नियति, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या सर्व गोष्टी एकाच कुटुंबातील आहेत. पण त्यांपैकी काहींचे संदर्भ आणि अर्थ काहीसे भिन्न आहेत.
नियति (Fate). भविष्यात केव्हा काय घडणार आहे हे पूर्णपणे पूर्वनिश्चित आहे. मनुष्याने काहीही केले त्यापासून त्याची सुटका नाही. उदाहरण म्हणून पुढील गोष्ट देता येईल.
एका मनुष्याला दुपारी बाजारात मृत्यू भेटला आणि म्हणाला : ‘आज रात्री बारा वाजता येतो आणि तो नाहीसा झाला. तो मनुष्य स्वाभाविकच घाबरला, पण काहीतरी हातपाय हलवायचे म्हणून त्याने आपले घोडे काढले आणि त्यावर बसून तो भरधाव वाट फुटेल तिकडे जात राहिला. रात्र पडल्यावर वाटेत एक रिकामे घर पाहून त्याने तिथेच मुक्काम ठोकायचे ठरविले, आणि थोडे खाऊन तो झोपी गेला. रात्री बारा वाजता दारावर थाप पडली. तो जागा झाला आणि दार उघडतो तो मृत्यू समोर उभा. तो म्हणाला, ‘अरे, दुपारी तुला सांगायचेच विसरलो- मी तुला इथे भेटेन म्हणून.’
या गोष्टीत नियतिवादाचे एक उदाहरण सांगितले आहे.
भविष्यात केव्हा काय घडेल हे पूर्वीच निश्चित असते, आणि त्यापासून कोणाची सुटका नाही यापलीकडे नियतिवादाविषयी जास्त काही सांगता येत नाही. प्रारब्धवादात कर्मसिद्धांतानुसार कृतकर्माची फळे माणसांना भोगावी लागतात असे म्हटले जाते, तसे आणखी काही नियतीसंबंधी सांगता येत नाही. :
दैव, नशीब, विधिलिखित यांतही भविष्य पूर्वनिश्चित असण्याची कल्पना आहे. पण प्रारब्धवादात स्वकर्माने आपण बद्ध होतो, विशिष्ट फळांना बांधले जातो तसेकाही येथे असेल असे म्हणता येत नाही. एखाद्या स्वच्छंदी, अरेराव राजाप्रमाणे नशीब, दैव इत्यादींचा व्यवहार असतो. त्यात अर्हतेचा (desert) प्रश्नच उद्भवत नाही.
प्रारब्धाची गोष्ट काहीशी वेगळी आहे असे वर म्हटले आहे. मनुष्यांना आपल्या कर्माची उचित फळे (सत्कर्माची गोड फळे आणि दुष्कर्माची कटु फळे) भोगावी लागतात. या मताला कर्मसिद्धांत हे नाव आहे. कर्माचे एकूण तीन वर्गात कर्मसिद्धांतानुसार वर्गीकरण केले जाते-क्रियमाण, प्रारब्ध आणि संचित. क्रियमाण कमें म्हणजे आपण करीत असलेली कर्मे. यांचा संचय होत असतो आणि तो पूर्वीच्या संचित कर्मामध्ये जमा होतो. संचित कर्मापैकी काहींची फळे भोगण्याकरिता वर्तमान जन्म मनुष्याला प्राप्त झालेला असतो. त्यांना प्रारब्ध कमें म्हणतात. भविष्यात केव्हा काय होईल हे आपण कर्म केल्याबरोबर निश्चित होते असे प्रारब्धवादात म्हटले जाते. आपल्याला गोड फळे हवी असतील तर आपण सत्कर्मे करावीत म्हणजे झाले.
या मतात अडचण एवढीच आहे की सत्कर्म कोणते आणि दुष्कर्म कोणते हे सांगणे कठीण आहे. ते आपल्याला धर्मग्रंथांवरून कळू शकते असे कोणी म्हणेल. पण एका धर्मामध्ये सत्कर्म मानलेले कर्म दुसन्या धर्मात दुष्कर्म मानले जाते. शिवाय एका धर्मापुरता विचार कोणी केला तरी धर्मही बदलतो. त्यात सुधारणा होते. उदा. एका काळी ब्राह्मणांनी मांसाहार करणे दुष्कर्म नव्हते, पण वर्तमान काळी ते निषिद्ध मानले जाते. दुसरे म्हणजे कोणत्या कर्माला कोणती फळे मिळाली आहेत हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. त्याचे एक कार म्हणजे पूर्वजन्मातील कर्माची फळे या जन्मात भोगावी लागतात, परंतु आपण पूर्वजन्मात कोणती कर्मे केली याचे स्मरण कोणालाही नसते. या कारणामुळे प्रारब्धवाद ही एक असत्य उपपत्ती आहे असे म्हणावे लागते.
या सर्व उपपत्तीविषयी लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारे लोकही नियति किंवा भविष्य काय आहे हे सांगू शकत नाहीत. एखादी घटना घडल्यावर हे होणार ही नियति होती’, ‘विधिलिखित हे होते, असे ते म्हणतात. परंतु जी घटना घडेपर्यंत ती नियती होती हे सांगणे शक्य नसते ती नियति होती असे म्हणण्याचे प्रमाण काय? एखादा रोगी दगावल्यानंतर तो मरणारच होता असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार काय? तो दगावणार ही नियति आहे असे घटना घडण्यापूर्वी सांगता आले तर त्याला काही अर्थ आहे. विरोधकाने जर प्रश्न केला की ‘अमुक घटना नियत होती ह्याला प्रमाण काय?’ तर त्याला उत्तर मिळते की ती नियत नसती तर ती घडलीच नसती. या युक्तिवादातील हेत्वाभास स्पष्ट आहे. नियत असणारी घटनाच फक्त घडू शकते अन्य नाही असे त्यात गृहीत धरले आहे. पण हे तर सिद्ध करायचे आहे.
नियति नावाची गोष्ट आहे असे मानणाच्या लोकांना जर विचारले की ‘नियति आहे याला प्रमाण काय?’ तर बहुधा असे उत्तर मिळते की काय घडेल हे आपल्या हातात नाही असा प्रत्यय वारंवार येतो. आपण करायला जातो एक आणि होते भलतेच. जे होते ते टाळण्याचे उपाय अपेशी होतात. आपल्या ध्यानीमनी नसता आपल्याला इष्ट अशा गोष्टीही घडतात. यासर्वांमुळे नियति नावाची गोष्ट आहे असे म्हणावे लागते. परंतु अनेक अवांछित गोष्टी आपला ‘विरोध न जुमानता घडतात, आणि अनेक वांछित गोष्टी आपण प्रयत्न न करताही घडतात याचा अर्थ एवढाच आहे की आपली शक्ती अत्यल्प आहे, आणि निसर्गात अगणित अत्यंत प्रबल अशा कारणांचा व्यापार चालू असतो. सबंध जगात असंख्य शक्ती कार्यरत असतात आणि त्यांच्यामुळे वर्तमान घटना घडत असतात, परंतु या नैसर्गिक शक्तींची आपल्याला जाणीवही नसते. आपल्याला ज्ञात असलेल्या शक्ती समग्र शक्तींचा एक अत्यल्प भाग असतो,आणि त्यामुळे आपल्याला अनपेक्षित अशा इष्ट किंवा अनिष्ट गोष्टी घडताना दिसतात. पण त्यामुळे भविष्यात काय होणार हे नियतीने ठरविलेले असते असे म्हणणे निराधार कल्पना करणे होय.
Determinism किंवा नियमबद्धतावाद
वरील सर्व मतांच्या जोडीला एका मताचा विचार करणे अनुचित होणार नाही. ते मत म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये determinism म्हणतात ते. याला मराठीत ‘नियतिवाद असे म्हणण्यात येते, पण ते चूक आहे. नियतिवाद म्हणजे fatalism. परंतु Determinism म्हणजे नियतिवाद नव्हे. त्याला ‘नियमबद्धतावाद’ म्हणणे जास्त अन्वर्थक होईल. याचे कारण थोड्या वेळाने स्पष्ट होईल.
नियमबद्धतावाद हा एक गंभीर विचार आहे. विज्ञानाने तो गृहीत धरला आहे. अनेक तत्त्वज्ञांनी त्याला मान्यता दिली आहे, आणि आजही देतात. त्या मताचे प्रतिपादन असे आहे की प्रत्येक घटनेला कारण असते. कार्यकारणसंबंध एक-एक संबंध (one – one relation) आहे. कारणकार्य संबंध एक-एक संबंध आहे असे म्हणण्याचा अर्थ एका कारणाचे कार्य एकच आणि एका कार्याचे कारणही एकच. या नियमाच्या कक्षेत मानवांची कर्मेही येतात, कारण कर्मे याही घटनाच आहेत. त्यात फरक एवढाच आहे की मानवांच्या कर्मात इतर अनेक कारणांखेरीज त्यांच्या ईहाशक्तीचाही (will) भाग असतो, तर अन्य घटनांत मानवी कर्तृत्वाचा भाग नसतो. कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही, आणि कोणत्या घटनेचे कारण काय आहे हे निरीक्षणाने, अनुभवाने कळू शकते आणि कारणनियम (causal laws) प्रस्थापित । होऊ शकतात. ह्या मतातून एक निष्कर्ष असा निघतो की जर कोणाला विश्वातील सर्व कारण-नियमांचे ज्ञान झाले, आणि कोणत्याही क्षणी (उदा. वर्तमान) विश्वाची एकूण स्थिती काय आहे हेही ज्ञात झाले, तर भविष्यात केव्हा कोठे काय घडेल हे तो जाणू शकेल. या बाबतीत फ्रेंच गणिती आणि तत्त्वज्ञ लाप्लास (Laplace) याचे वचन प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, ‘Give me the present location and motions of all bodies in the universe, and I will predict their locations and motions through all eternity.” । । नियमबद्धतावाद आणि अगोदर उल्लेखिलेली मते यात हा मोठा फरक आहे की कारण-नियम अनुभवाने आणि निरीक्षणाने ज्ञात होऊ शकतात. अन्यत्र कारणाची भाषा आलीच तरी कशानंतर काय येते, कोणत्या कारणामुळे कोणते कार्य घडते हे कोणालाही कळणेशक्य नसते. भविष्याचे ज्ञान होण्याचे प्राकृत, बौद्धिक उपाय नाहीत. सिद्ध पुरुषांनाच ते मिळू शकते असे म्हणतात. नियमबद्धतावादात अभिप्रेत असणारी कारणे आणि कार्येकोणालाही दिसण्यासारखी असतात.
परंतु नियमबद्धतावादात आधारभूत असणार्या कारणाच्या नियमाची (Law of Causation) स्थिती काय आहे? तो स्वयंसिद्ध आहे असे म्हणता येत नाही. बरे, तो सिद्ध करावा म्हटले तर तेही शक्य नाही, कारण विश्वातील घटनांची संख्या अनंत आहे,
आणि त्या सर्वांना कारणे आहेत हे तपासून पाहणे अशक्य आहे. पण मग त्याच्यावरील वैज्ञानिकांचा विश्वास श्रद्धा नाही काय?
नाही, कारण तो विश्वास अनुभवाला उतरतो आहे. आतापर्यंत लक्षावधि घटनांची कारणे सापडली आहेत, आणि प्रत्यही नवीन घटनांची कारणेही सापडत आहेत. कारणाशिवाय घडलेली एकही घटना अनुभवाला आलेली नाही. काही घटनांची कारणे अजून सापडली नाहीत, पण ती आज नाही उद्या सापडतील ह्या विश्वासाला धक्का बसलेला नाही. उद्या ती सापडल्यावाचून राहणार नाहीत असा विश्वास आहे.
शिवाय कारणे शोधणे आणि इष्ट गोष्टींच्या प्राप्त्यर्थ विशिष्ट कारणांचा उपयोग करणे ही आपली सहजप्रवृत्ति (instinct) आहे. जीवन मुळी कारणाच्या नियमावर आधारले आहे. या नियमाची स्पष्ट बौद्धिक जाणीव आपल्याला नसते. पण आपल्या भोवती घडणार्याा गोष्टी काही कारणांनी घडल्या आहेत, आणि ती कारणे पुन्हा घडली तर त्या घटनाही घडल्यावाचून राहणार नाहीत असा प्रचंड पुरावा आपल्याला सापडतो. जर कारणाचा नियम आपण मानला नाही तर आपले जीवन अशक्य होईल. भूक लागल्यावर जेवल्याने ती शमेल याविषयी आपल्या मनात शंका येत नाही. पण ती आली आणि तिचे निरसन होईपर्यंत जेवायचे नाही असे ठरविले तर आपले जीवनच संपुष्टात येईल.
सारांश, नियमबद्धतावाद हा स्वयंसिद्ध सिद्धान्त नसला तरी तो आपल्या जीवनाचे पूर्वगृहीत आहे हे मान्य केले पाहिजे. कारण सृष्टिज्ञान, एवढेच नव्हे तर आपले जीवनही शक्य होण्याची ती पूर्वअट आहे. अशा विधानाला postulate म्हणतात. ते स्वयंसिद्ध नसते. ते सिद्ध करता येत नाही, पण त्याच्यावाचून आपले क्षणभरही चालू शकत नाही.
पुष्कळदा या विश्वासाला वैज्ञानिकाची श्रद्धा (the faith of the scientist) असे म्हणतात, आणि त्यामुळे ईश्वरादि गोष्टींवरील धार्मिकाची श्रद्धा आणि वैज्ञानिकाची श्रद्धा यांची तुलना करून असे विचारले जाते की जर वैज्ञानिकाला श्रद्धा बाळगण्याचा अधिकार असेल, तर धार्मिकाला आपली श्रद्धा बाळगण्याचा अधिकार का असू नये? या प्रश्नाला उत्तर असे आहे की ते दोन विश्वास एकाच तहेचे नाहीत. वर लिहिल्याप्रमाणे कारणाच्या नियमावरील आपला विश्वास उपजत विश्वास असून तो टाकणे सर्वस्वीअशक्य आहे. तो केवळ वैज्ञानिकाचाच विश्वास नाही. तो सर्व मानवांचा.(त्यांत धार्मिकही आले) विश्वास आहे. उलट धार्मिकाचा ईश्वरावरील विश्वास उपजत नाही, आणि त्याचा त्याग करणे शक्य आहे हे हजारो निरीश्वरवाद्यांनी दाखवून दिले आहे. तो ज्ञान आणि जीवन यांच्याकरिता अपरिहार्य नाही.
नियतिवाद, नशीब, इत्यादि गोष्टी पूर्ण बिनबुडाच्या, अविवेकी श्रद्धेवर आधारलेल्या आहेत हे यावरून स्पष्ट होईल.
१.Law of Causation आणि causal laws यात फरक आहे. प्रत्येक घटनेला कारण असते हा सामान्य नियम म्हणजे Law of Causation आणि अमुक घटनेचे कारण अमुक (उदा. उष्ण होणेआणि मान वाढणे) असे सांगणारा विशिष्ट नियम म्हणजे causal law (कारणनियम).