डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांना आपण ज्ञानकोशकार म्हणतो. ते स्वतःही हे बिरुद मोठ्या आवडीने मिरवीत. पण केतकरांनी केवळ ज्ञानसंग्रह केला नाही. ज्ञानाचा विस्तार केला. प्रसार केला. तरी त्यांना ज्ञानकोशकार ही पदवी भूषणास्पद आहेच. कारण त्यांच्या आधी मराठीत कोणीही हा गड सर करू शकले नव्हते. हे काम त्यांनी ज्या अवधीत पूर्ण केले तो एकै विक्रम आहे. राजाश्रय नसताना कल्पकतेने लोकाश्रय मिळवून त्यांनी हा वाङ्मयव्यवहार तडीस नेला. अशी तडफ त्यांच्याआधी कोणी दाखविली नव्हती आणि नंतरही दाखविली नाही. बारा वर्षांत ज्ञानकोश हातावेगळा केला. तो आता शेवटास जाणार हे दिसू । लागताच कादंबरीलेखनास त्यांनी हात घातला. कादंबरीवाङ्मयाचा नवा मापदंड जनतेसमोर उभा केला. सारा सुबुद्ध समाज ढवळून काढला. हे काम इतके असामान्य होते की, त्यांनी ज्ञानकोश रचला नसता आणि एवढ्या सात कादंबर्यालच काय त्या लिहिल्या असत्या तरी मराठी सारस्वताला आणि महाराष्ट्रीय समाजाला ते तितकेच भूषणभूत झाले असते. आणिसमजा त्यांनी ज्ञानकोश नाही, या कादंबर्यांटचे लेखन नाही, पण ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’, ‘हिंदुत्व, त्याची घडण आणि भवितव्य आणि प्रस्तावना खंडात आलेला ‘हिंदुस्थान आणि जग एवढे तीनच ग्रंथ लिहिले असते तरी त्यांचे नाव महाराष्ट्रात अजरामर झाले असते. भारतभर त्यांची कीर्ती पोहोचली असती.
ज्ञानकोशात ज्ञानसंग्रहच करावा असा मूळ उद्देश असता, तो करता करतात ते वेदांच्या संशोधनात पडले. आणि वेदांच्या अत्यंत थोर अभ्यासकांत त्यांची गणना होईल इतके विपुल, विस्तृत आणि सखोल संशोधन त्यांनी केले. त्याचे वैदिक संशोधन मुळातून नाही तरी त्याचे भाषांतर इंग्रजी किंवा एखाद्या युरोपीय भाषेत जर कोणी केले तरी आपण ते जर्मन भाषेत आणू अशी विनंती विंटरनिट्झु या प्राग विद्यापीठातील पंडिताने केली होती. स्वदेशी, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा शास्त्रीबोवांनी पुरस्कारलेला अभिमान राजवाड्यांप्रमाणेच केतकरांमध्ये उतरला होता. त्यामुळे त्यांनी इंग्रजीत फारच थोडे लिखाण केले. आपल्या संशोधनाची गुणवत्ता आणि महत्ता वर्तमान महाराष्ट्रात ओळखू शकेल असे कोणी नाहीत हे जाणत असूनही त्यांनी मराठीतच आपले प्रायः सर्व लेखन केले. ‘जातिसंस्थेचा इतिहास’ आणि ‘हिंदुइझम’ हा पीएच्.डी. चा प्रबंध (दोन भागांत) सोडला तर बाकीचे सारे लेखन त्यांनी सुमारे वीस वर्षांत केले. कोत्या बुद्धीच्या टीकाकारांनाही त्यांचा द्रष्टेपणा कबूल करावा लागला इतका त्यांच्या बुद्धीचा आवाका प्रचंड होता. आत्मविश्वास दांडगा होता आणि उरक असामान्य होता.
ही असामान्य, अतिमानुष आणि अद्वितीय म्हणावी अशी कामगिरी केतकरांनी ५३ वर्षांच्या आयुष्यात केली. हे अचाट काम ते करू शकले कारण चारचौघांच्या रुळलेल्या वाटेने जाणे केतकरांना माहीत नव्हते. ते स्वतःच म्हणतात,
असेल ठावा जो लोकांतें आयुष्याचा क्रम
तो द्यावा टाकुनि, आयुष्याचे नियमन सुखें करावें.
स्वकल्पनांनी, …. त्याच्या आयुष्याला जी वक्रगती मिळाली तिचे कारण त्यांच्या बालपणात, शिक्षणात आणि सभोवतालच्या राजकारणात आहे असे निदान त्यांनी स्वतःच केले आहे.
केतकरांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला. पाच वर्षांचे असताना, त्यांचे वडील आणि सोळावर्षांचे असताना आई वारली. वडील पोस्टमास्तर होते. बालपण आणि हायस्कूलचे शिक्षण अमरावतीला झाले. काका औपचारिक पालक होते. आईमागोमाग वडील बहीण वारली आणि मायापाश तुटून आपण आता वाट फुटेल तिकडे हिंडायला मोकळे झालो अशी त्यांची भावना झाली. त्यांची हुशारी पाहून ‘याने आय्. सी. एस्. व्हावे असे वडिलांना वाटे. काकांना त्यांनी डॉक्टर व्हावे असे वाटे, तर देशप्रेमाचे वारे भरलेल्या केतकरांना समाजासाठी कार्य करायचे होते. पुण्याला फर्गसनमध्ये शिकायला जायचे होते. तर काकांनी युरोपीय प्रोफेसरांना शिकवण्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांना मुंबईला विल्सनकॉलेजात घातले. तिथे त्यांनी ५ वर्षे घालविली, पण बी. ए. होऊ शकले नाहीत. कारण नेमलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर विषयांचे सपाटून वाचन करण्यात ते दंग असत. काही काळ योग-मार्गाची जिज्ञासा अनावर झाल्यामुळे योगावरचे ग्रंथ आणि प्रत्यक्ष अभ्यास यांत ते रमले. वीर सावरकर, अण्णासाहेब कर्वे वगैरेंचे जे चतुष्टय होते त्यात हेही सामील झाले. तीव्र देशाभिमानी मित्रमंडळींत क्रांतिकारकांच्या हिंसक मार्गाची भुरळ काही काळ त्यांच्या मनावर पडली होती. ती मधून बाहेर पडल्यावर तरुणांनी लष्करी शिक्षण संपादावे, पुढेमागे ब्रिटिशांशी लष्करी संघर्ष करावा लागणार तेव्हा हे शिक्षण कामी पडेल म्हणून परदेशात कोठे कोठे लष्करी शिक्षण मिळते याचा तपास त्यांच्या मित्रमेळ्याने वेगवेगळ्या वकालतींना भेटी देऊन घेतला. लष्करी उठाव बेकायदेशीर असला तरी लष्करी शिक्षण घेणे यात गुन्हा नव्हता. अमेरिकन विद्यापीठात लष्करी शिक्षण मिळू शकते हे कळले म्हणून तेथे जाण्याचे ठरले. प्रत्यक्षात जायची वेळ आली तेव्हा दोघेच तयार झाले. प्रभाकर शिलोत्री हा त्यांचा मित्र आणि ते. परंतु अमेरिकेत अन् तेही लष्करी शिक्षण घ्यायला काकांनी मोडता घातला, पैसे देण्याचे नाकारले. म्हणून १९०५ मध्ये एकटे शिलोत्री अमेरिकेला रवाना झाले. मागे राहिलेल्या केतकरांच्या मनात आणखी एकदा बदल झाला. लष्करी शिक्षणाचे आकर्षण संपले. यशस्वी बंड करणे शक्य नाही हे पटले. पण जातो जातो म्हणून गवगवा फार झाला, बोलणे खरे करून दाखविले पाहिजे म्हणून पुढल्या वर्षी, १९०६ मध्ये केतकर अमेरिकेत पूर्वेकडील कॉर्नेल विद्यापीठात – शिलोत्री गेले होते तिकडे रवाना झाले. त्यावेळी, बोटीवर चढताना त्यांच्या खिशात तिकिटाशिवाय फक्त दोनशे रुपये होते. आणखी तीनशे बँकेत अडकले ते त्यांचे आतेभाऊ मागाहून पाठवणार होते. काकांकडून मदत मिळण्याचा प्रश्नच नव्हता. आपले मित्र कादंबरीकार बाळकृष्ण संतुराम गडकरी यांच्या हमालपुण्यातील कीर्तनाला जातो असे सांगून केतकर घरून पळून आले होते.
वाटेत जिनोआ येथे, त्यांची इटालियन बोट बिघडली म्हणून १५ दिवस त्यांचा मुक्काम झाला. ‘न व्याजेन चरेद्धर्मः’ (धर्माचरणात लबाडी करू नये) या तत्त्वाला सोडून तेथील धर्मगुरू वागत असे त्यांच्या लक्षात आले. मद्याचा एकच पेला घेणे आणि चाळिशी उलटलेली एक सेविका ठेवणे ह्या गोष्टी धर्मसंमत होत्या म्हणून ते मोठ्या घागरीच्या आकाराचा पेलाआणि विशीच्या दोन सेविका ठेवत असत.
कॉर्नेल विद्यापीठात ते पाच वर्षे होते. त्या कालावधीत त्यांनी बी. ए., एम. ए. आणि पीएच. डी. ह्या पदव्या घेतल्या. पीएच्. डी. ची पदवी एकदीड वर्षे आधीच मिळाली असती. कारण त्यांचा प्रबंध जरी प्रसिद्ध झाला तरी काही वाचन आणि फ्रेंच भाषेची परीक्षा राहून गेली होती.
हे राहायचे कारण त्यांच्या स्वभावाला साजेसेच होते. ‘स्त्रियांचे विवाहाचे वय वाढल्यामुळे लैंगिक स्वैराचार खरेच वाढतो का’?हे तपासायचे त्यांनी डोक्यात घेतले. हा शोध त्यांना पुढे भारतात घेता येणारा नव्हता. म्हणून त्यांनी तीन गावे निवडली.कुमारिकांचे गर्भपात, मातृत्व किंवा उपदंशासारखे लैंगिक रोग यांच्यावर उपचार करणाच्या डॉक्टरांकडून त्यांनी आकडेवारी जमवली. स्वतःचा निष्कर्ष काढला. या विषयावर पुढे भारतात मद्रासच्या ‘मॉडर्न वर्ल्ड या पत्रिकेत त्यांनी लेख प्रसिद्ध केले. परंतु ते उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा निष्कर्ष त्यांच्या चरित्रकाराला कळू शकत नाही. या खटाटोपात त्यांचे पीएच्. डी. चे काम लांबणीवर पडले. त्यांना सुमारे दोन हजार रुपये खर्च आला. बडोदा सरकारची एक अल्पशी शिष्यवृत्ती ३ वर्षे होती, तिची मुदत संपली. पण त्यांच्या प्राध्यापकांच्या जोरदार शिफारशीवरून त्यांना ती एक वर्ष आणखी वाढवून मिळाली.
कॉर्नेल विद्यापीठात भूस्तरशास्त्रावरील एक ग्रंथ वाचताना त्यांच्या लक्षात आले की भूस्तरासंबंधीचे अनेक नियम सामाजिक घडामोडींचे स्पष्टीकरण करण्यास लागू पडतात. तेव्हा त्यांच्या मनाने घेतले की समाजशास्त्रावरील ग्रंथ आपण स्वतःच्या प्रयत्नाने वाचू शकतो. परंतु इतर पूरक विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान आताच मिळविले पाहिजे. म्हणून प्राध्यापकांच्या अनुज्ञेने ते जीवशास्त्र, पुराणवस्तुशास्त्र, इतिहास संशोधनशास्त्र इ. विषयांच्या पहिल्या वर्गात जाऊन व्याख्याने ऐकत.
केतकर आपला खर्च भागविण्यासाठी नाना कामे करत. वसतिगृहात जेवणाच्या विद्याथ्र्यांची ताटेवाट्या विसळणे, हंगामाच्या वेळी शेतकर्यांयकडे बटाटे उकरण्यासाठी मजुरी करणे, कॅमेर्यािच्या पेट्या बनवणे, फिरता पुस्तकविक्रेता बनणे – अशी कामे ते लहानमोठ्या सुट्यांत करत. करणार्यायला काम मिळतेच या अमेरिकन जीवनपद्धतीच्या अनुभवामुळे फार पुढचा विचार न करण्याची सवय आपल्याला लागली असे ते पुढे शीलवतीबाईंजवळ म्हणत.
The History of Caste in India, (Vol.I)हा त्यांच्या शोधप्रबंधाचा पूर्वार्ध १९०९ मध्ये न्यूयॉर्कला प्रसिद्ध झाला. त्याने केतकरांचे मोठे नाव झाले. समाजशास्त्राच्या दोन विख्यात प्राध्यापकांच्या एका संशोधनपर निबंधावर त्यांना न्यूयॉर्क येथील परिषदेत उपवक्ता म्हणून बोलण्याचा मान मिळाला. अशा वेळी वाचावयाच्या निबंधाची प्रत उपवक्त्याला आधी मिळत असे. मात्र आपले भाषण त्याला मुख्य निबंधवाचनापूर्वी लिहून सादर करावे लागे. अशा परिसंवादाच्या निमित्ताने फराळपाण्याची चंगळ असे. परंतु आपले लिखित भाषण तयार करण्यासाठी तीन इंच मलईचा थर असलेल्या चविष्ट केकचा चाळवणारा मोह आवरून त्यांनी ग्रंथालयात बसून भाषण तयार केले. नियोजित निबंध वाचल्यावर केतकरांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या प्रश्नांना हे बडे विद्वान तत्काळ उत्तरे देतील ही श्रोत्यांची अपेक्षा होती. पण आपण निबंध प्रसिद्ध करताना उत्तर देऊ असे म्हणून त्यांनी वेळ टाळली. पुढे हा निबंध प्रसिद्ध झालाच नाही, आक्षेप अनुत्तरितच राहिले. अशा लहानमोठ्या बौद्धिक पराक्रमानंतर केतकरांना वाटे, या तथाकथित विद्वानांचे ज्ञान कसे तोकडे आहे, यांना जगाचा बराच भूभाग नीट ठाऊक नाही, आपल्याला चांगल्या परिचितअसलेल्या सामाजिक अवस्थांचे यांना ज्ञान नाही. मात्र त्यांच्या समाजाचे ज्ञान आपल्याला आहे. त्यामुळे, त्यांच्या विद्वत्तेच्या मर्यादा कळल्यामुळे त्यांच्या कौतुकाचे महत्त्व ते काय?
तरुण वय, स्वभाव वाहवत जाणारा, अमेरिकेतले मोकळे स्त्रीपुरुषसंबंध एवढे सगळे असता केतकरांनी स्वदेश, स्वसमाजाची सेवा यांची आठवण ठेवून मनाला संयम घालावा. ते म्हणतात,
भारतवर्षी पुन्हां जाऊनी वसती करणे ज्यास
गुंतुं नये कधिं तेणें देऊंमन येथिल मोहास…………
जाई देशी कार्या लागे, स्वजनांच्या कल्याणा..
अभ्यासक्रम संपवून केतकरांनी १९११ मध्ये अमेरिका सोडली. वाटेत इंग्लंडमध्ये ते सुमारे दीड वर्ष राहिले. नवा अनुभव, नवे ज्ञान मिळवावे हा हेतू. त्यांच्या संशोधनाचा उत्तरार्ध an essay on hinduism, its formation and future हा तेथे १९११ मध्येच प्रसिद्ध झाला. केतकरांच्या संशोधनामागे स्वदेश, स्वधर्म यांचे प्रेम ही प्रेरणा होती. समाजाचा पुनर्घटनेचा विचार करायचा तर समाजाचे ज्ञान पाहिजे. हिंदुसमाजाचे शास्त्रीय ज्ञान करून घेतले तरच हिंदुसमाजाच्या पुनर्घटनेची भाषा करता येईल या हेतूने त्यांचा अभ्यास चालला होता.
जाती वर्णीमधून अपभ्रष्ट झालेल्या लोकांतून उत्पन्न झाल्या, संस्कारलोपामुळे झाल्या इत्यादी उपपत्ती त्यांनी नाकारल्या. भारत या खंडप्राय देशात अतिप्राचीन काळापासून हजारो टोळ्या राहतात. त्यांचे जीवन स्वयंपूर्ण असे. त्या परस्परांत भांडत. त्यामुळे लग्ने आपल्या टोळीतच लावत. बालविवाहामुळे हे सहज शक्य झाले. पावित्र्याच्या कल्पनांमधून उच्चनीच भाव आला. अशा रीतीने जातिभेद पक्के झाले. तसेच संप्रदाय, विविध उद्योग यांच्यातून जाती झाल्या. ख्रिश्चन आणि मुसलमान हे पारमार्थिक मतांवर आधारित संप्रदाय आहेत. तर हिंदुसमाज एक सामाजिक संघ आहे. त्यात ब्राह्मण, महार अशा जाती आणि शीख, महानुभव असे संप्रदाय समाविष्ट आहेत. हिंदू समाज सान्निध्याने वाढत गेला. इतःपर जग सन्निध येत आहे. सान्निध्याने सादृश्य वाढते. जग जवळ येत आहे. परिणामतः सारख्या संस्कृतीची वाढ होईल. विज्ञान, वैज्ञानिक सत्य सर्वमान्य होतील. आपापली वैशिष्ट्ये राखूनही जग ऐक्याकडे वाटचाल करील. हे ऐक्य धर्मसंप्रदायाची वाढ करून साधणार नाही. जवळिकीने, सान्निध्याने समान संस्कृतीचा प्रसार होईल. शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे, बुद्धिप्रमाण विचारही सर्वत्र एक होतील. असे केतकरांचे या ग्रंथात प्रतिपादन आहे. केतकरांच्या दृष्टीला जगदैक्याचे भवितव्य अटळ दिसले. त्याच्या आधीचा टप्पा. प्रादेशिक समूहांचा किंवा राष्ट्रांचा आहे. हिंदूसमाज जाती आणि पंथांचा संघ आहे. त्याचे रूपांतर प्रादेशिक-राष्ट्र या स्वरूपात करण्यासाठी त्यांनी उपाय सुचविले की, हिंदूंनी अहिंदूंना अपवित्र (म्लेंच्छ) मानणे सोडून द्यावे. जातिभेद सोडावा. आंतरजातीय विवाहकरावेत. प्रौढविवाह, प्रेमविवाह प्रशंसनीय मानावेत. धर्मसंप्रदाय ही व्यक्तिगत बाब आहे. राजकारणात किंवा समाजकारणात तो विचार वर्ण्य करावा. प्रादेशिक एकतेची भावना दृढ होण्यासाठी त्यांनी दोन उपाय सुचविले. पहिला भाषावार प्रांतरचना. दुसरा उपाय म्हणजे उघड्या तोंडाचा उच्चवर्ग (अरिस्टॉक्रसी) स्थापन व्हावा. ह्या समाजात विवाहबंधाने कोणालाही शिरता येईल. तो सर्व देशभर पसरलेला असावा. त्यात श्रीमंत संस्थानिक असतील तसे विद्याविभूषित ब्राह्मण असतील. त्यांच्या प्रतिष्ठेमुळे त्यांचे अनुकरण होईल. त्यांच्यात विवाहसंबंधाने शिरावे अशी आकांक्षा इतरांमध्ये वाढेल. या रीतीने देशभर सादृश्य वाढेल. येणेप्रमाणे, जगदैक्याच्या अंतिम उद्दिष्टासाठी देशैक्य साधावे म्हणजे हिंदी राष्ट्रवादाची प्रस्थापना करावी असे केतकरांचे चिंतन आहे. ‘हिंदुइझम’ या पुस्तकाच्या विक्रीतून आणि इतर किरकोळ लेखनातून मिळणाच्या अल्प उत्पन्नात केतकरांनी अत्यंत हालाखीत इंग्लंडमधील दिवस काढले. पण गरिबी आनंदाने झेलत एकप्रकारच्या मस्तीत केतकर ज्ञानसंग्रह करत होते. बाली बेटातून ‘ब्रह्मांडपुराणांची प्रत मिळावी म्हणून इंडिया ऑफिस मार्फत प्रयत्न करत होते. इंडियन सोशल क्लब, इंडियन यूनियन सोसायटी अशा संस्थांत भाग घेत होते. ‘दि नोबडीज क्लब’ या संस्थेत ते दोनपैकी एक कार्यवाह होते. तिथेच त्यांच्या, ‘विशाल, चॉकलेटी रंगाच्या मखमली डोळ्यांनी कु. ईडिथ कोहन या गौरकाय युवतीला भुरळ घातली. कु. कोहन जर्मन ज्यू होत्या. फ्रेंच, डच ह्या भाषाही जाणत होत्या. जर्मनीतील येना विद्यापीठात त्यांनी ‘तौलनिक धर्मसंप्रदाय’ या विषयात पदवी घेतलेली होती. त्यांच्या मनाने घेतले की ‘या प्रज्ञावंताची काळजी आपण वाहिली पाहिजे. पण केतकर ऑक्टोबर १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर, ज्ञानकोशाचे काम सुरू होऊन चार वर्षे लोटेपर्यंत हे स्वयंवर साकार होऊ शकले नाही.