नोव्हें. ९५ च्या आजच्या सुधारकात ज्ञान मिळवण्याच्या मार्गाबद्दल “सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे” या नावाचा एक लेख मी लिहिला. “The price of liberty is eternalvigilance” या वचनाचे भापांतर शीर्षक म्हणून वापरले. विवेकवादी भूमिकेतून साक्षात्कार व अंतःस्फूर्ती हे ज्ञान कमवायचे मार्ग कसे दिसतात, ते पहायचा प्रयत्न होता. असे काही मार्ग आहेत, हे एकदा मान्य केले, की त्या मार्गांनी मिळालेले ज्ञान खुद्द ज्ञानार्जन करणारा सोडून इतरांना “बाबावाक्य म्हणून मान्य करावे लागते. हा अखेर विवेकवाद्याच्या स्वातंत्र्यावर घाला ठरतो. म्हणून अशा ज्ञानमार्गाबाबतचे दावे फार काळजीपूर्वक तपासायला हवेत, असा लेखाचा सूर होता.
सोबत हेही जाणवत होते, की केवळ साक्षात्कार व अंतःस्फूर्ती यांच्याबाबतच पहारा देण्याची गरज आहे, असे नाही. विवेकवाद ज्या वैज्ञानिक पद्धतीला मान देतो, त्या पद्धतीने हाती आलेले निष्कर्षही तपासूनच घ्यायला हवेत. हे स्पष्ट करणारी एक कहाणी खाली देतआहे.
पाव्हलोव्ह या रशियन शास्त्रज्ञाने उंदरांवर काही प्रयोग केले. उंदरांना आधी घंटा ऐकवायची, आणि मग जरा वेळाने अन्न द्यायचे, असे केले गेले. उंदरांना घंटानाद ही जेवण येत असल्याची खूण आहे, हे उमगायला किती वेळ लागतो, ते तपासले जात होते. सुमारे तीनशे वेळा घंटा-आणि-खाद्य हा क्रम वापरल्यानंतरच उंदरांना हे तंत्र उमगल्याचे दिसले. ते घंटा वाजताच खाद्य मिळायच्या जागी जाऊन तयारीत उभे राहू लागले. याच उंदरांच्यापिल्लांनाही असेच शिकवले गेले. पण या उंदरांना मात्र जेमतेम शंभरेक आवर्तनांनंतर घंटा,आणि जेवण यातला संबंध समजला. या प्रयोगावरून पाव्हलोव्हचा निष्कर्ष असा, की उंदरांना शिकवलेली गोष्ट त्यांच्या पिल्लांना “आपोआप” (बहुधा आनुवंशिक) यंत्रणेने समजते.
पाव्हलोव्हच्या काळच्या जीवशास्त्रात एक मोठा वाद झडत होता, आणि या प्रयोगाचा त्याच्याशी थेट संबंध होता. डार्विनने उत्कांतीमागे नैसर्गिक निवडीची यंत्रणा असते, हे सुचवण्याआधी एक वेगळी यंत्रणा सुचवली गेली होती. तिचे तांत्रिक नाव आहे “इन्हेरिटन्स ऑफ अॅक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स”. एखादी व्यक्ती आयुष्यभरात जे काय कमावते, ते आनुवंशिकतेने तिच्या पिल्लांमध्ये उतरते, अशी ही कल्पना. इथे “व्यक्ती म्हणजे वनस्पती, प्राणी, जे काही सजीव असेल ते, असा अर्थ आहे. खुद्द डार्विनच्या मतात ही वारशाची कल्पना बसणेही अशक्य नव्हते. पण डार्विनच्या मागून येणारे नवडार्विनवादी” मात्र ही यंत्रणा मानत नव्हते.
याला कारणेही सबळ होती. डार्विनच्या काळी, किंवा कमाईचा वारसा सुचवणाच्या लामार्कच्या काळी आनुवंशिकतेची यंत्रणा माहीत नव्हती. नव-डार्विनवाद जोमात आला, तेव्हा अशी यंत्रणा समजायला लागली होती. आणि त्या यंत्रणेत व्यक्तीच्या आयुष्यातील कोणत्याही व्यवहारामुळे संततीकडे जाणारे गुणधर्म बदलत नाहीत. आज हे रेणु-जीवशास्त्राने अधिकच स्पष्ट केले आहे. आज असे मानले जात नाही, की मी व्यायाम केला तर माझी मुलेही “तंदुरुस्त होतील. फार तर मला व्यायामाची आवड आहे, या मागील जे गुणधर्म आहेत, ते माझ्या मुलांमध्येही असायची (एक पन्नास टक्के) शक्यता आहे येवढेच आजचे
आनुवंशिकतेचे ज्ञान सांगते.
पाव्हलोव्हने मात्र आपल्या प्रयोगांमुळे लामार्कच्या मताला पुष्टी मिळते, असे जाहीर केले. त्याच्या काळचे रशियन विज्ञान लायसेंको या लामार्कवादी शास्त्रज्ञाच्या पगड्याखाली होते. लामार्कचे मत साम्यवादाशी जुळते आहे, आणि डार्विनवाद तसा नाही, अशी तेव्हाची धारणा होती. यामुळे पाव्हलोव्हच्या प्रयोगांवर जास्त चर्चा, पुढचे प्रयोग, वगैरे काही झाले नाहीत.
इतर जगात मात्र नव-डार्विनवाद जास्त जास्त मान्य होत होता, तर लामार्कमत अमान्य होत होते. आणि याची हार्वर्ड विद्यापीठातल्या विल्यम मॅकडुगल (MacDougall) या मानसशास्त्रज्ञाला जाणीव होती. तो होता लामार्कवादी, पण खरा वैज्ञानिक वृत्तीचा, प्रयोगातून लामार्कवाद प्रसिद्ध ठरला, तर सोडून द्यायची तयारी असलेला. त्यानेही पाव्हलोव्हसारखा प्रयोग रचला.
इथे घंटा-अत्र संबंध शिकवणे नव्हते, तर एका पाण्याच्या टाकीतून पळवाट शोधणे शिकवायचे होते. इथेही उंदरांवरच प्रयोग केला गेला. त्यांना पळवाट शोधणे शिकवलेगेले, आणि यासाठी लागणारा वेळ मोजला गेला. आणि नंतर हाच प्रयोग “प्रशिक्षित उंदरांच्या पिल्लांवरही केला गेला. मॅकडुगलला अपेक्षित होता, तसा पिल्लांना मूळ उंदरांपेक्षा कमी वेळ लागला. आईबापांचे शिक्षण अपत्यांमध्ये उतरते, असा निष्कर्ष निघाला. पण मॅकडुगलच्या मनात शंका होतीच. प्रयोगाबाबतचा अहवाल देताना त्याने नोंदून ठेवले, “जर आमचे निष्कर्ष अग्राह्य असतील, तर त्यातील आम्हाला चकवणारी चूक आमच्या तरल (लामार्कवादी) पूर्वग्रहांमुळेच आलेली असेल, असे मला वाटते.” (if our results are not valid, the slaw, which has escaped our penetration hitherto, must, I think, be due to some subtle influence of this bias. 1927)
मॅकडुगलने प्रयत्नपूर्वक स्वतःचे पूर्वग्रह प्रायोगिक रचनेला व तंत्राला विकृत करण्यापासून दूर ठेवले होते. आणि तरीही त्याला या पूर्वग्रहांपासून मुक्त निष्कर्षाची खात्री नव्हती! पण मनमोकळेपणासाठी मॅकडुगलला “पैकीच्या पैकी गुण देऊनही त्याचे निष्कर्ष दूषितच होते! दोष मात्र लामार्कमतामुळे आलेला नव्हता, तर “नियंत्रण गट” (control group) ही संकल्पना न वापरल्याने आलेला होता. ही संकल्पना काटेकोरपणे वापरून जर मॅकडुगलने प्रयोग केला असता, तर त्याची रचना अशी राहिली असती :
(१) उंदरांचे दोन गट पाडा, क आणि ख.
(२) क-गटाला पाण्याच्या टाकीतून पळवाट काढणे शिकवा, आणि शिकायलालागणारा वेळ मोजा. याचवेळी ख-गटाला मात्र असे काही शिकवू नका.
(३) दोन्ही गटांना पिल्ले होऊ द्या. क-गटाच्या पिल्लांना च-गट म्हणा, आणि ख-गटाच्या पिल्लांना छ-गट म्हणा.
(४) आता या दोन गटांना पाण्यातून पळवाट शोधणे शिकायला लागणारा वेळ मोजा.
हा प्रयोग केला गेला. क-गटाला सगळ्यात जास्त वेळ लागला. च-गट आणि छ-गट यांना क-गटाहून कमी वेळ लागला – पण एकमेकांइतकाच वेळ लागला. म्हणजे पिल्लांना कमी वेळ लागला, पण यात आईबाप”प्रशिक्षित असण्या-नसण्याने फरक पडला नाही! मग कशाने फरक पडला?
हे समजायला तिसरा (आपल्यापुरता काल्पनिक) प्रयोग करू या. (१) उंदरांचे तीन गट पाडा, क, ख आणि ग.
(२) क-गटाला प्रशिक्षित करा, प्रशिक्षित होण्याला लागणारा वेळ मोजा. खगटाला प्रशिक्षित करू नका, पण प्रयोगशाळेतच ठेवा. ग-गटाला प्रयोगशाळेपासून दूर “नैसर्गिक वातावरणात ठेवा, जसे धान्यकोठार, गुरांचा गोठा, वगैरे.
(३)या तीन्ही गटांना पिल्ले होऊ द्या, आणि त्यांना अनुक्रमे च, छ आणि ज अशी नावे द्या.
(४) आता या गटांना प्रशिक्षण द्या, आणि यासाठी लागणारा वेळ मोजा.
आता लक्षात येईल की मुळात प्रयोगशाळेशी संबंध न आलेल्या क आणि ज गटांना सारखाचवेळ लागतो. प्रयोगशाळेतच जन्मलेल्या च आणि छ गटांनाही सारखाच वेळ लागतो. आणि च-छं ना क-जं पेक्षा कमी वेळ लागतो. म्हणजे आईबाप प्रशिक्षित असणे महत्त्वाचे नाही, तर प्रयोगशाळेत जन्मणे महत्त्वाचे आहे – आणि तेही फक्त शिकायला लागणाच्या वेळापुरतेच! आणि लामार्कमत अग्राह्यच आहे.
कितीही सजगपणा दाखवला, पूर्वग्रह टाळायचा कितीही प्रयत्न केला, तरी निष्कर्ष चुकतातच, असे मानावे का? सतत पहारा देऊनही “स्वातंत्र्य टिकवताच येत नाही का?अगदी “वैज्ञानिक पद्धतीतही हे अटळ आहे का? ।
फ्रान्सिस बेकनने ही “भीती” ओळखली होती. त्याने वैज्ञानिक ज्ञानपद्धतीला एक बंधन घातले. त्याने सांगितले, की कोणतेही मत न घडवता, कोणताही “वाद” न माजवता निरीक्षणे करावी आणि या निरीक्षणांवरूनच निष्कर्ष काढावे. बेकनचे म्हणणे पाळू इच्छिणारे अनेक जण आहेत, होते, असतील. न्यूटनने यावर आधारित “शपथ” वाहिलीHypotheses non fingo- मी अभ्युपगम घडवीत नाही.
वरकरणी हे “पावित्र्य राखणे योग्य, आवश्यक, मोहक वाटते. पण असे करणे मुळातच शक्य नाही! पाव्हलोव्ह-मॅकडुगलना लामार्कमत तपासायचे होते, आणि त्याला आवश्यक असेच प्रयोग दोघांनीही रचले. निष्कर्ष लामार्कला पूरक-मारक ठरणे सोडून द्या, प्रयोग मात्र लामार्कमतानेच घडले. न्यूटनला सुद्धा वस्तूंच्या हालचालींमध्ये काहीतरी मोजता येण्यासारखे असते असे वाटले, आणि त्यावर आधारित प्रयोगांमधूनच त्याने “गतीचे नियम” शोधले. न्यूटनला दोन वस्तू एकमेकांवर “कार्य करतात” असे वाटले. आणि याच्या तपासातूनच त्याला गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली.
म्हणजे माणसाच्या मनात काहीतरी धूसर, अस्पष्ट असे तत्त्व, असा अभ्युपगम असल्याशिवाय निरीक्षणे, प्रयोग वगैरे काही संभवत नाही – आणि कधीकधी या अभ्युपगमांना “पूर्वग्रह” मानावे लागते!
एकच उपाय दिसतो, की पूर्वग्रहांची जाणीव ठेवून त्यांचे दुष्परिणाम लक्षात ठेवून पहारा” वाढवणे!
(मार्च ९६ च्या अंकात श्री. देशपांडे यांनी माझ्या गणिताच्या ज्ञानाच्या मर्यादा दाखवल्या आहेत. त्यांचे सर्वच आक्षेप योग्य आहेत. धन्यवाद. खरे तर “सल्लागार” या भूमिकेतून त्यांना एक विनंती आहे. त्यांनी गोएडेलच्या प्रमेयावर लिहावे. आजच्या सुधारकाच्या वाचकांना ते बरेच “खाद्य पुरवू शकतील. ही विनंती “घंटा” समजावी!)