आपली पृथ्वी विश्वाचा एक लहानसा कोपरा आहे. आणि बाकीचे विश्व इथल्यासारखेच कदाचित् नसेल असे मानायला जागा आहे. अन्यत्र कुठे जीवन असेल हे सर जेम्स जीन्स शंकास्पद मानतात. ईश्वराच्या योजना विशेषतः पृथ्वीशी संबद्ध आहेत असे मानणे कोपर्निकन क्रांतीपूर्वी स्वाभाविक होते, पण आता ती कल्पना अयुक्तिक झाली आहे. जर विश्वाचा हेतू मनाची उत्पत्ती हा आहे असे मानले तर एवढ्या दीर्घ काळात इतके थोडे निर्मिल्यामुळे त्याला काहीसा अकुशल समजावे लागेल. अन्यत्र कुठेतरी केव्हातरी उन्नत मने निर्माण होतील याचा काहीही वैज्ञानिक पुरावा नाही. जीवन अपघाताने निर्माण झाले असे मानणे चमत्कारिक वाटेल, पण एवढ्या विशाल जगात अपघात होणे अपरिहार्य आहे.