काही दिवसांपूर्वी माझ्या एका विद्यार्थी मित्राचे पत्र आले. त्यात त्याने लिहिलेल्या ‘बैंडिट क्वीन’वरील प्रसिद्ध झालेल्या लेखाचे कात्रण होते. तो लेख वाचला, मनापासून आवडला, तसे त्याला कळविले अन् सिनेमा पाहण्याचे ठरविले. तोवर सिनेमा पाहावा हे तीव्रतेने जाणवले नव्हते. कुटुंबीय आणि इष्ट मित्रांसह सिनेमा पाहून आलो. परवा घातलेली बंदी वाचून आपण सिनेमा पाहण्याची संधी हुकवली नाही ह्याचे समाधान वाटले. नाहीतर एक अतिशय भेदक वास्तव कलाकृती पाहायचे राहूनच गेले असते.
‘बैंडिट क्वीन’ ही फूलनदेवीची जीवन कहाणी! लहान, अल्लड, निरागस फूलनचा डाकूची राणी बनण्यापर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास त्यात दाखवलेला. (मधले काही प्रसंग कापल्यामुळे सलगता खंडित होते.) सिनेमा पाहताना पडद्यावरील व्यक्तींशी आपण स्वतःला कधी एकरूप करून घेतो हे कळतच नाही. विवाह म्हणजे काय हे समजण्याचेही वय नसलेल्या निरागस फूलनचा (चिमुरड्या मुलीने केलेले हे काम अतिशय सुंदर आहे.) तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या व्यक्तीशी करून दिलेला विवाह! ‘सुहाग रात’ (?) च्या दुसऱ्या दिवशी कोपऱ्यात बसलेली अन् केविलवाणेपणाने ‘पोटात दुखतंय सांगणारी फूलन! हे पाहून मन गलबलले. अशावेळी प्रेमाने कोणीतरी जवळ घेऊन, मायेने समजाविण्याऐवजी निर्दयपणे तिचा नवरा ‘हे असं होतच असतं, ऊठ, कामाला लाग’ हे सांगतो तेव्हा त्याच्या हृदयशून्यतेची चीड येते.
खालच्या जातीत जन्मलेली फूलन हळूहळू मोठी होताना (हे काम सीमा विश्वासने अपार कष्ट घेऊन जिवंत केले. तिने फूलनला स्वतःत सामावून घेतले आहे.) तिला तथाकथित उच्चभ्रू समाजाकडून आलेले अनुभव, मिळालेली वागणूक याचा प्रतिकार म्हणून ती सूडाने पेटून उठते व आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी लुटालूट करणे, खून करणे हा डाकूचा मार्ग स्वीकारते. (तिने स्वीकारलेला हा मार्ग योग्य की अयोग्य?हा प्रश्न विचारणाऱ्यांनी जरा आपल्या सुरक्षित कोषातून बाहेर येऊन पाहावे.)
तथाकथित उच्चभ्रू समाजाशी तिने केलेल्या मुकाबल्यासाठी अर्थातच तिला शिक्षा होते. एक खालच्या जातीत जन्माला आलेली स्त्री आमच्याशी टक्कर घेते म्हणजे काय?शिक्षा म्हणून तिला विवस्त्रावस्थेत विहिरीवर पाणी भरायला पाठविले जाते. गावातल्या लोकांसमोर, ठाकुरांना केलेल्या विरोधाला काय जबर शिक्षा होऊ शकते, हे दाखविण्यासाठी तिची अवहेलना केली जाते. हे सर्व प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना मन गोठूनगेले. तुम्ही अन्याय करणार, त्याला कोणी विरोध करू नये अन् केला तर ही शिक्षा! या विचाराने मन प्रचंड अस्वस्थ होते. (या नग्न दृश्याने म्हणे पुरुषांच्या कामुक भावना उफाळतात असा आरोप केला गेला. माझ्या मित्रांनी त्यांची अतिशय प्रामाणिक प्रतिक्रिया नोंदविली की तसे काहीही वाटत नाही.) स्त्रीला पुढून नग्न दाखविणे धार्ष्ट्याचे खरेच, पण ते पाहताना आपण काहीतरी अश्लील पाहतोय असे चुकूनही वाटत नाही. उलट त्या स्त्रीची ही विटंबना करणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू समाजाबद्दल चीडच उत्पन्न होते. दिग्दर्शकाने अतिशय कलात्मकतने या प्रसंगाची तसेच सामूहिक बलात्काराच्या दृश्याची हाताळणी केली आहे. एकामागून एक येऊन त्या निपचित पडलेल्या देहावर अत्याचार करताना आजही स्त्रीच्या ह्या असहाय अवस्थेत काही फरक पडला आहे काय? हा विचार मनात आला आणि कमालीची विषण्णता जाणवली. (भंवरीदेवी या ग्रामसेविकेवरील अत्याचारांची कहाणी ताजी आहे.)
फूलन दरोडेखोर असली तरी तिच्यातल्या स्त्रीचे कोमल मन मेलेले नाही. लुटालुटीत घेतलेली चांदीची तोरडी रस्त्यात दिसणाच्या लहान मुलीला ती सहजपणे देऊन टाकते; केव्हातरी घरी येते तेव्हा बहिणीचे लहान मूल कडेवर घेऊन खेळवते, त्याला खेळवताना आईकडे लक्ष जाते, अन् ती गहिवरून आईला भेटते, बिलगते.
या चित्रपटाची भाषा समजत नाही. दृश्येच बोलकी आहेत त्यामुळे भाषेची फारशी अड़चण भासत नाही हे खरे. परंतु काही प्रसंगी ती समजावी असे वाटते. उदा. पंचायतचा प्रमुख जे बोलतो ते नक्कीच खोटे असणार, कारण फूलनचा त्वेष तिच्या चेहऱ्यावर दिसतो. पण तो नेमके काय बोलला?
९ मार्चला चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. (८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन झाला. दुर्दैवी योगायोग!) कारण त्यात स्त्रीदेहाची विटंबना दाखविण्यात आली. (पडद्यावरील विटंबना दाखविण्यावरील बंदीची मागणी करणाऱ्यांनी प्रत्यक्षात होणारी स्त्रीची विटंबना थांबविण्यासाठी चार पावले उचलली तर बरे होईल.) आणखी एक कारण म्हणजे गुज्जर ठाकूर समाजातील एक व्यक्ती बलात्कार करताना दाखविलेली आहे, त्यामुळे त्या समाजातील व्यक्तींची बदनामी झाली म्हणे! ह्या युक्तिवादाला काय म्हणणार? प्रत्येकच समाजात सुष्ट/दुष्ट प्रवृत्तींची माणसे असतात. महात्मा गांधींची हत्या करणारा ब्राह्मण होता म्हणून पूर्ण ब्राह्मण समाज खुनी ठरत नाही, इंदिरा गांधींची हत्या करणारा शीख होता म्हणून पूर्ण शीख समाजाला कोणी दोष लावीत नाही. ही अपवादात्मक माथेफिरू माणसे समाजाचे नेतृत्व करणारी नसतात.
चित्रपटावर बंदी घालण्यात यावी ही मागणी करणाऱ्यांच्या आणि ती मान्य करणाऱ्यांच्या दोहोंच्याही वैचारिक पातळीची मात्र कीव करावीशी वाटते.