महाराष्ट्रातील विद्यापीठांत आणि महाविद्यालयांत तत्त्वज्ञानाचे जे अध्ययनअध्यापन सध्या चालू आहे त्याचे स्वरूप काय आहे? आणि त्याची अवस्था काय आहे?
वाचक विचारतील, काय झालं आहे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला? आमची तर सर्व काही आलबेल आहे अशी कल्पना आहे. तत्त्वज्ञानाचे उद्बोधनवर्ग (refresher courses) नेमाने होताहेत आणि त्यात सर्व प्राध्यापक न चुकता हजेरी लावताहेत. वर्षातून दहा-पाच तरी पीएच.डी. बाहेर पडत आहेत. सेमिनार्स, वर्कशॉप्स, समरस्कूल्स इ. दरवर्षी होताहेत. एकूण चित्र तर फारच आशादायी दिसतंय.’ काही विचारतील की ‘तत्त्वज्ञानाचीच विशेष दखल घ्यायचे कारण काय? अन्य विषयांची जी स्थिती आहे तिच्याहून तत्त्वज्ञानाची वेगळी असण्याचे कारण काय?’
दोन्ही प्रश्न बरोबर आहेत. तत्त्वज्ञानाची स्थिती इतरांपेक्षा फार वेगळी नाही हे खरेच आहे. आणि तिथे एकुण काम दिसायला तरी बिनबोभाट चालू आहे हेही खरे आहे. परंतु परिस्थिती दिसते तिच्याहून फार वेगळी आहे असे थोडे बारकाईने पाहिले की लक्षात येते. आणि तत्त्वज्ञानविषयाचे माझ्या दृष्टीने वैशिष्ट्य असे आहे की त्याची मला थोडी जास्त माहिती आहे. इतर विषयांची स्थितीही थोडी फार अशीच आहे की नाही हे त्या विषयाचे जाणकार सांगतील.
माझे स्वतःचे अवलोकन असे आहे की गेली पन्नास वर्षे या विषयातील व्यासंगाची पातळी सतत अधोगामी राहिली असून सध्या तर ती जवळपास बुडापर्यंत पोचलीआहे.
याची कारणे अनेक आहेत. पण त्यांतील मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील विद्यापीठांत संस्कृत आणि इंग्रजी या दोन्हींचे अध्ययन जवळपास बंद आहे हे होय. तत्त्वज्ञानाचे भारतीय आणि पाश्चात्त्य असे विभाजन केल्यास भारतीय तत्त्वज्ञान संस्कृतात आहे, आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान तीन-चार भाषांत असले तरी ते बहुतेक अनुवादरूपाने इंग्रजीत सापडते. संस्कृतचे अध्ययन जरी येथे एका काळी कसून होत असे तरी गेली पंचवीस-तीस वर्षे ते तसे राहिलेले नाही; आणि सध्या महाविद्यालयात राहोच, पण शाळांतसुद्धा संस्कृत हा विद्यार्थिप्रिय विषय राहिलेला नाही. इंग्रजी विषयाला पाचवीपासून बी.ए.- पर्यंत रोज निदान एक तास दिलेला असूनही, आणि तो विषय बी.ए.पर्यंत आवश्यक असूनही त्याची पातळी इतकी खाली कशी गेली हे एक कोडेच आहे. कॉन्व्हेंट शाळेत शिकलेली मुले सोडली तर इंग्रजी जवळपास बंद झाले आहे. बी.ए.झालेल्या विद्यार्थ्यालाही जुन्या काळच्या दुसर्याइ वर्गातील विद्याथ्र्यांइतकेही इंग्रजी येत नाही ही वस्तुस्थिती आहे. बरे, इंग्रजीतील विद्याथ्र्यांची ही प्रगती पाहून इंग्रजी विषय ऐच्छिक ठेवावा ही सूचना करण्याची सोय नाही. ब्राह्मणेतर पुढार्यांनकडून अशी तक्रार होते की इंग्रजी ऐच्छिक केल्यास ब्राह्मणांची मुले मात्र इंग्रजी शिकतील आणि आमची मुले मात्र इंग्रजीपासून वंचित राहतील!
ते कसेही असो. पण बी.ए. आणि एम्.ए. झालेले विद्यार्थी घेतले तरी त्यांना इंग्रजी यथातथाच समजते, ग्रंथांचे वाचन करण्याइतपत इंग्रजी अपवादात्मक झाले आहे ही वस्तुस्थिती आहे.
इंग्रजीचे ज्ञान इतके जुजबी आणि तुटपुंजे झाले आहे याचे एक महत्त्वाचे कारण मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सोय. ती मोकळीक मिळाल्यामुळे सध्या इंग्रजीच्या वाटेला कोणी जात नाही. एम्.ए. आणि पीएच्.डी. यांच्याकरताही मराठी माध्यम अनुज्ञेय झाले आहे. एका मुंबई शहरातील विद्यार्थी सोडले तर कोणत्याही विद्यापीठात इंग्रजी माध्यमाचे वर्ग सध्या शिल्लक राहिलेले नाहीत. हे एका अर्थी मातृभाषा माध्यमवाद्यांना इष्ट तेच घडले आहे म्हणून त्याचे स्वागतच करावे असे म्हणता येईल. परंतु मातृभाषेतून शिकणार्याड बी.ए. आणि एम्.ए. च्या विद्याथ्र्यांना वाचायला मराठीत पुस्तकेच नाहीत. अनुवादित पुस्तकांची संख्या सुद्धा हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. बी.ए. लाही एका विषयाला एखादेच पुस्तक सापडते, आणि एम्.ए. ला तर अनेक पत्रिकांकरिता एकही पुस्तक आढळत नाही. त्यामुळे प्राध्यापकांनी दिलेल्या नोटस् यापलीकडे वाचन जात नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हीही इष्टापत्तीच आहे. कारण इंग्रजीतील हजारपाचशे पानांचे ग्रंथ वाचण्यापेक्षा दोनतीनशे पानांची वही केव्हाही स्वागतार्ह. परिणाम असा होतो की प्राध्यापकांनी दिलेल्या नोट्स वाचून एम्.ए. झालेले आजचे विद्यार्थी उद्या प्राध्यापक होतात, आणि त्याच नोट्स्वर गुजराण करतात. या सर्व प्रकारात विद्येची (अध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्याही) पातळी घसरते आहे – घसरली आहे. हाही इष्टापत्तीचाच भाग म्हणायचा काय?
अशा स्थितीत विद्यार्थी भारतीय आणि पाश्चात्त्य दोन्ही तत्त्वज्ञानांना पारखा होत आहे. पण या अडचणीवर मात करणारा तोडगाही महाराष्ट्रातील प्राध्यापकांना सापडला आहे. जर संस्कृत आणि इंग्रजी यांतील तत्त्वज्ञान आपल्याला मिळत नसेल तर मराठीत उपलब्ध असलेले तत्त्वज्ञान आपण अभ्यासू या. असे साहित्य म्हणजे संतांचे साहित्य! त्यालाच तत्त्वज्ञान म्हणून त्याचा सध्या जोमाने अभ्यास सुरू आहे. पीएच्.डी. चे प्रबंधही संतांच्या तत्त्वज्ञानावर लिहिले जाऊ लागले आहेत. संतांबरोबर जोतीबा फुले, महात्मा गांधी, विनोबा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा समावेश तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात झाला आहे. एका विद्याथ्र्याने पीएच.डी. प्रबंधाकरिता निवडलेला विषय होता दत्तसंप्रदाय आणि दुसर्याीचा होता दासबोध, तिसरा तुकारामाच्या तत्त्वज्ञानाचा सामाजिक आशय याविषयावर व्याख्याने झोडतो आहे. गेल्या पाचसहा वर्षांत जोतीबा, गांधी, विनोबा आणिआंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर तत्त्वज्ञान-परिषदांमध्ये परिसंवाद होत आहेत.
हे सर्व फार चिंताजनक आहे. त्यात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे एवढी एकच गोष्ट चिंतेची नाही. त्यात भारतीय तत्त्वज्ञानाकडेही दुर्लक्ष होत आहे ही चिंतेची बाब आहे. स्पष्टच बोलायचे तर महाराष्ट्रात सध्या तत्त्वज्ञानाचा अभ्यासच थांबला आहे.
कारण तत्त्वज्ञान म्हणजे प्रामुख्याने तर्कशास्त्र, ज्ञानमीमांसा, अतिभौतिकी (metaphysics) आणि नीतिशास्त्र यांपैकी एकाचाही विचार संतवाङ्मयात नाही. त्यात तत्त्वज्ञान या अर्थाने अध्यात्मही नाही. तत्त्वज्ञान म्हणजे युक्तिवाद, साधकबाधक चर्चा. पण इथे तर फक्त भारतीय दर्शनांच्या काही निष्कर्षांची निवळ पोपटपंची आहे, त्यात युक्तिवादांचा विचार नाही. नवे चिंतन तर नाहीच!
धर्म हा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला एक लहानसा भाग. ईश्वराच्या अस्तित्वाची किंवा । नास्तित्वाची सिद्धी हा तत्त्वज्ञानाचा विषय, पण त्याचा संतसाहित्यात मागमूसही नसतो.
संतांचे साहित्य अभ्यासू नये असे म्हणणे नाही; पण तत्त्वज्ञान हा त्यांचा व्यवसाय नाही. त्यांच्या विषयाला तत्त्वज्ञान म्हणणे हे अनर्थकारक आहे. हे आत्मघातकीपणाचे आहे.