पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही ही गोष्ट कोपर्निकस व गॅलिलिओ यांनी जगाच्या नजरेस आणून दिल्यास पक्की सव्वादोनशे वर्षे होऊन गेली, तरी आमच्या मते सूर्य व चंद्र एका दर्जाचे ग्रह असून ते पृथ्वीभोवती घिरट्या घालीत आहेत, आमच्या पंचांगांत प्रत्येक पानावर चमकणारे, पण अर्वाचीन ज्योतिषज्ञास मोठमोठ्या दूरदर्शक यंत्रांच्या साह्यानेही अद्याप न गवसलेले राहू व केतू द्विजांस विकल करीत आहेत, शनी वगैरे दूरस्थ ग्रहांचे आमच्याशी अर्थाअर्थी संबंध नसून त्यांची साडेसाती आम्हांस अद्यापि छळीत आहे, सारांश सार्याे ग्रहमालेपुढे आमची पृथ्वी बोराएवढी असूनही आम्ही तिला एका दृष्टीने सर्व ग्रंहांची स्वामिनी आणि दुसन्या दृष्टीने सवौची बटीक करून सोडीत आहो! परिचारकांप्रमाणे चंद्रसूर्यशनिमंगळांनी पृथ्वीच्या भोवती भ्रमण करीत असावे एवढा तिचा प्रताप असे असून सूर्याने आणि त्याच्या मंद पोराने, शुक्राने आणि मंगळाने, राहूने आणि केतूने आमच्या जननीची आणि आमची हवीतशी वासलात लावावी हे आमच्या अत्यंत नीचत्वाचे चिन्ह नाही काय? तात्पर्य, रुढ आचार किंवा विचार खरा असो किंवा खोटा. असो, त्याचे जीवित पराकाष्ठेचे चिकट असते. शेकडो वर्षे त्याच्या टाळक्यात आणि पेकाटात सोटे घालावे लागतात तेव्हा कोठे तो हळू हळू आपला पाय काढता येतो.