स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक भारतीय व आशियामधल्या (बहुतेक) स्त्रीपुरुषांना समजणे कठीण जाते याचा प्रत्यय परत श्री गलांडे यांच्या (नोव्हें. ९५) पत्रातून आला. म्हणून परत लैंगिक मुक्ती व स्वैराचार ह्यांच्या (माझ्या) व्याख्या लिहिते.
लैंगिक स्वातंत्र्य अथवा मुक्ती असणे म्हणजे शरीरसंबंधास हो किंवा नाही म्हणण्याची संपूर्ण समाजमान्य मुक्तता.
स्वैराचार म्हणजे असंख्य मित्रमैत्रिणींशी अल्प परिचयात शरीरसंबंध, मजा म्हणून one night stand व वेश्यागमन.
स्त्रियांची अत्यंत हानी त्यांच्या लैंगिक पावित्र्याला अवास्तव दिलेल्या महत्त्वामुळे झालेली आहे. म्हणून मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे.
भारतात स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य किंवा मुक्ती असती तर एका धोब्याच्या वक्तव्यामुळे श्रीरामांनी सीतामाईचा त्याग केला नसता, द्रौपदीला भोगदासी करण्याची दुर्योधनाला हिंमत झाली नसती, सोळासहस्र नारींशी लग्न करण्याची श्रीकृष्णांना जरूरी पडली नसती, (बलात्कार झाले असते पण त्यामुळे बायका अपवित्र मानल्या गेल्या नसत्या), स्त्रियांना सती जावे लागले नसते, विधवांचे केशवपन झाले नसते, पाकिस्तान, बांगलादेश इथल्या स्त्रिया बलात्कारानंतरही अकलंकित राहिल्या असत्या व कुटुंबीयांनी त्यांचा स्वीकार केला असता, सावंतवाडी, जळगाव प्रकरणे झाली नसती.
लैंगिक स्वैराचार नीतीमुळे नव्हे, तर एड्समुळे आता शक्य नाही. अमेरिकेत मुलांना शाळांत शिकवतात, “if you have sex with one person, you are having sex with everyone your partner has had sex with.” लैंगिक स्वैराचाराला माझा नैतिक विरोध आहे, पण लैंगिक स्वातंत्र्य असलेल्या समाजात कुणी कुणाशी शरीरसंबंध ठेवायचे हा निर्णय वैयक्तिक असेल.
भारतीयांना स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक समजत नाही. त्याप्रमाणेच भारतीय पुरुष स्वैराचार करायला मुक्त आहेत असे म्हटले तर त्यांना पटत नाही.भारतीय पुरुषांचा स्वैराचार तो स्वैराचारच नाही” असे ते म्हणू लागतात. याचे उदाहरण डॉ. पंडित यांच्या (सप्टेंबर ९५) पत्रात सापडेल. ते म्हणतात, “वेश्यावृत्तीस लैंगिक स्वच्छंदता म्हणणे बरोबर नाही. तो स्वैराचार तर नाहीच नाही.”पुरुषांच्या स्वैराचाराचे समर्थनही भारतीय स्त्रीपुरुष अनेक मुद्दे मांडून करतात. उदा. पुरुषांची कामवासना स्त्रियांच्या तिप्पट असते,स्त्रिया ऋतुस्रावाच्या वेळी अपवित्र असतात, पुरुष हा नैसर्गिकरीत्या जास्त कामातुरअसतो, त्याच्या इच्छा पुन्या झाल्या नाहीत तर त्याच्या पुरुषत्वाला हानी पोचेल, पुरुषांना धमनिच अनेक समागम करण्याचा हक्क दिला आहे. कौटुंबिक शुद्धतेसाठी स्त्रियांवर बंधनेहवीत.
ह्या कल्पना भारतातच नव्हे तर बहुतेक पुरुषप्रधान समाजात प्रचलित होत्या. (त्याला काही अपवाद आहेत.) त्या आता पाश्चात्त्य देशांत थोड्याफार प्रमाणात बदलल्या आहेत.
एड्स् हा रोग का पसरतो आहे याबद्दल खूप माहिती उपलब्ध आहे. “पुरुष मोठ्या प्रमाणात वेश्यागमन करतात व HIV विषाणू आपल्या कुटुंबात पसरवितात” हा उल्लेख डॉ.पंडिताच्या पत्रातही (सप्टें. ९५) आहे. ह्या विषयावर जास्त लिहीत नाही.
आपण अनेक स्त्रियांशी संबंध ठेवून पत्नी मात्र “व्हर्जिन’ हवी या एशियन पुरुषाच्यादुटप्पी वर्तनाला माझा आक्षेप आहे.
‘एकता’त(टोरोंटो, कॅनडा, ऑक्टो.९५) नीला खेर यांचा लेख वाचावा. त्या“माझ्या लेकीचं लग्नँ” ह्या लेखात म्हणतात, “अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेले भारतीय तरुण म्हणतात अमेरिकेत शिकायला आलेल्या मुली मैत्रिणी म्हणून मजा मारायलाच ठीक आहेत. पण लग्न करायला नाहीत. त्यासाठी भारतातूनच बायको (आईच्या पसंतीची व्हर्जिन) नेलेलीबरी.”
स्त्रीमुक्तीचे विविध पैलू आहेत. पण स्त्रीचं लैंगिक पावित्र्य भारतीयांना येवढे महत्त्वाचं वाटतं की स्त्रीमुक्तीची चर्चा लैंगिक पावित्र्याच्या भोवर्याात गरगरत राहते हेआपले दुर्दैव.