प्रस्तावना
प्रस्तुत निबंधाचे तीन भाग पाडले आहेत. पहिल्या भागात आगरकरांच्या अगोदरच्या काळात महाराष्ट्रात आर्थिक चिंतनाची स्थिती काय होती हे दर्शविले आहे. दुसन्या भागात आगरकरांच्या निबंधांमधून प्रकर्षाने दिसून येणारे विचारांचे पैलू दिग्दर्शित केले आहेत. निबंधाच्या तिसर्याप भागात त्यांच्या एकूण आर्थिक चिंतनाचे समालोचन करण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) आगरकरपूर्व आर्थिक चिंतन
१८२० च्या सुमारास पेशवाईचे पतन झाल्यानंतरही ब्रिटिशांशी लढाया करून आपले उरलेसुरले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे व ब्रिटिशांना घालवून देण्याचे प्रयत्न चालू होते. उत्तर भारतात हे प्रयत्न बराच काळ चालू होते. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, उत्तरप्रदेश व बिहारमधील उठाव ही त्या प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत. त्याच काळात हिंदुस्थानातील काही व्यक्तींमध्ये व समाजगटांमध्ये इंग्रजी भाषेचे शिक्षण, इंग्लंडमधील संस्थात्मक, सामाजिक, औद्योगिक संरचनांचे आर्थिक विकासात योगदान ह्या विषयीचे आकर्षणआणि हिंदुस्थानातील दारिद्र्य हटविण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो काय ह्याविषयी विचारमंथन चालू होते.
१८५७ हे एकच उदाहरण विचारात घेतले तर असे दिसून येते की त्या उठावाची तयारी निदान १०-१२ वर्षे तरी चालू होत होती व तशी कारणे त्यासाठी निर्माण होत होती. त्याच काळात निदान महाराष्ट्रात तरी ब्रिटिश राज्यपद्धती, शिक्षणपद्धती, ख्रिस्ती धर्म, इंग्रजी भाषा यांच्याशी उच्च वर्ग व मध्यम वर्ग पुरेसा परिचित झालेला होता.
त्या काळात हिंदुस्थानात खर्या अर्थाने तलवारीची लढाई चालू होती ब्रिटिशांना घालविण्यासाठी, तर दुसरीकडे समाजाच्या मनात वैचारिक-सांस्कृतिक संघर्ष चालू होता ब्रिटिश समाजरचना व संस्कृती (तिचा बराचसा भाग) हिंदुस्थानी समाजरचनेत आणि संस्कृतीत सामावून घेण्यासाठी हिंदुस्थानची कृषिप्रधान सामंतशाही मूल्यांवर आधारित राजकीयदृष्ट्या विखुरलेली व विस्कळीत व्यवस्था, ब्रिटिशांच्या यंत्राधारित उत्पादनपद्धती, सामंतवादाशी संघर्ष करून विकसित झालेल्या भांडवलशाहीशी आणि भांडवलशाहीतून झपाट्याने निर्माण झालेल्या बलाढ्य साम्राज्यवादी शक्तीशी असफल लढे देत होती.
ब्रिटिशांनी स्वतःचा आर्थिक विकास व त्यासाठी हिंदुस्थानातून तिथे जाणारा संपत्तीचा ओघ सतत सुरू राहावा, प्रशासन सुलभ व्हावे व हिंदुस्थानी लोकांनी सामान्यपणेब्रिटिश समाजव्यवस्था सर्वांगांनी मान्य करावी म्हणून हिंदुस्थानात इंग्रजी शिक्षण सुरू केले, रेल्वे सुरू केली आणि इंग्रजी शिकलेल्या लोकांकरवी इंग्रजी साहित्य, राज्यशास्त्र, अर्थशास्त्रावरील ग्रंथ यांच्या प्रसारास मदत करणे सुरू केले.
मेकॉलेने हिंदुस्थानात कोणत्या प्रकारची शिक्षणपद्धती असावी ह्याबद्दलचा अहवाल १८३५ मध्ये लिहिला, तो १८३८ मध्ये इंग्लंडमध्ये आणि १८६२ मध्ये हिंदुस्थानात प्रकाशित झाला. १८५७ मध्ये मुंबई आणि कलकत्ता विद्यापीठे स्थापन झाली. त्याच काळात इंग्लंडच्या आर्थिक विकासाच्या आधारावर निर्माण झालेले अर्थशास्त्राचे ज्ञान मराठी भाषेत प्रसृत होऊ लागले होते.
१८४३ ते १८५५ ह्या काळात महाराष्ट्रात इंग्लंडमधील अर्थशास्त्रीय विचारांचा परिचय करून देणारे चार ग्रंथ प्रकाशित झाले. (पहाः चार जुने मराठी अर्थशास्त्रीय ग्रंथः १८४३-५५. सं. दि. के. बेडेकर, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे, १८५९). श्री. रामकृष्ण विश्वनाथ यांनी अॅडम स्मिथच्या १७७६ साली प्रकाशित झालेल्या ‘वेल्थ ऑफ नेशन्स ह्याग्रंथाचा परिचय १८४३ मध्ये हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयी विचार ह्या ग्रंथाच्या रूपाने करून दिला.
१८४९ मध्ये लोकहितवादींनी होरेस विल्यम क्लिफ्ट यांच्या ‘एलिमेंट्स् ऑफ पोलिटिकल इकॉनमी, १८३५, ह्या ग्रंथाच्या आधाराने लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ लिहिला.
१८५४ मध्ये हरि केशवजी सोमवंशी क्षत्रीपाठारे व विश्वनाथ मंडलिक यांचा देशव्यवहार व्यवस्था या शास्त्राची मूलतत्त्वे हा ग्रंथ प्रकाशित झाला. तो श्रीमती जेन मासेंट ह्यांनी १८१६ मध्ये लिहिलेल्या व इंग्लंड व फ्रान्समध्ये त्या काळात प्रशंसा पावलेल्या संवादरूपी कॉन्व्हसेशन्स ऑन पोलिटिकल इकॉनमी ह्या ग्रंथाचा अनुवाद होता.
१८५५ मध्ये कृष्णशास्त्री चिपळोणकर यांचा अर्थशास्त्र परिभाषा हा जॉन स्टुअर्ट मिल यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनमी, १८४८, ह्या ग्रंथाच्या आधारे लिहिलेला ग्रंथ प्रकाशित झाला. संपादकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की चिपळोणकरांनी बहुधा त्या ग्रंथाची १८५२ साली प्रकाशित झालेली तिसरी आवृत्ती उपयोगात आणली असावी. हा अंदाज खरा असेल तर असे म्हणता येईल की इंग्लंडमधील अर्थशास्त्रीय विचारांचा विकास आणि हिंदुस्थानात त्या विचारांचा प्रसार व चर्चा ह्यामधील कालांतर (टाईम-गॅप) झपाट्याने कमी होत होते.
सुमारे १८६० नंतरचा काळ असा दिसतो की ब्रिटिश राज्यव्यवस्थेने आपली राजकीय-लष्करी पकड मजबूत केली होती. हिंदुस्थानातील कायदेव्यवस्था बदलवून ती स्वतःस अनुकूल करून घेतली होती. त्यामुळे हिंदुस्थानातील संपत्तीचा ओघ एखाद्या कालव्याप्रमाणे इंग्लंडकडे वाहत होता. हिंदुस्थानच्या भोवताली राज्यविस्तार करण्यासाठी सुद्धा ब्रिटिश राजसत्ता हिंदुस्थानच्याच तिजोरीचा उपयोग करीत होती. शेतीविकास, सार्वजनिक स्वास्थ्य, रोजगार ह्या स्थानिक जनतेच्या अत्यावश्यक विषयांकडे सरकार सोईस्करपणे डोळेझाक करीत होते. त्यामुळे दुष्काळ, उपोषण-कुपोषण, बेरोजगारी, दारिद्रययांनी जनजीवन ग्रासलेले होते. ब्रिटिश सरकार सांगत असे की आम्ही हिंदुस्थानच्या कल्याणासाठीच राज्य स्थापन केले आहे आणि जिथे ब्रिटिश राज्य असते तिथे कायदा, सुव्यवस्था, शांतता, समृद्धी व प्रगती असते. ब्रिटिशांच्या ह्या दाव्याबद्दलचा भ्रमनिरास व्हावयास १८६० नंतरच्या काळात सुरुवात झाली. विशेषतः १८८० नंतर इंग्लिश भाषा, साहित्य, ब्रिटिश प्रशासन, धोरण, अर्थव्यवस्था इत्यादींशी जवळून परिचय असणारांची एक पिढी उलटून गेली होती. त्यामुळे हिंदुस्थानी समाजात काही बदल करता आले तर हो समाज ब्रिटिशांच्या बरोबरीचा होऊ शकेल, किंबहुना त्यांना मागे टाकू शकेल असाआत्मविश्वास काही विचारवंतांच्या मनांत निर्माण होत होता.
आगरकरांनी आपल्या ३९ वर्षांच्या अल्पायुष्यात १५-२० वर्षे लिखाण केले असे मानल्यास त्यांचा लेखनकाल १८७५-९५ असा येतो. त्याच काळाची ही वैशिष्ट्ये आहेत. त्यात ब्रिटिशांच्या श्रेष्ठतेबद्दलची प्रांजळ कबुली; हिंदुस्थान तितका बळकट नाही याबद्दल खंत, आर्थिक विकास घडवून आणावयाचा असेल तर ब्रिटिशांप्रमाणे नवे तंत्रशास्त्र, कारखान्यांचे किंवा उत्पादनसंस्थेचे संघटन, भांडवलाची निर्मिती, निर्यात व्यापारातून नफा कमावण्याची संधी इत्यादींबद्दलचे ज्ञान, ब्रिटिश राज्यव्यवस्था शोषक आणि दारिद्र्यकारी आहे ह्याबाबतची खात्री व चीड, हिंदुस्थानातील समाजव्यवस्था विकृत रूढींच्या आहारी गेलेली आहे याबद्दल हळहळ व निराशा, या समाजात बदल घडवून तो विकसित व्हावा हीआशा व स्वप्ने इत्यादी भावनांचे मिश्रण दिसून येते.
आगरकरांच्याही आर्थिक जीवनाबद्दलच्या विश्लेषणात आणि आर्थिक चिंतनात वरील सर्व वैशिष्ट्यांचे मिश्रण दिसून येते. त्यांचे चौफेर वाचन आणि स्पष्टोक्ती ह्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीला विशेष धार आलेली दिसून येते.
(२) आर्थिक चिंतनाचे पैलू
आगरकरांच्या लेखांचे म. गं. नातू व दि. य. देशपांडे यांनी संपादित केलेले व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले तीन खंड उपलब्ध आहेत. त्यातील आर्थिक परिस्थितीशी संबंधित लेखांमध्ये आगरकरांनी व्यक्त केलेल्या विचारांचा ऊहापोह येथे केला आहे. त्यांनी आर्थिक स्थितीसंबंधी किमान २२ लेख लिहिले आहेत असे दिसते. प्रस्तुत चर्चेत संदर्भ देताना लेखाचे नाव, खंडक्रमांक आणि पृष्ठक्रमांक दिले आहेत.
सामाजिक स्थित्यंतर
आगरकरांच्या विचारपद्धतीचे एक वैशिष्ट्य असे की ते समाजाच्या स्थित्यंतराचा समाजशास्त्रीय आणि उत्क्रांतिवादी दृष्टिकोन स्वीकारतात. त्यातून त्यांना समाजाचे जे चित्र दिसते त्याची ते स्पष्टपणे मांडणी करतात. उदाहरणार्थ, ते म्हणतात की सामाजिक स्थित्यंतरात “मांस, स्तन्य आणि धान्य ह्या उपजिविकेच्या साधनांमध्ये पहिल्यापेक्षा दुसन्यास व दुसन्यापेक्षा तिसन्यास अधिक श्रम, आत्मसंयमन व दूरदृष्टी लागते.
मनुष्याशिवाय इतर प्राणी गोपाल किंवा कृषीवल होऊ शकत नाही.” (‘समाजोत्कर्षाचा एक मुख्य घटक-व्यापारवृद्धी, १:६६). त्यामुळे समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत ह्या तिन्ही गुणांचे महत्त्व त्यांनी अचूकपणे हेरले होते. विकासप्रक्रियेत ऐतिहासिक दृष्ट्या काही समाज पुढे जातात व काही मागे ढेपाळतात. त्यांत आप-पर-भाव न ठेवता आगरकर सांगतात की सध्या आम्हा निरुद्योगी हिंदू लोकांची उद्योगी इंग्रज लोकांशी गाठ पडली आहे. तेव्हा एकतर आम्ही त्यांच्यासारखा उद्योग करण्यास शिकले पाहिजे, किंवा ते ज्या स्थितीत ठेवतील त्या स्थितीत राहण्यास सिद्ध झाले पाहिजे.” (तत्रैव, १:६८).
विविध समाजांच्या विकास-प्रक्रियेत आणखी एक मुद्दा महत्त्वाचा असतो, तो म्हणजे समाजात (किंवा श्रमबळात) उत्पादक वर्गाचे प्रमाण किती आणि अनुत्पादक वर्गाचे किती? श्रमबळाचे हे विभाजन अंडम स्मिथपासून (१७७६) चालत आलेले आहे. अॅडम स्मिथ यांनी अतिरिक्त मूल्य (सरप्लस व्हॅल्यू) निर्माण करणारे ते उत्पादक श्रम आणि इतर अनुत्पादक श्रम असतात असे म्हटले. मार्स यांनी अतिरिक्त मूल्य निर्माण करणारा पायाभूत वर्ग आणि त्या आधिक्याचा वाटा घेणारे इतर वर्ग समाजातल्या इमल्याचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले. आगरकर त्या अभिजात अर्थशास्त्राच्या जवळचेच वर्गीकरण वापरून मत व्यक्त करतात की मनुष्याच्या उद्योगाचे दोन भेद आहेत, एक नियामक व दुसरा उत्पादक.
ज्या देशात थोडासा नियामक वर्ग व मोठा उत्पादक वर्ग असेल तो देश सुखी असतो (उदाहरणार्थ, अमेरिका व त्या खालोखाल इंग्लड व फ्रान्स). उत्पादक उद्योग करण्याची हौस सर्वत्रिक होऊन संपत्ति व व्यापार वाढल्याशिवाय सर्वांस चैन तरी कोठून करता येणार? फ्रेंच राज्यक्रांतीचे एक कारण अंमलदारांचा सुळसुळाट. नियामकांसाठी देशाच्या प्राप्तीचा मोठा वाटा जातो व त्यांच्या जुलुमामुळे लोकांची त्यांचे उत्पन्न करण्याची इच्छा मंदावते. ह्या (नियामकांची) सर्वांची जास्त संख्या होण्यात कष्टाळू रयतेचा तोटा आहे.” (तत्रैव, १:६९).
आगरकरांची ही जाण समाजाच्या संरचनेबद्दलच्या त्यांच्या जागरूकपणाची साक्ष देते.
हिंदुस्थानचे आर्थिक शोषण
आगरकरांच्या काळापर्यंत ब्रिटिश राज्यव्यवस्था हिंदुस्थानाचे शोषण करते आणि ब्रिटिश राज्याच्या तथाकथित फायद्यांपेक्षा शोषणापासून होणारे तोटे अधिक आहेत हे अनेक अभ्यासक देशवासीयांच्या विचारार्थ पराकाष्ठेने मांडीत होते. आगरकर त्यांपैकी एक होत.
तत्कालीन माहितीचे संकलन करून आगरकर म्हणतात की “हिंदुस्थानच्या.. उत्पन्नापैकी सुमारे दोन तृतीयांश उत्पन्नापासून आम्हास कवडीचाही मोबदला नाही. हे सुमारे १०० वर्षे चालू आहे … या देशाच्या द्रव्याला हा पाझर लागला आहे. हा क्रम पाच-पंचवीस वर्षे असाच चालू राहिला तर सध्याची अन्नान्न दशा वाढून माणसे माणसांस खाऊ लागतील.” (‘गुलामांचे राष्ट्र : १:१६५-६६).
आगरकर पुढे म्हणतात की त्यांनी स्वकीय व्यापार्यांगच्या फायद्यासाठी जे कायदे केले आहेत व जी राज्यपद्धती येथे घातली आहे, त्या कायद्यांमुळे व राज्यपद्धतीमुळे… आमचेअनिर्वचनीय नुकसान होत असून त्यांच्या शंभर वर्षांच्या अंमलात आमचे प्राण आमच्या डोळ्यांत येऊन ठेपले आहेत.” (‘हिंदुस्थानास क्षय लागला”, २: ७-८). “हिंदुस्थानात प्रत्येक इसमापाठीमागे वार्षिक उत्पन्न सारे २० रुपये आहे!… या वीसांपैकी १५ रुपये तरी आमच्या पोटांत जात असतील की नाही, याचा संशय आहे!” (‘वाचाल तर चकित व्हाल,२:१२)
दादाभाई नौरोजींनी त्याच काळात ब्रिटिशांचा जो दावा होता की हिंदुस्थानात लोकांचे कल्याण वाढत आहे. तो फोल आहे हे स्वतःच्या पुस्तकाच्या शीर्षकातून व्यक्त केले होते. त्यांच्या ग्रंथाचे शीर्षक होतेः पॉव्ह अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. त्यात दादाभाईंनी हिंदुस्थानच्या शोषणाचा पाझर सिद्धान्त मांडला होता व आगरकरांनी दादाभाईंचा संदर्भ देऊन लोकांचे लक्ष त्याकडे वेधले होते. आगरकरांनी ब्रिटिशांची राज्यपद्धती व कायदे तेथील व्यापार्यांयच्या फायद्यासाठी होते हे नोंदवून ती एकप्रकारची ‘व्यवस्था होती हे दर्शविले होते. त्या व्यवस्थेलाच आपण वसाहतवाद असे म्हणतो.
मात्र आगरकर ब्रिटिशांना धारेवर धरत नाहीत. त्यांना सरळ दोष देत नाहीत तर उलट त्यांची बाजू मांडतात व त्यांच्याकडून अंतिमतः काही गैर होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतात. ते म्हणतात की “…..तर ….. त्यांना हिंदुस्थानचे राज्य सोडावे लागेल,…. पण ब्रिटिश पार्लमेंट व मुख्यत्वेकरून इंग्लंडचे सदस्य लोक असा प्रसंग येऊ देतील असे आम्हांस वाटत नाहीं. आंग्लभूमीच्या कुशीत मेकॉले, रिपन, ब्राइट, बँडला किंवा ह्यूम यासारख्या धीरोदात्त पुरुषांचे जनन होण्याची अक्षमता उत्पन्न झाली नसेल, व उत्तरोत्तर तिच्या पुण्य गर्भाशयांत अशा प्रकारच्या सात्त्विक आत्म्यांची अधिकाधिक धारणा होत जाणार असेल, तर इंग्लंडचा राज्यविस्तार संकुचित होण्याचे, व आमचे राष्टूजीवित नष्ट होण्याचे भय नाहीं इतकेंच नाही, तर आमच्या या राज्यकर्त्या इंग्लिश लोकांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या, भूतदयेच्या व उदाहरणाच्या साहाय्याने आम्ही आपल्या सांप्रत अत्यंत शोचनीय स्थितींतून हळूहळू बाहेर पडून कांहीं शतकांनी इंग्लिश लोकांच्या बरोबरीचा सुखोपभोग घेऊ लागू….” (‘हिंदुस्थानास क्षय लागला’, २:८-९). स्वतःच्या देशातील लोकांवर कडाडून हल्ला चढविणारे आगरकर ब्रिटिशांच्या बाबतीत मात्र म्हणतात की “आजपर्यंत त्यांच्याकडून आमच्या कल्याणाकडे जे दुर्लक्ष झाले आहे, ते त्यांच्या नजरचुकीने झाले आहे. त्यांना कळूनवळून झालेले नाही. म्हणून त्यांच्या नजरेस त्यांचे प्रमाद आणून ते दूर करण्याविषयी त्यांची आग्रहपूर्वक प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य आहे.”(‘वाचाल तर चकित व्हाल,२:११).
ब्रिटिशांची व्यापारनीती ओळखणारे व ती शंभर वर्षांपासून तशीच चालू आहे असे म्हणणारे आगरकर जेव्हा राज्यकर्त्यांकडून होणारे दुर्लक्ष केवळ ‘नजरचुकीने होत आहे असे म्हणतात तेव्हा त्यांच्या या दोन विधांनांमध्ये विसंगती आहे असे वाटू लागते.
दारिद्र्यावर खरा उपाय दीर्घोद्योग
परंतु वरील विसंगतीचे रहस्य काही प्रमाणात वेगळे आहे. आगरकरांच्या मतेहिंदुस्थानच्या दारिद्र्याचे मुख्य कारण ब्रिटिश राजवट नसून स्थानिक लोकांचे अज्ञान, आळस, संघटन कौशल्याचा व उद्योजकतेचा अभाव ही होती. ही कारणे दूर झाल्याशिवाय हिंदुस्थानातील दारिद्र्य हटणार नाही अशी त्यांची खात्री होती.
हिंदुस्थानास क्षय लागला या निबंधात ब्रिटिशांच्या अनुभवाच्या व उदाहरणाच्या साहाय्याने आम्ही आमच्या शोचनीय स्थितीतून बाहेर पडू असे म्हणत असतानाच आगरकर म्हणतात की “हे ऐंशी टक्के आमचे आम्हांवर अवलंबून आहे.” (२:९). आगरकर हिंदुस्थानच्या दारिद्र्याच्या दोषाची वाटणी कशी करतात हे वरील उदाहरणाने दिसून येते. ते पुढे म्हणतात की “दीर्घोद्योगादि स्वोन्नतीची जी प्रशस्त साधने आहेत, त्यांचा अंगीकार करून त्यांच्या साहाय्याने आपला इष्ट हेतु साधण्याचा प्रयत्न करणे हेच खास यशाचे चिन्ह नव्हे काय? याप्रमाणे याविषयी आमचे मत असल्यामुळे, अशा प्रकारच्या लेखांत सरकारचे जे दोष दाखविण्यांत येतात ते त्यांच्या नजरेस येऊन त्यांनी ते दूर करावे, हा एक हेतु असतोच; पण तो मुख्य नाही. लोकांच्या नजरेस ते दोष पडून त्यांस आपल्या विपत्तीचीं खरीं कारणे समजावी, आणि ती दूर करून सुखी होण्याची इच्छा उत्पन्न व्हावी, हा त्यांचा मुख्य हेतु आहे.” (इंग्लिश राज्यांत पोटभर अन्न नाहीं,२ः१९, तिरपा टाइप माझा).
व्यापारवृद्धी
ब्रिटिश सरकार त्याकाळी हिंदुस्थानशी व्यापार करून तेथील यंत्रांच्या साहाय्याने उत्पादित झालेल्या वस्तू येथील लोकांवर लादते व जास्त किंमतींच्या द्वारा इथून संपत्ती तिकडे नेते हे कार्यतंत्र सुशिक्षित हिंदुस्थानी लोकांना कळले होते. म्हणून हिंदुस्थानी लोकांनी आधुनिक यंत्रविद्या, तंत्र आणि दीर्घोद्योग करून व्यापारवृद्धी करावी व संपत्ती मिळवावी हा विचार १८४३ पासून लिखित स्वरूपात व्यक्त केलेला आढळतो.
रामकृष्ण विश्वनाथांनी त्यांच्या १८४३ च्या पुस्तकात म्हटले की “ही गोष्ट वास्तविक आहे, की हे होणे इतर व परलोकांचे मदतीवर नाहीं तर हिंदुस्थानांतले लोकांची स्थिति सुधारणे हे त्यांचे स्वाधीन आहे.. यंत्रादि युक्तींचे साहाय्याने जो हिंदुस्थानांत माल उत्पन्न होईल, त्याची बरोबरी कोणाच्यानेही करवणार नाहीं,…. तेव्हां व्यापारापासून लोक कलाकौशल्यांत हुशार अधिक होतात. कारखाने आणि सर्वांचे उद्योगाचे ऐक्य असणे हेच सुधारलेले लोकांत राज्याचे बळ आहे.” (रामकृष्ण विश्वनाथ, ‘हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती, चार जुने मराठी अर्थशास्त्रीय ग्रंथ ह्यात समाविष्ट, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे, १९६९, पृ. अनुक्रमे ३४, ३६ व ३९).
आगरकरही तेच म्हणतात. की “ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे देशाच्या दारिद्र्यहननासाठी होईल तेवढे परिश्रम करण्यास प्रवृत्त व्हावे…” (इंग्लिश राज्यांत पोटभर अन्न मिळत नाही’,२:१९).
समाईक भांडवल व शेतपेढ्या
इंग्लंडच्या व नंतर युरोपच्या विकासाच्या प्रक्रियेत एका व्यक्तीच्या किंवा एकाकुटुंबाच्या मालकीचे भांडवल कमी पडते असे दिसून आले. कारण त्या काळात इंग्लंड व युरोपातील देश यंत्रांच्या साहाय्याने वस्तु उत्पादन करणारे पहिले देश असल्यामुळे आणि सारे जगच त्यांच्यासाठी बाजारपेठ म्हणून उपलब्ध असल्यामुळे उत्पादन जितक्या मोठ्या प्रमाणावर करता येईल तितका नफा अधिक मिळेल अशी स्थिती होती. त्यामुळे व्यक्तिगत भांडवलाऐवजी भाग भांडवल असंख्य लोकांना विकून मोठे सामाईक भांडवल निर्माण करावयाचे आणि मोठी कंपनी चालवावयाची (संयुक्त भांडवली मंडळी किंवा जॉईंट स्टॉक कंपनी) ही उद्योग संघटनांची उन्नतावस्था आहे हे सगळ्यांनी मान्य केले होते.
आगरकरांनी सुद्धा ते सुचविले होते. ते म्हणतात, “युरोपांतील बहुतेक देशांतील मोठमोठ्या कारखान्यांपैकी शेकडा पंचाण्णव कारखाने समाईक भांडवलावर चालले आहेत. लहान लहान हिस्से काढून मोठा फंड उभारण्यांत आणि त्यावर कारखाना काढण्यांत, अनेक फायदे आहेत… मोठे भांडवल असल्याखेरीज मोठा कारखाना निघण्याची शक्यता नाहीं.”
शेतीविकासाकरतासुद्धा आगरकरांनी समाईक भांडवलाची व सर्व प्रकारच्या व्यवस्थापनकौशल्यांच्या पुरवठ्याची संकल्पना मांडली होती. “ज्यांच्यापाशी प्रतिमासीं किंवा प्रतिवर्षी काही नक्त शिल्लक जमते त्यांनी ती सारी सरकारी ब्यांकेंत कोंडून न घालतां आपल्या तालुक्यापुरत्या, जिल्ह्यापुरत्या किंवा इलाख्यापुरत्या लहानमोठ्या शेतपेढ्या काढल्या,….तर……पुष्कळ फायदा होणार आहे, (‘शेतपेढ्या २:३२२-३२३)
तीन अर्थशास्त्रे
आर्थिक विकासाकरिता व दारिद्र्यहननाकरिता आगरकर आर्थिक धोरणाचे (म्हणजे त्या काळच्या अर्थशास्त्राचे) तीन प्रकार मानतातः एक अर्थशास्त्र म्हणजे ब्रिटिश सरकारचे हिंदुस्थानसाठी अंमलात आणलेले धोरण. सरकार हे व्यक्तिस्वातंत्र्यामध्ये विश्वास ठेवते व म्हणून आर्थिक व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करत नाही असे दाखविण्यासाठी व पर्यायाने बळकट ब्रिटिश कंपन्यांना हिंदुस्थानात मुक्तपणे हातपाय पसरवू देण्यासाठी ब्रिटिश सरकार म्हणत असे की आम्ही धोरण म्हणून हिंदुस्थानच्या व्यापाराला उत्तेजन देणार नाही, कारण ती ढवळाढवळ होईल. आगरकर त्याला “निव्वळऔपपत्तिक अर्थशास्त्र” म्हणतात. त्या काळी, देशी उद्योगांना उत्तेजन मिळावे म्हणून देशी मालाशिवाय दुसरा माल वापरू नये, असे म्हणणारा एक वर्ग होता. आगरकर त्याला “मूढांचे भ्रामक अर्थशास्त्र’ असे संबोधतात, आणि सरकारने व लोकांनी वाजवी उत्तेजन देऊन या देशाला इतर देशांशी प्रतिस्पर्धा करण्याचे सामर्थ्य आणावे व मग हवा तसा निष्प्रतिबंध व्यापार सुरू करावा, हे तारतम्य जाणणारांचे प्रयोज्य (तिसरे) अर्थशास्त्र, आगरकर म्हणतात की “ह्या तीन्हींपैकी पहिली दोन एकंदरीने आम्हांस मान्य नाहींत.” (‘तीन अर्थशास्त्रे, २:८३).
(३) समालोचन
आगरकरांच्या आर्थिक निबंधांवरून एक गोष्ट दिसून येते ती अशी की ब्रिटिशांकडून देशाचे सतत शोषण होत आहे हे मान्य करून, अन्नान्न दशा होत आहे असेलिहूनही आगरकर ब्रिटिश राजवटीला विरोध करताना दिसत नाहीत. उलट त्यांचा राज्यविस्तार धोक्यात येऊ नये असे त्यांना वाटत होते. इंग्लंडला “पुण्य ‘गर्भाशय म्हणण्यासही ते तयार होते. हिंदुस्थानच्या दारिद्र्याचे दोषारोपण करताना त्याची केवळ २०% जबाबदारी इंग्रजांवर टाकतात आणि तरीसुद्धा ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडून जावे असे त्यांनी म्हटले नाही. हे त्यांचे स्वतंत्ररीत्या बनलेले मत होते की टिळक आणि इतर मंडळी सतत ब्रिटिशांना हुसकविण्याचे प्रयत्न करतात त्याची प्रतिक्रिया होती हे अधिक अभ्यास करून ठरवावे लागेल.
मात्र त्यांचे तीन अर्थशास्त्रांचे उदाहरण आज (१९९५) च्या स्थितीसही लागू पडते. १९९१ पासूनच्या नव्या आर्थिक धोरणामध्ये भारत सरकारची भूमिका (देशी सरकार असूनही) जवळपास आगरकांनी वर्णिलेल्या पहिल्या अर्थशास्त्रासारखी होती. सरकार सातत्याने विदेशी कंपन्यांसाठी भारताचा बाजार संपूर्णपणे मोकळा करण्यात गुंतले होते. स्वदेशी मालच वापरा असे सांगणारे “मूढांचे भ्रामक अर्थशास्त्र सुद्धा आज चालविले जात आहे. आणि, देशी उद्योगांना प्रोत्साहन द्या, त्यांना जगू द्या आणि उरलेला बाजार विदेशी उद्योगांसाठी खुला करा हे आगरकरांना अभिप्रेत अर्थशास्त्र सुद्धा भारतातील श्रमिक संघटनाआणि एक मोठा गट प्रखर संघर्ष करून सरकारला सांगत आहे. त्यात केवळ काही राजकीय पक्षच आहेत असे नाही, तर त्यांच्याबरोबर प्रयोज्य अर्थशास्त्र ज्यांना “तारतम्याने जाणवतें” असे सर्व लोक आहेत, संघटना आहेत. काहीशा समाधानाची बाब हीच आहे की प्रयोज्य अर्थशास्त्र मानणारांच्या प्रखर विरोधामुळे नाईलाजाने सरकार पहिल्या अर्थशास्त्राकडून तिसर्यार अर्थशास्त्राकडे वळत आहे. १८९५ ते १९९५ ह्या शंभर वर्षांत फरक एवढाच पडला की “परतंत्र हिंदुस्थानांत” आगरकरांनी जे मत व्यक्त केले त्याची रास्तता प्रत्यक्षात आणण्यासाठी किती मोठे संघर्ष करावे लागतात हे “स्वतंत्र हिंदुस्थानांतील लोकांना कळू लागले आहे.
स्वतःच्या दारिद्र्याची किळस आलेल्या व्यक्तीप्रमाणेच आगरकर जेव्हा हिंदुस्थानच्या दारिद्र्याची किळस येऊन “पुष्कळ व्यापार म्हणजे पुष्कळ उद्योग, पुष्कळ उत्पन्न आणि पुष्कळ उपभोग” असे लिहितात तेव्हा ते भोगवादी किंवा चंगळ म्हणून लिहीत नाहीत. “युरोपांतील लोकांशी तुलना करतां आमचे लोक बर्यागच अंशीं बैरागी किंवा रानटी आहेत असे म्हणावे लागेल” असे मत मांडून ह्या सगळ्या लोकांना चांगले जीवनमान मिळावे ह्या कळकळीने ते तसे लिहितात.
समतावादी आणि साम्यवादीही?
स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस मुक्तपणे विचार करू लागला म्हणजे तो आपल्या तर्काच्या शेवटापर्यंत जातो, इतर लोक तेथपर्यंत जाऊ शकत नाहीत. ह्या सत्य परिस्थितीचे त्या विचारवंतास दुःखही होते आणि चीडही येते. आगरकर म्हणतात की “आपल्या देशांतील लोकांस नव्या विचारांची जेवढी भीती वाटते, तशी दुसर्याम कोणत्याहि देशांतील लोकांस वाटत नसेल. उदाहरणार्थ… व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा संपत्तीवरील हक्क नाहींसा करूनदेशांतील साच्या संपत्तीचे लोक समाईक मालक कां न मानावे?” (‘गुलामांचे राष्ट्र, १:१६८६९). आगरकरांच्या ह्या मतावरून त्यांच्या एकूण अर्थचिंतनाची दिशा कोणती होती ते कळून येते.
(आगरकर स्मृति शताब्दी निमित्त नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सादर केलेला निबंध (३०-३१ ऑगस्ट १९९५).)