शारदेच्या माहेरच्या माणसांची तिने सांगितलेली नावे
शारदेने तिच्या खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील, दोन काका आणि दोन सावत्रभाऊ यांची नावे सांगितली आणि त्याप्रमाणेच (पणजोबा सोडून) नावे असणारी वंशावळ प्रा. अकोलकरांनी सादर केली आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याची नीट छाननी होणे जरूर आहे. याबाबत प्रा. अकोलकरांना श्री. आर. के. सिन्हा यांच्याकडून त्यांनी मिळविलेली वंशावळ मिळाली आहे. याशिवाय डॉ. स्टीव्हन्सनना प्रो. पॉल यांच्याकडून वंशावळ मिळाली. श्री. सिन्हा व प्रो. पॉल यांचा शारदा केसशी कसा संबंध आला, ही माणसे कोण, त्यांनी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माहितीच्या आधारे तपास केला, अशा प्रकारच्या संशोधनात तपास करताना ज्या काळज्या घ्याव्या लागतात त्याची त्यांना जाण होती का, याची काहीच माहिती प्रा. अकोलकरांच्या शोधनिबंधात नाही. श्री. सिन्हा किंवा प्रो. पॉल यांचीप्रत्यक्ष गाठ घेऊन श्री. अकोलकरांनी ही माहिती मिळवलेली नाही (पान २१२). प्रो. पॉल यांनी चट्टोपाध्याय कुटुंबाचे १८२७ चे वाटणीपत्र पाहिले असा उल्लेख आहे (कुलकर्णी; पान १४४). परंतु या वाटणीपत्रात कुटुंबातील माणसांची नावे कोणती होती, कोणत्या मालमत्तेची वाटणी झाली याची काहीच माहिती प्रा. अकोलकर देत नाहीत. केवळ प्रो. पॉल वाटणीपत्रातील नावे आणि शारदा सांगत असलेली नावे एकच आहेत असे सांगतात असा उल्लेख आहे. तो उल्लेख प्रा. अकोलकर वैयक्तिक रीत्या प्रो. पॉल यांच्यावर श्रद्धा ठेवून सत्य मानू शकतात. पण ही सत्यशोधनाची शास्त्रीय रीत नाही.
श्री. सिन्हा व प्रो. पॉल यांना श्री सतीनाथ चट्टोपाध्याय यांच्याकडून वंशावळ मिळाली. या वंशावळीत फक्त पुरुषांचा उल्लेख आहे, स्त्रियांचा (पर्यायाने शारदेचा) उल्लेख नाही. हे श्री. सतीनाथ चट्टोपाध्याय कोण, ही वंशावळ त्यांच्याकडे कशी आली हे प्रश्न उपस्थित होतात. कारण वंशावळीत त्यांचे नाव नाही आणि वंशावळीतील कोणी त्यांचे नातेवाईक असल्याचा शोधनिबंधात उल्लेख नाही. याशिवाय शोधनिबंधात (अकोलकर, पान २३१) पुढील वाक्य येते. ‘The genealogical table in possession of Mr. Ashoknath Chattopadhyaya of Calcutta mentions the titles they held.’ अशोकनाथ हे कैलासनाथ (शारदेचा सावत्रभाऊ) यांचे पणतू. यांना कोणी व कसे शोधले, त्यांच्याकडील वंशावळ प्रा. अकोलकरांकडे कशी आली याचा काहीच उलगडा शोधनिबंधात नाही. याशिवाय शोधनिबंधात (अकोलकर, पान २४०) श्री. कामाक्ष चट्टोपाध्याय यांनी आपल्या पणजीच्या काळात कुटुंबातील एक बाई साप चावून मेल्याचे ऐकले आहे असे सांगितले अशी माहिती दिली आहे. हे श्री. कामाक्ष चट्टोपाध्याय कोण? शारदेच्या माहेरची म्हणून जी वंशावळ दिलेली आहे (अकोलकर, पान २३१) तिच्यात यांचा काहीच उल्लेख नाही. ते शारदेच्या वंशातील कोणाचे नातेवाईक होते अशी माहितीही दिलेली नाही.
शारदेने दिलेली नावे आणि तिच्या माहेरच्या वंशावळीतील नावे जुळतात खरी, पण याबाबत एक मोठी गफलत झाली आहे. श्री. सिन्हांनी ५ मे ते ७ जून १९७५ या काळात बंगालमध्ये जाऊन वंशावळ व इतर माहिती मिळवली आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रा. अकोलकरांना पाठविली (अकोलकर, पान २१२). सिन्हा बंगालला जाण्याआधी शारदेला तिच्या खापरपणजोबांपासून सावत्र भावापर्यंत सर्वांची नावे विचारण्यात आली नव्हती. सिन्हा बंगालमधून आल्यावर लगेच त्यांनी ही नावे शारदेला विचारली नाहीत. जून ते ऑक्टोबर १९७५ या काळात अनेक दिवस उत्तरेची शारदावस्था असल्याची माहिती प्रा. अकोलकर (पान २२४) देतात. या काळात उत्तरेला वंशावळीतील राहिलेली नावे विचारण्यात आली नाहीत, तर वंशावळ मिळाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी, १३ । ऑक्टोबर १९७५ रोजी तिला आजोबांची व भावांची नावे विचारण्यात आली. या मधल्या चार महिन्यांत वंशावळीची माहिती गुप्त ठेवली गेल्याचा कोणताही दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी शारदेसमोर नाही तरी उत्तरेसमोर वंशावळ सांगितली गेली असणे शक्य आहे. कारण उत्तरा आणि शारदा ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे (एकमेकांशी संबंध नसलेली)आहेत असेच सर्व संबंधितांचे मत. परंतु प्रा. अकोलकरांनीच नंतर आपल्या शोधनिबंधात (पान २३९) उत्तरेच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शारदेच्या व्यक्तिमत्त्वाचा (स्मरणशक्ती धरून) काहीसा परस्पर संबंध होता असे सविस्तर मांडले आहे. त्यामुळे पुढीलप्रमाणे घडले असणे सहज शक्य आहे – शारदेने माहेरची म्हणून काहींची नावे सांगितली. त्याला अनुसरून एक वंशावळ श्री. सिन्हांना मिळाली. त्यात इतरही अनेक नावे होती. ही नावे गुप्त ठेवली नाहीत किंवा शारदेला लगेच विचारलीही नाहीत. मध्यंतरीच्या काळात ही नावे उत्तरेला समजली आणि शारदावस्थेत तिने ती सांगितली.
आणखी एक शक्यता आहे. श्री सिन्हा यांच्याप्रमाणेच (त्यांच्या बरोबर की स्वतंत्रपणे याचा उल्लेख शोधनिबंधात नाही) प्रो. पॉल यांनीही ही वंशावळ मिळविली होती. तसेच प्रो. पॉल यांनी चट्टोपाध्याय कुटुंबीयांचे १८२७ मधील वाटणीपत्र पाहिले होते (अकोलकर, पान २१२). या वाटणीपत्रात कुटुंबातील पुरुषांची नावे होती. याबाबत प्रो. पॉल यांनी हुद्दार कुटुंबीयांना पत्राने माहिती दिली होती. १० नोव्हेंबर १९७५ च्या नागपूर टाइम्समध्ये (अकोलकर, पान २३१) प्रो. पॉल यांनी चट्टोपाध्याय कुटुंबीयांच्या वंशावळीबाबत आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला. यावरून १३ ऑक्टोबरच्या आधी प्रो. पॉलमार्फतही वंशावळीचीमाहिती उत्तरेला मिळाली असणे शक्य आहे.
उत्तरेने वंशावळीतील नावे एकदम सांगितली नाहीत ही वस्तुस्थिती आणि वर दिलेला कालानुक्रम प्रा. अकोलकरांच्या नजरेतून सुटलेला दिसतो. परंतु त्यामुळे वाचकांपुढे असे चित्र उभे होते की, शारदेने सांगितलेली वंशावळ आणि श्री. सिन्हांनी मिळवलेली वंशावळ (पणजोबा सोडून) तंतोतंत जुळते आणि यामागे paranormalकारणांखेरीज इतर स्पष्टीकरण शक्य नाही.
शारदेच्या माहेरच्या माणसांबाबत तीन ठिकाणाहून माहिती मिळाल्याचे प्रा. अकोलकरांच्या शोधनिबंधावरून कळते. प्रो. पॉल यांनी पाहिलेले वाटणीपत्र, श्री. सतीनाथ चट्टोपाध्याय यांनी दाखविलेली वंशावळ आणि श्री. अशोकनाथ चट्टोपाध्याय यांच्याकडील वंशावळ. वाटणीपत्रात वारसदारांचे वय लिहिण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. वंशावळीतही शक्य तेवढ्या व्यक्तींचा जन्म व मृत्यू लिहिलेला असतो. नावांप्रमाणेच वयांवरून मिळणारा काळ जुळतो की नाही हा तपास करणे आवश्यक होते. परंतु कोणत्याही ठिकाणाहून वये मिळाल्याचा उल्लेख शोधनिबंधात नाही. याबाबत प्रा. अकोलकरांनी का बरे चौकशी केली नाही? अशा त्रुटीमुळे त्यांना मिळालेल्या माहितीच्या काटेकोरपणाबाबत दाट शंका उत्पन्न होते.
शारदेचा काळ
शारदा कोणत्या काळात अस्तित्वात होती याचे विवेचन प्रा. अकोलकरांनी पाने २३४ व २४०-२४१ वर सविस्तर केले आहे. श्री. प्र.ब. कुलकर्णीच्या लेखात (पान १४१) ‘तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधकांनी तिची आयुर्मर्यादा १८०५ ते २९ किंवा १८०७ ते ३१ अशा कालखंडातील (२४ वर्षांची) असावी असे ठरविले.’ असे ठामविधान येते. शारदेचा काळ ठरविण्यासाठी जी माहिती प्रा. अकोलकरांनी दिली आहे तीच, ग्राह्य मानली तरी वर दिल्यापेक्षा वेगळे अनुमान अधिक सुसंगतपणे काढता येते. शारदेचा काळ ठरविताना खालील मुद्दे प्रा. अकोलकरांनी मांडले आहेत.
१. तिचे १० व्या वर्षी लग्न झाले व लग्नानंतर ती १४ वर्षे जगली म्हणून तिचे आयुष्य २४ वर्षे.
टीप- डॉ. पसरिचा आपल्या पुस्तकात (पान २५५) शारदेचा काळ १८१० ते १८३० असा देतात. यानुसार शारदेचे आयुष्य २० वर्षे होते. एवढ्या प्राथमिक बाबतीतही दोन संशोधकांना समान माहिती मिळालेली दिसत नाही.
२. तिने कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले होते.
टीप- बरद्वान भागात १४ एप्रिल १९२८ व ४ मे १८४० ला खग्रास सूर्यग्रहणे दिसली अशी माहिती प्रा. अकोलकर देतात. यातील पहिले (१८२८) शारदेने पाहिले असावे असे ते म्हणतात. हेच का पाहिले असे मानायचे याची कारणे ३ व४ क्रमांकाच्या मुक्ष्यांशी निगडित आहेत.
३. श्री. रामकृष्ण परमहंस (१८३६ ते १८८६), स्वामी विवेकानंद (१८६३ – १९०२), राणी लक्ष्मीबाई व १८५७ चे बंड याची तिला माहिती नव्हती.
टीप – श्री. रामकृष्ण परमहंसांचा जन्म १८३६ साली झाला तेव्हापासून काही ते प्रसिद्धी पावले नव्हते. ब्राह्मणीने कलकत्त्यात पंडितांची जाहीर सभा घेऊन त्यांना १८६१ मध्ये परमेश्वराचा अवतार म्हणून जाहीर केले. त्यानंतर ते प्रसिद्धी पावत गेले. त्यामुळे १८५७ च्या आधी त्यांचे नाव शारदेच्या कानांवर जायचे काहीच कारण नाही. विवेकानंदांचा तर जन्मच १८६३ चा. यामुळे १८५७ च्या बंडाआधी शारदा अस्तित्वात होती एवढेच अनुमान या माहितीवरून काढता येते. त्यामुळे १८२८ किंवा १८४० या दोहोंपैकी कोणतेही एक सूर्यग्रहण शारदेने पाहिले असणे शक्य आहे.
४. शिवणाचे यंत्र व फोटोग्राफ तिने पाहिले नव्हते.
टीप – सैनिकांचे कपडे शिवण्याचे ‘Large-sized sewing machine’ १८२५ मध्ये कलकत्त्यात आले होते. ते शारदेने बघितले असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ती कधी कलकत्त्याला गेलेलीच नाही. घरगुती शिवणाची यंत्रे (मेरिट कंपनीची) १८५४ला । अमेरिकेत आली. त्यानंतर ती भारतात आली. फोटोग्राफ्सच्या जाहिराती १८४० नंतर कलकत्त्याच्या वृत्तपत्रांत येऊ लागल्या. त्यामुळे कलकत्यापासून दूर आयुष्य गेलेल्या शारदेने १८५७ पर्यंत फोटो न पाहिले असणे सहज शक्य आहे. (या टोपेतील सर्व माहिती प्रा.अकोलकरांच्या शोधनिबंधातीलच आहे.)
प्रा. अकोलकरांच्या शोधनिबंधात पान २३४ वर खालील माहिती देण्यात आली आहे. (1) There was no famine or epidemic or flood in her life-time. (2) The Damodar river was in flood in 1823 and again in 1853. (3) The Burdwan epidemic was in 1853. या सर्व गोष्टींचा एकत्र विचार केला तर १८२३ साली शारदा• जन्मलेली नव्हती किंवा अगदी लहान होती, त्यामुळे १८२३ चा पूर तिला आठवत नाही. तिने एकच खग्रास सूर्यग्रहण पाहिले म्हणजे १८२८ मध्येही ती अगदी लहान होती, त्यामुळे तिला ते सूर्यग्रहण आठवत नाही. यावरून हिचा जन्म १८२५ च्या सुमारास झाला आणि १८५३ च्या आधी तिचा मृत्यू झाला. अशाप्रकारे १८२५ ते १८५२ या २७ वर्षांच्या काळापैकी २४ वर्षे शारदा अस्तित्वात होती (खरी असलीच तर) आणि तिने १८४० चे खग्रास सूर्यग्रहण पाहिले हे अनुमान अधिक योग्य वाटते. प्रा. अकोलकरांनी याचा विचारही केलेला नाही. अशाप्रकारे प्रा. अकोलकरांच्या माहितीवरूनच शारदेचे दोन वेगवेगळे कालखंड कल्पिता येतात. मागे उल्लेख केल्याप्रमाणे वंशावळीबरोबर त्या माणसांची जन्म व मृत्युवर्षे मिळवण्यात आली असती तर यावर प्रकाश टाकता आला असता.
शारदा केसवरील आपल्या शोधनिबंधात प्रा. अकोलकरांनी आणखी प्रचंड माहिती दिली आहे व अनेक निष्कर्ष काढले आहेत. त्या सर्वांचा परामर्श येथे घेणे अतिविस्तारभयास्तव अशक्य आहे. परंतु त्यांच्या सर्वच माहितीवर आणि निष्कर्षावर असे अनेक आक्षेप घेता येतात. प्रा. अकोलकरांनी प्रामाणिकपणे, खूप वेळ खर्च करून, अनेक संदर्भ मिळवून शारदा केसचे संशोधन केले आहे. हुद्दार कुटुंबीयांनीही त्यांना प्रामाणिकपणे सहकार्य आणि माहिती दिलेली आहे. मग त्यांनी मिळविलेल्या माहितीबाबत अपुरेपणा (अपरिहार्य नसलेला), माहिती कशी मिळाली, माहिती देणारे कोण, त्यांची विश्वासार्हता काय, याबाबत नेमकेपणाचा अभाव, आपणच दिलेली माहिती वा काढलेली अनुमाने यात निर्विवाद सुसंगती नसणे, कुंडलिनी, योगी यांच्यामागे जाण्यात वाया घालविलेला वेळ (व शोधनिबंधाची पाने) असे अनेक दोष का बरे आढळून येतात? याचे कारण कोणत्याही संशोधनात संशोधक आपले पूर्वग्रह आणि त्यामुळे आपल्या विवेचनशक्तीवर येणारी मर्यादा टाळू शकत नाही. वैद्यकशास्त्रात औषधाची उपयुक्तता तपासताना या प्रकारचे पूर्वग्रह (bias) व त्याचे परिणाम टाळण्यासाठी double blind पद्धतीचा वापर केला जातो. यात औषधे देणारा डॉक्टर व घेणारा पेशंट या दोघांनाही कोणते औषध तपासले जात आहे याची माहिती नसते. Case study मध्ये अशी पद्धत वापरता येत नाही. पण आतापर्यंतच्या अनुभवावरून paranormal शक्तींच्या अस्तित्वावर विश्वास असणारे संशोधक जेव्हा असे संशोधन करतात तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर paranormal वर विश्वास न ठेवणारा सहकारी घेणे जरूर आहे असे सुचवावेसे वाटते. असा सहकारी नसल्याने जरी प्रा. अकोलकरांनी कष्टपूर्वक व प्रामाणिकपणे संशोधन केले तरी त्यांची मूळ वृत्ती paranormal गोष्टींवर विश्वास ठेवणारी असल्याने आपल्याच मांडणीतील कच्चे दुवे ते दूर करू शकले नाहीत.
प्रा. अकोलकरांनी दिलेल्या माहितीवरूनच उत्तरेची शारदावस्था ही एका ऐतिहासिक व्यक्तीचे पुनरुज्जीवन होते हे निर्विवाद सिद्ध होत नाही हे आपण पाहिले. त्यामुळे अर्थातच शारदावस्थेची Extra-Sensory Perception (ESP), बाधा व पुनर्जन्म ही paranormal शक्तींचे अस्तित्व मानणारी स्पष्टीकरणेही कोसळतात. मग उत्तरेला नेमके काय झाले होते? हा सर्व मानसिक आजाराचा प्रकार असू शकेल ही शक्यता प्रा. अकोलकरठामपणे नाकारतात. ‘There is no evidence of mental illness or behavioural abnormality’ असे विधान ते करतात (अकोलकर, पान २४१). उत्तरेचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे पाहिले तर विकृत वाटत नाही, शारदेच्या व्यक्तिमत्त्वातही विकृती नाही. परंतु विकृती नसलेली (वा असलेलीही) दोन किंवा अधिक व्यक्तीमत्त्वे एकाच शरीरात आलटून पालटून प्रकट होणे हीच एक मानसिक विकृती आहे. या आजारास multiple personality disorder किंवा dissociative identity disorder असे नाव आहे. प्रा. अकोलकर यांनीच त्यांच्या पत्रात पाठविलेल्या माहितीवरून Prof. Braunde आणि John Palmer या दोन parapsychologists नी सुद्धा शारदा केसबाबत multiple personality disorder या दृष्टिकोनातून गंभीरपणे विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. Multiple Personality Disorder (MPD) म्हणजे नेमके काय व तिच्या निदानासाठी आधुनिक मनोविकृतिशास्त्राने दिलेल्या निकषात शारदा केस बसते का ते पाहू या.
Multiple Personality Disorder 34. Dissociative Identity Disorder
Psychiatry मध्ये सध्या जगात दोन वर्गीकरणे (classifications of psychiatric disorders) वापरात आहेत. त्यातील एक American Psychiatric Association चे DSM IV आणि दुसरे जागतिक आरोग्य संघटनेचे ICD 10.दोन्ही पद्धतीत काही मानसिक आजारांबाबत फरक दिसून येतो. पण सुदैवाने MPD बाबत दोन्ही वर्गीकरणांमध्ये एकसारखेच diagnostic criteria दिलेले आहेत. ते असे (ICD 10):
A. Two or more distinct personalities exist within the individual, only one being evident at a time.
उत्तरेतही मूळची उत्तरा व नंतर मधून मधून अवतीर्ण होणारी शारदा अशी दोन व्यक्तिमत्त्वे वास करीत होती आणि त्यातील एकच व्यक्तिमत्त्व एकावेळी प्रकट असायचे.
B. Each personality has its own memories, preferences and behaviour patterns and at some time (and recurrently) takes full control of the individual’s behaviour.
उत्तरा व शारदा या व्यक्तिमत्त्वांची स्मरणे, आवडी-निवडी, वर्तणुकीच्या पद्धती अगदी भिन्न होत्या. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे वारंवार आणि पूर्णाशाने प्रकट होत. याचे सविस्तर वर्णन श्री. प्र. ब. कुलकर्णीच्या लेखातही आले आहे.
C. There is inability to recall important personal information which is too extensive to be explained by ordinary forgetfulness.
जरी उत्तरा व शारदा यांचा मेंदू एकच असला तरी उत्तरेला शारदा म्हणून आपण काय बोललो, वागलो, अनुभव घेतले याचे स्मरण नसे आणि शारदेलाही उत्तरेची काही माहिती नसे. शारदेच्या काही वागण्यातून तिला उत्तरेची जाण असल्याचे दिसून येई, असे MPDच्या अनेक केसेसमध्ये आढळून येते. परंतु MPD च्या काही केसेसमध्ये बालपणीचा बराच•कालखंड व्यापणाच्या काही गोष्टींचेही विस्मरण झालेले आढळून येते. आपण बंगाली शिकल्याचे उत्तरेला अशा प्रकारे विस्मरण झाले असेल का?
D. The symptoms are not due to organic mental disorders (e.g. in epileptic disorders) or to psychoactive substance related disorders (e.g. intoxication or withdrawal).
वरील (A, B, C) लक्षणे एपिलेप्सी वा मेंदूच्या इतर रोगांमुळे किंवा मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणार्याण मानसिक आजारांमुळे झालेली नसतात. उत्तरेला कोणताही मेंदूचा रोग नव्हता. तिचा दोनदा EEG (मेंदूचा विद्युत् आलेख) काढण्यात आला होता, तो नॉर्मल होता. ती मादक पदार्थही घेत नसे.
अशा प्रकारे MPD च्या चारही diagnostic criteria शारदा केसला व्यवस्थित लागू होतात. याशिवाय या आजाराची काही आनुषंगिक लक्षणे (associated features)
आहेत. त्यांतील खालील लक्षणे या केसला लागू होतात.
(१) अशा व्यक्तींची hypnotizability व dissociative capacity सर्वसामान्यांपेक्षा जास्त असते. उत्तरेची hypnotizability कोणी तपासली नाही, पण तिला योगनिद्रेत (संमोहनसदृश अवस्था) नेले होते आणि तिला योगनिद्रा शिकविली होती (अकोलकर, पान २२१). ती automatic writing करत असे (अकोलकर, पान २२२),
आणि ती trance अवस्थेत जात असे (पसरिचा, पान २५५). यावरून तिची hypnotizability व dissociative capacity सर्वसामान्यांपेक्षा जास्त आहे असे सूचित होते.
(२) अशा केसेसमध्ये सुरुवातीला (दुसरे व्यक्तिमत्त्व प्रकट होण्याच्या सुरुवातीचा काळ) मूळ व्यक्तिमत्त्वाला दुसर्याु व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भातील वेगवेगळे भास होतात. उत्तरेलाही असे भास व्हायचे (कुलकर्णी, पान १४०, अकोलकर पान २२०, २२१).
(३) MPD मध्ये एका व्यक्तिमत्त्वातून दुसर्या,त जाणे हे काही वेळा सूचनेमुळे होते. उत्तरेला फेब्रुवारी १९७४ मध्ये मा योग शक्ती या साध्वीने ‘घाबरू नकोस आणि तुझ्या आतआहे ते बाहेर येऊ दे असा सल्ला दिला होता (अकोलकर, पान २२१).
(४) दुसर्या व्यक्तिमत्त्वाचे सर्जन होणे हे ताणांवरही अवलंबून असते. उत्तरेमध्ये शारदेचे सर्जन होण्याच्या काळात उत्तरेवर खच्या लग्नास मित्राचा व त्याच्या घरच्यांचा ठाम नकार आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी करायच्या लग्नास तिच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा नकार हे दोन जबरदस्त ताण होते. याचे सविस्तर वर्णन प्रा. अकोलकरांनी केले आहे.
(५) चाळिशीनंतर MPD मध्ये दुसरी व्यक्तिमत्त्वे प्रकट होण्याचे प्रकार कमी – कमी होत जातात. उत्तरेच्या बाबतही हेच होत गेले आहे. प्रा. अकोलकर पान २४१ वर लिहितात, ‘In her 40s the Sharada manifestations became less frequent.
प्रा. अकोलकरांनी मला लिहिलेल्या पत्रात multiple personality व reincarnation या दोन गोष्टी परस्पर व्यावर्तक (mutually exclusive) नाहीत हा मुद्दा मांडलाआहे. तार्किकदृष्ट्या तो बरोबरही आहे. परंतु प्रा. अकोलकरांनी दिलेल्या माहितीची छाननी करता शारदा हे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते हे सिद्ध होत नाही ही गोष्ट आधीच स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे शारदेच्या पुनर्जन्माचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट त्यांनीच दिलेल्या माहितीवरून शारदा केस ही MPD मध्ये निर्विवाद बसते हे दाखविता येते.
श्री. प्र. ब. कुलकर्णी यांची माझ्या ह्या उत्तरावर काय प्रतिक्रिया आहे?
संदर्भ
(1) प्र. ब. कुलकर्णी, ‘खरं पुनर्जन्म आहे?’ आजचा सुधारक, ऑगस्ट १९९५, पान १३९ ते १४७.
(2) V.V. Akolkar, ‘Search of Sharada: Report of a Case and Its Investigation,’ TheJournal of the American Society for Psychical Research, Vol. 86, July 1992,Page, 209-247.
(3) Satwant Pasricha, Claims of Reincarnation, An Empirical Study of Cases inIndia, Harman Publishing House, New Delhi, 1990, Page, 253 – 256.
(4) The ICD-10 Classification of Mental and Behavioural Disorders, DiagnosticCriteria for Research, World Health Organization, Geneva, 1993.
(5) Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, Fourth Edition (DSM -M), Published by the American Psychiatric Association, Washington, DC, 1994.
(6) Comprehensive Textbook of Psychiatry, Sixth Edition, Vol.1, Edited by Kaplan,H. I. and Sadock, B. J., Williams and Wilkins, Baltimore, 1995.
(7) प्रा. अकोलकरांनी २९-८-९५ रोजी मला लिहिलेले पत्र आणि त्यात त्यांनी जोडलेली JohnPalmer यांच्या पत्राची झेरॉक्स प्रत