आजचा सुधारक मासिकाच्या ऑक्टो. ९५ च्या अंकातील लेखातून हिंदुत्व या धार्मिक संज्ञेचा ऐतिहासिक शोध निष्फळ ठरतो याविषयीचा विचार मांडला आहे. राजकीय स्वार्थासाठी हिन्दुत्वाचा जयकार केला जात असेल तर प्रस्तुत लेखकाला या । विषयाची चर्चा करण्याची गरज नाही. पण ज्यावेळी जनजागृतीसाठी धर्मप्रचाराचा अभिनिवेश असतो त्यावेळी असे जाणवते की प्रचाराची माध्यमे ज्यांच्याजवळ आहेत ते कर्मठ आहेत, आणि या कर्मठांनी कोणत्याच समस्येचा अभ्यास केला नसतो. विचारही केला नसतो. कारण धर्मप्रचाराचे नाटक वठविण्यात ते स्वतःला धन्य समजतात. त्यांना मंदिरांविषयी आस्था नसते. कीर्तन-प्रवचनांचा त्यांना कंटाळा असतो. खाजगी जीवनात ते अतिशय अश्रद्ध आणि धर्मातीत असू शकतात. हिन्दुत्वाच्या प्रचारासाठी उतरलेले प्रचारक हे पोशाखी संस्कृतीचे, आणि स्वतःच्या स्वप्नराज्यात अज्ञान पांघरून बसण्यात धन्य समजणारे असतात. प्रस्तुत लेखक आरोप करण्याच्या मनःस्थितीतून हे लिहीत नाही. अनुभवातून आलेल्या नैराश्यातून लिहितो आहे.
हिन्दुत्ववाद्यांनी आता इतिहासाचे पुनर्लेखन सुरू केलेले आहे. इतिहासाच्या अध्ययनाने आधीच परस्परांची मने दुरावली आहेत. हा भारतीय समाज एकसंध आणि सामंजस्याच्या वातावरणात नांदावा अशी प्रामाणिक सुधारकांची इच्छा असेल तर सर्वप्रथम गेल्या पाऊणशे वर्षांत निर्माण झालेल्या इतिहासाच्या ग्रंथांची होळी करणे आवश्यक आहे, आणि अभ्यासक्रमातून हा विषय हद्दपार करणे आवश्यक आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करून इतिहासाच्या पानांवर धार्मिक आणि जातीय संघर्षाचे पाठ वर्गातून शिकविण्यासाठी शब्दांकित होणार आहेत, आणि संघर्ष चालू राहणार आहे. हिन्दुत्ववाद्यांनी इतिहासाचे जे पुनर्लेखन चालू केले आहे त्याचा एक उद्देश म्हणजे आपली परंपरा हजारो वर्षे पूर्वी नेऊन ठेवायची. इथे फारसे बिघडत नाही. ऋग्वेद इ. स. पू. १५०० साली अस्तित्वात असला काय किंवा प्लिस्टोसीन काळाइतका प्राचीन असला काय कोणाचे काही बिघडत नाही. पण परधर्मीयांविरुद्ध द्वेषमूलक आणि निंदाव्यंजक अशा कृतघ्न मनोवृत्तीने इतिहासाचे
पुनर्लेखन करणे हा जो दुसरा उद्देश तो मात्र धार्मिक संघर्ष धुमसत, चिघळत ठेवण्याच्या मनोभूमिकेतून निर्माण झाला असतो. शतकापूर्वीच्या ब्राह्मणी कर्मठ मनोवृत्तीच्या बापाच्या दुष्कृत्याची फळे आज निरपराध पोरगा भोगतो आहे. हिन्दुत्वाच्या प्रचारातून निर्माण होणाच्या परिणामाचे फळ पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहे. त्यावेळी हा प्रचारक त्याच्या कर्मानुसार स्वर्गात वा नरकात असेल.
सामान्य मानवाच्या जीवनात व्रते, वैकल्ये, व्यक्तीचे वा दैवताचे पूजन अपरिहार्य असते. इथेच त्याची धर्मसंकल्पना रुजलेली असते. अठरापगड जातींत विभागला गेलेला तळागाळातील समाज सामंजस्याच्या नात्याने संघटित व्हावा यासाठी सर्वमान्य अशा एकेश्वराचे पूजन, आणि समान आचार-विचाराचे माध्यम आवश्यक असते. तात्पर्य ईश्वरपूजनाधिष्ठित धर्म हाच संघटन मजबूत करण्याचे एकमेव साधन आहे. पण हिन्दुत्वाचा प्रचार करणाच्या प्रचारकाने झोपडपट्टीतील, तळागाळातील मानवाचे मानसिक आणि
आर्थिक प्रश्न समजावून घेतले नसतात. या माणसाचे त्याचे कोणतेच नाते नसते. अशा मानवांनी सामूहिक धर्मांतर करवून घेतले तर हिन्दुत्ववाद्यांना पोटशूळ का व्हावा? आर्थिक अभिलाषेपोटी, पोटासाठी, अस्मितेतून आत्मसंतोषासाठी एखाद्याने धर्माचा त्याग केला तर बिघडले कुठे? झोपडपट्टीपर्यंत जाताना हिंदुत्ववाद्यांच्या पायाला माती लागते आणि जो मातीची पर्वा न करता तळागाळात पोहोचतो तो स्वार्थाकरिता का होईना पण धर्मांतर करवून घेतो. मग घरी बसून ऊरबडवेपणा कशासाठी? हिन्दुत्व हे तर अस्तित्वात नाहीच, अःि त्वात आणायचे असेल तर त्या धर्माची तत्त्वे खालीलप्रमाणे निश्चित करावी लागतील. परंपरेने चालत आलेल्या देवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार, स्वच्छता, समृद्ध रुग्णालये, आणि विद्यालये यांचे प्रामाणिक संचालन, त्यांच्या व्रत-वैकल्याच्या उत्सवात मनापासून सहभाग. इतिहासाचे पुनर्लेखन थंड हवेत बसून करता येते. इतिहासाचे पुनर्लेखन करण्यापेक्षा समाजसुधारकांनी जो श्रमजीवी आणि त्यागमय मार्ग अनुसरला त्याचे मनापासून वाचन आणि अनुकरण करण्याची हिन्दुत्ववाद्यांना गरज आहे. हिन्दुत्ववाद्यांचे धर्मप्रेम हे काही उत्सवाच्या क्षणांत क्षणभर उसळून येते आणि धार्मिक उत्सवाची पूर्ण सांगता होण्यापूर्वीच आटून गेले असते असेही अनुभवास येते.
हिन्दुत्ववाद्यांच्या इतिहासाच्या आकलनातील, आणि जातीजातीतील तेढ वाढविणारे काही शोध लक्षात घेणे आवश्यक आहे. ते शोध असे आहेत.
ताजमहाल हे तेजोमहालय असून ते तथाकथित हिंदूंचे मंदिर होते. या अल्ला बिसमिल्ला’ ही बांग ‘या कुन्देन्दुतुषारहारधवला या श्लोकातून घेतली आहे. बाबराने अयोध्येच्या राममंदिराला भग्न करून मशीद बांधली. हे सर्वच दावे चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र लेखाचा प्रपंच करावा लागेल. पण या कृत्यांसाठी मुसलमान बांधवावर आग पाखडून त्यांच्या श्रद्धास्थानांवर प्रहार करण्यापेक्षा पेशवाईत तथाकथित हिंदूंनी हिंदूवर जे अत्याचार केले त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक वाटेल. म्हणजे मग मुसलमानांना दूषणे देताना इतिहासाचे पुनर्लेखन करणार्यांरच्या माना लाजेने झुकतील.
इंद्राने यतीचे मांस कुत्र्यांना खावयास दिले असा ऋग्वेदात निर्देश आहे.
पुष्यमित्र शुंगाने लक्षावधि बौद्धांची कत्तल केली. बौद्ध मूर्तीवर शेंदराची पुटे चढवून त्यांचा मारुती करून टाकला. शैव वैष्णवांनी परस्परांना अर्वाच्य शिवीगाळ केली. एकमेकांची मंदिरे फोडली अशा तथाकथित हिंदूंनी केलेल्या अत्याचाराच्या कथा इतिहासातून शोधून काढता येतात. बंगाली जनतेवर भोसल्यांनी केलेले अत्याचार अगदी अलिकडच्या काळातील आहेत. १७७१ साली त्रिंबक पेठे यांनी रामानुजाचार्यांचा मठ लुटला. १७७५ साली हरिपंत फडक्याच्या सैन्याने शृंगेरीची मठ लुटला. या लुटीत बायांची अब्रू गेली. ब्राह्मणांची कत्तल झाली. १७९६ साली पटवर्धनांनी करवीरचा मठ लुटलाः (पेशवाईतील ही लूटमारीची यादी म. वा. धोंड यांच्या मराठी लावणी या अभ्यासपूर्ण ग्रंथातून दिली आहे). मठ लुटले याचे दुःख नाही. कारण मठातील अमाप धन आचार्यांनी सर्वसामान्यांची पिळवणूक करूनच संगृहीत केले होते, आणि अलिकडचे शंकराचार्य, आद्य शंकराचार्यांच्या कालखंडापासून कोणतेच जनहिताचे वा धर्मप्रसाराचे कार्य न करता ऐतखाऊ जीवन जगलेले आहेत. या पाश्र्वभूमीचा विचार करता मुसलमानांनी वेगळे केले असे म्हणता येत नाही. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात हिन्दुराष्ट्रवाद, हिन्दुत्व, कल्पनारम्य अशा बेगडी प्रचाराचाच भाग ठरतो. त्यांत संपूर्ण समाजाचे धार्मिक संघटन आणि धर्म-जागरण यासंबंधी प्रामाणिकपणाचा अभाव जाणवतो.
हिन्दुत्वाचा प्रचार आणि हिन्दुधर्माविषयीचे प्रेम हे विशिष्ट पोशाखी समाजातील ज्ञानवंतांनी, विशिष्ट समाजासाठीच मर्यादित करून ठेवले असतात. पुन्हा एकदा पेशवाईचे पुनरुज्जीवन होऊन समाजाचे नेतृत्व विशिष्ट गटांच्या हाती राहावे या दृष्टीने जो प्रचार चालू आहे त्यातून उद्या गारद्यांच्या हातून अनेक नारायणांची कत्तल होण्याची भीती आहे. कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष राजकीय लाभासाठी धर्माचा आश्रय घेणारी व्यक्ती वा संघटना राघोबाच्या मनोवृत्तीची असते. धर्मप्रचार आणि हिन्दुत्वप्रसाराच्या कौतुकात रमणाच्या या देशातील creative minority ची मनोवृत्ती कर्मठ असते.
हिन्दुत्व आणि हिन्दुधर्म यासंबंधी प्रचारकी मते ही स्वातंत्र्यवीरांच्या काळापासूनच धार्मिक संघटनापेक्षा राजकीय संघटना दृढ करण्यासाठी मांडली गेली आहेत. एवढ्यासाठीच ती टीकेचा विषय बनली आहेत. पण ज्याअर्थी सिंधु, हिन्दु हे शब्द ग्रीक इतिहासकारांनी, ब्रिटिश इतिहासकारांनी रूढ केले आहेत त्याअर्थी ह्या संज्ञांमागे असणारी परंपरा इतिहासातून शोधून पाहणे आवश्यक आहे. हिन्दुधर्माचा प्रचार करणार्यां ना प्रथम हिन्दु या शब्दाचा अर्थ सांगावा लागेल. सिंधु ह्या शब्दाचा उच्चारदोषातून हिन्दु हा शब्द निर्माण झाला आहे. सिंधु या शब्दाचे शब्दकोषात अनेक अर्थ दिलेले आहेत. पण सिंधु नदीला सिंधु का म्हणायचे? सिंधूचा अर्थ सागर असाच का लावायचा? उदाहरण द्यावयाचे झाल्यास गंगेचे देता येईल. इंडो-तिबेटी भाषा गटात कोणत्याही वाहत्या प्रवाहाला ‘खोंग’ असे म्हणतात. खोंगाचा संस्कृतमध्ये अपभ्रंश गंगा असा झाला. सिंधु या शब्दाचे घटक वेगळे केले तर सिम् आणि प्पु असे नाम आणि क्रियापद वेगळी होतात. (अशा शब्दच्छलाची संशोधक टरउडवितात याची प्रस्तुत लेखकाला जाणीव आहे. पण या दृष्टीने सत्यान्वेषणासाठी Linguistic Paleontology चा आश्रय घेणे लाभदायक ठरते).
थोडे विषयांतर करून लिहावयाचे झाल्यास असे सूचित करावेसे वाटते की साच्या संज्ञांचा अर्थ संस्कृत भाषेच्या गोतावळ्यातून शोधण्याचा जो दुराग्रह संस्कृत पंडितांनी पोसून ठेवला आहे त्यामुळे सत्याचा अनेकदा अपलाप होतो. संस्कृत ही भाषा उच्चारदोषातून निर्माण झालेली आहे. या भाषेत अनेक बोलीतील शब्द उच्चारदोषामुळे संस्कृत झाले आहेत. गोंडी, मुंडारी, भिल्ली, संथालांच्या बोलीतील अनेक शब्द उच्चारदोषांमुळे संस्कृत झालेआहेत. संस्कृतांत ३० टक्के शब्द भिल्ली बोलीतील आहेत असा संदर्भ R. Shafer यांच्या ‘Ethnography of Ancient India’ या पुस्तकात दिलेला आहे. इराणमधून आलेला पांढरा घोडा म्हणजे अशा संस्कृतात अश्व झाला. आणि तिबेटातून आलेला काळ्या करड्या रंगाचा घूर्त हा भारतात घोडा या संज्ञेत परिवर्तित झाला. सिंधू या शब्दाची फोड संस्कृताच्या शब्दकोषातून होणे शक्य नाही. कारण त्यातील सिन् हा शब्द मुंडारी बोलीतील आहे आणि त्याचा अर्थ चंद्र असा आहे. ऋग्वेदात सिनीवाली नावाची देवता आहे. लोकमान्यांनी वेदांगज्योतिष या ग्रंथात तळटीपेत ती चंद्रदेवता असावी असा तर्क केला आहे. पण लोकमान्यांनी हा शब्द परकीय ठरविला आहे. (वेदांग ज्योतिष, तळटीप पान १४३) सिनीवाली ही चंद्रदेवता आहे आणि त्यात सिन् हाच शब्द दडलेला आहे, तो मुंडारी बोलीतील आहे. संथाल नावाच्या आदिवासी जमातीचे दैवत सिनबोंगा असे आहे. आपल्याला अश्लील भासणारे अनेक शब्द जातीजमातींच्या पवित्र दैवतांची नावे आहे.
सिंधु याचा अर्थ चंद्राला वाहून नेणारी किंवा पांढर्यानशुभ्र हिमातून प्रवाहित होणारी. चंद्रामुळे उचंबळून येणारा सिंधु म्हणजे समुद्र. तसा मुळात तो शब्द सिंमिंदर असा असावा. बॅबिलोनियन संस्कृतीत चंद्रदेवतेला सिन् असे नाव आहे. सिन् शब्दावरून अनेक शब्द परिचयाचे होऊ शकतात सिमगा म्हणजे चंद्राचे गाणे. सिंकर म्हणजेच शंकर, सिंगार म्हणजे चंद्रासारखे दिसणे, ज्याचा अपभ्रंश पुढे शृंगार असा झाला. सिमपासून सिंग हा चंद्रकोरीच्या अर्थाचा शब्द निर्माण झाला आणि चंद्रकोरीचे प्रतीक म्हणून शिंगाची शिरस्त्राणे आदिवासींनी वापरली. त्या शिंगाचा अपभ्रंश संस्कृतात गुंग असा झाला. कपाळावरचे आडवे गंध हे चंद्रकोर सजविण्यासाठीच रेखाटले असते. ज्या मुंडारी जमातीत सिन् विशेष पूजनीय आहे त्या परंपरेतून मुंडावळीच्या स्वरूपात एकतर चंद्राची आकृती भिवईच्या वर रेखाटली जाते किंवा चंद्रकोरीचे शिरोभूषण धारण केले जाते, मुंडावळीचा अपभ्रंश ‘मळवट (भरणे). असा झाला. तात्पर्य हेच की हिन्दुधर्म म्हणजे चंद्रपूजकांचा धर्म. आणि हाच धर्म सिंधूच्या खन्यातील टोळ्यांचा धर्म असावा. कारण सिंधु संस्कृतीच्या उत्खननातून तिथे ज्या पवित्र मूर्तीचे ठसे आढळलेत त्या मूर्ती शृंगधारी असून त्यांच्या आसनाखाली हरिणाची आकृती रेखाटली आहे. चंद्र आणि हरिण यांचा संबंध लोकमानसात आजही जुडून आहे.
मग खरा हिंदु कोण? महाशिवरात्रीच्या काळात त्रिशूल म्हणजे चंद्रकोर खांद्यावरवाहून नेणारा, सांबाची गीते गाणारा आणि चंद्रमौळीच्या नावाने टाहो फोडणारा, रात्र जागून काढणारा महादेवाचा यात्री. ज्यांच्या उत्सवात नवरात्रींना, पूर्णिमेला महत्त्व असते अशा व्रतांचे आचरण करणारे अनुयायी. चंद्र पाहून चतुर्थीचे व्रत सोडणारे व्रती. चंद्रकोर धारण करणारा शंकराचा भक्त. चंद्रकुळात जन्माला आलेल्या श्रीकृष्णाचे भक्त हे खर्याो अर्थाने हिंदु आहेत. याच विचाराच्या दिशेने राम हे हिंदूंचे दैवत ठरू शकत नाही. कारण राम सूर्यवंशी आहे. हिंदुत्वाचे हिंदुधर्माचे जयघोष करणार्यांचना हिंदुधर्म चंद्रपूजेपर्यंतच मर्यादित ठेवणे मान्य नसेल तर हिन्दुत्वाचा आग्रह धरण्याची कर्मठ मनोवृत्ती सोडून द्यावी आणि शैव, वैष्णव, शाक्त परंपरांचे सामंजस्य प्रस्थापित करून भगवान कृष्ण या एकेश्वराची पूजा लोकमानसावर रुजविणारा आणि जातीपातींना विठ्ठलभक्तीच्या व्यासपीठावर एकत्र आणणाच्या भागवतधर्माचे जयघोष चालू करावेत. पण ब्राह्मणाभिमानी वृत्तीला अठरा पगड जातींच्या धार्मिक पंगतीला बसायचे नसते. इतिहासातील चंद्रपूजकांचे हिन्दू म्हणून अस्तित्व नाकारून हिन्दुधर्माचा नाटकी जयघोष चालू असतो. तथाकथित हिंदुत्व ही देवांच्या ‘दीव्य परंपरेचे गोडवे गाणारी असून याच दीव्य (देवानुगामी) परंपरेत ‘सिन्’ म्हणजे चंद्रपूजकांची परंपरा हीन ठरते. (देवांनी चंद्राला बहिष्कृत केले होते अशी कथा पुराणातून रंगविलेली आहेच.) तात्पर्य हिन्दु कोण? या प्रश्नाचे ठोस उत्तर आहे शैव. आणि हिन्दु कोण नाहीत? याचे उत्तर आहे वैष्णव. कारण वैष्णवांची परंपरा सूर्यपरंपरा आहे. हा तर्क ताणला तर रावण हा हिन्दु ठरतो.