ज्याला लोक इतिहास समजतात तो म्हणजे ईजिप्त, बॅबिलोनिया, इराण, मॅसिडोनिया आणि रोम इत्यादींच्या साम्राज्यांपासून थेट आपल्या काळापर्यंतचा इतिहास. ते त्याला मानवाचा इतिहास म्हणतात, पण त्यांना अभिप्रेत असलेली गोष्ट. (जी ते शाळेत शिकतात) म्हणजे राजकीय शक्तींचा इतिहास होय.
मानवाचा इतिहास नाही; मानवी जीवनाच्या विविध अंगांचे अनेक इतिहास तेवढे आहेत. आणि त्यांच्यापैकी एक राजकीय शक्तींचा इतिहास आहे. त्यालाच जगाचा इतिहास असे भारदस्त नाव दिले जाते. पण हे मानवाच्या कोणत्याही शिष्ट संकल्पनेचा अधिक्षेप करणारे आहे असे माझे मत आहे. पैशाच्या अफरातफरींचा, दरवडेखोरीचा किंवा विषप्रयोगाचा इतिहास मानवजातीचा इतिहास मानण्यासारखे ते आहे. कारण सत्तांच्या राजकारणाचा इतिहास म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि सामूहिक खून यांच्या इतिहासाहून अन्य काही नाही. हा इतिहास शाळेत शिकविला जातो, आणि गुन्हेगारांच्या शिरोमणींची वीर म्हणून स्तोत्रे गायिली जातात.