ऑगस्ट अंकामध्ये म्हटल्याप्रमाणे मी प्रा. श्याम कुळकर्णी ह्यांच्या पत्रातील काही शिल्लक मुद्यांचा परामर्श घेतो व त्यानंतर ह्या चर्चेचा समारोप करतो. हा विषय आता समारोपापर्यन्त आला आहे असे वाटण्याचे कारण माझा दृष्टिकोन आता वाचकांच्या लक्षात आला आहे असे माझ्या ज्यांच्याज्यांच्याशी भेटी झाल्या त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितले आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
मला अभिप्रेत स्वायत्तता स्त्रियांना ताबडतोब मिळू शकणार नाही ह्याची मला पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच इष्ट त्या दिशेकडे आपली वाटचाल सुरू करण्याची मला घाई झाली आहे, त्याच कारणासाठी आपण सर्वांनी मिळून पुढचा कार्यक्रम ठरविण्याची गरज शिल्लक आहे. आपली प्रगती कितीही सावकाश का होईना, इष्ट दिशेने झाल्याशी कारण! सुधारकाचे कार्य फक्त चर्चा करून पुरे होत नसते.
मागच्या अंकामध्ये श्रीमती प्रमिला मुंजे ह्यांनी लिहिलेला एक लेख लोकसत्तामधूनघेऊन पुनःप्रकाशित केला आहे. स्त्रीमुक्तीच्या ज्या अंगांचा जास्त सखोल विचार व्हावयाला हवा असे काही मुद्दे त्यामध्ये आहेत. गेले वर्षभर आपल्या मासिकामधून स्त्रीमुक्तीविषयीची चर्चा चालू असल्यामुळे तिचाच भाग म्हणून तो लेख मुद्दाम ह्या चर्चेत अन्तर्भूत केला आहे. श्रीमती मुंजे ह्यानी उपस्थित केलेल्या मुद्यांपैकी पुष्कळांचा परामर्श माझ्या पूर्वीच्या लेखांतून घेऊन झाल्यामुळे मी पुन्हा त्यात पडत नाही, मात्र त्यांपैकी स्त्रीमुक्तीचा कुटुंबसंस्थेवर होणारा परिणाम विशद करणारे काही लेख लिहिण्याचे मी योजिले आहे.
आपले आजवरचे कुटुंब हे यदृच्छेने उत्क्रान्त होऊन घडत गेल्यामुळे त्याचे स्वरूप निरनिराळ्या ठिकाणी व काळी निरनिराळे राहिलेले आहे. ह्या अचानक घडलेल्या कुटुंबव्यवस्थेचा किंवा आपल्याच देशकाळामधल्या व आपापल्या जातिधर्मामुळे आपल्या वाट्याला आलेल्या कुटुंबरचनेचा अभिमान सोडून देऊन, मोकळ्या मनाने त्याची सर्वांना कमीतकमी अन्यायकारक होईल अशी रचना यापुढे आपणास मुद्दाम म्हणजे हेतुपूर्वक व प्रयत्नपूर्वक करावी लागणार आहे.
ह्या ठिकाणी एका गोष्टीचा पुन्हा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. आजवर ह्या विषयावरच्या चर्चेत भाग घेणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत एक गोष्ट मी पोचवू शकलो नाही. ती अशी की स्त्रियांची स्वायत्तता ही माझ्या किंवा आणखी कोणा एकाच्या म्हणण्यावरून एक फतवा काढून अमलात येणार आहे, ती परंपरानिष्ठ सामान्यजनांवर लादली जाणार आहे, अशी परिस्थिती नसून लोकांची मने स्त्रीपुरुषांच्या त्या प्रकारच्या आचरणाला आधीच अनुकूल झाली तरच ती वास्तवात येईल. अशी स्थिती, म्हणजे अशा आचरणाला समाजमान्यता आज फक्त काही थोड्या प्रदेशातच आहे. आपल्या देशात ती मुख्यतः हिमालयाच्या पायथ्याच्या अनेक आणि नीलगिरीवरील काही लोकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे आफ्रिका, ग्रीनलंड अशा प्रदेशांतही आहे. अमेरिकेमध्ये किंवा नॉवें स्वीडनसारख्या युरोपातल्या देशांमध्ये आपल्या देशातल्यापेक्षा आज त्यासाठी थोडे अधिक पोषक वातावरण आहे असे दिसत असले तरी तेथे अशा वर्तनाला पूर्ण समाजाची मान्यता मुळीच नाही. तेथे काही अविवाहित किंवा थोड्या सुट्या स्त्रियांचे हे वर्तन चालवून घेतले जाते. पण तो त्यांचा हक्क नाही.आपल्या नवर्यांाचा मार खाणाच्या अमेरिकन स्त्रिया संख्येने खूप मोठ्या आहेत. तेथे संशयी नवरे आहेत, तश्याच संशयी स्त्रिया आहेत. एकमेकांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तहेर आहेत. कॅथोलिकांना घटस्फोट मान्य नाही. त्यामुळे त्यांच्यात नवरा-बायकोच्या खुनांचे प्रमाण अधिक आहे. बलात्कार आणि blackmailing यांपासून तो देश मुक्त नाही. तेथे समाजमान्य बहुपतिकत्व नाही. कोठे तसे लहानसहान गट क्वचित् दिसले, काही थोड्या मॉर्मन्ससारख्या पंथांमध्ये बहुपत्नीकत्व मान्य असले तरी ते सर्वमान्य नाही. स्त्रीपुरुषांचे एकमेकांशी होणारे खाजगीमधले वर्तन हा जो वस्तुतः सर्वानी दुर्लक्षिण्याचा विषय व्हावयास पाहिजे तो तेथेही चघळण्याचा विषयच म्हणणे नाही आहे. म्हणून आजच्या अमेरिकेचा दाखला येथे गैरलागू आहे. आम्ही अमेरिकेच्या वाटेने जावे असे माझे मुळीच म्हणणे नाही.
आपण स्त्रीमुक्तीच्या आमच्या प्रयत्नांत पुढेमागे यशस्वी झालो तर लोक ह्या प्रश्नांकडे आजच्या त्यांच्या चष्म्यातून पाहणार नाहीत. त्यांची नजर आधीच बदललेली असेल. तुम्ही कोणाला आज गुन्हेगार समजता व त्याला समाजबहिष्कृत करता, पण त्यावर खटला चालून तो निरपराध सिद्ध झाला किंवा कायदा बदलला तर त्याकडे पाहण्याची नजर तुम्हाला जशी जाणीवपूर्वक बदलावी लागते तसेच येथे घडवावे लागेल. आज मी ह्या प्रश्नाकडे न्यायाधीशाच्या भूमिकेमधून पाहण्याचा यत्न करीत आहे, कोणत्याही पक्षाच्या वकिलाच्या नाही.
प्रा. श्याम कुळकर्णी म्हणतात की स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य द्यावे म्हटल्यावर पुरुषांनाही ते देणे क्रमप्राप्तच आहे. सध्या बेकायदेशीरपणे हे स्वातंत्र्य उपभोगणार्याल पुरुषाला ते कायदेशीरपणे मिळाल्यास कुटुंबसंस्थेची काय अवस्था होईल ह्याचा विचार न केलेलाच बरा. मला प्रा. कुळकर्णीसारखे वाटत नाही. येथे आपणास विवाह हा संस्कार अथवा विधी आणि विवाहितपणा ही जीवनपद्धती असा फरक करावा लागणार आहे. आपल्या देशात अनेक लोक तो संस्कार न होताच विवाहिताचे आयुष्य जगतात, व तो संस्कार होऊनही अनेक तसे जगत नाहीत. त्यामुळे विवाह आणि कुटुंब ह्या दोन वेगवेगळ्या संस्था मानाव्या लागतात.
हिंदूंच्या विवाहाच्या धार्मिक विधीमध्ये, तो कायदेशीर होण्यासाठी लाजाहोम आणि सप्क्रपदी हे दोन विधी आवश्यक आहेत अशी माझी माहिती आहे. पण ते विधी प्रत्येक लग्नात होत नाहीत. त्यामुळे बेकायदेशीर विवाहांचीच संख्या मोठी असावी. बेकायदेशीर बालविवाह सर्वत्र चालू आहेत. कायद्याप्रमाणे निषिद्ध नातेसंबंध असलेल्याचे विवाह रूढीने चालू आहेत. स्त्रीपुरुष देवळात जाऊन एकमेकांना हार घालतात, टेपरेकॉर्डरवर नुसती मंगलाष्टके ऐकवून व एकमेकांच्या गळ्यांत हार घालून विवाहसमारंभ पूर्ण होतो. (अशा पुरोहिताशिवाये लागलेल्या एका लग्नाला मी स्वतः हजर होतो.) मियांबीबी जन्मभर राजी राहिले, कज्जे झालेच नाहीत तर विवाहसंस्कार कायदेशीर होता की नव्हता ते पाहतो कोण? वारल्यांसारख्या वनवासींमध्ये मुलांच्या लग्नात त्यांच्या आईबापांचे लग्न- तेही धवळेरीने लावलेले- ही फार विरळ अशी घटना नाही. विवाह विधी हा चारचौघांदेखत मुख्यतः संबंधितांसमोर अमके अमके आजपासून पतिपत्नी हे घोषित करण्याचा असतो. बाकी सारे अवडंबर! जेथे सगळेच एकमेकांच्या पूर्वपरिचयाचे असतात तेथे कोणी स्त्रीपुरुष एकत्र राहावयाला लागले की सगळ्या संबंधितांना ते पतिपत्नी झाले आहेत हे सहज समजते. वेगळ्या घोषणेची गरज राहत नाही. त्यांच्या कुटुंबस्थापनेमध्ये ह्या विधीची आवश्यकता त्यांना भासत नाही.
बहुपत्नीक विवाह हा आमच्या प्रदेशात अगदी अलीकडेपर्यंत वैध होता, आणिआजही तो रूढ आहे. तूर्त त्याला कायद्याची मान्यता नसली तरी पुष्कळ ठिकाणी त्याला समाजमान्यता आहे. त्या कायद्यातून अनेक पळवाटा काढण्याचा यत्न बरेच धनाढ्य लोक करीत असतात व त्यात सफल होतात. ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतभरात आहे. त्यामुळे बहुपत्नीकत्व हे कोठेच फारसे निंद्य व निषेधार्ह मानले जात नाही. ह्याउलट बहुपतिकत्व फारच थोड्या प्रदेशात व काही लहान गटांमध्येच मान्य आहे त्यामुळे सगळ्या मोठ्या प्रदेशात ते फार मोठे दुराचरण मानले जाते व आपले लोक त्याची कल्पनाच करू शकत नाहीत. तसा विचार मनात आणणेसुद्धा त्यांना पाप वाटते. ही समाजरचना पुरुषांना पक्षपात करणारी आहे. कायदा कोणताही असो, पुरुषांचे उद्योग पुष्कळसे बिनबोभाट सुरू असतात. पुरुषांच्या बाबतीत ते स्वातंत्र्य कायद्याने मान्य केले तरी आहे त्या परिस्थितीत फार फरक पडणार नाही.
कुटुंबाच्या बाबतीत कायदेशीर, बेकायदेशीर हा प्रश्नच उद्भवत नाही. विधिवत् विवाहसंस्कार झाला नाही तरी कुटुंब कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेच. ते नसते तर पिढ्यांचे सातत्य टिकलेच नसते. बरे विवाहविधी झाल्यामुळे कुटुंब निर्माण होतेच असे नाही. लग्न झाल्यानंतर लगेच नवरा परागंदा झाल्यास अथवा मरून गेल्यास बाईच्या दृष्टीने कुटुंब निर्माण होतच नाही. बाई त्याच्या नावाने कुंकूलावून किंवा पुसून – हातात पोळपाट-लाटणे घेऊन कोणाच्यातरी आश्रयाने जन्म काढते. कारण विवाहविधीचे बंधन तिला. त्याला नाहीच. कधी नवरे पळून किंवा मरून जात नाहीत, पण आपल्या सुशील बायकोला घराबाहेर हाकलून देतात. अशाही वेळी विधीचे बंधन तिलाच! तिला कुटुंबाचे सुख दूरच आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पातिव्रत्य सांभाळण्याची जबाबदारी तिचीच. घरात काय किंवा बाहेर काय कुंपण शेत खायला टपलेले. इतके असूनही परिस्थिती पुरुषांना पक्षपाती आहे हे कोणी मान्यच करीत नाहीत, कारण प्रत्यक्ष श्रीभगवन्तांनी अर्जुनाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः
स्त्रीषु दुष्टासु वाष्र्णेय जायते वर्णसङ्करः ।।
सङकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ।।
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ।।
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।। १.४१ ते १.४४
हे जे सांगितले आहे त्याचे खण्डन भगवंतांनी केले नाही. पुरुषांना ह्या वचनांचा केवढा भक्कम
आधार मिळाला आहे.
माझे थोडे विषयान्तर झाले, पण मला सांगावयाचे आहे ते हे की कुटुंबरचनेसाठीकिंवा कुटुंबस्थापनेसाठी कायदेशीर विवाहाची गरज आहे हा आपला भ्रम आहे. आपल्या देशांमध्ये सध्या तरी कायदे हे फक्त बुजगावण्यासारखे आहेत. जे स्वभावतः भीरू आहेत त्यांच्यावरच त्यांचा (कायद्यांचा) परिणाम होतो. टग्यांचे व्यवहार निर्वेध चालतात.
स्त्रीला नको असलेले स्वातंत्र्य मी त्यांना देऊ करतो आहे म्हणून मी स्त्रीमनाचा कानोसा घ्यावा अशी सूचना प्रा. कुळकर्णी ह्यांनी केली आहे त्या विषयी.
एकतर माझे लेखन अजूनपर्यन्त फार थोड्या स्त्रियांपर्यन्त पोचले आहे. पारतंत्र्याची, नव्हे मनाला गुलामीची सवय झालेल्या, कर्मसिद्धान्ताच्या त्याचप्रमाणे उच्चवर्णीयांच्या संस्कारांच्या बेडीत जखडलेल्या स्त्रियांची मने मला अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्यासाठी अजून तयार नाहीत हे स्पष्ट आहे. तिहाइताच्या, त्रयस्थाच्या तटस्थ दृष्टीने त्यांतल्या बहुसंख्य तर स्वतःच्या परिस्थितीकडे पाहूच शकत नाहीत. ज्या थोडेफार पाहू शकतात त्यांच्या ठिकाणी ही सर्व परिस्थिती बदलण्याचे त्राण नाही, त्या हतबल आहेत, हताश आहेत. काही जितके मिळेल तितके तूर्त पदरात पाडून घेऊ या, आतापासूनच मोठी वादळे कशाला उठवा? असा विचार करीत आहेत. त्याशिवाय माझ्या विचाराला कोणी एखादीने प्रकटपणे पाठिंबा दिलाच तर तिला तिच्या स्वतःच्या भूतकाळामधल्या किंवा भविष्यकाळातल्या वैयक्तिक कृतीचे समर्थन करावयाचे आहे असा गैरसमज बाकीचे लोक करून घेतील अशी भीती वाटते. ह्या प्रश्नाकडे कोणी व्यक्तिनिरपेक्ष (impersonal) नजरेने पाहू शकतो हेही आपल्या सुसंस्कृत समाजाला समजत नाही. तेव्हा अश्या परिस्थितीत त्या उघडपणे माझ्या बाजूने उभ्या राहतील अशी मी अपेक्षा करणे चूक ठरेल.
तरुणपणी ज्यांना वैधव्य आले त्या पुन्हा विवाह करण्यास अनुत्सुक असतात असे निरीक्षण प्रा. श्याम कुळकर्णी ह्यांनी नोंदवले आहे. माझ्या समजुतीप्रमाणे जे निरीक्षण फक्त महाराष्ट्रीय उच्चवर्णीयांबाबत आहे आणि ते त्यांच्या मनावरच्या संस्कारांमुळे आहे. ज्यांचे संस्कार उच्चवर्णीयांपेक्षा भिन्न आहेत अशा नवरगावच्या धनगर स्त्रियांना, मूलगडचिरोलीच्या गोंडांना, खानदेशातल्या भिल्लांना, किंवा कोकणपट्टीतल्या वारली, ठाकर, धोडी, महादेव कोळी, कातकरी स्त्रियांना ते निरीक्षण लागू पडत नाही. आपणाला तर नवे नियम एकजात सर्वांना लागू होतील असे करावयाचे आहेत. त्याशिवाय नवीन नवरा पूर्वीपेक्षाही संशयी असेल का? आपल्या पूर्वीच्या मुलांना तो प्रेमाने व आपलेपणाने वागवील की नाही असे सारेच प्रश्न स्त्रियांना पुन्हा लग्न करण्यापासून नाउमेद करीत असतात.
स्त्रियांच्या ह्या मूलभूत हक्काकडे मी मुख्यतः स्त्रियांनी आपला स्वतःचा छळ होऊ न देण्यासाठी धारण करण्याचे कवच म्हणून पाहतो. आमच्या आजच्या सामाजिक परिस्थितीत त्या सहजभेद्य (vulnerable) आहेत. (आज आपल्या सख्ख्या भावावर भावासारखे प्रेम जरी एखादीने दाखविले तरी तिच्याविषयी संशय घेणारे नवरे आपल्या ‘सुसंस्कृत समाजात आहेत.) म्हणून आपण सारे समस्त स्त्रीजनांना ते कवच सन्मानपूर्वकत्यांचा अधिकार म्हणून प्रदान करू या, त्यांचा वैधव्याचा डाग कायमचा पुसून टाकूया आणि त्याचवेळी आपल्या रक्ताच्या नात्यापुरताच बंदिस्त ठेवलेल्या आपल्या मनातल्या जिव्हाळ्याला मुक्तपणे बाहेर पडू देऊ या.