पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक यांस
आपल्या मार्च १९९६ च्या अंकात प्रा. मधुकर देशपांडे ह्यांचे पत्र आले आहे. त्याविषयी मला काही खुलासा करावयाचा आहे.
(१)३९४ पानावरील त्यांच्या तिसर्याम परिच्छेदाशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्त्रीपुरुषांची लैंगिक गरज कमीजास्त कशीही असो, लैंगिक स्वायत्तता दोघांनाही सारख्या प्रमाणात असावी असेच माझे मत आहे.
(२)आता कुटुंब : आजचे आणि उद्याचे ह्यासंबंधी.
‘पाश्चात्त्य कुटुंबात मुले एकदा आईपासून सुटी झाली की ती पूर्ण बिरादरीची होतात’ हे माझे विधान अतिव्याप्त आहे ह्यात संशय नाही.
मी हे विधान मुख्यत: भारतीय आईबापांच्या तीन जबाबदार्यांदच्या संदर्भात केले होते. त्या तीन जबाबदार्याई म्हणजे आपल्या मुलांचे (१) शिक्षण (२) नोकरी (३) विवाह ह्या होत. भारतीय मध्यमवर्गीयांच्या आयुष्याला ह्या तीन जबाबदार्यां चे जणू काही ग्रहण लागले आहे. त्या पार पाडता पाडता प्रत्येक जण थकून जावा अशी आपल्या समाजाचीइच्छा आहे असे वाटते. ह्या जबाबदार्याव पार पाडल्या की माणसाचे आयुष्य कारणी लागले, किंवा त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असे मानले जाते. पाश्चात्त्य समाजात त्या जबाबदार्याय कोणा एका व्यक्तीच्या नसतात, पण ती कामे तर होतात. तेव्हा त्या जबाबदाच्या बिरादरी पार पाडत असली पाहिजे असे मला वाटले.
भारतीयांचे आयुष्य ही त्या जबाबदार्यांिमुळे एक अडथळ्यांची शर्यत (hurdle race) होऊन बसली आहे. हे सर्व अडथळे मानवनिर्मित आहेत व आम्हीच ते सारे बिरादरीच्या भावनेच्या अभावामुळे निर्माण केले आहेत. आम्ही आमच्या समाजाची घडीच तशी पाडली आहे. किंबहुना आम्हाला नकळत ती पडली आहे.
निरनिराळ्या कारणांमुळे ज्या काही पद्धती समाजात पडून जातात त्यांच्या पलीकडचे, त्यांच्यापेक्षा निराळे मानवी मनश्चक्षूना सहजपणे पाहता येत नाही. मनांना लागलेल्या सवयींमुळे माणसांच्या मनोविश्वात ईश्वराचा अभाव, स्त्रीपुरुष-समता, सार्वजनिक किंवा सामाईक संपत्ती, बहुपतिपत्नीकत्व अशा विषयांना, कल्पनांना स्थान नसते. त्यामुळे त्यांना जात, धर्म, देव, दैव, पैसा ह्यापलिकडचे काही दिसत नाही. अशा विषयांचा विचार करताना त्यांच्या मनाची पाटी पुसून टाकून ती त्यांना कोरी करता येत नाही. त्यामुळे त्यांचे वर्तन गतानुगतिक असते. नवनवीन वस्तूंचे शोधसुद्धा अशा गतानुगतिक समाजांमध्ये कमीच लागतात. असे समाज परक्या समाजांच्या संपर्कात आल्यावर काही गोष्टी शिकतात, पण त्यांची गती मंद असू शकते. नवनिर्मितीच्या बाबतीत एकूणच हे समाज कमी पडतात. जितक्या श्रद्धा दृढ तितका परंपरेबद्दल अभिमान अधिक व गतानुगतिकताही अधिक. पण ह्याविषयी अधिक अध्ययनाची गरज आहे हे नक्की.
जे लोक थोडेफार चाकोरीबाहेर जाऊन विचार करू शकतात तेच नवे शोध लावू शकतात. तेव्हा सर्जनशीलता म्हणजे काय तर आपल्या मनोविश्वात पूर्वी नसलेल्या वस्तूंचा, कल्पनांचा समावेश करणे. येथेच मी माझा एक मुद्दा पुन्हा मांडतो. तो हा की कुटुंबाचा आकार व जबाबदाच्या ह्या माणसाच्या त्या त्या काळातल्या आणि प्रदेशातल्या मनोविश्वामुळे ठरतात व कुटुंबामुळे मनोविश्व. हा उभयतांमधला अन्योन्याश्रय मलाआपल्या नजरेला आणून द्यावयाचा आहे.
आदर्श कुटुंबसंस्था हे फार दूरचे उद्दिष्ट आहे असे आज आपल्याला वाटते म्हणून
आपले प्रयत्नच त्या दिशेने होऊ नयेत असे नाही. मला त्या मार्गातला जाणवणारा अडथळा हा की आपणा सर्वांच्या मनाची तयारी त्या दृष्टीने झालेली नाही.
प्रा. देशपांडे म्हणतात की बिरादरीची भावना आपल्या देशात नाही ह्याचे कारणआपल्या राजकीय इतिहासात (गुलामगिरी वगैरेत) शोधणेच बरोबर. पण मला त्यांच्याअगदी उलट वाटते. आपल्या सर्वांच्या मनावर असलेला आपल्या कुटुंबसंस्थेचा व त्याचबरोबर जातिसंस्थेचा पगडा म्हणजेच बिरादरीच्या भावनेचा अभाव हेच माझ्या मतेआपल्या गुलामगिरीचे कारण आहे. हा गुलामगिरीचा परिणाम नाही.
आपल्या ढोंगीपणावर प्रा. मधुकर देशपांडे जे उपाय सुचवितात त्यांविषयीसुद्धा माझा थोडा मतभेद नोंदविण्याची मला गरज वाटते.
आपल्या देशातील भ्रष्टाचार आपल्या बिरादरीच्या जाणिवेच्या अभावामुळे होतो अशी माझी खात्री आहे. एका बाजूला उत्तुंग इमारती आणि त्यांना चिकटून झोपडपट्ट्या ह्यांचे एका ठिकाणी होणारे दर्शन आपल्याकडे येणार्याी परदेशी पाहुण्यांना अतिशय चमत्कारिक वाटते हे प्रा. देशपांड्यांना माहीत असावे. त्यांच्याकडे वंशभेद आहे, गौर आणि गौरेतर असा फरक आहे. पण सर्व गौरांच्या राहणीमानात फार मोठा फरक तेथे नसावा. श्रीमंती आणि राहणीमान ह्या दोहोत मी फरक करतो. श्रीमंतांना साधारणतया दुप्पट मोठी घरे आणि बँकेत त्यांची शिल्लक मोठी. पण अन्न, वस्त्र, वाहतुकीच्या, शिक्षणाच्या सोयी ह्यांत फार फरक गौर मध्यमवर्गीयांत व श्रीमंतांत नाही अशी माझी माहिती आहे. हे फक्त त्यांच्यातील civic sense मुळे घडू शकत नाही; त्याच्या पलीकडे जाणार्याक एका भावनेमुळे घडते असे मला वाटते. त्या भावनेलाच मी बिरादरी म्हणतो. आंधळ्यांसाठी स्पर्शलिपी, बहिन्यांसाठी काही खुणांचे प्रमाणीकरण हे पहिल्याने पाश्चात्त्य देशांत सुरू झाले हे आपणास नाकबूल करता येणार नाही. आमचे वसुधैव कटुंब तेथे उपयोगी पडले नाही. उलट ‘ठेविलें अनन्ते तैसेचि राहावे, चित्तीं असों द्यावें समाधान’ ही आमच्या संतांची शिकवण परस्परांसाठी आम्ही झटण्याच्या आड आली, किंवा असे म्हणू या की संतांच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही एकमेकांना जिवंत ठेवण्यासाठी मदत केली, पण कुटुंबीयांच्या पलीकडे जाऊन परस्परांच्या भौतिक उत्कर्षासाठी ती कधीच केली नाही. उलट त्या बाबतीतआम्ही एकमेकांचे पायच ओढले.
बिरादरीची भावना निर्माण करण्यात जर आम्ही यशस्वी झालो तर परिवहनमंडळ, वीजमंडळ, दूरसंचार अशा खात्यांमधली बाबूमंडळी खाबूगिरी करणार नाहीत. आजही तीआपल्या निकटवर्तीयांकडून म्हणजे प्रत्यक्ष कुटुंबीयांकडून लाच खात नसावीत. प्रा. देशपांड्यांनी सुचविलेल्या स्वयंसेवी एजंटांना मात्र ती मंडळी आज मारहाण करून हुसकून लावतील, सळो की पळो करतील व नियमाने काम करणे अशक्य करतील ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही. तेव्हा बिरादरीची भावना वाढीस लागावी ह्यासाठी वाचकांनी आणखीकाही सूचना कराव्या इतकीच सध्या विनन्ती आहे.
– दिवाकर मोहनी
मोहनीभवन, बारलिंगे मार्ग, धरमपेठ, नागपूर – ४४००१०
संपादक
आजचा सुधारक,
स. न. वि. वि. माफ करा; परंतु आज मला दि. य. देशपांडे ह्यांचेवर टीका करणे भाग आहे. प्रा. देशपांडे मार्च ९६ च्या अंकात म्हणतात, “कॉन्व्हेंट शाळेत शिकलेली मुले सोडली तर इंग्रजी जवळपास बंद आहे. त्यामुळे इंग्रजी ग्रंथांचे वाचन होत नाही आणि म्हणून शिक्षणाचा दर्जा घसरला आहे इ. -”
मला माहीत असलेले शिक्षणतज्ज्ञ प्रा. वि. गो. कुलकर्णी, संचालक होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुम्बई हे आहेत. त्यांच्या मते “प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे, कारण शैशवात मुले भावनिक असतात; त्यांना काऊ, माऊ, चिऊ बद्दल जशी आपुलकी असते तशी क्रो, कॅट, स्पॅरोबद्दल नसते. ती स्पेलिंगमध्ये अडकतात व फक्त पाठांतर करतात. अंडरस्टैंडिंग होत नाही. अवांतर वाचन कमी होते इ.”
गेल्या पन्नास वर्षांत बारावीच्या परीक्षेतील मानकर्यां त आलेले कॉन्व्हेंटचे विद्यार्थी नगण्य आहेत. ते टॅश वाचतात. त्यांच्यातून एकही तत्त्वज्ञानाच्या किंवा कसल्याच विषयाला वाहून घेतलेला विद्वान नाही. हल्ली अनेक शाळांतून तिसरीपासूनच आठवा विषय इंग्रजी असतो.
राजवाड्यांना मान मिळतो; कारण त्यांनी राजांचा इतिहास न लिहिता समाजाचा इतिहास लिहिण्यास सांगतिले. आज समाजशास्त्राचा अभ्यास होत नाही. दलित साहित्यिक स्वतःची चरित्रे लिहितात. ती चटकदार असल्याने खूप खपतात. पण केतकर, राजवाडे, रघुनाथ कर्वे इ. प्रमाणे एखाद्या विषयाला वाहून घेतलेला दलित कोठे आहे?शहाबानो’ बद्दल गळा काढणारे हिंदुत्वनिष्ठ विद्वान “भंवरीदेवी” बद्दल गप्प बसतात. लक्ष्मी व सरस्वतीचे वैर जुनेच आहे. आज सर्वांना लक्ष्मी हवी आहे.
आज आपल्याकडील अनेक बुद्धिजीवींची मुले, मुली, भाऊ, बहिणी अमेरिकेतआहेत. त्यांच्या मनोवृत्तीचा प्रभाव इथल्यांवर पडतोच. हरदयाळ किंवा खानखोजे आज अमेरिकेत नाहीत. आज अमेरिकेत जे भारतीय आहेत, त्यांचे शिक्षण भारतीय संस्कृतीत उच्च दर्जाचे झाले. परंतु अमेरिकन संस्कृतीत त्यांची मुले मात्र शिकत नाहीत. आज त्यांना त्यांच्या मुलांना भारतात शिकवावयाचे आहे (टाइम्स १२ फेब्रु. ९६). म्हणून ते अनिवासी भारतीय भारतात येत आहेत आणि भारत सरकार त्यांच्यासाठी ‘रेड कार्पेट” अंथरत आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण असे की प्रा. देशपांडे ह्यांना जे वाटते की “इंग्रजीची पिछेहाट झाल्याने तत्त्वज्ञानाचे अभ्यासक घटले” ते खरे नाही हे त्यांच्या लक्षात यावे. माझा मुलगा जिल्ह्यात पहिला असे. त्याच्या प्राथमिक शिक्षकांबद्दल आम्हाला आदर होता. नातूसुद्धा पहिले येतात पण त्यांना घरी शिकवितो. त्यांच्या शिक्षकांना गाईडबाहेरचे काही येत नाही.
पायलटला दोन लाख पगार, एम्.बी.ए. ला एक लाख, शिवाय बंगला, मोटार इ. वार्ताहरांनासुद्धा मेजवान्या, क्रिकेटपटूना मोटारी बक्षिस मिळतात. टीव्हीवरील मालिकांना बक्षिसे असतात. विमान कंपन्या, विमा, मोठमोठे उद्योग इ. सोडून नव्वद टक्के मार्क्स मिळविणारा विद्यार्थी शिक्षणक्षेत्रात कसा येणार? आज बँका, सरकारी, खाजगी किंवा शिक्षण क्षेत्रांत १९८० नंतर आलेले सर्वजण साठ टक्क्याहून कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थीआहेत. त्यांचे शिक्षण कोणत्या भाषेत झाले ही बाब दुय्यम होय.
दुसरे असे की मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची तरी जाण असते. कॉन्व्हेंटच्या मुलांना तीपण नसते. शासनाने पैशाचे महत्त्व कमी केल्यावाचून समाजजीवन सुधारणार नाही.
कळावे.
‘तत्त्वबोधठ’ चेक नाका, हायवे, नेरळ ४१० १०१ आपला
केशवराव जोशी
संपादक,
आजचा सुधारक
श्री. पु. वि. खांडेकर यांचा ‘रहस्य, जीवोत्पत्तीचे’ -(एप्रिल १९९६) हा लेख वाचला. ‘Life is an island in the ever-increasing ocean of entropy’या विधानाचे सुंदर स्पष्टीकरण दिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
श्री. खांडेकरांनी जीवसृष्टीसाठी आवश्यक बाबी’ ह्या मथळ्याखाली लिहिलेले जीवसृष्टीचे गुणधर्म हे मानवाला सभोवताली दिसणाच्या (पृथ्वीवरील) जीवसृष्टीवर आधारलेले आहेत. उदा. कर्ब संयुगे (organic compounds). ब्रह्मांडाच्या एखाद्या कोपर्यालत एखाद्या दुसर्याक मूलद्रव्यावर आधारित जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते. कॉम्प्युटरमध्ये वापरले जाणारे सिलिकॉन हे मूलद्रव्य सारणीत (periodic table) कार्बनच्या गटात असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांत विलक्षण साम्य आढळते. सजीव सृष्टीचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ‘बुद्धिमत्ता’ (intelligence) ही जशी कर्ज संयुगांवर अवलंबून आहे तशीच कृत्रिम किंवा मानवनिर्मित ‘बुद्धिमत्ता’ (artificial intelligence) ही सिलिकॉन वा तत्सम पदार्थावर पूर्णपणे अवलंबून आहे. तेव्हा वेगळ्या मूलद्रव्यांवर आधारलेली वेगळ्या तपमानात आढळणारी जीवसृष्टी सापडणे अशक्य नाही.
जीवसृष्टीचे महत्त्वाचे गुणधर्म कोणते: जन्म, मृत्यु, पुनरुत्पादन, चयापचय, ‘बुद्धिमता’, पर्यावरणाशी समरूपता आणि संदेशवहन (communication).
आता आपण संदेशवहनाकडे वळू या. अमीबासारख्या आदिजीवापासून ते सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत मानवापर्यंत संदेशवहनाचे रूप बदलते, पण महत्त्व वाढतच जाते.‘आपण ह्या ब्रह्मांडात एकाकी आहोत काय’? (Are We Alone in this Universe?’) या प्रश्नाचे उत्तर दोन सजीव सृष्टींमधील संदेशवहनाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. दुसर्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असल्यास, पृथ्वीवरून त्यांना संदेश पाठवण्याचे आजचे एकमेव साधन म्हणजे रेडिओ लहरी. याचा अर्थ ज्या जीवसृष्टी रेडिओलहरी ग्रहण वा प्रक्षेपित करू शकतात त्यांच्याबरोबरच आपण संपर्क साधू शकतो. म्हणजेच अतिप्रगत वा अविकसित जीवसृष्टींशी संपर्क साधणे कठीण आहे. उदा. एखाद्या ग्रहावर जर मुघलकालीन समाजस्थिती असेल (१६-१७ व्या शतकातील मानव) तर रेडिओलहरींचे ग्रहण करण्याची क्षमता नसल्याने संदेशवहन अशक्य ठरेल. तसेच अतिप्रगत वसाहतीने रेडिओलहरींऐवजी न्यूट्रिनों द्वारा (एक मूलभूत कण) आज आपल्याला संदेश पाठवला तर आपल्याला त्या संदेशाचा योग्य अर्थ लावता येणार नाही.
जेव्हा अमेरिका व रशिया या महासत्तातील शीतयुद्ध रंगात होते तेव्हा परग्रहावर सजीवसृष्टीचा शोध घेणारे शास्त्रज्ञ अण्वस्त्रांविषयी एक वेगळाच विचार मांडत होते. जर इतरत्र आढळणाच्या जीवसृष्टींचा विकास हा पृथ्वीवरील जीवसृष्टीप्रमाणेच असेल तर प्रगत जीवसृष्टींचा अणुयुद्धात संहार झाला असेल’ हा निराशावादी विचार अजून अनेक शास्त्रज्ञांना भेडसावतो.
शेवटी, पृथ्वीबाहेरील सजीवसृष्टी शोधणाच्या शास्त्रज्ञांसमोरील आणखी एकासमस्येचा उल्लेख करणे आवश्यक आहे. आता ‘बुद्धिमत्तेचा विचार करू या.
भारतीय तत्त्वज्ञानात ‘आत्मा अमर आहे’ असे म्हटले गेले तरी शरीराचे महत्त्व ‘अधिष्ठान’ म्हणून मानले गेले आहे. बुद्धिमत्ता’ असण्यासाठी ह्या अधिष्ठानाची गरज आहे का? सजीवसृष्टी ही ‘शारीरिक’ असली पाहिजे का? ‘बुद्धिमत्ता’ हा ब्रह्मांडाचा अंतर – व काल – दर्शक गुणधर्म (space-time property) असू शकतो का?
आजचा सुधारकच्या बुद्धिवादी’ वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.
हेमंत आडारकर
२०२, राम निमी ८ मंडलिक रोड, कुलाबा मुंबई ४०० ००१
श्री. संपादक,
आजचा सुधारक स. न. वि.
एप्रिल ९६ च्या अंकात श्री. दि. य. दे. यांनी श्री. स. ह. देशपांडे यांना दिलेले उत्तर वाचले. मला ते उत्तर वितंडवादीपणाचे वाटले कारण असे की स. ह. दे. यांनी मार्च अंकातील त्यांच्या लेखात जी महत्त्वाची अशी दोन विधाने केलेली आहेत ती दुर्लक्षून दि. य. दे. यांनी आपले ठरीव ठशाचे विवेचन मांडले आहे. ती दोन विधाने अशी –
(१)पृष्ठ ३७४, ‘धर्म हे मानवी घटित आहे – प्रेषित कितीही सांगो की त्याला आकाशातून आदेश आले, पण धर्म आभाळातून पडत नाही हे खरेच आहे.”
(१)पृष्ठ ३७८ – ‘धर्मसुधारक जर विवेक-निष्ठेचा आश्रय आंशिकच करीत असतील तर त्यात एक प्रकारचा अप्रामाणिकपणा आहे हे दि. य. दे. यांचे म्हणणे अर्थातच मान्य करावे लागते. तूर्त आपण असे म्हणू या की हा अप्रामाणिकपणा ते जनतेच्या कल्याणासाठी करतात.’
वरील दोन विधाने ध्यानात घेऊन जर दि. य. दे. यांनी उत्तर लिहायचे ठरवले असते तर पुष्कळसा अनावश्यक मजकूर त्यांनी लिहिला नसता. दुसरी कोणी व्यक्ति काय म्हणते आहे ते पुरे ऐकून घेण्याआधीच आपले साचेबंद विचार पुढे दामटणारे लोक नेहमीआढळतात. दि. य. दे. यांचे उत्तर तशाच प्रकारचे आहे.
दि. य. दे. यांनी पृष्ठ ६ वर निकराला येऊन प्रश्न टाकला आहे की, ‘बाकीच्यांच्या राहू द्या, पण तुम्हाला तरी मी म्हणतो ते पटते की नाही ते सांगा’. दि. य. दे. याचे हे म्हणणे त्या अहितकारक का तर तशा श्रद्धांचे मूळ ईश्वर या संकल्पनेत असते, आणि ईश्वर ही संकल्पना त्याज्य आहे म्हणून.
इथे थोडासा वकिली थाटाचा प्रश्न मी उपस्थित करतो. श्रद्धा या शब्दामागे धार्मिक हे विशेषण ज्याअर्थी दि. य. दे. यांनी जोडले आहे, त्याअर्थी काही श्रद्धा निधार्मिक स्वरूपाच्या असतात हे त्यांना मान्य असलेच पाहिजे. म्हणजे मग अशा दोन्ही प्रकारच्या श्रद्धांपैकी कोणती श्रद्धा अहितकारक व कोणती हितकारक हे ठरवण्यासाठी कसोटी कोणती वापरायची? दि. य. दे. यांच्या मतानुसार, जी श्रद्धा ईश्वराशी जोडली आहे ती अहितकारक समजावी. मला ही कसोटी विचित्रच वाटते. निधार्मिक श्रद्धांच्या मुळे सुद्धा काही वेळा समाजाचे नुकसान झालेले आहे हे मला सांगावेसे वाटते. वादाला फाटे फुटू नयेत म्हणून त्यांची चर्चा मी करीत नाही. मूळ मुद्दा धार्मिक श्रद्धांचा आहे. त्या श्रद्धा अहितकारक आहेत असे का म्हणायचे याचे एक कारण मला जे दिसते ते असे आहे की तशा श्रद्धा ईश्वराशी जोडलेल्या असल्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा केलेली लोकांना आवडत नाही. त्यावर उपाय काय तर तसल्या श्रद्धाच आम्हाला नकोत असे म्हणायचे! शेवटी हा प्रश्न उरतोच, की हे सगळे प्रबोधन कुणासाठी?हस्तीदंती मनोच्यावर बसलेल्या व स्वानंदात मग्न असलेल्या चार दोन विद्वान लोकांसाठीच?आद्य शंकराचार्यांना अद्वैत मनापासून पटले होते तरीही त्यांनी पंचायतन पूजा, शारदांबेची पूजा, अशा गोष्टी लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रचारात आणल्या असे म्हणतात. चार दोन उच्च श्रेणीच्या विचारवंतांना पटलेली तत्त्वे त्यांच्या पुरतीच असतात. त्यांचे मूल्य केवळ अॅकेडेमिक स्वरूपाचे असते. असो.
२ वासवी, २१०१ सदाशिव पेठ मा. श्री. रिसबूड
पुणे ४११ ०३०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.