अनेकदा व्यक्त केली जाणारी ‘सर्वांनी सुखी असावे, कोणी दुःखी असू नये’ ही अपेक्षा उदात्तच आहे. परंतु जगात सहसा असे असत नाही. काही जण सुखी झाले, तर काही जणांच्या वाट्याला दुःख येतेच. ज्याच्या वाट्याला दुःख असेल त्याला धीर देणे, दिलासा देणे व त्याचे दुःख हलके किंवा दूर करण्याचा प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हाती असते. ते केले नाही, तरी त्याच्या दुःखाने दुःखी होऊन त्याच्याशी समरस होणे शक्य असते. त्याच्या दुःखामध्ये आनंद किंवा त्याउलट त्याच्या सुखामध्ये दुःख मानणे ही मात्र विकृती आणि अशी विकृती तो मनुष्य दुसर्याय, विशिष्ट धर्माचा असल्यामुळे आपल्या मनात निर्माण होत असेल तर अशा विकृतीला जन्म देणाच्या घटकाला आपणधर्म मानू शकत नाही. त्याला धर्म मानणे हेच त्याच्या स्वधर्मानुसार योग्य असेल तर अशा धर्मापलीकडे जाणे हे आपले कर्तव्यच ठरते. शिवाय धर्माच्या रक्षणासाठी रक्तपात व हिंसाचार केला जात असेल किंवा करावा लागत असेल आणि द्वेष-क्रोध इत्यादि विकारांचे थैमान माजवावे लागत असेल, तर अधर्म कशाला म्हणतात याचाही खुलासा कोणी केला तर बरे होईल.