सांप्रत कला शाखेतील एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे असा अनुभव येऊ लागला आहे. कलाशाखेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे याचे मुख्य कारण कला शाखेची आवड हे नसून या विषयांत बी. ए., एम्. ए. केल्यावर बी. एड्., एम्. एड्. केले तर शाळेत शिक्षकाची नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे हे होय. कला शाखेत संशोधन करण्याची आवड, हा उद्देश क्वचितच आढळतो आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी काही। नामवंत विद्यापीठातील कला शाखेची स्थिती याला अपवाद आहे. कला शाखेतही तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए., एम्. ए. करणारे दिवसेंदिवस कमी कमी होत आहेत. एका विद्यापीठाच्या पदव्युत्तर तत्त्वज्ञान विभागात एका वर्षी जेमतेम एक विद्यार्थी होता! अन्य सामाजिक शास्त्रांत बी. ए., एम्. ए. करणारे तुलनेत जास्त असले तरी त्यांचे उद्दिष्ट हे वरीलप्रमाणेच असते.
हुषार विद्यार्थी तंत्रज्ञान, विज्ञान याकडे मोठ्या प्रमाणात जातात. त्यांना सामाजिक शास्त्रात विशेष रस नसतो हेही अनुभवास येऊ लागले आहे. नाखुषीने सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणारे शिक्षण झाल्यावर प्राध्यापक होताना दिसताहेत. ग्रंथांचे, शास्त्रीय नियतकालिकांचे वाचन करण्यात बहुतांश प्राध्यापकांना रुची राहिलेली नाही हेही दिसून येत आहे. मराठीतून प्रकाशित होणार्या दर्जेदार नियतकालिकांचे वाचन करण्यात रुची नाही आणि अशाप्रकारचे इंग्रजी साहित्य वाचनाची तयारी नाही. मराठीत पुस्तके नाहीत म्हणून अभ्यासक्रमात बदल नको व अभ्यासक्रम बदलत नसल्याने नवनवे विचारप्रवाह, विषय यांची ओळखही नाही अशी परिस्थिती आहे. यासद्य:परिस्थितीची गंभीर दखल घ्यायला हवी आहे. त्यासाठी या विषयांच्या अध्यापकांनी खूपसेआत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
अध्यापनाची आमची पद्धत बाबा आदमच्या जमान्यातील आहे. गेल्या काही वर्षांत शिक्षणशास्त्रात मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. व्याख्यानपद्धतीशिवाय अध्यापनाच्या अन्य अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत. मात्र वर्गात जाऊन ४०-५० मिनिटे व्याख्यान देणे हीच एकमेव पद्धत बहुतांश ठिकाणी वापरली जात आहे. तत्त्वज्ञान विषय शिकविताना सॉक्रेटीसचा उल्लेख अनेकदा होतो, परंतु सॉक्रेटीसने स्वीकारलेली पद्धत मात्र दुर्लक्षिली जाते. आपल्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी अज्ञ मानून त्यांना व्याख्यानाद्वारे सर्व प्रश्नांची आयती उत्तरे देणे हे प्राध्यापकांचे प्रधान कार्य झाले आहे. विद्यार्थ्यांना बोलते करून, चर्चेत सहभागी करून घेऊन, त्यांच्या विचारांना चालना देऊन, त्यांनाच विचार करायला लावणे ही सॉक्रेटीसची पद्धती अवलंबिलीच जाताना दिसत नाही. या पद्धतीचा वापर गेली ६ वर्षे केल्यावर आलेले अनुभव बघता सॉक्रेटीसच्या पद्धतीचे पुनरुज्जीवन मला अत्यावश्यक वाटू लागले आहे. चर्चेत भाग घेता घेताच विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढते, ते अधिक चिकित्सक होतात, प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू लागतात, त्यासाठी आवश्यक ते वाचनही करू लागतात याचा अनुभव अनेकदा येतो. तेव्हा विद्यार्थ्यांविरुद्धच्या आम्हा प्राध्यापकांच्या तक्रारी पुन्हा एकदा तपासून घ्यायला हव्या. चर्चेत उपस्थित झालेल्या मुद्द्यांची दखल घेऊन त्यानंतर व्याख्यानपद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. सामाजिक शास्त्रांतील प्रत्येक विषय हा समाजातील कोणत्या ना कोणत्या समस्येशी, प्रश्नांशी, संबंधित असल्याने व या प्रश्नांचा दाहक अनुभव विद्यार्थीही घेत असल्याने प्रत्येक मुद्द्यांची चर्चा घडवून आणणे हे शिक्षकाने प्रयत्न केल्यास सहज शक्य आहे. वर्गात विद्यार्थ्यांची संख्या कितीही जास्त असली तरीही हे शक्य होऊ शकते. बोलणारे विद्यार्थी व न बोलणारे विद्यार्थीही चर्चेत सहभागी होतातच. ‘आमची मते मांडण्याची संधीच आम्हाला मिळत नाही’, ‘आमचे मत ऐकून घेण्यात प्राध्यापकांना रस नाही’ अशी तक्रार बहुतांश विद्यार्थी करीत असतात. ‘मूक श्रोते’ म्हणून वर्गात बसण्याची आजकालच्या विद्यार्थ्यांची तयारी नाही. विद्यार्थ्यांत विचार, अभ्यास, वादविवाद करण्याची क्षमता व्याख्यानपद्धतीच्या अतिरेकाने आम्ही प्राध्यापक नष्ट करीत आहोत का? याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
विज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक दौरा’ हा एक महत्त्वाचा भाग असतो. सामाजिक शास्त्रांत अशा गोष्टींना काहीच महत्त्व दिले जात नाही. समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमातील ‘वृद्धांच्या समस्या’ हा भाग वृद्धाश्रमाला भेट देऊन, तेथील वृद्धांशी चर्चा करून, अधिक चांगल्या पद्धतीने समजेल हे लक्षातच घेतले जात नाही. विविध सामाजिक,आर्थिक समस्यांचे प्रत्यक्ष अवलोकन करून, सामाजिक शास्त्रांतील संबंधित विषय शिकविला गेला तर आपण जे शिकतो त्याचा वास्तवाशी काही संबंध आहे हे विद्यार्थ्यांना कळेल. सामाजिक शास्त्रांची उपयोगिताही त्यातून लक्षात येईल. स्वयंसेवी संस्थांचे प्रकल्प बघणे, त्यांचा अभ्यास करणे हेही उपयुक्त ठरेल. अशा प्रकारच्या भेटीनंतर चर्चा व चर्चेशेवटी व्याख्यान अशी पद्धत स्वीकारल्यास सामाजिक शास्त्रांच्या अध्ययनास नवी दिशा मिळेल. प्रकल्प भेटींचा विद्यार्थ्यांना किती उपयोग होतो याचा अनेकदा अनुभव आला आहे. या भेटींतून आलेल्या अनुभवांच्या आधारे झालेले अध्यापन अधिक वास्तववादी असेल व प्रत्ययकारीही असेल.
महाविद्यालयातील विद्यार्थी वाचत नाहीत, इंग्रजी वाचन तर मुळीच करीत नाहीत ही सर्वसाधारण तक्रार आहे. मुळात प्राध्यापकच जर वाचत नसतील, विविध ग्रंथांची, नियतकालिकांची माहिती देत नसतील तर विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व कसे कळणार? विश्वकोश, शास्त्रीय नियतकालिके यांचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न कुठेच होताना दिसत नाही. संदर्भ कसे शोधायचे, माहिती कशी मिळवायची याचेही शिक्षण देणे हा आमच्या अध्यापनाचा भाग का असू नये? पाठ्य पुस्तकात दिलेले संदर्भच जर पुन्हा पुन्हा व्याख्यानातून दिले गेले तर त्यात विद्यार्थ्यांना नावीन्य कसे वाटेल. सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीत होणार्या बदलांची, स्थित्यंतरांची, ताज्या घडामोडींची दखल अध्यापनात घेतली जाते का? सगळा जागतिक संदर्भ बदललेला असतानाही या बदलांची दखल सामाजिक शास्त्रांचे किती अध्यापक घेतात? शास्त्रीय नियतकालिकांचा, विश्वकोशांचा, विविध ग्रंथांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिल्यास विद्यार्थी वाचू लागतात हा अनुभव आजही येतो. ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा, संदर्भ कसे शोधावेत हे विद्यार्थ्याने स्वतःहूनच शिकावे हा प्रचलित समज अतिशय चुकीचा आहे. सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांच्या विविध वाचनालयांना भेटी आयोजित करून वाचनाची आवड वृद्धिंगत करता येऊ शकते. सामाजिक शास्त्रांच्या अध्यापकांना याचे महत्त्व क्वचितच वाटते हा अनुभव येतो. वाचनालयांच्या कार्यपद्धतीतही खूप सारे बदल करायला हवे आहेत. पण तो एक स्वतंत्र विषय म्हणून तूर्त बाजूला ठेवू.
सामाजिक शास्त्रांचे अध्यापन साधारणतः ५ वी च्या वर्गापासून सुरू होते. हे अध्यापनच विद्यार्थ्यांची सामाजिक शास्त्रांची आवड संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरते असेही अनेक विद्यार्थी सांगतात. पदवीपूर्व वर्गातील सामाजिक शास्त्रांचे अध्यापनही याला अपवाद नाही. शालेय स्तरावर अध्यापन करणार्यांना, महाविद्यालयात अध्यापन करण्याचा मोह होतो, पदवीपूर्व वर्गांना शिकवणारे पदव्युत्तर वर्गांना शिकविण्याची इच्छा बाळगतात यामुळे ते त्यांच्या जागेवर नाखुषीनेच काम करीत असतात असे अनेकदा जाणवते. खरे तर प्रत्येक स्तरावरीलशिक्षण हे सारखेच महत्त्वाचे का मानले जाऊ नये? सॉक्रेटिसा सारखा तत्त्वज्ञ मुद्दाम युवकांशी चर्चा करीत असे. रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेतील अध्यापन करण्यात कमीपणाचे मानीत नसते. जेवढा जास्त विद्वान प्राध्यापक तेवढा त्याचा युवकांशी संवाद’ कमी असे चित्र आज दिसते आहे. पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांत ज्ञानाभिरुची वाढविण्याचे काम हे अत्यंत प्रतिभासंपन्न व विद्वान प्राध्यापकच खर्या अर्थाने उत्तमपणे करू शकतो. हे लक्षात घेऊन ज्येष्ठ प्राध्यापकांचा पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांशीही संपर्क असणे आवश्यक वाटू लागले आहे. अभ्यास-मंडळे चालविण्याची महाराष्ट्रातील परंपरा खंडित झाल्याने ‘संवादाची’ एक संधी संपुष्टात आली आहे. ‘गुरू’च्या भूमिकेतून प्रवचन देऊन आपला कार्यभाग संपला असे न मानता विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांना ज्ञानप्रक्रियेत सहभागी करून घेण्यास महत्त्व द्यावे लागेल.
संशोधनाचे प्रकल्प प्राधान्याने पदव्युत्तर स्तरावर राबवले जातात. ज्यामुळे पदवीपूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल असे प्रकल्प का असू नयेत? अशा प्रकल्पांमुळे संशोधनाचे महत्त्व समजावता येईल व संशोधनाची आवडही निर्माण करता येईल. त्या विषयासंबंधी विद्यार्थी निश्चितच वाचतील. अशा संशोधनाचे स्वरूप व स्तर माहितीचे संकलन एवढाच असतो. व्यक्तिशः असा एक प्रकल्प गेली ५ वर्षे राबवल्यानंतर मी या निष्कर्षावर आलो आहे. हे काम विद्यार्थी (पदवी स्तरावरचेही) केवढ्या उत्साहाने करतात हेही अनेकदा अनुभवले आहे. परंतु अशा प्रकारच्या प्रकल्पांचीही वानवाच आहे. मग विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड कशी निर्माण होणार?
शालेय स्तरावर अध्यापन करायचे असेल तर शिक्षणशास्त्रातील पदवी घ्यावी लागते. बी. एड्. च्या निमित्ताने शिक्षणाचे तत्त्वज्ञान, अध्यापनाच्या पद्धती, शिक्षणाचे उद्दिष्ट आदि अनेक गोष्टींचा परिचय तरी अध्यापकास होतो. महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी मात्र अशा परिचयाची काहीच आवश्यकता नसते! एम्. ए. झाल्यावर (व आता ‘नेट’, ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर) महाविद्यालयात सरळ प्राध्यापक होता येते! कसे शिकवावे, अध्यापन का, कशासाठी, कसे, अध्यापकाची जबाबदारी या व अशा बाबींची कोणतीही ओळख नसणारी व्यक्ती आज प्राध्यापक होताना दिसते! शिक्षणाच्या क्षेत्रात प्राध्यापक म्हणून प्रवेश करताना महाविद्यालयाच्या स्तरावर अध्यापन कसे करायचे असते हे जाणून घेण्याचा आपणहून प्रयत्न करणारे किती प्राध्यापक असतात हा एक संशोधनाचाच विषय आहे. वर्षानुवर्षे प्राध्यापकी करूनही निवृत्तीपर्यंत एकदाही शिक्षणशास्त्राचे, अध्यापनविषयक शास्त्राचे एकही पुस्तक न वाचलेले हवे तेवढे प्राध्यापक सापडतील. प्रत्येक विषयाच्या अध्यापनाची पद्धत भिन्न असते. अध्यापनाचेही एक शास्त्र आहे याचा साधा परिचयही नसणारे प्राध्यापक होतात! त्यांना आपल्याप्राध्यापकांची व्याख्यान पद्धती’ (किंवा नोट्स देणे) हीच एक पद्धती माहीत असते व तीच तेही राबवितात. पुन्हा व्याख्यान पद्धतीचेही शास्त्र न वाचता न अभ्यासता!! शिकवावे कसे याचे कोणतेही ज्ञान नसलेले लोक जेव्हा प्राध्यापक होतात तेव्हा चांगल्या चांगल्या विषयांची ते पार वाट (‘निक्काल’) लावतात!! सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत तर हे मोठ्या प्रमाणात होऊ लागलेआहे.
सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रात आलेले ‘साचलेपण’ हे अध्यापनशास्त्राचा गंध नसलेल्यांचे ‘योगदान आहे! सामाजिक शास्त्रांचे संबंधित परिसंवाद, अभ्यासवर्ग यांतही आपापला विषय कसा शिकवावा हा विषय, त्याचे शास्त्र कधीच चर्चिले जात नाही. कोणीही प्राध्यापक झाला की लगेच त्याला शिकवावे कसे याचे पूर्ण ज्ञान होते असाच समज सर्वत्र आढळतो! हळूहळू अध्यापन कसे करावे हे कळेल असे मानले जाते!! अध्यापन पद्धतींच्या बाबतीत आम्ही फारच ‘परंपरानिष्ठ’ आहोत. ही परंपरानिष्ठाच सामाजिक शास्त्रांचा अभ्यास कंटाळवाणा करण्यास कारणीभूत ठरली आहे. परंपरानिष्ठेला अनेक अपवाद आहेत; परंतु सर्वसामान्यतः स्थिती कशी आहे हे वर नोंदले आहे.
सामाजिक शास्त्रांच्या विद्यापीठातील पिछेहाटीची अन्य अनेक कारणे आहेत. अध्यापनाच्या स्तरावरील कारणांचा शोध घेण्याचाच प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.