आगरकर-वाङ्मयातील एक कूटस्थळ

आगरकरांचे लेखन म्हणजे प्रसादगुणाचा नमुना. त्यात ओजही अर्थात् भरपूर आहे, परंतु त्याचे त्यांच्या प्रसादगुणावर आक्रमण होत नाही. त्यांना काय म्हणायचे आहे याविषयी वाचकांची बुद्धि द्विधा होईल असे स्थळ शोधूनही सापडायचे नाही, इतके त्यांचे लेखन पारदर्शक आणि सुबोध आहे. त्यांची विवेचनपद्धतीही अशीच सुसंगत आणि तर्कशुद्ध. ज्याचे पूर्वग्रह फार पक्के नाहीत अशा कोणालाही सामान्यपणे पटेल अशीच ती असते. पण त्यांच्या वाङ्मयात एक स्थळ असे आहे की ते वरील दोन्ही नियमांना अपवाद आहे. हे स्थळ म्हणजे ‘देवतोत्पत्तीविषयी शेवटचे चार शब्द या लेखाचा शेवट. (आगरकर वाङ्मय, संपादक नातू देशपांडे, खंड २, पृष्ठे २०६—७). तो छेदक असा आहे.
‘…जों जों बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारण संबंध चांगला कळू लागतो, तों तों प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागून भूत, पिशाच, देव, दानव वगैरे शुद्ध कल्पनेनें उत्पन्न केलेल्या शक्तीची असत्यता प्रत्ययास येते, व पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते, आणि कांहीवेळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्यांचे परिपालन व नाश करणार्यार एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वेदांतविचाराच्या कुंडांत पेटलेल्या अग्नींत हें द्वैतही खाक होऊन जाते आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ एवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो. व्यक्तीच्या व राष्ट्राच्या धर्मविचाराचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत.’
– १ –
या छेदकातील मला कूटस्थल म्हणून अभिप्रेत असलेला भाग म्हणजे ‘पण पुढे वेदांतविचाराच्या … हा कळस आहे’ ही वाक्ये. त्यांचा अर्थ काय? त्यांचे प्रमाण काय? त्यांचे समर्थन काय? इत्यादि प्रश्न उपस्थित होतात. माझी अडचण अशी आहे की वरील अवतरणातील काही भाग अनाकलनीय आहे, काही असिद्ध आहे, आणि त्याची सिद्धी आवश्यक आहे.
वरील उतार्यायवरून साहजिकच आपल्याला असे वाटते की आगरकरांना वेदांतविचार (निदान तत्त्वतः) मान्य आहे, तसेच परमेश्वर आणि त्याने निर्माण केलेले ब्रह्मांड कोणत्यातरी अर्थी परमार्थतः सत् नाही, कारण त्याचा वेदांतविचारात निरास होतो, आणि अद्वैतवेदांतप्रणीत अहं आणि ब्रह्म यांचे अद्वैत हा सर्वोच्च विचार आहे हे त्यांना मान्य आहे. परंतु त्यांनी जी विवेकवादी भूमिका सर्वत्र स्वीकारली आहे तिच्याशी ही मते सुसंगत आहेतकाय? आणि नसतील तर त्यांचे समर्थन कसे करता येईल? इत्यादी प्रश्न उपस्थित होतात. या विचारांचे वैशिष्ट्य असे आहे की ते तत्त्वज्ञानातील तात्त्वज्ञानिक (philosophical) विचार आहेत, आणि विज्ञानात वापरल्या जाणार्यात विवेकवादी रीतीहून अत्यंत भिन्न रीतीने ती मते प्राप्त झाली आहेत. एवढेच नव्हे तर ती विवेकवादी मताच्या विरुद्धही आहेत.
– २ –
ज्याला विवेकवाद म्हणतात त्यानुसार वरील मते विवेकाच्या कसोटीवर उतरत नाहीत असे सहज दाखविता येईल.
तत्त्वज्ञानातील (आणि वेदान्तातील) प्रमुख प्रश्न विश्वाचे, जगाचे स्वरूप काय आहे हा आहे. विज्ञानाचाही प्रश्न हाच असला तरी ते तत्त्वज्ञानाच्या मार्गाने जात नाही. त्याची रीत विवेकवादी, इंद्रिये आणि बुद्धि यांचे प्रामाण्य मानणारी. आपल्याला जगाच्या विविध क्षेत्रात जो अनुभव येतो त्याची बुद्धीद्वारा व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करणे हे विज्ञानाचे कार्य. या प्रयत्नातून सर्व विज्ञाने निर्माण झाली. उदा. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, ज्योतिःशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र इ. परंतु तत्त्वज्ञानाचे- विशेषतः वेदांत तत्वज्ञानाचे – कार्य आधी इंद्रियानुभवाचे प्रामाण्य नाकारणे हे आहे. या अनुभवातून प्रतीत होणार्याष भौतिक सृष्टीची पदवी (status) वास्तव किंवा सत् (real) नसून भासमानाची आहे असा त्याचा निष्कर्ष आहे. भौतिक जगाला भासमान (सत् नव्हे) म्हणण्याकरिता स्वैर तर्काचा उपयोग पुष्कळ केला जातो, पण तर्काविषयी तो अप्रतिष्ठ आहे (तक अप्रतिष्ठः’ इति शंकराचार्य) असा त्यावर अविश्वास आहेच. भौतिक जगाच्या अनुभवाची पातळी (status) ज्ञानसाधन म्हणून सर्वोच्च (पारमार्थिक) नव्हे. ती आहे फक्त व्यावहारिक, व्यवहाराला पुरणारी. परंतु शब्द प्रमाणाने (श्रुतींनी) उपदेशिलेले भौतिक जगाचे स्वरूप रज्जुसर्पासारखे (दोरीवर भासणाच्या सर्पासारखे) भासमान, म्हणून मिथ्या आहे. मिथ्या ही सत् आणि असत् या दोहोंहून भिन्न अशी तिसरी पदवी आहे. जे सत्ही नाही, आणि असत्ही नाही, पण जे भासते, अनुभवाला येते, ते मिथ्या. हे कसे सिद्ध केले जाते?
आपल्याला वाटेल की सत् आणि असत् या गोष्टी सबंध विश्व व्यापणाच्या आहेत. तिथे तिसर्याे गोष्टीची शक्यताच नाही. जे सत् नाही ते असत्, आणि जे असत् नाही ते सत् असे आपण म्हणू. पण सत् आणि असत् यांच्या व्याख्या वेदान्तात अशा केल्या जातात की त्यानुसार त्या दोहोंहून भिन्न असा तिसरा एक पर्याय शिल्लक राहतो. सत् म्हणजे जे त्रिकालाबाधित असते ते. असत् म्हणजे जे कधीही अनुभवाला येत नाही, भासत नाही, ते. असे म्हटल्यानंतर जे त्रिकालाबाधितही नाही आणि जे कदापि न भासणारेही नाही, म्हणजे जे किंचित्काल भासणारे आणि नंतर नष्ट होणारे आहे, त्याची पदवी तिसरी पदवी झाली. या व्याख्येनुसार ब्रह्म हे सत्, सशाचे शिंग हे असत् (कारण ते कधी कुणाला दिसले नाही). आणि त्या दोहोंहून अन्य म्हणजे अनुभवाला येणारे सबंध जग मिथ्या असे निष्पन्न होते असे वेदांताचे म्हणणे.
त्रिकालाबाधित म्हणजे काय? जे कधी तरी नव्हते असे नाही, आणि जे कधी नष्टही होणार नाही, म्हणजे जे अनादि आणि अनंत आहे, जे सदैव अस्तित्वात होते, आहे आणि राहणारही आहे, ते. हा सत्चा मुलखावेगळा अर्थ नाही काय? जे आहे, ज्याला अस्तित्व आहे, ते सत् असे आपण सामान्यपणे मानतो. ज्याचे अस्तित्व अनादि आणि अनंत आहे तेच फक्त आहे, आणि त्याहून कमी काळ अस्तित्व असणारे भासमान अशा व्याख्या करण्याचे स्वातंत्र्य घेणे म्हणजे असमर्थनीय स्वैराचार आहे. कोठल्याही शब्दाची कोणतीही हवी ती व्याख्या करण्याचे स्वातंत्र्य घेतल्यास कोणतेही विधान सिद्ध करण्यात कसलीही अडचण येणार नाही. त्यामुळे वेदांतात केली जाणारी व्यख्यिा मान्य करणे कठीण आहे. ‘सत्’ आणि ‘असत् यांचे व्यवहारातील रूढ अर्थ पाहिले तर आपल्याला असे आढळेल की ज्याला अस्तित्व आहे ते सत्, आणि ज्याला अस्तित्व नाही ते असत्, असे त्यांचे अर्थ दिसतात. आणि जे आहे ते कमी जास्त काळपर्यंत अस्तित्वात असू शकेल. एखादी गोष्ट हजारो वर्षे टिकणारी असेल, दुसरी काही तासच आणि तिसरी एखादा सेकंदच टिकणारी असेल. पण म्हणून त्या असत् आहेत असे म्हणणे भाषेचा एक रूढ आणि अत्यावश्यक नियम नाकारणे होय.
तीच गोष्ट असत्च्या अर्थाविषयी. त्या शब्दाचा सामान्य अर्थ जे सत् नव्हे ते, ज्याला अस्तित्व नाही ते, असा आहे. जगात कोट्यवधि असत् वस्तू सत् होत असतात, काही तर सत् केल्या जातात. उदा. कुंभार मंडकी तयार करतो, म्हणजे आधी ज्याला अभाव होता त्याचा भाव होईल असे करतो. नैयायिकांची कारणाची उपपत्ती असत्कार्यवादी आहे. कार्य घडण्यापूर्वी असत् असते आणि नंतर ते सत् होते असे नैयायिक म्हणतात. या ‘असत् चा अर्थ उघडच केव्हांतरी, पण सर्वदा नव्हे, अस्तित्वात नसलेले असा आहे.
या ठिकाणी एका प्रसिद्ध वचनाचा विचार करणे उचित होईल. ते वचन पुढीलप्रमाणे आहे.
नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः।
याचा अर्थ जे असत् आहे त्याचा कधीही भाव नसतो, आणि जे सत् असते त्याचा अभाव कधीही होत नाही. हे खरे आहे काय? ।
असत् म्हणजे काय? जगात कोट्यवधि वस्तू उत्पन्न होतात, म्हणजे उत्पत्तिपूर्वी त्या असत् असतात आणि नंतर सत् होतात असे आपण आताच वर म्हणालो. मग वरील वचनाचा अर्थ काय? असे म्हणता येईल की जेव्हा उदा. एखादा कुंभार मडके तयार करतो तेव्हा तो फक्त आकारांतर करतो, उत्पत्ती करीत नाही. मृत्तिकेचे एका आकारातून दुसच्या आकारात परिवर्तन होते. पण मृत्तिका आधीपासून होतीच, ती काही कुंभाराने निर्माण केली नाही. तिचे रूपांतर करणे एवढेच फक्त कुंभाराच्या हातात आहे. पण मृत्तिकेचे काय? पाषाणाची कालांतराने मृत्तिका झाली असे मानले तर पाषाण तरी पूर्वी अन्य काही नसेल कशावरून? परंतु त्याची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत असे मानले तरी पहिले स्थित्यंतर शून्यातून झालेअसेल असे म्हणणे असंगत वाटते. आणि तसेच मृत्तिकेची अनेक स्थित्यंतरे झाली तरी ती कधी तरी परत शून्यात जाईल असेही म्हणणे चमत्कारिक वाटते. तेव्हा मृत्तिकेचे अंतिम उपादानकारण त्रिकालाबाधित असते असे म्हणता येईल. उपादान कारण म्हणजे घटकद्रव्य, ज्या द्रव्याची एखादी गोष्ट बनली असते ते.
तेव्हा त्रिकालाबाधित काही तरी असू शकते असे म्हणता येईल. पण त्रिकालाबाधित पदार्थाचे वेदांतात दिले जाणारे उदाहरण भूतद्रव्य (matter) नाही. ते आहे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय?
-४-
नित्य अस्तित्वात असणारे म्हणजे सत्, शुद्ध चैतन्यरूप असणारे म्हणजे चित्, सर्व विश्व व्यापून असणारे असे तत्त्व म्हणजे ब्रह्म असे वेदांत्यांचे मत आहे. ते भेदरहित, निरवयव, अखंड असून जगाचा आधार आहे. एवढेच नव्हे तर ब्रह्म आणि आपला आत्मा यांचे अद्वैत आहे. आत्म्यांचे अनेकत्व हा भ्रम आहे. सर्व आत्मे वस्तुतः एकच होत, आणि शेवटी ब्रह्म आणि आत्मा हीही एकच आहेत, असे वेदांताचे प्रतिपादन आहे. एका श्लोकार्धात हे सबंध तत्वज्ञान एका सुभाषितकाराने असे सांगितले आहेः ब्रह्म सत्यं, जगमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः’, ज्या अहं ब्रह्मास्मि या वचनाचा आगरकरांच्या वर उद्धृत केलेल्या उतार्याजत उल्लेख आहे ते हेच आत्मा (जीव) आणि ब्रह्म यांचे ऐक्य, अद्वैत प्रतिपादणारे वाक्य. त्या उताच्याकडे आता वळू.
आगरकर म्हणतात की वेदांताच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत परमात्मा आणि त्याची सृष्टी हे द्वैत भस्मसात् होते, आणि शेवटी ‘अहं ब्रह्मास्मि एवढा अनिर्वचनीय विचार शिल्लक राहतो. तो मानवी धर्मविचाराचा कळस होय असे ते म्हणतात. ह्याविषयी आपण
काय म्हणणार आहोत?
दैत्य किंवा नानात्व ही काहीतरी सदोष, अपूर्ण, चुकीची गोष्ट आहे असे मत स्वीकारण्याची सामान्य प्रवृत्ती आहे हे खरे आहे. परंतु द्वैत मान्य करणे म्हणजे आपला विचार अपुरा राहिला आहे असे समजायचे कारण काय? आता हे खरे आहे की कुठल्याही घटनेची किंवा घटिताची (phenomenon) उपपत्ती देताना आपण ती शक्य तितक्या कमी गृहीतांच्या साह्याने देण्याचा प्रयत्न करतो. त्यात लाघव (economy) आहे आणि लाघव हा विज्ञानातही गुण मानला जातो. एखाद्या गोष्टीची उपपत्ती देताना ती जर एका तत्त्वाने समाधानकारकपणे लावता आली, तर तिथे दोन तत्त्वांचा आधार घेणे धोक्याचे आहे. आपल्या उपपादनात चूक होण्याची शक्यता असते, आणि जितकी जास्त गृहीत तत्त्वे असतील तितकी चूक होण्याची शक्यता जास्त, अशी ही विचारसरणी आहे. म्हणून जर आपल्याला शेवटी एक तत्त्व मानून सबंध जगाची उपपत्ती देता आली तर ती श्रेयस्कर आहे. परंतु जर जगाचे स्वरूपच मुळात द्वैतात्मक असेल तर? म्हणून द्वैताचा निरास करण्याचा प्रयत्न तर करायचाच, पण ते भल्याबुर्या् कोणत्याही मार्गाने ते करायचेच असे मानण्याचे कारण नाही.
‘आता वेदांतात ईश्वर आणि त्याची सृष्टी ह्यांचे द्वैत असल्यामुळे ते अंतिम असू शकत नाही’ असे मानले जाते. ते कदाचित् बरोबर असेलही परंतु ब्रह्म ही एकच गोष्ट सत् आहे असे मानून जगताच्या अवभासाची उपपत्ती देण्याकरिता त्यात माया हे तत्त्व मानावे लागते. मुळात ब्रह्म ही एकमेव वस्तू असताना अनेक जीव कोठून येतात हा प्रश्न आहे. त्यावर उत्तर आहे मायावशात् जीवाचा अवभास होतो? कोणाला? तर फक्त ब्रह्मचअसल्यामुळे त्यालाच अवभास होऊ शकेल. पण शुद्ध चैतन्याला अवभास किंवा भ्रम होतो हे अशक्य आहे. त्यामुळे अद्वैती भूमिकेवरून जीवांच्या अवभासाची आणि त्यांच्या अनेकत्वाची उपपत्ती लागू शकत नाही. त्यामुळे ‘अहं ब्रह्मास्मि’ हा विचार अनुपपन्न ठरतो.
परंतु आगरकर तर म्हणतात की ‘अहं ब्रह्मास्मि हा अनिर्वचनीय विचार धर्मविचाराचा कळस आहे. उलट मला वाटते की इतके अर्थहीन वचन दुसरे क्वचितच सापडेल. या विराट विश्वाचे अंतिम स्वरूप असणारे जे ब्रह्म ते मी आहे असे म्हणण्यातील औद्धत्य स्पष्ट आहे. मी ब्रह्म आहे याचा अर्थ काय? ते खरे कशावरून? आणि तो विचार अनिर्वचनीय आणि अत्युच्च आहे म्हणजे काय? ती एक दुर्बोध, नव्हे अनाकलनीय कल्पना आहे. आणि तिला धर्मविचाराचा कळस म्हणणे यात काही तरी घोटाळा आहे.
धर्मविचार किती निरर्थक आहे हे ते वचन दाखविते या अर्थाने तो धर्मविचाराचा कळस आहे असे तर आगरकरांना अभिप्रेत नसेल?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.