प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी आजचा सुधारक, मार्च १९९६ च्या अंकात ‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ ह्या लेखातून प्रस्तुत विषयाची चर्चा पुन्हा उपस्थित केलेली आहे. पुन्हा म्हणण्याचे कारण असे की ह्या विषयाची चर्चा ह्यापूर्वीही केली गेलेली आहे. ह्या विषयाशी सततसंपर्क ठेवणाच्या व्यक्तींना डॉ. प्रदीप गोखले ह्यांच्या परामर्श, नोव्हें. १९८८ मधील ‘तत्त्वज्ञान-एक स्वदेशी विलापिका’ ह्या लेखाची सहज आठवण होईल. ह्या लेखात डॉ. गोखल्यांनी व्यक्त केलेली व्यथा वेगळ्याच प्रकारची आहे. आपल्या विद्यापीठांमधून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान शिकविण्यावर भर दिला जातो. ह्या तत्त्वज्ञानाचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतो. त्यातील समस्या, सामाजिक संदर्भ हे भारतीय मनाला संपूर्ण परके असतात. रसेलच्या विशिष्ट विधानाचा निश्चित अर्थ काय ह्याचा काथ्याकूट करण्यात विद्यापीठातील विद्वान आपले बौद्धिक सामर्थ्य वाया घालवीत असतात. आपल्या जीवनाला भिडणाच्या प्रश्नांची चर्चा करणे हे अधिक सुज्ञपणाचे आहे. असा सर्वसाधारण रोख प्रदीप गोखले ह्यांच्या लेखात आढळतो. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याच्या नावाखाली आपण निश्चित काय करीत आहोत हाच प्रश्न डॉ. गोखल्यांनी उपस्थित केलेला आहे. परंतु सद्य:स्थितीबद्दल त्यांना वाटणारी खंत ही दि. यं. ना वाटणार्याॉ चिंतेच्या कारणांपेक्षा वेगळ्या किंबहुना काही बाबतीत विरुद्ध कारणांसाठीच वाटत आहे असे जाणवते.
ह्या दोन लेखांचा आशय लक्षात घेतल्यास तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने पुढील प्रश्नांचा विचार व्हावा असे वाटते.
(१) वैचारिक ‘स्वदेशी’ चा अभिमान बाळगून भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासालाच महत्त्व द्यावे काय?
(२) भारतीय तत्त्वज्ञान हे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाप्रमाणे केवळ सैद्धान्तिक चर्चा नसून ती एक जीवनपद्धती आहे आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान हे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे असा जो युक्तिवाद केला जातो तो कितपत योग्य आहे?
(३) सैद्धान्तिक तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती ह्यांचा निश्चित संबंध काय असतो?
(४) संतवाङ्मयात ‘ईश्वर’ ही मध्यवर्ती श्रद्धा स्वीकारून ‘ईश्वरप्राप्ति’ हे ध्येय – आध्यात्मिक ध्येय-म्हणून स्वीकारलेले असते. संतांना ह्या परमतत्त्वाचा आलेला अनुभव हागूढानुभवच असतो. हा अनुभव काव्यानंदाशी साम्य असलेला असतो. वाङ्मय व तत्त्वज्ञान ह्या दोनही विषयाच्या अभ्यासकांना संतवाङ्मयाबद्दल जिव्हाळा वाटत असतो.
संतवाङ्मयाबद्दल दि. यं. नी उपस्थित केलेला प्रश्न असा – ह्याला तत्त्वज्ञान म्हणता येईल काय? तत्त्वज्ञानात वैश्विक समस्या, सत्ताशास्त्रीय समस्या, नीतिशास्त्रीय समस्या, ज्ञानमीमांसा इ. विषयांची चर्चा – ‘सैद्धांतिक चर्चा – अपेक्षित असते. तशी चर्चा संतसाहित्यात नाही. तसेच तत्त्वज्ञानाच्या नावाखाली फुले, आंबेडकर इ.च्या विचारांची चर्चा करणे हे अयोग्य आहे. (ह्या संदर्भात येथे एक गोष्ट नमूद करणे योग्य ठरेल. प्रगत समजल्याजाणाच्या विद्यापीठांमधूनही आज तत्त्वज्ञानातील तांत्रिक समस्यांपेक्षा अशा विषयांवर चर्चासत्रे ठेवण्याची प्रवृत्ती वाढीला लागलेली आढळते.)
दि. यं. नी व्यक्त केलेली खंत ही योग्यच आहे. गांधी, फुले, आंबेडकर, ज्ञानोबाविनोबा, तुकाराम हे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आता प्रस्थापित झालेले आहेत. नजिकच्या भविष्यकाळात जे. कृष्णमूर्ति, ओशो-रजनीश, साईबाबा किंबहुना सत्यसाईबाबा ह्यांचाही समावेश तत्त्ववेत्त्यांत केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(५) भारतीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास असे आढळून येते की दार्शनिक परंपरा संपुष्टात आल्यानंतर भारतीय तत्त्वज्ञानाचा विकास खुटला. त्यानंतरच्या कालखंडात असे आढळते की विविध दर्शनांच्या पाइकांचा त्या त्या दर्शनांचा अभ्यास पक्का असला तरी त्या अनुयायांकडून दर्शनाच्या विकासाला हातभार लागला नाही. ह्या अनुयायांनी आपली श्रद्धास्थाने निष्ठेने सांभाळली, आणि त्या विशिष्ट वैचारिक चौकटीत राहून पूर्वसूरींच्या विचारांचे मनन, पठण करण्यात धन्यता मानली. आधुनिक परिभाषेत ह्या दार्शनिक तत्त्वज्ञानाचा गोषवारा सांगणे हे ह्या पंडितांना जमत नाही. त्यांच्या प्रणालीत ते बसत नाही. टिळक, आगरकर, लोकहितवादी इत्यादींच्या लिखाणातील आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे संदर्भ हे त्यातील सामाजिक आशयाचे बोट धरून येतात.
(६) पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातील विद्यार्थ्यांची प्रमुख अडचण, दि. य. म्हणतात त्याप्रमाणे, इंग्रजीच्या सम्यक् ज्ञानाचा अभाव हे खरेच आहे. परंतु त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. तत्त्वज्ञान हा एक वैचारिक प्रवाह आहे. त्यामुळेच त्यांतील समस्यांचे स्वरूप समजून घेताना त्यात गुंतलेल्या सामाजिक व सांस्कृतिक संदर्भाची जाण असणे आवश्यक आहे.
आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञान समजण्यासाठी ख्रिश्चन धर्मातील संकल्पना व नव्याने विकसणाच्या वैज्ञानिक संकल्पना ह्यांविषयीची निदान ढोबळ कल्पना असावयास हवी. ती नसल्यास पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची चर्चा ही अर्थ न भावणारी शाब्दिक बडबडच ठरेल.
तत्त्वज्ञान हा विषय कलाशाखेतील विद्यार्थ्यांना शिकविला जातो. साधारणत: आजच्या विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तीनुसार उत्तम बौद्धिक दर्जा असलेले विद्यार्थी विज्ञान/ वाणिज्य शाखांकडे जातात. कलाशाखेचे विद्यार्थी गाळच असतात. त्यातील निवडक गाळ तत्त्वज्ञानाकडे वळतो. (अर्थात् ह्याला विरळा अपवाद आढळतो.) त्यांना कोणतीच भाषा धड येत नसते. ह्याला पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थीही अपवाद नाहीत. प्राप्त परिस्थितीत किमान संकल्पना जास्तीत जास्त सोप्या करून सांगणे व विद्यार्थ्यांची परीक्षेपुरती तयारी करून घेणे एवढेच कार्य शिक्षककरू शकतो. (येथे आणखीही एक गोष्ट नमूद करणे अगत्याचे आहे. ग्रामीण भागातून येणारा फार मोठा विद्यार्थ्यांचा वर्ग आज तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यास उत्सुक आहे. परंतु इंग्लिश व संस्कृत ह्या दोनही भाषांविषयीचे अज्ञान व मराठीतील ह्या विषयावरील ग्रंथांचा दुष्काळ ह्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या नोट्स्वरच त्यांना गुजराण करावी लागते. दि. यं. नी ही समस्या नेटकेपणाने मांडलेली आहे.)
ह्या ठिकाणी गेल्या काही वर्षांत वाढीला लागलेल्या आणखी एका प्रवृत्तीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ‘बौद्धिक स्वायत्तता’ ह्या आदर्शाने भारून जाऊन जे जे एतद्देशीय आहे त्याचा (च) पाठपुरावा करणे हे सांस्कृतिक महत्तेचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती आज अनेक अभ्यासकांमध्ये निर्माण झालेली आपणास आढळते. नॉस्ट्रेडेमसच्या भविष्यवाणीची जबरदस्त मोहिनी त्यांच्यावर पडलेली आहे. परिसंवादाच्या निमित्ताने व्यासपीठांवरून हे बोलूनही दाखविले जाते.
आमच्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांच्या व जागतिक पातळीवरील इतर विकसित विचारप्रणालींच्या अज्ञानाबद्दल फारसे दुःख करण्याचे कारण नाही. आमचा भूतकाळ ऐश्वर्यशाली होता. वेद पुरातन आहेत. कृषिविद्येपासून विमाने, टेस्टट्यूब बेबीपर्यंत सर्व शोध आमच्याकडे फार पूर्वीच लागलेले होते. आता फक्त क्रिकेटचा उगम वेदकाळातच झाला होता हे सिद्ध झाले की आम्ही पुन्हा एकदा धन्य झालो असे म्हणता येईल. स्पर्धा जिंकणे हे आम्ही कधीच महत्त्वाचे मानले नाही. ‘निष्कामकर्मयोग’ हे तत्त्वज्ञानही आमचेच!