लेखाचे शीर्षक पाहिल्याबरोबर अनेक वाचक बुचकळ्यात पडतील. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान?’ ते उद्गारतील. म्हणजे ती दोन आहेत की काय?आमची तर अशी माहिती आहे की त्या दोन गोष्टी नाहीतच; एकाच गोष्टीची दोन नावे आहेत. आणि अशी समजूत आपल्या समाजात प्रसृत झालेली आहे हे मान्य केले पाहिजे. एखादा ग्रंथ तत्त्वज्ञानाचा आहे असे ऐकल्याबरोबर त्यात अध्यात्माविषयी, आत्म्याविषयी, त्याचा बंध आणि मोक्ष यांविषयी विवेचन असणार हे गृहीत धरले जाते. पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर तत्त्वज्ञानाची पुस्तके हवीत अशी मागणी केल्याबरोबर विक्रेता आपल्यापुढे अध्यात्माची पुस्तके टाकील हे खरे आहे. पण तत्त्वज्ञान म्हणजे अध्यात्म अशी समजूत पसरलेली असली तरी ती बरोबर नाही हे स्पष्टपणे सांगणे जरूर आहे.
त्याकरिता प्रथम अध्यात्म म्हणजे काय ते पाहू. अध्यात्म म्हणजे काय?
‘अध्यात्म’ या शब्दाचा अर्थ ‘आत्मानं अधिकृत्य’, म्हणजे आत्म्याविषयी. तेव्हा अर्थात् अध्यात्मात आत्म्याविषयी माहिती, विवेचन, चर्चा असणार. पण आत्मा म्हणजे काय?ज्याला आपण सर्व ‘मने’ म्हणतो, किंवा ज्याचा उल्लेख आपण ‘मी’ या सर्वनामाने करतो तो आत्मा एवढाच त्याचा अर्थ नाही. आत्म्याच्या स्वरूपाविषयी एक विशिष्ट आणि सुरचित कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात सर्वमान्य आहे. ती थोडक्यात अशी. प्रत्येक मनुष्याला शरीराखेरीज एक आत्माही असतो. तो शरीराहून सर्वथा भिन्न असतो. तो वस्तुतः अशरीरी असतो, पण शरीरात बद्ध असतो, तो अमर असतो, शरीर मृत झाल्यावर ते सोडून तो दुसर्याश शरीरात जातो. जन्मापूर्वी त्याला अस्तित्व होते आणि मरणानंतरही अस्तित्व असते. त्याला पुनर्जन्म असतो. त्याने शरीरी असताना केलेल्या कर्माप्रमाणे, त्याने केलेल्या पापपुण्यानुसार, आपल्या कर्माची फळे चाखण्याकरिता त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. एवढ्यानेही ही कथा पूर्ण होत नाही. आत्म्याला जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून सुटकाही मिळू शकते. त्याचा उपाय सांगणे हे आपल्या तत्त्वज्ञानाचे प्रधान प्रयोजन असते. उदा. भगवद्गीतेने तो उपाय पुढीलप्रमाणे सांगितला आहे.फलाशा टाकून कर्मे केली असता त्यांचे बंधन राहत नाही, म्हणजे त्या कर्मांची फळे भोगण्याकरिता पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. आणि म्हणून अगोदर केलेल्या कर्मांची फळे भोगून झाल्यावर आत्म्याचा पुनर्जन्म व्हायला कारण राहत नाही. तो जन्ममरणातून सदाकरिता मुक्त होतो.
या सर्व गोष्टी अनुभवाचे विषय नाहीत. पण त्यांची माहिती श्रुतीतून मिळते.
अशा आत्म्याविषयी असलेले ते अध्यात्म. भारतीय तत्त्वज्ञान जरी अनेक दर्शनात व्यक्तं झालेले असले, आणि त्यांची प्रत्येकाची मते भिन्न असली तरीवरील अर्थाने ती सर्व अध्यात्मेचआहेत. बौद्ध तत्त्वज्ञान आत्मा मानत नाही; पण त्याचा अर्थ, न बदलता कायम राहणारा आत्मा त्याला मान्य नाही. पण क्षणोक्षणी बदलणारे आणि कारणनियमाने परिणत होणारे मनोव्यापारांचे अखंड संतान ते मानतात, आणि ते पुनर्जन्मास पुरेसे आहे असे ते मानतात. चार्वाकांचा विचार आत्मवादी तत्त्वज्ञानाहून वेगळा आहे. पण त्यांच्या मताला फारशी किंमत कोणी देत नाही. असे उथळ तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानच नव्हे अशी त्याची उपेक्षा केली जाते.
तत्त्वज्ञान म्हणजे काय?
तत्त्वज्ञान म्हणजे काय हे थोडक्यात सांगणे कठीण आहे. कारण प्राचीन काळापासून आतापर्यंत तत्त्वज्ञानाच्या अनेक कल्पना व्यक्त झाल्या असून भिन्न तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत. त्यापैकी एक कल्पना आपल्या अध्यात्माशी जुळणारी आहे. युरोपात मध्ययुगातील Scholastic philosophy म्हणून ओळखले जाणारे जे तत्त्वज्ञान आहे ते बायबलला प्रमाण मानते. बायबलला असंमत अशी गोष्ट सत्य असू शकत नाही अशा श्रद्धेतून ख्रिस्ती मध्ययुगीन तत्त्वज्ञान निर्माण झाले. पण Scholastic philosophy च्या पूर्वी ग्रीक तत्त्वज्ञानाचा संबंध धर्माशी नव्हता, आणि नंतर सतराव्या शतकापासून पुढे युरोपीय तत्त्वज्ञान धर्मपुस्तकांचा अधिकार मानीनासे झाले. अलीकडे तत्त्वज्ञानात कोणी आत्मा किंवा ईश्वर मानीत नाही असे नाही; पण त्या दोन्ही गोष्टी ते युक्तिवादाने सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, श्रद्धेने स्वीकारीत नाहीत.
हे झाले तत्त्वज्ञानाच्या एका प्रकाराविषयी. त्याचे अन्यही अनेक प्रकार आहेत. एक जुनी कल्पना म्हणजे तत्त्वज्ञान म्हणजे विश्वाविषयीच्या आणि जीवनाविषयीच्या अंतिम (ultimate) किंवा आद्य प्रश्नांची उत्तरे देणारे शास्त्र. उदा. जगाची उत्पत्ति कोणी केली? त्याचा कर्ता कोणआहे? मानवी जीवनाचा हेतू काय आहे? इत्यादि. या प्रश्नांची उत्तरे देण्याचे सामर्थ्य कोणत्याही विज्ञानात नसते. ते तत्त्वज्ञानात आहे अशी समजूत. आणखी एक कल्पना अशी, सबंध विश्वाचेआकलन करून विश्वरूपदर्शन घडविणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे. कारण विज्ञाने जरी विश्वाचा अभ्यास करीत असली तरी ती तो शकलशः, खंडशः करतात. आपल्या मर्यादित विषयापुरताच ती विचार करतात. उदा. पदार्थविज्ञान (भौतिकी) भौतिक जगाचा अभ्यास करते, जीवशास्त्र जिवंत वस्तूंचा, ज्योतिःशास्त्र आकाशस्थ गोलांचा, इत्यादि. तत्त्वज्ञान संबंध जगाचे व्यापक दर्शन घडविते अशी ही कल्पना आहे.
अलीकडे मात्र आपल्या बळानुसार ओझे उचलावे असे तत्त्वज्ञ शिकले आहेत. अंतिम प्रश्नांची उत्तरे देणे किंवा विश्वरूपदर्शन घडविणे ह्या दुरापास्त गोष्टी असून त्याकरिता केलेले प्रयत्न विफल होतात. म्हणून आपण मानवी बुद्धीला पेलतील असेच प्रश्न हाताळावेत असे मत प्रस्थापित झाले आहे. असे विषय म्हणजे तर्कशास्त्र, ज्ञानमीमांसा, अर्थमीमांसा, इ. पण त्याविषयी विवेचन करण्यास येथे अवकाश नाही.
तत्त्वज्ञानाचे अनेक प्रकार असले, आणि ते परस्परांवर टीका करणारे असले, तरी एका गोष्टीविषयी त्यांचे स्थूलमानाने एकमत आहे–तत्त्वज्ञानाच्या साधनांविषयी. तत्त्वज्ञानाची रीत बुद्धिसंमत आणि आनुभविक असली पाहिजे, त्यात विधाने युक्तिवादाने किंवा प्रमाणांनी सिद्ध किंवा निदान संभाव्य केली पाहिजेत. आणखी एक गोष्ट आहे. तत्त्वज्ञ हा एक मनुष्यच आहे,
आणि इतर मनुष्यांच्या जवळ नाही असे कोणतेही साधन त्याच्याजवळ नाही. उदा. वैज्ञानिकाला। अप्राप्य असे काहीही तत्त्वज्ञाला प्राप्य नसते. तो अतिशय बुद्धिमान असतो, त्याच्याजवळ प्रतिभाही असेल, पण ती प्रतिभा म्हणजे सामान्य मनुष्याजवळ असणार्यात प्रकारचीच, पण असामान्य प्रमाणात असलेली बुद्धि असते. असे वैज्ञानिकांतही असते. एखाद्याला अशी गोष्ट सुचते की जी अन्य कोणाला सुचली नव्हती. पण त्या गोष्टीची जात अलौकिक नसते. म्हणून तर तो आपल्याला सुचलेला शोध इतरांना समजावून सांगू शकतो आणि त्यांना पटवूही शकतो. तीच गोष्ट तत्त्वज्ञानाचीही आहे.
तेव्हा तत्त्वज्ञ प्रतिभावान असला तरी त्याचे म्हणणे सत्य म्हणून स्वीकारले जाण्याकरिता ते अनुभव आणि तर्क यांच्या कसोटीला उतरले पाहिजे असे मानले जाते. तत्त्वज्ञाला बौद्धिकआणि आनुभविक कसोट्यांना सामोरे जावे लागते.
३
त्या दृष्टीने अध्यात्माकडे पाहिल्यास आपल्याला काय आढळते?
अध्यात्माची मूलतत्त्वे, उदा. आत्मा नावाची मनाहून भिन्न वस्तू आहे, किंवा तो अमर आहे, किंवा तो या जगात बंधनात असून मुक्त होऊ शकतो, इ. मते, बुद्धीच्या कसोटीवर उतरतात काय? त्यांची प्रमाणे काय आहेत?
अध्यात्मातील मते बहुतेक श्रुर्तीवर आधारित
आत्मा हा शरीराहून वेगळा पदार्थ आहे हे मत घेऊ. या मताचे काय प्रमाण असू शकेल? हा अशरीरी पदार्थ असल्यामुळे आपल्याला त्याची कसलीही माहिती असू शकत नाही, कारण कोणत्याही इंद्रियाने तो कळू शकत नाही. शरीराहून विभक्त झाल्यावर अशरीरी व्यक्तीशी संवाद करण्याची शक्यताच नाहीशी होते. तरीही असे आत्मे आहेत आणि ते आपल्या कानांवर शब्द आणि आपल्या डोळ्यापुढे दृश्ये घालून आपल्याशी संवाद करू शकतात असे लोक मानतात. उदा. मृत व्यक्ती जिवंत व्यक्तीशी संभाषण करू शकते असे एक मत आहे. या प्रकारच्या घटनांची शहानिशा करण्याकरिता अमेरिकेत गेल्या शतकाच्या शेवटी Society for Psychical Research या नावाची संस्था स्थापन झाली होती, आणि तिने या प्रकारच्या असामान्य घटनांचा पुष्कळ शोध घेतला आहे. दुर्दैवाने त्यांपैकी एकही घटना निर्णायक रीतीने सिद्ध झाली नाही. अनेकदा लबाडी, भाबडेपणा, निरीक्षणात चुका, इष्ट निष्कर्ष काढण्याचीघाई, इत्यादि दोषांनी या सोसायटीचे शोध दूषित झालेले आढळले.
याप्रमाणे मरणोत्तर काही काळ आत्मा अस्तित्वात असतो याचाही पुरावा अपुरा आणि असमाधानकारक आहे मग अमरत्वाविषयी काय बोलावे?
पण तरी आत्म्याचे अमरत्व सिद्ध करण्याचे प्रयत्न होतात. गीतेतील ‘नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः’ हा श्लोकार्ध या संबंधात उद्धृत केला जातो. त्याचा अर्थ जे असत् आहे ते सत् होत नाही, आणि जे सत् आहे ते असत् होत नाही. ज्याअर्थी चेतन वस्तू आहेत त्याअर्थी त्या कधी नष्ट होऊ शकत नाहीत.
आता वरील श्लोकार्धाचा अर्थ काय करायचा? जर ते विधान सबंध जगाला उद्देशून वापरले असेल तर ते बरोबर असू शकेल असे म्हणता येईल. हे जग आहे, म्हणजे सत् आहे. ते कधी नव्हते आणि नंतर निर्माण झाले असे असू शकेल काय? कुठेही काहीही नाही अशा अवस्थेनंतर काही निर्माण झाले असे कसे असू शकेल हे सांगणे कठीण आहे. आणि तसेच हे जग कधी काळी नाहीसे होईल, म्हणजे सतानंतर असत् येईल हे अनाकलनीय दिसते. तेव्हा या अर्थाने वरील श्लोकार्ध सयुक्तिक वाटतो. परंतु सबंध जगाविषयी नव्हे, तर त्यातील व्यक्तींविषयी आपण बोलत असू तर ते संशयास्पद वाटते. जगात प्राणी जन्मतात आणि मरतात हे स्पष्ट दिसते. उदा. मानवापुरते बोलायचे तर जन्मणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या मातापित्यांच्या अंड आणि शुक्र यांच्या संयोगातून निर्माण होते. त्यापूर्वी ती नव्हती. आणि मृत्यूच्या वेळी तिचे चैतन्यच नाहीसे होते. म्हणून प्राण्यांना हा श्लोकार्ध लागू पडत नाही असे म्हणावे लागते.
तीच गोष्ट वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि’ या गीतेतील दुसर्या प्रसिद्ध श्लोकाविषयीही. जसा मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून देऊन नवीन धारण करतो, तसाचआत्माही एक देह टाकून दुसर्याीत प्रवेश करतो असे हा श्लोक म्हणतो. पण त्यात सांगितलेल्या गोष्टीचा पुरावा देत नाही. माणूस एक वस्त्र टाकून नवे धारण करतो हे खरे आहे, पण त्यामुळे आत्माही एक देह सोडून दुसरा धारण करतो हे म्हणायला आधार मिळत नाही. पुराव्याअभावी हाही श्लोक निरुपयोगीच आहे.
या श्रुतिवचनांच्या जोडीला अनेक आनुभविक (म्हणजे इंद्रियानुभव आणि तर्क यावर आधारलेली) प्रमाणेही दिली जातात, उदा. पूर्वजन्माचे स्मरण सांगणाच्या माणसांचे वृत्तांत. पण या सर्व प्रकरणी पूर्ण शोध घेतल्यानंतर निर्णायक असा पुरावा आढळत नाही असे म्हणावे लागते. येथेही लबाडी, भाबडेपणा, आपल्या श्रद्धेला अनुकूल दिसणार्याआ गोष्टींचा स्वीकार करण्याची घाई, सदोष तर्क, इत्यादि दोष आढळतात.
सारांश, अध्यात्म म्हणजे श्रद्धावान लोकांच्या भाबड्या आणि चुकीच्या तर्कावर उभे राहिलेले एक विशाल बांधकाम आहे. दुर्दैवाने ते इतक्या ठिसूळ पायावर उभे आहे की ते सत्य असण्याची शक्यता फारच कमी आहे.
४
मग माणसे, बुद्धिमान माणसेही, एवढ्या मोठ्या संख्येने अध्यात्म मानताना का आढळतात? त्याचे उत्तर असे आहे की अध्यात्म आश्वासक आहे, आणि मानवी मनाला जीवनात आश्वासनाची निकड वारंवार भासत असते. जीवन इतके अस्थिर आहे की ते केव्हा संपेल किंवा आपण केव्हा एखाद्या मोठ्या आपत्तीत सापडू याची शाश्वती नसते. मरण तर कोणाला चुकत नाही, आणि मरणानंतर आपले काय होते हे सांगणे अशक्य असल्यामुळे मोठी विवंचना लागून राहते. विवेक सांगतो की ज्याच्या सत्यत्वाचा कसलाही पुरावा नाही ते स्वीकारायचे नाही, ज्याच्याविरुद्ध पुरावा असेल त्याचा सरळ त्याग करावा, आणि ज्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल पुरावा नसेल त्याविषयी तटस्थ राहावे. पण एवढी शुद्ध विवेकवादी भूमिका स्वीकारून तिच्यानुसार जीवन उभारणे ही गोष्ट कठीण आहे. लहानपणी दुःखाच्या प्रसंगी वडील माणसे आपल्याला पोटाशी धरतात आणि आपल्याला धीर देतात, आपले सांत्वन करतात. पण दुःखे मोठेपणीही येतात. अशा वेळी माणसापेक्षा मोठी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे आणि ती आपले रक्षण करणार आहे असे आश्वासन आपल्याला मिळाले तर ते आपल्याला हवे असते. ते आश्वासन धर्म, अध्यात्म आपल्याला देतात.
पण हे आश्वासन निराधार आहे, एवढेच नव्हे तर त्याच्या विरुद्ध प्रतिकूल पुरावा आहे
असे लक्षात आल्यावर निदान प्रौढ मनुष्याने बालसदृश भाबडा विश्वास बाळगू नये असे सांगणे अवश्य आहे. त्यात आत्मवंचना आहे. सत्य आणि असत्य यांचा विवेक करण्याचे आपल्याजवळ बुद्धी हे एकमेव साधन आहे. तिच्या कसोटीला उतरतील, तिला संमत होतील, अशाच गोष्टींचा स्वीकार करणे समंजसपणाचे आहे. बुद्धीचे देणे लाभलेल्या मनुष्याला ते शोभणारे आहे. त्याच्याविरुद्ध वागणे बालकांसारखे वागणे आहे, प्रौढाचे वागणे नव्हे. असे वागणे मनुष्य अजून प्रौढ झाला नाही याचे द्योतक आहे.