिभावनेने करतो आणि जो शास्त्राने सांगितलेले आचार पाळतो तो सनातनधर्मी हिंदू होय.”
(क) एका ठिकाणी न्यायालयाने आपल्या संविधानातील ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे विशद केला आहे;
“घटनाकारांना हिंदुइझमच्या या व्यापक आणि समावेशक स्वरूपाची पूर्ण कल्पना होती आणि म्हणून धर्मस्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची हमी देताना कलम २५ च्या II क्रमांकाच्या स्पष्टीकरणात असा खुलासा केलेला आहे की जेव्हा जेव्हा ‘हिंदू’चा निर्देश केला जातो तेव्हा तेव्हा त्या निर्देशात शीख, जैन,बौद्ध या धर्माच्या अनुयायांचा समावेश होतो असे समजण्यात येईल.” न्यायालयाचा एकूण रोख स्पष्ट असला तरी वर (३) मध्ये दिलेल्या उतार्यां त ‘हिंदू’ शब्दावर त्याने वेगवेगळ्या ठिकाणी केलेले भाष्य एक नाही- किंबहुना न्यायालयाच्या मुख्य प्रतिपादनाशी ते विसंगत आहे असे लक्षात येईल.
वर विभाग ३ (ई) मध्ये दिलेली टिळकांची हिंदू धर्माची व हिंदू माणसाची व्याख्या पाहा. ती व्याख्या ‘सनातन’ हिंदू धर्माची व सनातन हिंदू-धर्मीयाची आहे हे स्पष्ट आहे. ही सनातन धर्म म्हणजे ज्याला ‘वैदिक’, ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त’ धर्म म्हणतात तो. या दोन्ही नावांचा उल्लेख अप्रत्यक्ष रीतीने त्या व्याख्येतच आलेला आहे. ही व्याख्या नुसतीच वेदप्रामाण्यावर किंवा श्रुतिस्मृति-पुराण-प्रामाण्यावर आधारलेली नसून रूढीने प्राप्त झालेल्या आचारधर्मावरही जोर देणारी आहे. शिवाय ‘स्वे स्वे कर्मणि अभिरतः’ यात भगवद्गीतेचा प्रतिध्वनी आहे आणि भगवद्गीतेच्या अर्थाने ‘स्वकर्म’ म्हणजे ‘विहित कर्म शास्त्राने प्रत्येक वर्गाला लावून दिलेले कर्म, असा आहे. अर्थात् येथे टिळकांच्या मनात वंशपरंपरेने आलेला जातीचा व्यवसाय असाचअर्थ निश्चयाने असेल असे नाही, पण तसा संशय येण्यास जागा आहे. थोडक्यात न्यायालयाला हिंदुत्वाला उदार अर्थ देताना जी ‘संकुचितता’ टाळायची आहे तीच या व्याख्येत ठसठशीतपणे प्रकट झाली आहे! न्यायालयाने उद्धृत केलेल्या ओळींत साधनानां अनेकता’ आणि ‘उपास्यानां अनियम:’ अशा शब्दयोजना आहेत हे खरे आहे आणि ही वैशिष्ट्ये हिंदू शब्दाच्या व्यापक अर्थाशी जोडता येतात हेही खरे आहे. पण टिळकांच्या मनात असलेला हिंदू आणि हिंदुधर्म न्यायालयाला अभिप्रेत असलेल्या हिंदूहून किंवा हिंदुधर्माहून वेगळा, म्हणजेच संकुचित, आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
जरा कमी प्रमाणात पण हीच अवस्था वर ३ (ड) मध्ये दिलेल्या संविधानातल्या व्याख्येची आहे. या व्याख्येप्रमाणे वैदिक, शीख, जैन, बौद्ध इ. हे सर्व हिंदू ठरतात. ही व्याख्या सावरकरांनी पुण्यभू-वर आधारित केलेल्या व्याख्येच्या जवळ येणारी आहे. म्हणजे टिळकांनी केलेल्या व्याख्येहून अधिक समावेशक आहे पण ‘हिंदू’ म्हणजे ‘भारतीय’, ‘हिंदी’ किंवा ‘इंडियन’ या न्यायालयाच्या धारणेशी तुलना करता पुन्हा संकुचितच आहे.
न्यायालयाच्या मनात प्रामुख्याने हिंदू शब्दाचा जो आशय आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या तात्विक स्वरूपाच्या विवेचनात वापरीत असलेल्या त्याच शब्दाच्या आशयाशी जुळणारा आहे, हे या ठिकाणी लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. संघाने सावरकर-प्रणीत हिंदुत्वाची व्याख्या टाकून या देशाचा कन्यापुत्र, मात्र या देशाच्या परंपरेचा अभिमानी’ अशी व्याख्या, स्वीकारली आहे. येथे ‘हिंदू’ म्हणजे ‘हिंदी’, ‘भारतीय’, “हिंदुस्थानी,’ ‘इंडियन’ – इत्यादि. (या विषयाचे अधिक विवेचन मी माझ्या सावरकर ते भाजप : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख, राजहंस, पुणे, १९९२, या पुस्तकात पृ. १४७-१४८ व पृ. १५२-५३ वर केलेले आहे.)
हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी जनगणनेत (सेन्सस) जे वर्गीकरण केले जाते त्याचा संदर्भ देणे योग्य होईल. शासकीय शिरगणतीत ज्याला ‘हिंदू’ म्हटले जाते तो टिळकांचा (सनातन धर्मी) हिंदू. (हे संविधानाने केलेल्या व्याख्येच्या विपरीत आहे हे लक्षात घ्यावे!) हा एकूण लोकसंख्येत सुमारे ८२ टक्के आहे. या सनातनधर्मी हिंदूत शीख, बौद्ध, जैन इत्यादींची बेरीज केली तर सावरकरांचा हिंदू सिद्ध होतो. याचे प्रमाण सु. ८५ टक्के आहे. सर्व भारताची लोकसंख्या (उणे या देशाच्या परंपरेवर प्रेम न करणारे) म्हणजे संघाचे हिंदू.
न्यायालयाने आपल्या व्यापक हिंदुत्वाची कल्पना स्पष्ट करताना या तीनही हिंदूचा निर्देश केलेला आहे! त्यामुळे साहजिकच मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र हे खरेच आहे की वर म्हटल्याप्रमाणे न्यायालयाचा एकूण रोख वर ज्या ३ प्रकारच्या हिंदूचा उल्लेख केला आहे त्यातल्या तिसर्याा प्रकारच्या हिंदूवर आहे. विवेचनात हे शैथिल्य आले नसते तर बरे झाले असते एवढेच येथे सुचवायचे आहे.
आणखी एक अंतर्गत विसंगती मला न्यायालयाच्या विवेचनात जाणवते. हिंदूची म्हणून जी सहिष्णु, समावेशक, उदार जीवन-सरणी न्यायालयाने अधोरेखित केलेली आहे ती सर्व भारतीयांची आहे असे खरोखर म्हणता येईल का? इस्लाममध्ये ‘मोमीन’ आणि ‘काफीर’ अशी जगाची विभागणी केलेली आहे आणि काफिरांना (इह-परलोकी!) नरकवास अपेक्षित आहे. खिस्ती धर्माप्रमाणे अ-खिश्चनांना, ‘हीदन’ लोकांना, ‘मुक्ती’ (साल्व्हेशन) अप्राप्य आहे. म्हणजे मुळातच हे धर्म असहिष्णु आहेत. म्हणूनच हे धर्म प्रसारशील आहेत, हिंदुधर्म तसा नाही. मग हिंदूची जी वैशिष्ट्ये ती सर्वच भारतीयांची वैशिष्ट्ये कशी ठरतील? सर्व भारतीयांनी सहिष्णु, उदार इत्यादि असावे, भारतीय संस्कृतीचा विकास त्या तर्हे ने व्हावा ही फार तर, आजच्या स्थितीत, एक इच्छा असू शकते. ते वास्तव नाही.
संघ ज्यावेळी सहिष्णुतेचा उल्लेख करतो त्यावेळी त्याच्या मनात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म नसतो. सर्वत्र हिंदी लोक सहिष्णु आहेत असे वास्तव म्हणून संघाने स्वीकारलेले नाही. सर्व भारतीयांनी या देशाची परंपरा मानावी असे जेव्हा संघ म्हणतो तेव्हा ती प्रामुख्याने मर्यादित अर्थाची हिंदु-परंपरा असते. त्या परंपरेत सहिष्णुता येतेच आणि मुसलमान आणि खिस्ती यांनी तिचा स्वीकार करावा, असा विध्यर्थी प्रयोग संघनेते करीत असतात. हा या दोन दृष्टिकोणांत फरक आहे. मात्र या दोन भूमिका बर्या च जवळ येतात हे सत्य उरतेच.
(६)
आता माझे मत
(अ) हिंदूंमध्ये इतिहासात असहिष्णुतेचे उद्रेक झालेले दिसत असले तरी इस्लाम आणि खिश्चियानिटी यांच्या तुलनेत हिंदू धर्म जास्त सहिष्णु होता हे मान्य करण्यास मला प्रत्यवाय वाटत नाही. निदान सहिष्णुतेची एक प्रबळ धारा जशी हिंदू वाङ्मयात प्रारंभापासून आजपर्यंत टिकून राहिलेली आहे तशी ती इतर धर्मांत दिसून येत नाही असे त्या धर्मांविषयीचे माझे जे काही ज्ञान आहे ते मला सांगते. अवती-भवतीच्या देशांमधून लोकशाही कोसळलेली असताना भारतात ती, कशीबशी का होईना, टिकून आहे; अठेचाळीस वर्षांत लष्करशाही किंवा हुकूमशाही येईल अशी भीती आपल्याला कधी वाटलेली नाही – या घटनेमागे हिंदूंच्या पारंपरिकसहिष्णुतेचा मोठा वाटा आहे असे मला वाटते आणि तिचा यथायोग्य अभिमान वाटतो. न्यायालयाने या वैशिष्ट्यावर जोर दिला हे चांगले झाले.
(आ) जगातल्या कुठल्याही समाजात न आढळणारे एक चमत्कारिक वैशिष्ट्य हिंदू विचारवंतांमध्ये दिसते. ते म्हणजे त्यांना हिंदू शब्दच अप्रिय आहे. शिरगणतीच्या वेळी आणि
अशाच इतर औपचारिक प्रसंगी ते आपण हिंदू आहोत असे लिहितील किंवा सांगतील; पण एरवीया शब्दाने त्यांना शरमिंधे वाटते. हिंदू शब्द जुन्या संस्कृत वाङ्मयात नाही, तो बाहेरच्यांनी दिलेला आहे, त्याचा अर्थ निंदाव्यंजक आहे, इत्यादि कारणांमुळे आर्य समाजानेही तो टाकून ‘आर्य’ शब्द घेतला. अस्पृश्यता, जातिभेद, ‘खुळ्या’ समजुती इत्यादींशी अलीकडच्या काळात हिंदुत्वाचे समीकरण मांडले गेले आणि असे होण्याला ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा बराच हातभार लागलेला आहे. आपल्या कम्युनिस्टांनी सर्व टीकेची सुरवात धर्मटीकेतून होते हे मार्क्सचे वचन फक्त हिंदुधर्माला लावले. वस्तुतः जी पापे हिंदू धर्माने किंवा समाजाने केली आहेत त्यांहून निदान कमी पापे इतर धर्मांनी केलेली नाहीत; त्यांचे प्रकार वेगवेगळे असतील एवढेच. तरीही हिंदू हा शब्द काहीसा कलंकित ठरलेला आहे. माझ्या देशपांडे’ नावाच्या मला अज्ञात असलेल्या पूर्वजांनी कित्येक घोर पातके केली असणे शक्य आहे. (सरंजामी काळातल्या ‘शोषकां’त तर त्यांची निश्चितच गणना होईल); तरीही ते नाव वागवण्यात मला संकोच वाटत नाही- जसा इतर कुठल्याही आडनावाच्या माणसाला त्याचे आडनाव वागवण्याचा वाटत नाही. जगभर दिसणारी ही अत्यंत स्वाभाविक प्रवृत्ती हिंदू विचारवंतांमध्ये मात्र अभावाने आढळते. हिंदूशब्दाला एक झळाळी देण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. अलिकडच्या काळातही ही प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने हातभार लावला हीही गोष्ट चांगली झाली.
(इ) न्यायालयाच्या निर्णयाने आणखी एक इष्ट घटना घडून येईल असे मला वाटते. मी वर संघाच्या हिंदुत्वाच्या व्यापक व्याख्येचा उल्लेख केला. मात्र संघर्षांरवारात सोयीप्रमाणे कधी व्यापक तर कधी संकुचित अर्थाच्या हिंदुत्वाचा उद्घोष केला जातो. संकुचित हिंदुत्वाची धार्मिक स्वरूपाची प्रतीके वापरण्याकडे परिवाराचा अलीकडे अधिक कल झालेला आहे. धर्मनिरपेक्ष राज्याच्या दृष्टीने ही घटना मला अदूरदर्शी आणि दुर्दैवी वाटते. व्यापक हिंदुत्वात जी सर्व भारतीय धार्मिक समूहांच्या एकात्मतेची बीजे आहेत त्यांना तात्कालिक राजकीय फायद्यांसाठी पायदळी तुडविले जात आहे.
खरे म्हणजे या वास्तवावर नजर रोखून न्यायालयाला अधिक स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेता आली असती. हिंदुत्ववादी संघटनांची पुस्तकातली तत्त्वे आणि त्यांचा प्रत्यक्षातील व्यवहार यांमधील विसंवाद ध्यानात आणून देता आला असता. पण अगोदर म्हटल्याप्रमाणे हिंदुत्वविचाराच्या आजच्या घटकेला प्रस्तुत असलेल्या प्रवाहांचा विचारच करण्याचे न्यायालयाने टाळल्यामुळे ही संधी गमावल्यासारखी झाली आहे.
तरीही इष्टघटना ही की संकुचित अर्थाच्या हिंदुत्वावर न्यायालयाने ताशेरे झोडले आहेत. याचा परिणाम म्हणून हिंदुत्वाचे प्रवक्ते भाषिक संयम बाळगतील आणि आपल्या व्यापक भूमिकेवर अधिकाधिक स्थिर होतील अशी शक्यता आहे.
(ई) हिंदुत्वाबाबतची न्यायालयाची एक भूमिका मात्र संभ्रमात टाकणारी आहे. हिंदुत्वाचा. व्यापक अर्थ ‘भारतीय’ (इंडियन) असा त्याने केला, मात्र ‘हिंदुराष्ट्र’ किंवा ‘हिंदुराज्य’ ही कल्पना त्याज्य मानली.
श्री. मनोहर जोशी यांनी निवडणुकीच्या एका भाषणात “आम्ही महाराष्ट्रात पहिले हिंदू राज्य (हिंदू स्टेट) आणू,’ असे म्हटले. न्यायालयाने त्यांना दोषी धरले नाही, पण ह्याचे कारण हिंदू राज्याची कल्पना त्याला स्वीकार्य वाटली म्हणून नव्हे. न्यायालयाच्या मते या विधानाने लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन होत नाही, कारण हे केवळ एक इच्छा-प्रदर्शन आहे’ असा त्याचा युक्तिवाद होता. पण त्या विधानाला ‘घृणास्पद’ (डेस्पिकेबल) असे विशेषणन्यायालयाने जोडले असून पुढे म्हटले आहे, “एखाद्या राजकीय नेत्याने अशी भूमिका घ्यावी किंवा असा विचार मनात बाळगावा याचा आम्हाला तिरस्कार वाटतो (वुई एक्सप्रेस अवर डिसडेन).” व्यापक अर्थाने हिंदुत्व हे भारतीयत्व ठरत असेल तर हिंदुराष्ट्र म्हणजे भारतराष्ट्र आणि हिंदुराज्य म्हणजे भारतीय राज्य ठरण्यास कसलाच प्रत्यवाय नाही. पण हा सरळ तर्क न्यायालयाला मान्य दिसत नाही.
(७)
या सर्व वादांत एक प्रश्न मध्यवर्ती आहे. एकच शब्द परस्पर-विरुद्ध किंवा परस्परविसंगत असे अनेक अर्थ व्यक्त करीत असेल तर विचारांत, परस्पर-संवादात आणि त्यामुळे व्यवहारातही घोटाळे निर्माण होतात. हिंदू, हिंदुत्व या शब्दांचा दुहेरी (आणि क्वचित् दुटप्पीही!) उपयोग हिंदुत्वाचे प्रवक्ते करीत असतात ह्याचा वर उल्लेख झालेला आहेच. अशा अवस्थेत व्यापक अर्थाने एक, तर मर्यादित अर्थाने दुसरा, असे शब्द वापरण्यास काय हरकत आहे? व्यापक अर्थाने ‘भारतीय’ आणि संकुचित अर्थाने (म्हणजे सावरकरी अर्थाने) ‘हिंदू’ हे शब्द वापरण्याची शिस्त सर्वांनी लावून घेतली तर आजच्या राजकारणातला बराचसा भाषिक आणि व्यावहारिक गोंधळ कमी होणार नाही काय?
खरे म्हणजे ही भूमिका घेणारी एक प्रबळ धारा भारतीय राजकारणात विद्यमान आहे. ही धारा म्हणजे धर्मनिरपेक्षतेशी जोडली गेलेली ‘हिंदी’ राष्ट्रवादाची धारा. काँग्रेसच्या स्थापनेपासून व्यापक अर्थाने ‘हिंदी’ किंवा ‘इंडियन’ या शब्दांनी ती सूचित होत असे. स्वातंत्र्यानंतर या धारेने ‘भारतीय’ शब्द स्वीकारला. आपल्या संविधानाने या देशाला ‘भारत’ हे (पर्यायी का होईना!) नावही ठेवले. मात्र संविधानाचा अर्थ लावण्याचे ज्याचे काम आहे त्या सर्वोच्च न्यायालयाची घटनापीठे आणि खंडपीठे हिंदू म्हणजेच भारतीय असे म्हणत आहेत ही एक गंमत आहे.
व्यापक अर्थाने हिंदू शब्द वापरण्यास माझा व्यक्तिशः विरोध नाही. पण येथे काही गोष्टीध्यानात घेतल्या पाहिजेत. (अ) हिंदू धर्म इतर, विशेषतः सेमिटिक, धर्मीसारखा एककेंद्रित नाही; किंबहुना हिंदू नावाचा एकत्र धर्मही अस्तित्वात नाही; हिंदूंचे जे अनेक धर्म आहेत त्यांची गोळाबेरीज करून आणि तिला ‘हिंदू’ हे नाव देवून तिचा चुकीने ‘धर्म’ करण्यात आला वगैरे सर्व खरे असले किंवा मानले तरी ‘हिंदू’ या शब्दाला अलिकडच्या काळात तरी धर्मसूचक अर्थ चिकटलेला आहे हे नाकारता येत नाही. (आ) केवळ व्यापक अर्थानेच ‘हिंदू’ शब्द वापरण्याची काळजी संघपरिवाराने घेतली नाही त्यामुळे व्यापक अर्थ ठसठशीतपणे संघ
अनुयायांच्या आणि इतरांच्याही मनात ठसलेला नाही. (इ) हिंदूमधील विचारवंतांचा वर उल्लेख केला. पण विचारवंतांपेक्षा महत्त्वाचे समाज घटक म्हणजे हिंदूमधील मागास वर्ग. त्यांनाही ‘हिंदू शब्द फारसा प्रिय नाही, ते तो ‘ब्राह्मण्या’शी जोडतात आणि असा त्यांनी तो जोडावा याला भरपूर कारणे हिंदुत्ववाद्यांनी पुरवलेली आहेत. (ई) ‘भारत’ या शब्दाला सावरकरांचा व संघपरिवाराचा अगदी प्राणपणाने विरोध आहे असेही नाही, याची अनेक प्रत्यंतरे आहेत. (या विषयाचा विस्तार माझ्या वर उल्लेखिलेल्या पुस्तकात पृ. २१७ ते २२० वर केला आहे.) (3) न्यायालयाने दाखविल्याप्रमाणे ‘हिंदू’ शब्दाचा एके काळी प्रादेशिक अर्थाने उपयोग होत होता हे खरे असले तरी इतिहासाच्या ओघात तो अर्थ टिकून राहिलेला नाही.
म्हणून संघपरिवाराने व्यापक अर्थाने ‘भारतीय’ शब्द वापरणे चालू करावे असे मला वाटते. अर्थात् तो वापरणे म्हणजे प्रादेशिक स्वरूपाचा ‘हिंदी’ राष्ट्रवाद मान्य करणे नव्हे. त्या राष्ट्रवादात केवळ शरीराचा सांगाडा आहे, आत्मा नाही, कारण येथल्या सांस्कृतिक संचिताशी किंवा परंपरेशी तो दृढपणे जोडलेला नाही. त्यात सांस्कृतिक आत्मा घालण्याचा संघाचा उद्देश मला तत्त्वतः मान्य आहे. (पण संघ ज्या पद्धतीने तो घालू बघतो ती पद्धत मला मान्य नाही.) पण हा वेगळा आणि मोठा विषय झाला. इथे मला एवढेच म्हणायचे आहे की संघपरिवाराने ‘हिंदुत्व’ शब्दाचा पुनर्विचार करायला पुरेशी कारणे आहेत आणि न्यायालयालाही या भाषिक गोंधळातून वाट काढून अधिक चांगले मार्गदर्शन करता आले असते.
आणि ही वाट काही नवी नव्हती; मळलेली, रुळलेली होती.
शेवटी एका मुद्द्याला स्पर्श केला पाहिजे. कोणत्या प्रकारचे आचरण धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) राज्यसंस्थेच्या संकल्पनेशी सुसंगत आहे हे पाहणे हा न्यायालयांचा अशा सर्व प्रकारच्या वादांमधला उद्देश आहे. ह्या संदर्भात न्यायालयाने आपल्या लोकप्रतिनिधी कायद्यातली जी एक त्रुटी ध्यानात आणून दिली आहे तिचा विचार करणे अगत्याचे आहे. कुल्तार सिंगवि. मुखतियार सिंग या दाव्यात (१९६४) एका खंडपीठाने असे म्हटले आहे :
हे सर्वज्ञात आहे की या देशात निरनिराळ्या राजकीय आणि आर्थिक ध्येयवादांप्रमाणे चालणारे अनेक पक्ष असे आहेत की ज्यांचे सभासद एकाचजमातीचे किवा धर्माचे अनुयायी आहेत किंवा ज्यांच्या सभासदसंख्येत एकाच जमातीच्या किंवा धर्माच्या अनुयायांची बहुसंख्या आहे. जोपर्यंत कायदा अशा पक्षांवर बंदी घालीत नाही, किंबहुना निवडणुकांसाठी आणि सांसदीय व्यवहारांसाठी त्यांना मान्यता देतो तोपर्यंत धर्म, वंश, जात, जमात, भाषा इत्यादी घटकांचा त्यांनी मतांसाठी केलेल्या आवाहनांवर प्रभाव पडेल हीउणीव (इन्फर्मिटी) कदाचित् टाळता येण्यासारखी नाही.
कायद्यानेच जर धर्म, जात इत्यादि आधारांवर उभ्या असलेल्या पक्षांना मोकळीक दिली असेल तर धर्म, जात यांना उमेदवारांकडून आवाहने होणारच आणि आपण या बाबतीत काही करू शकत नाही अशी हताशताच जणू काही न्यायालयाने प्रकट केली आहे!
मग हिंदू, हिंदुत्व, हिंदुधर्म यांच्या अर्थावर प्रवचने कशासाठी असाही प्रश्न मनात उभाराहतो.
मला असे वाटते की आपल्या राजकारणातली ही एक भयानक विसंगती आहे. अकाली दल, मुस्लिम लीग इत्यादी पक्षांना या देशात कायदेशीर मान्यता आहे. अशा पक्षांच्या उमेदवारांनी धार्मिक आवाहने केली तर सौम्य भूमिका घ्यावी असा न्यायालयाचा सल्ला आहे.
तज्ज्ञांनी व सुजाण नागरिकांनी या प्रश्नाचा विचार करावा असे सुचवून हा लेख आटोपता
घेतो.
टीप : टिळकांची व्याख्या उद्भूत करताना न्यायालयाने ती गीतारहस्यात असल्याचे म्हटले आहे, हे बरोबर नाही. ही व्याख्या गीतारहस्यात नाही. तिचा इतिहास थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. १९०० सालच्या गणेशोत्सवात पुण्याच्या रे मार्केटात टिळकांनी श्री. भिंगारकरबुवा यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुधर्मावर भाषण दिले. त्यावर लेख तयार करून १८ (किंवा २५) सप्टेंबर १९०० च्या केसरीत त्यांनी तो प्रसिद्ध केला. त्यात ही व्याख्या म्हणजे पहिले दोन चरण दिली आहे. ही व्याख्या अपुरी वाटल्यामुळे पुढे जानेवारी १९१५ साली चित्रमयजगत्मध्ये लिहिलेल्या लेखात (‘हिंदुधर्माचे स्वरूपलक्षण’) त्यांनी तीत आणखी चार चरणांची भर घातली. पहिल्या दोन चरणांत हिंदू धर्माची व्याख्या आहे तर पुढच्या। चार चरणांत हिंदू व्यक्तीची व्याख्या आहे. व्यक्तीच्या व्याख्येत आचारधर्मावर अधिक भर आहे. (पाहा न. चिं. केळकर, लो. टिळक यांचे चरित्र, १९२८, खंड ३, भाग ९ ‘व्यक्तिविषयक’, पृ. ३४; न. चिं. केळकर (सं.) लो. टिळकांची धर्मविषयक मते, प्र. न. चिं. केळकर, टिळक स्मारक ग्रंथमाला, पुणे, १९२५, पृ. ३५, ६१, १२२, १४६-१४७, १८३, १८६.)