अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी एक जुनी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची पाश्र्वभूमी ग्रामीण महाराष्ट्र ही असली तरी तिचा वापर ग्रामीण तसेच नागरी संदर्भात होत आलेला आहे. एक शेतकरी फार बुद्धिमान होता व आपण आपल्या शेतीची दैनंदिन कामे फार हुशारीने करतो अशी त्याची समजूत होती. शेतीच्या मशागतीसाठी त्याच्याजवळ एक बैल होता. पण इतर सामान्य शेतकर्यांप्रमाणे औताला बैल जुंपण्यापूर्वी हा बुद्धिमान शेतकरी खूप सूक्ष्म विचार करी. त्यामुळे रोज त्याचे काम लांबणीवर पडत जाई व बैल रिकामाच राही. असे होता होता शेतीच्या कामाची वेळ टळल्याने या बुद्धिमान शेतकर्याकची अतोनात हानी झाली आणि बैल मात्र सदैव रिकामाच राहिला!
जीवनात आपणास अशी अनेक उदाहरणे सातत्याने आढळतात. आमच्या आधीच्या पिढीतील आमचे एक नातेवाईक अतिशय तल्लख बुद्धीसाठी प्रसिद्ध होते. बी. ए. लागणित विषय घेऊन (त्या काळी ते शक्य होते) विद्यापीठात प्रथम आले होते. पण बोलता बोलता कोण्या मित्राने म्हटले की, गणित हा तर भरघोस गुण देणारा विषय आहे, तेव्हा पहिल्या क्रमांकाचे कौतुक कशासाठी. झाले! हे गृहस्थ चिडले व पुढे एम्. ए. ला तत्त्वज्ञान विषय घेऊन पुन्हा विद्यापीठात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाले. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना उच्च पदाच्या नोकर्या ही मिळाल्या. परंतु जीवनसंघर्षात ते खर्याा अर्थाने यशस्वी होऊ शकले नाहीत. सदैव वरिष्ठांशी मतभेद व भांडणे, घरामध्ये आईवडिलांशी बेबनाव, पत्नीला व मुलांना अतिरेकी धाक आणि तुटकपणा यामुळे ते अपयशी ठरले. हा त्यांचा स्वभाव आनुवंशिक असावा असे मानण्यास आधार आहे. एवंच “अति शहाणे असूनही जीवनभर त्यांचा बैल रिकामाच राहिला!” असे का व्हावे?
आमचा फलज्योतिषावर मुळीच विश्वास नाही. ग्रहमानामुळे मानवाचे आचारविचार आणि कर्तृत्व प्रभावित होतात व व्यक्तीला एका विशिष्ट प्रकारचे वर्तन करण्याची प्रेरणा ग्रहांच्या त्या व्यक्तीवरील प्रभावामुळे होते हे फलज्योतिषाचे मुख्य सूत्र आहे. हे थोतांड आहे असे प्रतिपादन करीत असतानाच, आम्ही आमचा स्वतःचा एक सिद्धांत कित्येक वर्षांपासून मांडीत आलो आहोत. तो असा की, प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूमध्ये असणार्याल कोट्यवधी मज्जापेशींचे, मज्जातंतूद्वारा आपसात अनुबंध (circuits) असतात व ते व्यक्तिनिहाय भिन्न असतात. प्रत्येक व्यक्तीला बाह्य वातावरणातून मिळणाच्या प्रकाश, ध्वनी, गंध, स्पर्श, चव आदी संवेदनांचे होणारे आकलन व त्यापासून मेंदूत होणारे व्यापार भिन्न असतात. त्यामुळे विशिष्ट संवेदनामुळे प्रत्येक व्यक्तीकडून वेगवेगळी प्रतिक्रिया होते व त्यांचे वर्तनही वेगवेगळे घडते. एक सोपे उदाहरणच घेऊ. वरिष्ठाने (व्यावसायिक अथवा कौटुंबिक संदर्भात) जर काही अपमानास्पद उद्गार काढले तर एखादी व्यक्ती तापटपणाने स्वतःही अपमानकारक दुरुत्तर देईल, दुसरी व्यक्ती बोलणाच्या वरिष्ठाची समजूत घालून राग शांत करण्याचा प्रयत्न करील, तर तिसरी व्यक्ती वरिष्ठाच्या बोलण्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करील. म्हणजे एकाच उत्तेजकाच्या (stimulus) प्रतिक्रिया विविध स्वरूपाच्या होऊ शकतात व या प्रतिक्रियांवरच व्यक्तीच्या भवितव्याचे स्वरूप अवलंबून असू शकते. प्रस्तुत लेखकाच्या जीवनसंघर्षाच्या प्रारंभी त्याला एका वरिष्ठाने सार्वजनिक स्थळी एकेरी नावाने संबोधून वरच्या आवाजात थोडी कानउघाडणी केली होती. लेखकानेही चिडून जाऊन तेवढ्याच मोठ्या स्वरात (लेखकाच्या मते) वरिष्ठाची काढून ठेवली. परंतु हे वर्तन लेखकाला पुढे खूप वर्षे भोवले! त्या प्रसंगी जर लेखकाची प्रतिक्रिया काही वेगळी, सौम्य झाली असती तर त्याचे भोग टळले असते, हे आता समजते!
माणूस असा का वागतो? बुद्धिमान माणसे अशी अगदी वेगवेगळ्या प्रकारे का वागतात? जर केवळ बौद्धिक गुणवत्तेवरच माणसाचे जीवनातील यशापयश अवलंबून असते तर सर्वच बुद्धिमान व्यक्ती जीवनात यशस्वी झाल्या असत्या. परंतु प्रत्यक्षात तसेहोताना दिसत नाही. बुद्धिमत्तेच्या निकषावर डॉक्टर्स, अभियंते, व्यवस्थापक, अधिवक्ते होणार्याध सर्व व्यक्ती समान यश मिळवू शकत नाहीत असे का? यात नशिबाचा, ग्रहमानाचा, नियतीचा भाग आहे काय? केवळ बुध्यंकावरच (I.Q.) यश अवलंबून असते काय? केवळ बुद्धि हाच मानवी वर्तनाचा आधार नसून मानव विशिष्ट परिस्थितीत, संवेदनांची कशी प्रतिक्रिया करतो यावर माणसाचे यश आणि कर्तृत्व अवलंबून असते असे प्रतिपादन आम्ही कित्येक वर्षांपासून करीत आलो. परंतु आमच्या इतर अनेक “फंडांप्रमाणेच हेही एक फॅडचआहे असे आमच्या मित्रमंडळींचे म्हणणे असे. परंतु गेल्या काही वर्षांत आमचे मत सपशेल निरर्थक नाही असा दिलासा देणारे नव्या संशोधनाचे निष्कर्ष वाचून सुखद धक्का बसलाआहे. “व्यक्तीच्या जीवनातील यशाचे गमक त्या व्यक्तीची बौद्धिक गुणवत्ताच नसून त्या व्यक्तीची भावनिक गुणवत्ताही कारणीभूत असते” असा नवा सिद्धांत वाचनात आला तेव्हा, आपण इतकी वर्षे जे म्हणत होतो त्याचा आता इतरत्र स्वीकार होत आहे याचे समाधान वाटले.
I.Q. (Intelligence Quotient) ऐवजी E.Q.अर्थात Emotional Quotient अधिक महत्त्वाचा आहे व त्यावरच व्यक्तींच्या जीवनातील यशापयश अधिक प्रमाणात अवलंबून असते ही कल्पना येल विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ पीटर सालोव व न्यू कॅम्पशायरच्या डॉ. जॉन मेयर यांनी सर्वप्रथम १९९० साली मांडली. नुकतेच या विषयावर डॉ. डॅनियल गोलमन यांनी लिहिलेले “Emotional Intelligence’ हे पुस्तक “बॅन्टम’ ने प्रकाशित केले आहे. १९९५ साली खपाच्या संख्येवरून, नॉन-फिक्शन पुस्तकांच्या, न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या सूचीत या पुस्तकाचा दुसरा क्रमांक आहे!
बौद्धिक गुणवत्ता (I. Q.) आणि भावनिक गुणवत्ता (E.O.) या सर्वस्वी परस्परविरुद्ध गोष्टी मात्र नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक गुणवत्तेसोबतच तिची भावनिक गुणवत्ताही उत्तम दर्जाची असू शकते. पण असे फार कमी प्रमाणात आढळते. मानवी जीवनातील कर्तृत्व आणि यश हे केवळ २०% च बौद्धिक गुणवत्तेवर अवलंबून असते तर ८०% यश भावनिक गुणवत्तेवर आणि काही अंशी व्यक्तीचे सामाजिक स्थान (घराण्याचे स्थान), संधी यांवर अवलंबून असते. बौद्धिक गुणवत्ता उच्च श्रेणीची असून भावनिक गुणवत्ता निकृष्ट असेल तर अशा व्यक्ती, प्राप्त परिस्थितीत हानिकारक प्रतिक्रिया किंवा वर्तन वारंवार करून अपयशी ठरतात. अनुभवाने त्यांच्यात सुधारणा होत नाही असेही आढळते. याचे कारण म्हणजे क्रोध, अहंकार, भय, घृणा, मत्सर या भावना मानवी मेंदूच्या लिंबिक सिस्टिम व अॅमेग्डेला या प्राचीन भागात उत्पन्न होतात. याउलट स्मृती, योजकता, अनुभवांमुळे होणारे प्रशिक्षण, तसेच कृती या गोष्टी मेंदूच्या उत्क्रांत भागात (neo-cortex) निर्माण होतात. मेंदूच्या या दोन भागांना जोडणारे मज्जातंतूंचे सेतू असतात. हे सेतु प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न जाडीचे असतात व हे व्यक्तीच्या जैनिक गुणधर्मावर अवलंबून असते.कोणतीही शारीरिक प्रतिक्रिया किंवा कृती सेरिब्रम या neo-cortex मध्ये प्रारंभ होते व त्यावर या मज्जासेतूंद्वारे लिबिक सिस्टिमचे नियंत्रण असते. ज्या व्यक्तीमध्ये हे मज्जासेतू अधिक बळकट असतात त्या व्यक्तीमध्ये भावनांचे कृतीवर अधिक कार्यक्षम नियंत्रण असते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या भावनांचा कौशल्याने वापर होऊन कृती अधिक संतुलित असते. भावनिक गुणवत्तेचे या प्रकारचे भावनिक कौशल्य, हेच मर्म आहे! कोणत्याही संवेदनासमूहामुळे उत्पन्न होणार्या भावनांची बुद्धीद्वारे तात्काळ दखल घेतली जाऊन योग्य जाणीव अथवा आत्मज्ञान होऊन त्यानुसार शरीर कृती करते. जर बुद्धीला भावना समजल्या तरच व्यक्ती योग्य व अधिक उपयुक्त कृती करू शकते. भावनिक गुणवत्तेचे हेच महत्त्व आहे.
क्रोध, अहंकार, मत्सर, चिंता या भावना जाणून त्यावर बुद्धीचे नियंत्रण ठेवणे हे सर्वांत कठिण असते. त्यामानाने आनंद, दुःख, अपेक्षाभंग यासारख्या भावनांवर नियंत्रण ठेवणे बरेच सोपे असते. सामंजस्य, प्रेम, सहकार्य या भावना भावनिक कौशल्यास सर्वाधिक पोषक असतात व या भावना जीवनातील यशास मोलाचा हातभार लावतात!
उच्च भावनिक गुणवत्तेमुळे (higher emotional intelligence) जीवनातील सगळ्या उलाढालींमध्ये व्यक्ती यशस्वी होते. चांगले पतिपत्नीसंबंध, आर्थिक प्राप्ती, कौटुंबिक स्वास्थ्य, बालांचे योग्य संगोपन, शालेय जीवनातील प्रगती, जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक वर्तन, व्यवसायात सचोटीचे व्यवहार व सहकार्यांनशी मधुर संबंध यासारख्या गोष्टी बौद्धिक गुणवत्तेपेक्षाही भावनिक गुणवत्तेमुळे साध्य होतात असे या संशोधकांचे मत आहे.
भावनिक गुणवत्तेमुळे अथवा भावनांचा कौशल्याने वापर केल्यामुळे शुद्ध बुद्धिनिष्ठ विचारांवर अंकुश लागतो. श्रद्धा, भक्ती या भावनांचा वापर अमर्याद स्वरूपात होऊ लागल्यास, केवळ बुद्धिनिष्ठ विवेकावर (rational thought) अधिष्ठित असलेल्या तत्त्वज्ञानाला शह बसणार काय अशी शंका येते. जीवनात यशस्वी होण्यास विवेकवाद कुचकामी आहे असाही प्रचार होण्याचा संभव आहे. यास्तव “बौद्धिक गुणवत्तेपेक्षा भावनिक गुणवत्ता यशस्वी जीवनास अधिक उपयुक्त आहे” या नव्या सिद्धांताचा किमान विवेकवाद्यांनी विचार करणे आवश्यक वाटते.
अमेरिकेत अगदी बालवाडीपासून विद्यापीठापर्यंतच्या शिक्षणात यापुढे स्टॅनफोर्ड-बिनेट’ चाचणी अथवा “स्कोलॅस्टिक अप्टिट्यूड टेस्ट’ यांसारख्या चाचण्यांऐवजी, E.O. चाचण्या सुरू कराव्यात काय यावर विचार चालू झाला आहे. परंतु I. Q. चाचण्यासारखी सोपी व सुटसुटीत चाचणी अजून विकसित व्हावयाची आहे. पेन्सिल्व्हानिया विद्यापीठातील एक मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्टिन सेल्गिमान यांनी एक प्रश्नात्मक चाचणी तयार केली आहे; परंतु ती केवळ विमा एजंटांच्या निवडीसाठी विमाकंपन्या वापरीत आहेत. परंतु लवकरच विविध समूहांना उपयुक्त अशा विविध समूहांना उपयुक्त अशा भावनिक गुणवत्तामापन चाचण्या विकसित होतील यात शंकाच नाही.
वस्तुतः भावनिक गुणवत्तेच्या महत्त्वाचा नव्याने गाजावाजा करण्याचे कारण नाही. अगदी अॅरिस्टॉटलपासून तर आमच्या महर्षी व्यास, रामदासस्वामी, साईबाबा या सर्वांनीच बुद्धिमत्तेपेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या व निर्णायक असतात हे विविध प्रकारे सांगितले आहेच. आधुनिक काळात व्यवसायप्रशिक्षणाच्या क्षेत्रात डेल कार्नेगीपासून आताचे गुरुजन तोच मंत्र देत आहेत. आपल्या भारतीय कुटुंबामध्येही सदसद्विवेक, धैर्य, निष्ठा, आशा यावर विश्वास ठेवण्याचीच शिकवण दिली जाते. त्यामुळे हे भावनिक गुणवत्तेचे (Emotional Intelligence) चे खूळ पाश्चात्त्य देशांमध्ये आता पसरू लागले तरी ते आम्हाला नवीन नाही. गोलमनचा ग्रंथ कितीही लोकप्रिय झाला, अथवा TIME साप्ताहिकाने या विषयावर प्रदीर्घ लेख (९ ऑक्टोबर १९९५) प्रसिद्ध केला तरी आम्हाला त्याचे फारसे अप्रूप नसावे. कारण आम्ही “बैल रिकामा ठेवणाच्या अति शहाण्यांची” सदैव टिंगलच केली आहे!
डॉ. र. वि. पंडित, पीएच्. डी. (पेन्सिल्व्हानिया)