दि. य. देशपांडे यांचा ‘धर्म, सुधारणा आणि विवेक (आ. सु., जानेवारी १९९६) हा लेख वाचून सुचलेले विचार पुढे मांडायचे आहेत.
दि. य. यांचे प्रतिपादन असे की ‘धर्म आणि ‘सुधारणा या शब्दांना एकत्र केल्याने ‘वदतो व्याघात होतो. कारण, ‘धर्म हा श्रद्धेवर म्हणजे पुराव्याशिवाय केलेल्या विधानांवर
आधारलेला असतो, उलट सुधारणा बुद्धीवर, विवेकावर आधारलेली असते, श्रद्धा आणि विवेक यांचा परस्पर विरोध असतो. ते म्हणतात, “मला मात्र धर्मसुधारणा ही कल्पनाच वन्ध्यापुत्र या कल्पनेसारखी दोन परस्परविरुद्ध कल्पनांच्या संयोगाने बनलेली संकल्पना वाटते.”
‘धर्मसुधारणा’ हा प्रकार तर्कतः अशक्य (वाटत) असला तरी तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहेच. दि. य. यांनाही हे मान्य आहे. लेखाच्या प्रारंभीच”हे धर्मसुधारणेचे युग आहे,” असे त्यांनी म्हटले आहे आणि नंतर काही धर्मसुधारकांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.
म्हणजे ‘वन्ध्यापुत्र आपल्याला पाहायला मिळतो! हे काय कोडे आहे?
या संदर्भात मला जे म्हणावेसे वाटते ते पुढीलप्रमाणे आहे.
(अ)
धर्म हे एक मानवी घटित आहे. याचा अर्थ असा की तो माणसांनीच तयार केलेला असतो. एका प्रेषिताने तयार केलेला असला तरी तो प्रेषित एका मानवसमूहाचाच घटक असतो. म्हणून कोणत्याही माणसांचे प्रश्न, त्यांच्या गरजा, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब पडलेले असणार. प्रेषित कितीही सांगो की त्याला आकाशातून आदेश आले, पण धर्म ‘आभाळातून पडत नाही हे खरेच.
यात मुख्य गोष्ट अशी की माणसाला जगायचे असते आणि शक्य तर चांगल्या रीतीने जगायचे असते. या त्याच्या जैविक प्रेरणा आहेत. जीवन जगताना आणि ते सुकर करताना त्याला जीवनाचे आकलन करावे लागते आणि हे आकलन त्याला त्याच्या बुद्धीनेच होते. ‘माणूस हा विवेकनिष्ठ प्राणी आहे ही व्याख्या सर्वस्वी खरी नसली तरी तिच्यात सत्याचा अंश आहेच. आदिम माणूसही फळे तोडताना, पशुपालन करताना किंवा प्राथमिक शेती करताना आपल्या वंशाच्या अनुभवाचे काही संचित बरोबर बाळगीत होता आणि सावकाशीने का होईना त्याला कार्य-कारण संबंध कळत जात होते. म्हणून केवळ मंत्रशक्तीने झाडाची फळे पडतील, गाई दूध देतील किंवा शेती उपजाऊ होईल असे कोणत्याही धर्माने सांगितलेले नाही. एका मांत्रिकाविषयी एक गोष्ट अशी सांगितली जाते. तो म्हणाला, “मी केवळ मंत्र म्हणून बकच्या मारू शकतो. मात्र त्याच वेळी त्यांना थोडे आर्सेनिक (एक जहाल विष) द्यावे लागते.” सर्व धर्माचे स्वरूप मंत्र + आर्सेनिक’ असे असते असे म्हणायला हरकत नाही. थोडक्यात धर्माचे स्वरूप विवेकाशी सुसंगत असू शकते. किंबहुना त्या त्या परिस्थितीत ते विवेकाशी काही विशिष्ट बाबतीत तरी सुसंगत असल्याशिवाय गत्यंतर नसते. तसे नसेल तर जीवनच अशक्य होईल. म्हणून आज अस्तित्वात असणारे धर्म विवेकाशी कमी-अधिक प्रमाणात सुसंगत असलेले दिसतात.
दि. य. म्हणतात की, “इहलोकाविषयी अनादर ही गोष्ट सर्वच धर्मात आढळून येते.” हे कदाचित् खरे असेल. मात्र या अनादराची मात्रा सर्व धर्मात सारखी आहे असे दिसत नाही. उदाहरणार्थ, पारश्यांचा (झरथुष्ट्राचा) धर्म ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व देतो असे म्हटले जाते. कॅथलिकांच्या तुलनेने प्रॉटेस्टंट अधिक ऐहिक-उन्मुख. बौद्ध धर्म वैदिक धर्माच्या मानाने आंबेडकरांना अधिक विवेकनिष्ठ वाटला. ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस्’ ही धर्माची उद्दिष्टे सांगताना शंकराचार्यांच्या मनातला ‘अभ्युदय पारलौकिक होता (उदा.’स्वर्गकामो यजेत’),पण’अभ्युदयाचा अर्थ ‘ऐहिक उत्कर्ष असा हल्ली केला जातो व धर्मातल्या ऐहिक अंशावर अधिक जोर दिला जातो.
या सगळ्याचा अर्थ असा की धर्मात विवेकप्रणीत सत्यांना किंवा निष्ठांना स्थान नसतेच असे नाही. मुळात लक्षात घ्यायची ती ही गोष्ट.
(आ)
धर्म आणि विवेक ही एकत्र राहू शकतात असे एकदा लक्षात घेतले म्हणजे बदलत्या परिस्थितीत धर्माच्या अंगानेही सुधारणा होऊ शकते हे मान्य करता येईल. ही प्रक्रिया ‘भाष्य या पद्धतीने होते असे दिसते. भाष्यकाराला काही स्वातंत्र्य राहते व तो बुद्धीचा आश्रय घेऊ शकतो. इस्लाममध्ये प्रारंभीच्या काळी धर्मग्रंथांचा अर्थ लावताना ‘इजमा (भाष्य) आणि ‘कयास (तर्क) यांना स्थान देण्यात येत होते; ‘अग्नी थंड असतो किंवा ‘दिवस आणि रात्र एकत्र असतात असे शंभर श्रुतींनी सांगितले तरी ते मानता येणार नाही असे शंकराचार्यांनी म्हटले आहे.
भाष्य (इंटरप्रिटेशन) करण्याचे अनेक प्रकार नजरेस येतात. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे :
१) परमेश्वर तर ‘सर्वज्ञ, म्हणजे त्याच्या बुद्धीचा आवाका सगळ्यात मोठा; मग आपल्याला जे स्पष्ट दिसते ते त्याला कसे दिसणार नाही? म्हणून आपल्याला ज्याचा प्रत्यय येतो पण धर्मवचने जे नाकारतात ते मुळात नसले पाहिजे, म्हणजेच ‘प्रक्षिप्त असले पाहिजे – असा विचार सुधारणेमागे असू शकतो. अशा रीतीने ‘मूळ धर्माकडे वळण्याच्या प्रयत्नांतून अनेक धर्मसुधारणा झाल्या आहेत. ‘प्रक्षिप्त’ याचा मी येथे व्यापक अर्थ घेतो; केवळ एखाद्या ग्रंथातले ‘प्रक्षिप्त’ असे माझ्या मनात नाही. उदा. ‘रूढी’नेही काही आचार-विचार धर्माची पदवी प्राप्त करून घेतात; ते टाळणे म्हणजे प्रक्षेप टाळणे. उदाहरणार्थ अशी धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न आर्यसमाजाने केला.
२) ‘खरा धर्म ही संकल्पनाही विवेकाप्रत घेऊन जाऊ शकते. खरा धर्म म्हणजे धर्माचा केंद्रीय, सारभूत भाग, असा भाग जेव्हा वेगळा काढून दाखविला जातो तेव्हा तो सर्वसामान्य नीतितत्त्वांच्या आणि मानवतेच्या पातळीवर येतो. या अर्थाने सर्व धर्म सारखेच आहेत असा दावा सर्वधर्मसमभाववादी लोक करीत असतात. तो खरा असो वा नसो, अशा घोषणांचा परिणाम काही व्यक्तींवर तरी होत असेल हे शक्य आहे. ज्या प्रमाणात हे घडेलत्या प्रमाणांत ‘धर्मसुधारणा होईल.
३) एकच धर्मग्रंथ असला तरी त्याच्या अर्थाबाबत वाद असू शकतात. शब्दांचे अर्थ माहीत नसतात, संदिग्ध असतात, बदलतात. जिथे धर्माची परंपरा मौखिक असते तिथे संदिग्धतेला, म्हणून विवादाला अधिक जागा असते. “चातुर्वण्यं मया सृष्टम्” आणि चातुर्वण्यं मयाऽसृष्टम्” हे ऐकताना फरक जाणवत नाही; पण लेखनात प्रविष्ट होताना ‘शुद्ध रूपअमुकच आहे असे म्हणता येते व अगदी परस्पर-विरोधी अर्थ उद्भवतात. (मयाSसृष्टम् = मया + असृष्टम्). अशा वेळी (ज्याच्या त्याच्या मताप्रमाणे) जीवन सुकर किंवा अधिक न्याय्य करणारा अर्थ घेता येतो.
धर्माची संदिग्धता दाखवून देणारे अलिकडच्या काळातले महत्त्वाचे उदाहरणम्हणजे १९५३ साली पाकिस्तानात झालेल्या कादियानी (अहमदिया) पंथीयांच्या हत्याकांडानंतर नेमलेल्या न्या. मू. मुनीर आयोगाचा अहवाल. मुसलमान कोणाला म्हणावे? या प्रश्नाला इस्लामी धर्मपंडितांकडूनच अनेक उत्तरे आली आणि शेवटी हा प्रश्न विवाद्यच राहिला असे आयोगानेच म्हटले आहे. (केवळ ‘हिंदू कोण?’ याच प्रश्नाचे उत्तर अवघडआहे असे नाही!)
४) सेमिटिक (ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम) धर्मात एकच धर्मग्रंथ आहे; उलट हिंदू धर्मात धर्माचे अनेक उद्गाते आहेत. या कारणामुळे सोयीचा (जीवन सुकर करणारा) उद्गाता निवडता येतो. धर्मांतर झालेल्या हिंदूना पुन्हा आपल्या धर्मात परत घेता येते असे आठव्या शतकातल्या देवलस्मृतीने सांगितले. पतित-परावर्तनाची गरज जेव्हा हिंदू नेत्यांना वाटू लागली तेव्हा देवलस्मृतीचा दाखला देण्यात येऊ लागला.
५) एकाच धर्मग्रंथात परस्पर-विरोधी वचने किंवा आदेश असू शकतात. ईश्वर सर्वव्यापी, सर्वनियंता असला तरी “Give unto Caesar what is Caesar’s and unto God what is God’s” (राजाचे राजाला द्या आणि देवाचे देवाला द्या) असे वचनही बायबलात आहे. या वचनात ऐहिक आणि पारलौकिक अशी विभागणी केलेली असून ऐहिकाबाबत राज्यसंस्थेचे नियमन मान्य करण्यात आले आहे आणि ईश्वराची सत्ता पारलौकिकापुरती मर्यादित करण्यात आली आहे – निदान असा अर्थ त्यातून काढता येतो. धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्या संकल्पनेच्या मुळाशी हीच विभागणी आहे. धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था ख्रिस्ती लोकांनी कालौघात लवकर मान्य केली याचे हे कारण समजले जाते.
६) “बुद्धीसुद्धा परमेश्वरानेच माणसाला दिली आहे ना?” हा विचारही माणसाच्या मनात येणे शक्य आहे. धर्मसुधारकांनी हा विचार सांगितला की नाही हे मला माहीत नाही, पण वैयक्तिक पातळीवर एखाद्याच्या मनात तो येणे अशक्य नाही. अशा रीतीने बुद्धीचा उपयोग ‘धर्म ठरू शकतो.
(इ)
कायद्यात जशा ‘फटी (लूपहोल्स) किंवा पळवाटा असतात तशा धर्मातही असतात. एक ‘आपद्धर्म व दुसरी प्रायश्चित्त. एखादी कृती करावी असा धर्माचा आदेश असतो पणआपत्तीच्या प्रसंगी ती केली नाही तरी चालते असे धर्मच सांगतो. – आणि (सुदैवाने) ‘आपत्तीची व्याख्या धर्म करीत नाही. हाजची यात्रा हे इस्लामचे एक प्रमुख तत्त्व आहे. पण ती ज्याला शक्य असेल त्याने करावी असे धर्मातच सांगितलेले आहे. तसेच, ‘पापा’ची निष्कृती प्रायश्चित्ताने होते. प्रायश्चित्ताची किंमत फार जबर नसेल तर सोयीप्रमाणे ‘पाप करता येते. ब्राह्मणाने रसायनांचा व्यापार करू नये असे धर्मवचन आहे. लोणचीवाल्या बेडेकरांनी लोणची, मसाले वगैरे रसायने तयार केली. विकली आणि आपल्या गावी गणपतीचे देऊळ बांधून प्रायश्चित्त घेतले.
(ई)
वर ‘आ मध्ये भाष्याचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्यांमधून धर्म आणि विवेक एकत्र राहू शकतात असे सूचित होते. तरीही ते कसे?’ हा प्रश्न शिल्लक राहतोच. त्याचे उत्तर दिसते ते असे. काही क्रिया जीवनाला उपयुक्त असतात आणि त्या उपयुक्त आहेत हे माणसाच्या बुद्धीला कळते. मग त्यांचा नियम केला जातो. आणि नियम करताना त्यांना ‘पुण्य जोडले जाते. उदाहरणार्थ तुळस ही एक औषधी वनस्पती आहे; अंगणात तिचे रोप लावले तर फायदा होईल. म्हणून, ‘तुळस लावा, पुण्य पदरात पडेल ही धर्माज्ञा (किंवा धर्माज्ञेसारखे काही) होते. म्हणजेच उपयुक्त, जीवनाभिमुख क्रियेला पारलौकिक किंवा ईश्वरी अधिष्ठान दिले जाते.
(उ)
दि. य. यांच्या विवेचनात आणखी एक त्रुटी आहे असे वाटते. धर्माचे तत्त्व एकच आहे असे एक (अनुक्त) गृहीत त्यांच्या मनात आहे. तत्त्व एकच असेल तर त्याविषयी एकाच वेळी माणूस सश्रद्ध आणि अश्रद्ध (विवेकनिष्ठ) असेल हे शक्य नाही; तसे म्हणणे हा व्याघात होईल. पण वस्तुतः धर्म म्हणजे अनेक तत्त्वे, विचार, आचार यांचा पुंज असतो. अशा वेळी माणूस काही तत्त्वांच्या किंवा आचारांच्या बाबतीत सश्रद्ध आणि एरव्ही विवेकनिष्ठ असू शकतो.
किंबहुना श्रद्धेचे स्वरूपच असे असते. ती स्वभावतःच शिथिल असते. आपल्या धर्मातल्या आज्ञा शंभर टक्के पाळणारा श्रद्धावान भेटणे असंभाव्य आहे. (उलट शंभर टक्के विवेकनिष्ठ माणूस तितकासा दुर्मिळ नाही.)
परिस्थिती आणि प्रश्न बदलतात तसतसे काही आचार-विचार जीवन-विरोधीआहेत असे लक्षात येते आणि काही नवे आचार-विचार स्वीकार्य ठरतात. काही श्रद्धांना तडा जातो. मात्र हे लक्षात ठेवणे अवश्य आहे की काहींना झळ पोचत नाही. ज्या श्रद्धा जीवनाला घातक नाहीत किंवा फार घातक नाहीत किंवा गंभीर रीतीची गैरसोय निर्माण करणाच्या नाहीत त्या टिकून राहतात. सुशिक्षित माणसे हल्ली तब्येत बिघडल्यावर देवऋषीकडे धाव घेत नाहीत, डॉक्टरकडे जातात; मात्र नव्या घरात राहायला जाण्यापूर्वी हटकून वास्तुशांत करतात. धर्मसुधारणेचा हाही एक मार्ग आहे- श्रद्धांवर बुद्धीचे आक्रमण. या प्रक्रियेत धर्माचा संकोच होतो आणि या अर्थाने धर्मसुधारणा होते. भाष्यातून आणि फटींतून जी सुधारणा होते ती धर्माच्या चौकटीत होते; बुद्धिवादाची कास धरल्याने होणारी सुधारणा धर्माचा परिसर क्रमाक्रमाने मर्यादित करीत जाते. इतिहासक्रमात झालेली सुधारणा म्हणजे दोन्ही मार्गाचा संयुक्त परिणाम होय.
या सगळ्यातून एक अर्थ निष्पन्न होतो तो असा की श्रद्धा फार चिवट असते. तिची खोल मानसशास्त्रीय मुळे असतात. एक सनातन एकटेपण, एक सनातन असुरक्षिततायांमधून ईश्वराची कल्पना साकार होते. त्यामुळे दि. य. म्हणतात तसा “श्रद्धेचा संपूर्ण त्याग करून संपूर्ण जीवनाची घडी नव्याने बसविण्याचा प्रयत्न करणे कितपत यशस्वी होईल याची शंका आहे.
ज्यांना समाजाला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे त्यांना सर्वसामान्य माणसांच्या या प्रवृत्तीपुढे शरण जावे लागते. ‘मूले कुठारः’ ही नीती फारशी उपयोगी पडत नाही. किंबहुना तीमधून क्वचित् हाती घेतलेले कार्यच धोक्यात येण्याचा संभव असतो, किंवा ते निष्प्रभ ठरणे संभवते.
धर्मसुधारक विवेक-निष्ठेचा आश्रय आंशिकच करीत असतील तर त्यात एक प्रकारचा अप्रामाणिकपणा आहे हे दि. यं. चे म्हणणे अर्थातच मान्य करावे लागते. तूर्त आपण असे म्हणू या की हा अप्रामाणिकपणा ते जनतेच्या भल्यासाठी करतात. दि. य. यांच्या नीतिविचाराशी हे विधान सुसंगत ठरेल की नाही हे मात्र मला माहीत नाही.
मी जे काही वर म्हटले आहे त्यावर दि. य. देशपांडे यांची प्रतिक्रिया समजावून घेण्यास सर्वच वाचक उत्सुक असतील अशी मला खात्री आहे.